पापक्षालनासाठी गांधीजींना करावे लागले गोदास्नान! (Gandhiji had bath in Nasik river Godavari as mark of Repentance)

0
225

महात्मा गांधी अन् नाशिक यांच्यातील नातं अनोखं आहे. बॅरिस्टर झाल्यानंतर त्या महात्म्याला जातीत घ्यायचं की नाही, यावर त्यांच्या गावी पोरबंदरला जातपंचायतीत झगडा सुरू होता. कुटुंबाचा आग्रह जातीत पुन्हा प्रवेश मिळावा असा होता. म्हणून त्या महात्म्याला 1891 मध्ये गोदावरीत स्नान करावं लागलं होतं. मोहनदास हे महात्मा होण्याच्या प्रवासातील बंडाची ती पहिली ठिणगी नाशिकच्या गोदाकाठावर त्यांच्या मनात भडकली होती.

महात्मा गांधी यशवंत पटांगणावरील वसंत व्याख्यानमालेसाठी 1932 मध्ये नाशिकला आले होते. मात्र, गांधीजी त्या व्याख्यानापूर्वी चाळीस वर्षे आधी, म्हणजे 1891 मध्ये गोदास्नानासाठी नाशिकला येऊन गेले होते. त्याची नोंद नाशिककरांच्या पदरी नाही. त्यावेळी ते बॅ. मोहनदास होते. मात्र, खुद्द गांधीजींनी ती नोंद करून ठेवली आहे. मनाविरूद्ध घडलेल्या गोदास्नानाने त्यांच्या मनावर दीर्घकालीन छाप उमटली अन् एका अर्थी, त्यांचा महात्मा होण्यापर्यंतचा प्रवास नाशिकमधून सुरू झाला.

घडले असे की, काठेवाडीतील मोहनदास गांधी हा तरुण मॅट्रिक्युलेशनची परीक्षा 1887 साली पास झाला. मोहनदास यांच्या वडिलांचे त्यापूर्वी निधन झाले होते. मोहनदासने दिवाणपदाची जबाबदारी घेण्यासाठी परदेशात जाऊन बॅरिस्टर व्हावे, असे त्यांच्या वडिलांचे मित्र मावजी दवे यांनी सुचवले. त्या सूचनेस घरातून पाठिंबा होता, मात्र जातीतून विरोध सुरू झाला. समुद्र ओलांडून परदेशी गेल्यावर धर्मभ्रष्ट होतो अशा समजुतीमुळे ज्ञाती (जातपंचायत)मध्ये खळबळ माजली. गांधीजींनी शिक्षणासाठी परदेशात जाणारच हे ठरवूनच जातपंचायतीला उत्तरे दिली. तेव्हा त्यांना जातीबाहेर केले गेले. त्यांना मदत करणाऱ्यांनाही जातीबाहेर काढण्याची धमकी देण्यात आली. गांधीजी त्या सगळ्यावर मात करून, बॅरिस्टर होऊन 1891 मध्ये भारतात परतले. तथापी ज्ञातीचा वाद सुरूच होता, जातपंचायतीत फूट पडली. अखेर, त्यांचा मोठा भाऊ त्यांना पापक्षालनासाठी नाशिकला गोदास्नानासाठी घेऊन आला. गांधी कुटुंबाने दोन्ही भाऊ राजकोटला परतल्यावर जातपंचायतीला भोजन दिले.

गांधीजींच्या अस्थींचे विसर्जन बॉम्बे राज्याचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी केले ते नाशिकच्या गोदावरीतच. ती घटना 9 फेब्रुवारी 1948ची. त्यांच्या नाशिकशी असलेल्या ऋणानुबंधाच्या आठवणी गोदाघाटावरील गांधी ज्योतीतून जाग्या होत असतात.

– रमेश पडवळ 8380098107 rameshpadwal@gmail.com

———————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here