झाडीचा हिरा – मानाचा तुरा : हिरालाल पेंटर (Hiralal Painter – Versatile Actor on Zadi dialect stage in Vidarbha)

हिरालाल पेंटर हा विनोदाची खाण आणि टायमिंगची उत्तम जाण असणारा विदर्भातील कसदार अभिनेता आहे. तो ‘विनोदाचा बादशहा – हिरालाल पेंटर’ म्हणून झाडीपट्टीत प्रसिद्ध आहे. त्याचा जन्म ब्रह्मपुरी तालुक्यातील मालडोंगरी या छोट्याशा गावात झाला. तो त्याची ओळख ‘आठवी पास, नववी नापास !’ अशीच करून देतो. हिरालाल तिसरीत, सहावीत आणि नववीत असा जणू तीनच्या पाढ्यांत नापास होत गेला ! तो अवलिया जीवनाच्या परीक्षेत मात्र गुणवत्ता यादीत झळकला. पेंटर त्यांचा संसाररथ सुशील पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी यांच्या सोबतीने यशस्वी ओढत आहेत.

हिरालाल यांच्या आयुष्यात एक जोहरी चहांदे गुरूजी यांच्या रूपाने आला. ते इयत्ता तिसरीत असताना चहांदे गुरूजींनी त्याला पाच मिनिटांचे कीर्तन लिहून दिले. त्या विनोदी किर्तनाचे हिरालाल यांचे सादरीकरण इतके झकास होते, की गणपती, दुर्गोत्सव, लग्न अशा कोणत्याही ठिकाणी ते हमखास सादर केले जाई. तो बालकिर्तनकार हशा आणि टाळ्या यांनी हरखून जाई ! सप्तखंजरी वादक सत्यपाल महाराज, तुषार सूर्यवंशी, इंजी, थुटे महाराज यांची किर्तने आणि ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांचे मार्गदर्शन हे हिरालाल यांच्या प्रबोधनाच्या वाटेवरील मैलाचे दगड ठरले. हिरालाल विनोदाने वर्णन करतात, “कालचा बालकिर्तनकार आज ह.भ.प.झाला.  ह.भ.प. म्हणजे हळूच भलतीकडे पाहणारा महाराज.” मात्र वास्तवात ते त्यांच्या विनोदी शैलीतून अज्ञान, अंधश्रद्धा, मुलींचे शिक्षण, ग्रामस्वच्छता अशा अनेक विषयांवर ताशेरे ओढत राष्ट्रसंतांचे विचार श्रोत्यांना ऐकवतात.

हिरालाल सहारे हे चित्रकलेमुळे ‘हिरालाल पेंटर’ म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध झाले.

त्यांच्या अंगी अनेक गुण आहेत. त्यांनी तिसरीत असतानाच चित्रकला हस्तगत केली. स्पर्धेत त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले. त्यांना हातातील कुंचल्याने त्या वयात उपजीविकेचे साधन उपलब्ध करून दिले. चित्र कोरणे, नावे लिहिणे, लग्न समारंभात भिंतीवर चित्र काढणे, पुढे पुढे तर, त्यांच्या हाती कुंचल्यांनी नाटकांची पोस्टर्स रंगवणे, नाटकाचे पडदे रंगवणे अशी महत्त्वपूर्ण कामे आली. विशेषत्वाने, त्यांनी नाटकाचे नेपथ्य, पडदे आदींचे रंगकाम बिसेन आर्ट, किन्ही यांच्याकडे केले. त्यामुळे त्यांचे मूळ नाव हिरालाल सहारे हे पुसले जाऊन ते ‘हिरालाल पेंटर’ म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध झाले. त्यांनी लग्नप्रसंगी, घराच्या दर्शनी भिंतीवर काढलेल्या चित्रांमध्ये वाघाचे चित्र फेमस आहे. झाडीपट्टीवाल्यांच्या आकर्षक रंगसंगतीतून साकारलेला चांद्याचा (चंद्रपूरचा) पट्टेदार वाघ मुंबईत जाऊन झाडीपट्टीवाल्यांच्या बैठक खोलीच्या भिंतीवरसुद्धा ऐटीत बसला आहे. त्या कुंचल्यानेच हिराभाऊंची लग्नगाठ बांधली. पेंटर ती हकीकत खुमासदार शैलीत सांगतात, “बोथलीला लग्नाची पेंटिंग करत होतो. गणपतीचे चित्र काढत असताना चारपाच बाया, पोरी चित्र पाहत होत्या. तेथली एक पोरगी मालं पसंत पल्ली. तिलं बिस्किटचा पुळा देलो. नंतर ती आमच्या घरी आली. एका लग्नाच्या वरातीवर जातांनी नाही का जी. वरातीचं बंडी, खासरा आमच्या घरासामने थांबले. पाणी पेण्यासाठी पोरी, बाया आमच्या घरी आल्या. ते पोरगीही होती. तिना घराची पाहाणी केलंन. आमच्या घरच्यायलं ते पसंत पल्ली आणि मंग कोठी आमचा लग्न जुल्ला. तेच पोरगी माझ्या आयुष्यभराची जोडीदार झाली.” त्यांची लग्नगाठ गुरूदेव सेवा मंडळ (मालडोंगरी) येथे 12 जानेवारी 1991 ला बांधली गेली.

उजवीकडून हिरालाल पेंटर आणि रोशनकुमार पिलेवान

दादा पारधी नावाचे प्रसिद्ध नकलाकार त्यांना गुरूस्थानी लाभले. त्यांनी ‘शेंबडा विद्यार्थी’, ‘माहा लगन कवर होईल’, ‘खेड्यातली बाई मुंबईला गेली’ अशा एक ना अनेक नकलांतून रसिकांची दाद मिळवली. ते कै. बाबासाहेब खानोरकर, उद्धवराव सिंगाडे या राजकारण्यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करत. तथापी त्यांच्या नकलांपेक्षा त्यांचे विनोदी किर्तनच वरचढ ठरत गेले हे विशेष. त्यांनी जादूचे प्रयोगही लोकांसमोर सफाईदारपणे सादर केले आहेत. जादूचे प्रयोग शिकवणारे त्यांचे गुरू जादूगर विजयकुमार हे पाटबंधारे विभागात कार्यरत होते. हिरालाल पेंटर यांनी स्वतंत्रपणे जादूचे प्रयोग केले. त्यांच्याकडे जादूच्या प्रयोगांचे दोन संदूक भरून उरेल एवढे साहित्य आहे. त्यांचे नवनवे साहित्य बनवण्याचे कार्य अजूनही चालू असते.

त्यांच्या परिचयाचा चंद्र कले कलेने पेंटर, विनोदी किर्तनकार, नकलाकार, जादूगार या विविधांगी कलांमुळे जनमानसात वाढत गेला आहे. त्यांना पंचायत समितीच्या वेगवेगळ्या अभियानांत कलापथकांचे कार्यक्रम मिळतात. पोलिस जनजागरण मेळाव्यांचेही कार्यक्रम मिळतात. माजी आमदार ह.भ.प. उद्धवराव सिंगाडे महाराज यांच्याशी त्यांची खास मैत्री झाली. हिरालाल पेंटर यांच्या सहवासातून त्यांनी ‘अशीच राहावी प्रित साजना’, ‘दारू पाई विकली बाई’, ‘वेशेच्या द्वारी येती ब्रह्मचारी’ आदी नाटकांचे लेखन, सादरीकरण आणि अभिनयदेखील केला ! हिरालाल पेंटर यांनी ‘चिलिया बाळ’, ‘नागसेन बाळ’ यांसारख्या दंडारीतून भूमिकाभिनय केला आहे. त्यांचा पंचमात लागणारा स्वर हा दंडारीत गाणे म्हणण्यासाठी फार महत्त्वाचा ठरला.

त्यांना नाटकांचे पोस्टर रंगवताना ‘धर्मभाष्कर’ नाटकात ‘शाहिरा’ची छोटेखानी भूमिका मिळाली. तीही नटवर्य मोरेश्वर खानोरकर, टी. खरकाटे, गितांजली यांसारख्या नामवंत कलावंतांसोबत. त्यांनी पहिल्याच प्रयोगात रसिकजनांची दाद मिळवली. रंगदेवता प्रसन्न झाली. त्यानंतर नाटकांचे दालन त्यांच्यासाठी खुले झाले. त्यांना पुंडलीक ठाकरे यांच्या पुढाकाराने चिकमारा आणि कोंढाळा येथे ‘शिवा रामोशी’ नाटकात मखमलीची भूमिका मिळाली. त्यांची वर्णी झाडीपट्टी नाटकांच्या महाराष्ट्र ललित कला, भारत नाट्य रंगभूमी, धनंजय स्मृती या रंगभूमी ग्रूपला विनोदी कलावंत म्हणून लागली आणि मागे वळून बघावेच लागले नाही. त्यांना रंगमंचावर अभिनय शेखर पटले, ज्ञानेश्वरी कापगते, पुजा बन्सोड, शुभलक्ष्मी या सहकलावंतांसह साकारता आला.

ते सिंहाचा छावा, ब्रह्माकुमारी, चमके शिवबाची तलवार, संत गोरा कुंभार, प्रित जमली चाळांतून, झांशीची राणी, लावणी भुलली अभंगाला अशा अनेक नाटकांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत गेले, पसंतीस उतरले. त्यांनी दिवाळी ते होळी असा एकशेपासष्ट नाटकांचा पल्ला दर वर्षी पार करत रंगमंच जिंकला. हिरालाल पेंटर यांनी ‘सयमाया सजनीले चैनच पडेच ना’ हे गीत नाटकाच्या माध्यमातून गावागावात आबालवृद्धांपर्यंत पोचवले. हिरालाल पेंटर हे दादा कोंडके यांची ‘ढगाला लागली कळ’ असो की ‘चल खेळ खेळू दोघे’ ही लोकप्रिय गाणीसुद्धा रंगमंचावर सादर करत. या कलावंतावर मायेची पाखर ‘धनंजय स्मृती रंगभूमी’ने पंधरा वर्षांपर्यंत धरली ! त्यांना नाटकाचे मानधन फक्त पन्नास रुपये सुरुवातीला मिळत. नंतर ते पाचशेपन्नास, सहाशेपंचवीस, नऊशे आणि तेराशे असे वाढत गेले आहे. नृत्यबिजली लावणी सम्राज्ञी ज्ञानेश्वरी कापगते आणि विनोदवीर हिरालाल पेंटर हे समीकरण इतके जुळले की ती जोडी ज्या नाटकात असेल ते नाटक हाऊसफुल्ल जाईच !

हिरालाल नाट्यलेखक म्हणून उदयास आले, त्याचा किस्सा मजेदार आहे. ‘राजसा रंगभूमी’जवळ नवे नाटक नसल्यामुळे गोची निर्माण झाली होती. झाडीपट्टीच्या लेखकांचे उंबरठे झिजवून थकल्यानंतर काय करावे असा प्रश्न आ वासून उभा होता. तेव्हा हिरालाल यांनी नाट्यलेखनाचे शिवधनुष्यही जिद्द, चिकाटी आणि नाटकांचा पूर्वानुभव यांच्या हिंमतीवर संयतपणे हाती पेलले. त्यांचे लक्ष गावाशेजारी असलेल्या गोपाळ समाजाच्या समस्यांनी वेधले. त्यांनी त्या समस्या आणि राष्ट्रसंतांचे विचार ‘मायेची पाखरं’ या नाटकातून उजागर केले. त्यांनी नाट्य निर्माता, लेखक आणि कलावंत म्हणून पंचाहत्तर नाटकांचा पल्ला पहिल्याच वर्षी गाठला. त्या नंतर त्यांचे आदिवासी मुलींच्या शिक्षणावर आधारित ‘कष्टाची शिदोरी’ हे नाटक रंगभूमीवर आले. त्या नाटकाचे एकाच महिन्यात एकाच रंगमंचावर दोनदा प्रयोग करण्याचा सन्मान शेगाव (बु. ता. वरोरा) येथे मिळाला. त्यांनी  झाडीपट्टी नाटक, निर्माता, कलावंत यांवर ताशेरे ओढणारे ‘अनाथांची माय’, धार्मिक विषयाचा आलेख मांडणारे ‘दगडाचा देव’ ह्या नाटकांचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.

हिरालाल ‘झाडिवूड’ सिनेमांतून देखील झळकत आहेत. सिनेस्टार प्रेमा किरण हिची ती झाडीपट्टी नाटकांमध्ये आल्यानंतर त्यांच्याशी मैत्री झाली. त्यांना अविनाश व ऐश्वर्या नारकर, दीपक देऊळकर, निशिगंधा वाड, अंकुश चौधरी, रमेश भाटकर या सिनेनटांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या ‘तूच माझी भाग्यलक्ष्मी’ या चित्रपटात छोटीशी भूमिका मिळाली. त्यांना झाडीपट्टीच्या ‘सून सांभाळा पाटलीन बाई’ या गाजलेल्या नाट्यकृतीवर आधारित त्याच शीर्षकाच्या चित्रपटातही महत्त्वपूर्ण भूमिका साकारता आली. त्या चित्रपटाचे चित्रिकरण कुही, गुरनोली, मालडोंगरी या परिसरात झाले. तो मराठी चित्रपट अलंकार टॉकीज (ब्रह्मपुरी) येथे सर्वाधिक चालल्याची नोंद आहे. त्यांच्यावर नृत्य ‘चमत्कारी गणेश’ या चित्रपटात चित्रित करण्यात आले आहे.

ते ‘क्लोजप अंताक्षरी’मध्ये टीव्हीवर दिसले! त्यांना ‘जित्याची खोड’ या टी.व्ही. शोमध्ये अभिनयाची संधी मिळाली. त्यांच्या मुलाखती मुंबई दूरदर्शन, आकाशवाणीचे नागपूर केंद्र येथून प्रसारित झाल्या आहेत. त्या मुलाखतीचे प्रसारण गोकुळ कार्यक्रमातून करण्यात आले होते. ती पुढे चारदा चंद्रपूर, नागपूर आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात आली. ‘झाडीचा हिरा -मानाचा तुरा’ या गीतांच्या व्हिसीडी कॅसेटची निर्मिती झाली आहे. त्यांच्या ‘किती गुणी माझा वतन’ या गाण्याने रसिकांची मने जिंकली. त्यानंतर ‘गोरी गोरी झुमकेवाली’ या ऑडिओ गीतांच्या सी.डी.चे लोकार्पण करण्यात आले. ‘सून सांभाळा पाटलीन बाई’ हे नाटक मुंबईच्या सिनेकलावंतांसह यशवंत नाट्य मंदिरात सादर झाले. ती बाब झाडीपट्टी नाटकांच्या दृष्टिकोनातून अधोरेखित करण्यासारखी आहे. त्यात सिनेस्टार मोहन जोशी, पुजा पिंपळकर, देवेंद्र लुटे, विक्रम मोरे यांनी भूमिका साकारल्या होत्या. सिनेसृष्टीतील मोहन जोशी, विलास उजवणे, चेतन दळवी, प्रेमाकिरण या कलावंतांना झाडीचे वेध लागले. त्यांच्या सोबत हिरालाल पेंटर यांनी झाडीचा रंगमंच गाजवला. ‘लावणी भुलली अभंगाला’ या नाटकाच्या प्रयोगादरम्यान घडलेला एक प्रसंग – त्या नाटकात चारूदत्त आफळे, कमल आगलावे, अर्चना कुबेर यांसारखे नामांकित कलावंत होते. त्यात त्यांना छक्क्याची (भवान्या) भूमिका होती. मेकअप करताना त्यांना विंचवाने नांगी मारली. विष हळूहळू अंगात भिनण्यास लागले. डोळ्यांत वेदनांचा पाऊस आणि अंगात जळफळाट होत होता. असे असतानाही, त्यांनी जादूचे तीन-चार प्रयोग दाखवून रसिकजनांची मने जिंकली. भवान्याचे एक वाक्य आहे – ‘शाहिराची बाजू घ्यावी तर गंगाबाई रूसून बसत्यात आणि गंगाबाईची बाजू घ्यावी तर शाहीर रूसून बसत्यात. ढोलकीवानी गत झाली आहे माझी.’ त्यावेळी त्यांच्या डोळ्यांतून ओघळणारा अश्रूंचा पूर रसिकांच्या टाळ्या घेत त्यांना रडवून गेला. ते सांगतात, प्रेक्षकांची प्रसंशा ‘वाह, काय जिवंत अभिनय’ ! म्हणत मिळाली. पण आंतरिक वेदना मात्र विंचवाने दिली होती. त्याची साधी भनकदेखील प्रेक्षकांना लागली नव्हती. रात्री मारलेल्या विंचवाचा डंख दुसऱ्या दिवशीच उतरला. दुसऱ्या दिवशी जेवणाळा येथे असलेले नाटक पावसाअभावी रद्द झाले. त्यामुळे त्यांना वैद्यकीय उपचारासाठी आणि विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळाला. हिरालाल पेंटर यांनी साकारलेला छक्का इतका अप्रतिम की पुरूषांना भुरळ पडावी. ते मेकअप केल्यानंतर एखाद्या स्त्रीला लाजवेल एवढे रूपवान दिसत. त्यामुळे त्यांना विनयभंगाला मखेपल्ली गावात सामोरे जावे लागले होते. तो अतिप्रसंग कलावंतांच्या सतर्कतेमुळे टळला. अन्यथा त्यांना ‘नटरंग’चा ‘गुणा’ व्हावे लागले असते.

हिरालाल पेंटर हे कलावंत म्हणून जेवढे लोकप्रिय आहेत तेवढे एक व्यक्ती म्हणूनही. त्यांनी त्यांच्यातील संघटनात्मक कौशल्यामुळे अनेक संघटनांची महत्त्वपूर्ण पदे भूषवली आहेत. त्यांना दादू इंदूरीकरपासून पु.ल. देशपांडे यांच्यापर्यंतच्या नावांचे अनेकानेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना पु.ल. देशपांडे कॉमेडी स्पर्धा 2019  मध्ये गडचिरोली जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावण्याचा सन्मानही प्राप्त झाला.

हिरालाल पेंटर हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाचे प्रतिनिधित्व करतात. हिरालाल पेंटर हे चौकात, रस्त्यावर जेथे उभे असतील तेथे उपस्थितांचे विनोदी शैलीत प्रबोधन करत असतात. त्यांनीही काही कलावंतांना मार्गदर्शन केले, प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे घडवले आहे. त्यांचा मुलगा विशाल सहारे हासुद्धा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत नाट्य क्षेत्रात यशस्वी पाय रोवत आहे. विशाल ‘उघडं पडलं घरटं माझं’ या नाटकात बालकलावंत म्हणून आला. तो आता बालकलावंत राहिला नाही, मोठा झाला आहे. तो एकूणच झाडीपट्टीतील प्रेक्षकांना प्रिय असलेल्या, नायकापेक्षा खलनायकावर फिदा होत असलेल्या भूमिका करतो. त्याने ‘कष्टाची शिदोरी’सारख्या नाटकांतून खलनायक साकारला. त्याचा खलनायक प्रेक्षकांच्या अंगात कापरे भरवतो.

रोशनकुमार शामजी पिलेवान 7798509816 roshankumarpilewan11@gmail.com
मु.पो. पिंपळगाव भोसले ता. ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here