माझी वाडवळी बोली (Wadwali dialect)

0
1000

वाडवळी ही बोलीभाषा उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यात राहणाऱ्या सोमवंशी क्षत्रियांची आहे. सोमवंशीयांची वस्ती मुंबईजवळच्या वसई, पालघर, डहाणू तालुक्यांत मुख्यत: आहे. तेथे बागायती उत्तम होते. नारळी, पोफळी, आंबा, फणस यांची झाडे आणि वसईची केळीची बने, बोर्डीच्या चिकूबागा आणि केळवे-माहीमचे नागवेलीचे मळे यांनी तो पट्टा हिरवागार केला आहे. त्यांना पानवेलीची शेती करणारे म्हणून वसईत ‘पानमाळी’ म्हटले जाते; तसेच, त्यांना उत्तम वाडी करणारे म्हणून ‘वाडवळ’ असे स्वतंत्र संबोधन मिळाले असावे.

वाडवळांची वस्ती प्रत्यक्षात दक्षिण सीमेवरील मुंबई महानगराचा भाग ते उत्तर सीमेवरील गुजरात राज्यामध्ये येणारे देहेरी गाव येथपर्यंत आहे. वाडवळांची मोठी वस्ती मुंबईतील गिरगाव, जुहू ह्या गावांमध्येही आहे. वाडवळांची थोडी फार घरे पालघर जिल्ह्याच्या तलासरी तालुक्यात आहेत. वाडवळांच्या जमिनी वसई तालुक्याला खेटून असलेल्या भिवंडीमध्येही आहेत.

वाडवळ ज्या बोलीतून त्यांचा व्यवहार करतात त्या बोलीला ‘वाडवळी’ म्हटले जाते. वाडवळी ही माझी प्रथम भाषा आहे. प्रमाण मराठी ही माझ्या आयुष्यात वाडवळीनंतर आलेली दुसरी भाषा होय. वाडवळी बोलीची गुणकीर्ती गाताना मला एकेका शब्दामागे अनेक शब्दांचे सूर सहज सुचत राहतात ….

माही वाडवळी बोली | तिहा वृत्तांत साजरा | बखरीमन्सन दुमदुमे | घणी  जुनी  परंपरा ||   

बिंबराजासंगे आली | सोमवंशी क्षत्रिय कुळी | त्यांही वाडवळी बोली | महिकावती नगरबोली ||  

माही वाडवळी बोली | दरवळे साप्यावाणी | रूप  मयाळ   वत्सल | वारा  गायी  रानोरानी ||  

माही वाडवळी बोली | वाणी मंजुळ  रसाळ | शब्दाशब्दासन तिया | गळे मदौले मदाळ ||  

माही वाडवळी बोली | किती गावी तिशी कीर्ती | अभिमाने भरली शाती | गाऊ सालोसाल आरती || 

वाडवळी बोली वाडवळांच्या घराघरातून बोलली जातेच; गावागावांतही तिचे अस्तित्व ठळकपणे जाणवेल असे आहे. नाक्यावर व बाजारासारख्या सार्वजनिक ठिकाणी आणि सामाजिक कार्यात, सांस्कृतिक कार्यक्रमात वाडवळीतून आदानप्रदान होते. लग्नसमारंभ, होळी-दिवाळी या प्रसंगी वाडवळी गीते गाण्याची प्रथा पूर्वीपासून आहे. वाडवळीतून लेखन करण्याला विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सुरुवात झाली.

वाडवळी बोलीला वाडवळांची वस्ती असलेल्या परिसराच्या भौगोलिक परिस्थितीचा स्पर्श झालेला आहे. तिच्यातील शब्दोच्चारांना विशिष्ट असा हेल आहे. ती स्वतःचा डौल वाडवळांच्या व्यवसायातून निर्माण झालेले शब्द घेऊन मिरवते. तिने प्राचीन शब्दावशेषांचे दागिने जपून ठेवले आहेतच, तिची साताठशे वर्षांपूर्वीची मुळे त्यांमधून जाणवतात.

आम्ही नातवंडे घेरा घालत आजीला गोष्ट सांगण्याचा आग्रह धरत असू. मग बोठीबाय (आजी) सांगायची, “एठी बय. मी का हांगतं ते आईक.” ती ‘काणी’ सांगायची. “पोरांही आयका. पार जुन्या काळशी गोष्ट हाय यी. आपल्या गावात कने येक मठ ओथा. त्या मठात येक बावा रेतोहा. त्या बावाया माथ्यार ह्या झिंजोट्या नं यी आथभर लांबी दाडी….” तिच्या बोलण्याला लय असायची. ती झोका काही शब्दांवर घ्यायची. ती मध्येच डोळे मोठे करून आम्हाला भीती घालायची. तिची कहाणी बावायाच्या दाढीसारखी लांबलचक असायची. तिला कहाण्या खूप माहीत असायच्या. कधी, त्या कहाणीत देवी यायची तर कधी शेडा (भूत). ती कहाणी गीताच्या ठेक्यात कधीकधी सांगायची. तिची कहाणी ऐकण्यास खूप मजा येई.

वाडवळांच्या स्त्रिया कोंडाळे करून काथ्याचे दोर वळण्याचे काम घरात रोज रात्री करत. ही गोष्ट साठसत्तर वर्षांपूर्वींची. त्या बायका काम करता करता गीते गायच्या. वाडवळांचा जीव वाडीत गुंतलेला असे. त्यामुळे वाडीत लावलेल्या झाडापानांची गाणी ओठावर सहज खेळत. “वयी उमेडा, वयी उमेडा l वांग्या मिरशीहा माडा l बिन हिपण्यान बिन हिपण्यान बाय फळाला आला ll” ही गीते कोणी रचली ते नाही सांगता येणार. आज्या-पणज्या गात, ते ऐकून ती गीते पुढील पिढ्यांच्या ओठांवर आपसूक येत असत. त्या गीतांनी वाडवळांचे पूर्वापारचे जगणे शब्दांत कोरून ठेवले आहे.

वाडवळी बोलीचे नाते मध्ययुगीन महाराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या मराठीशी आहे. यादवकालीन वाङ्मयात आढळणारे शब्द – इंगळ, ओखंद, माखी, वीख, आथी, केव यांसारखे – वाडवळीत वापरले जातात. ज्ञानेश्वरीत पोखण, वेऱ्ही, वीख, जंव-तंव, येक, येर यांसारखे शब्द जागोजागी आढळून येतात… ते वाडवळीत सर्रास वापरले जातात. तुकाराम गाथेत एक अभंग आहे, “क्याला मज आयो वारीतसे घरा l खेळतो सोकरा नंदाचा मी ll” ही रचना वाडवळीसारखी बरीचशी आहे. ‘आयो’ हे संबोधन… ‘क्याला’ हा शब्द वाडवळीत ‘कशाला’ या अर्थाने वापरला जातो. वारीतसे म्हणजे बोलावतेस – ते क्रियापद म्हणूनच वाडवळीत सुद्धा वापरले जाते.

कोणतीही बोली ज्या प्रदेशात बोलली जाते त्या प्रदेशाचे काही विशेष तिच्यात उतरतात. गुजरातला खेटून असलेला महाराष्ट्राचा उत्तर कोकण विभाग हा वाडवळीचा प्रदेश. त्यामुळे त्या बोलीत कितीतरी गुजराती शब्द सापडतात. वाडवळीत वापरले जाणारे – सोके, ओव, बिजा, वागा हे शब्द गुजरातीशी साधर्म्य दाखवतात. शिवाय, सोमवंशी क्षत्रियांची काही कुळे उत्तर भारताच्या माळवा प्रांतातील चंपानेरमधून उत्तर कोकणात आली, त्याचाही तो परिणाम असेल.

शब्दांचे उच्चार आणि ते उच्चारण्याची लकब यांमुळे बोलींचे एकमेकींहून असणारे वेगळेपण ठळक होते. वाडवळी त्याला अपवाद नाही. वाडवळीत ‘स’च्या ठिकाणी ‘ह’ असा उच्चार केला जातो. जसे हाकर, हांज, हकाळ, होयरा इत्यादी. ‘च’चा उच्चार करताना तेथे ‘स’ अवतरतो. जसे समसा, सूल, सौकशी इत्यादी. वाडवळी अनुस्वारांच्या बाबतीतही स्वातंत्र्य घेते. म्हणजे काही वेळा अनुस्वारांना फाटा देऊन उट, खुट, माजर, पिपळ, उस्सा, जाम असे बोलायचे. तर काही ठिकाणी नसलेले अनुस्वार चिकटवायचे. जसे मंगं, तांबोटी इत्यादी. काही वर्णांची उलटापालट करून पारय (पहार), माहणू (माणूस), नुसकानी (नुकसानी) असे शब्द उच्चारायचे. उच्चारांबाबत असे बरेच बदल सांगता येतील.

वाडवळीने स्वतःचे असे बरेच शब्द वाडीव्यवसायामधून निर्माण केले आहेत. ते मराठीत इतरत्र सापडणे मुश्किल. वाडवळी हा शब्द पानवेलीच्या व्यवसायातून जन्माला आला आहे : वेडणं, पानं हडखणं, आडकी, खांडावण, हरळ, बिबला, ढाळणी, आवटर. वाडवळीचे स्वतःचे असे काही शब्द आहेत- जसे, खोला (केळीचे पान), हायवेळ (सावली करणे), बावखल (लहान तळे), इरोळी (लहान टोपली), कुबाव (विहीर) इत्यादी. तिचे वेगळेपण त्या शब्दांमुळे जाणवतेच, पण नवीन शब्द गरजेनुसार जन्माला घालण्याची तिची ताकदही अनुभवाला येते.

एक नमुना बघा हं ! “रांडीशा या कोरोनापाही आथात कराटी घेव्याही पाळी आले. वाडीह्या मालाला कुत्रा विसारी नय. माहणाही मजूरी भरताना माहा जीव नुखळा गायवाय जाले. जेमेतेमे एकान दहा किलो हिराळ्याही आड्डर दिल्ती तं पांडूला खेप टाखव्या हांगतलतं. यान खाडा केला नं बरं हांगीव नय. पोरंही तं आशास नय. ती ऐशी काडी तय करीत नय. बोलूनव उपेग नय. आपलेस दात नं आपलेस ओठ. पांडूला विसारव्या गेला तं तो पिऊन टेर. वरती मायास आंगार धावते बस. काकामामान भरलं गाव नं पाणी पेव्या कय जाव अही आज माही अवस्ता जाले. डोखं रागान अहे वेडं जाल्तं का वाटतोहं डोख्यात मुहळ घालवं नं करवा एकदासा सोक्षमोक्ष. काय करणार… गेला तहास वाडीत. गाडीहा होडला नं नागराला जुपिला अही गत जाले माही.” वाडवळी बोलीतील हा एक संवाद. जनरीत, अनुभवांची शिदोरी यांच्या स्पर्शाने अर्थसघन झालेल्या त्यातील म्हणी आणि वाक्प्रचार माणसाच्या भावना उत्कटपणे व्यक्त करतात.

वाडवळीतील म्हणी आणि वाक्प्रचार हे वाडवळीचे अलंकार आहेत. ‘आले राय नं बहले ठाय.’, ‘हाय खांद्यावर नं खोळते बांदावर’, ‘कंळग्याला आथ लावू नको नं पोरं उपाही मारू नोको.’, ‘शिसा तुकीता दिही गेले नं वाकड्या फळाहं नाव विसारते.’ यांसारख्या म्हणींमधून सालोसाल अनुभवलेले ज्ञान साठवलेले असते. ‘आथाहा पाट करून वाडवीणे’, ‘तळआथाहा फोड’, ‘माहा मोगुरल्या … माहा गोजुरल्या’ या शब्दांना आया-आजी यांच्या मायाममतेचा स्पर्श झालेला असतो. ते शब्द ऐकताना राज्यवैभव भोगल्याचा आनंद मिळतो.

अलिकडे कथा, कविता आवर्जून वाडवळीत लिहिल्या जातात. त्या साहित्याला वाडवळी जीवनाचा, रीतिभातींचा, त्यांच्या आशाआकांक्षांचा, तेथील समस्यांचा स्पर्श झालेला आहे. वाडवळी साहित्य संमेलनेही अलिकडे आयोजित केली जातात. वाडवळी बोलीतील कविता वाचनाचे प्रयोगही यशस्वी रीत्या राबवले जात आहेत. रघुनाथ मा. पाटील ऊर्फ कवी आरेम, चालना कार अरविंद राऊत, नंदन पाटील सर, डॉ. गजानन मो. पाटील, वाडवळी शब्दकोशकार अशोक सावे, नंदकुमार राऊत, द्वारकानाथ चौधरी, सुहास का. राऊत, कवी हेमंतराम असे काही जण वाडवळीतून लेखन करत आहेत. मीही त्या भाषेत कविता लिहिते. सोमवंशी क्षत्रिय समाजाच्या व्यासपीठावरून होणाऱ्या वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये वाडवळी बोलीतून कार्यक्रम घेतले जातात. त्यात नाट्यछटा, एकपात्री प्रयोग, मनोगते, पारंपरिक गीते सादर केली जातात. नूतन पाटील यांनी वाडवळी लोकगीतांचे संकलन करून ‘ठेवा वाडवळी लोकगीतांचा’ हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे.

वसई तालुक्यातील काही सोमवंशी क्षत्रिय तीनशे-चारशे वर्षांपूर्वी पोर्तुगीज राजवटीच्या काळात धर्मांतरित झाले. त्यांची नावे, उपनामे बदलली. त्यांच्या उपासना पद्धतीत बदल झाले. पण त्यांनी वाडवळी बोलीला अंतर दिले नाही. उपासना पद्धत बदलल्यामुळे ख्रिस्ती वाडवळीत काही पोर्तुगीज शब्द आले. त्यामुळे ती भाषा हिंदूंच्या वाडवळीहून थोडी वेगळी भासते. मात्र तिचे ठाणमांड मूळ मध्ययुगीन वाडवळीचे आहे. त्यामुळे तिच्यातील वेगळेपण वरवरचे असल्याचे दिसून येते. ख्रिस्ती वाडवळांचे लेखनातील योगदान मोठे आहे. रेमंड मच्याडो, सिसिलीया कार्व्हालो, रिचर्ड नुनीस, स्टॅन्ली गोन्सालवीस ही वाडवळीत लेखन करणारी महत्त्वाची नावे. वाडवळी जीवनाला स्पर्श करणाऱ्या त्यांच्या कथा, कविता अनेक नियतकालिकांमधून प्रसिद्ध होत असतात. रेमंड मच्याडो यांच्या कादंबऱ्यांमधून ख्रिस्ती वाडवळी जीवनाचे यथार्थ दर्शन घडते. वसई प्रांतात राहणारे ख्रिस्ती वाडवळ वाडवळी बोलीबद्दल जास्त आत्मीयता बाळगून आहेत. ते त्यांच्या घरातील प्रत्येकाने वाडवळीतून बोलावे म्हणून आग्रह धरतात. त्यांना सार्वजनिक ठिकाणी वाडवळीतून बोलताना कमीपणा वाटत नाही. त्यामुळे वसईत वाडवळीला प्रतिष्ठा प्राप्त झाल्यासारखे वाटते. वसईचे ख्रिस्ती बांधव वाडवळी साहित्य संमेलने भरवतात आणि वाडवळीला पालखीत घेऊन मिरवतात. ख्रिस्ती वाडवळ बांधवांचे संगीत जलसे वसईतही होतात. तसे ते गोव्यातील ख्रिस्ती बांधवांचे होतात. वाडवळी गीतांना लोकसंगीताचा स्पर्श असतो. ते ती गीते आकर्षक साजसंगीतासह सादर करत असत. त्यांना तरुण ख्रिस्ती संगीतकारांनी उत्तम चाली बांधल्या आहेत.

मुंबई विद्यापीठाने पदवी परीक्षेच्या अभ्यासक्रमात वाडवळीचा समावेश केला आहे. त्यामुळे नवीन पिढीला वाडवळीविषयी खोलवर माहिती मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

– प्रा. स्मिता पाटील 80078 48384 patilsmita313@gmail.com

केळवे, ता. जि. पालघर, 401401.

———————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here