चौतिसावे मराठी साहित्य संमेलन (Thirty fourth Marathi Literary Meet – 1951)

चौतिसावे मराठी साहित्य संमेलन कर्नाटकात कारवार येथे 1951 साली झाले. त्या संमेलनाचे अध्यक्ष अनंत काकबा प्रियोळकर हे होते. त्यांची ख्याती चिकित्सक संशोधक, प्राचीन वाङ्मयाचे विचक्षण अभ्यासक, दुर्मीळ ग्रंथांचे साक्षेपी संपादक अशी होती. ते भाषाशास्त्रज्ञ म्हणूनही प्रसिद्ध होते. पाठचिकित्सा शास्त्रातील सखोल संशोधन हा त्यांचा विशेष प्रांत. त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1895 रोजी झाला. प्रियोळकर यांचे घराणे गोव्यातील फोंड्याच्या प्रियोळचे. ते ‘अरुणोदय बी’ ह्या टोपणनावाने आरंभी कविता लिहित. त्यांनी सुरूवातीला कादंबरीलेखनही केले. त्यांची ‘गोंडवनातील गावगुंड’ ही कादंबरी श्री.व्यं. केतकर यांना उत्तर देणारी होती, पण प्रियोळकर यांचा पिंड हा संशोधनातच रमणारा होता.

त्यांचे चौथीपर्यंतचे मराठी शिक्षण प्रियोळ व असमोडे येथे झाले. त्यांचे मराठीचे शिक्षण घरी शिक्षक ठेवून झाले. पुढे, माध्यमिक शिक्षण फोंडा येथील सरकारी शाळेत झाले. ते अल्मैद महाविद्यालयातून 1918 साली मॅट्रिक झाले. त्यांचे बी ए पर्यंतचे (1923) शिक्षण धारवाड कर्नाटक महाविद्यालय व सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालय येथे झाले. त्यांचा सांगलीला डॉ. पां.दा. गुणे या विद्वान गृहस्थांशी घनिष्ट संबंध आला. त्यांनी त्यांच्या सहवासात भाषाशास्त्राचा आणि पाठचिकित्सा शास्त्राचा अभ्यास केला. त्यांनी जुन्या हस्तलिखिताचे संशोधन आणि संपादन केले. ते मुंबईत 1926 साली आले. त्यांनी ‘विविधज्ञान विस्तारात’ सहसंपादक म्हणून काम केले. शिक्षण खात्यात नोकरी केली.

त्यांनी रघुनाथ पंडितकृत ‘नलदमयंती स्वयंवर’, मुक्तेश्वरकृत ‘महाभारताचे आदिपर्व’, परशुरामपंत तात्या गोडबोले यांच्या ‘नवनीता’चा पहिला भाग व दुसरा भाग, लोकहितवादीकृत ‘निबंधसंग्रह’ यांसारख्या चोवीस दुर्मीळ ग्रंथांचे साक्षेपी संपादन केले. त्यांनी दादोबा पांडुरंग तर्खडकर ह्यांच्या आत्मचरित्राचे संपादन केले आणि त्यांचे चरित्रही लिहिले. तसेच स्वतंत्र लेखन म्हणून ‘प्रिय अप्रिय’, ‘गोमंतकाची सरस्वती’, ‘हिंदुस्थानचे दोन दरवाजे’ यांसारख्या सुमारे तीस ग्रंथांची निर्मिती केली. त्यांनी ‘मराठी संशोधन पत्रिके’चे संपादन 1953 पासून केले. ते मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे सुरू झालेल्या मराठी संशोधन मंडळाचे प्रमुख 1948 ते 1966 पर्यंत होते.

प्रियोळकर यांनी मौलिक असे इंग्रजी ग्रंथलेखन केलेले आहे. द प्रिंटिंग प्रेस इन इंडिया (1958), गोवा री-डिस्कव्हर्ड (1967), द गोवा इंक्विझिशन (1961), ग्रांथिक मराठी भाषा आणि कोंकणी बोली (1966) हे काही ग्रंथ होत. विविध भारतीय भाषांतील मुद्रणाच्या आरंभीच्या अवस्थांचे विहंगमावलोकन ‘द प्रिंटिग प्रेस इन इंडिया’त आढळते. त्यांनी ‘गोवा री-डिस्कव्हर्ड’मध्ये गोव्याकडे आणि त्याच्या सामाजिक-सांस्कृतिक इतिहासाकडे पाहण्याचे उचित यथादर्शन मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सतराव्या शतकात पोर्तुगीजांनी गोव्यातील हिंदूंना सक्तीने करण्यास लावलेल्या धर्मांतराची विस्तृत माहिती ‘द गोवा इंक्विझिशन’मध्ये आलेली आहे. मराठी बोली, ग्रांथिक भाषा व बोली, मराठी बोलीचे यथोच्चार लेखन, कोकणी बोलीची नामांतरे, कोकणी-मराठी भेदभावाचा उद्‌भव व फैलाव इत्यादी विषय ‘ग्रांथिक मराठी भाषा आणि कोंकणी बोली’ या ग्रंथामध्ये विवेचलेले आहेत. कोकणी ही मराठीहून वेगळी भाषा आहे हे मत प्रियोळकर यांना मान्य नव्हते. त्यांनी कोकणी-मराठी वादात मराठीचा हिरीरीने पुरस्कार केला. जेझुइटांनी कोश, व्याकरणे, ओवीबद्ध पुराणे आदींची रचना करून मराठीची जी सेवा केली, तिच्याबद्दल प्रियोळकर यांना आदर होता. गोव्यातील ख्रिस्ती आणि हिंदू ह्या दोन समाजांतील भावनात्मक एकात्मता हा त्यांचा ध्यास होता.

ते संमेलनातील अध्यक्षीय भाषणात म्हणाले, “मराठी हस्तलिखिते गोळा करण्यात अनेक हेतू साध्य होतील. त्यामुळे निरनिराळ्या धर्मांच्या व ठिकाणांच्या लोकांमध्ये महाराष्ट्रीय परंपरेची जाणीव उत्पन्न होऊन सर्व मराठी भाषिकांमध्ये ऐक्य निर्माण होईल.”

त्यांनी मराठी मुद्रणकलेच्या सुरूवातीच्या मराठी ग्रंथांचे अवलोकन करून ‘मराठी दोलामुद्रित’ ह्या नावाने प्रसिद्ध केले. त्यांनी डॉ. भाऊ दाजी लाड ह्यांचे चरित्र लिहिले. त्यांनी आयुष्याच्या अखेरीस आत्मचरित्र लिहिण्यास घेतले होते. त्या आत्मचरित्रात 1925 पर्यंतचा काळ आला आहे. सुभाष भेंडे संपादित अ. का. प्रियोळकर स्मृतिग्रंथात तो भाग समाविष्ट आहे. प्रियोळकर यांच्या समग्र साहित्याची सूची सु. रा. चुनेकर यांनी तयार केली आहे (1973). प्रियोळकर यांच्या संशोधनाबद्दल भीमराव कुलकर्णी म्हणतात, ‘त्यांनी मराठीचे संशोधन ‘Age of Chronicals’ मधून ‘Age of Documents’ मध्ये आणून ठेवले’. ते चित्रकारही होते.

त्यांचे निधन मुंबई येथे 13 एप्रिल 1973 रोजी झाले.

– वामन देशपांडे 9167686695, अर्कचित्र – सुरेश लोटलीकर 9920089488

————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here