मुंबई दूरदर्शनवरील मराठी झेंडा (Marathi flag on Mumbai Doordarshan)

0
284

मुंबई दूरदर्शन केंद्राची निर्मिती 2 ऑक्टोबर 1972 ची. त्या केंद्राचा सुवर्ण महोत्सव 2 ऑक्टोबर 2022 चा. मुंबई दूरदर्शन केंद्राच्या सुरुवातीला त्यावर केवळ एक चॅनेल होते. त्यावर मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तिन्ही भाषांतून कार्यक्रम सादर केले जात. कोकणी बातम्या नियमित व सिंधी कार्यक्रमही होत असत. विशेष म्हणजे हे चॅनेल दुपारी सुरू होत असे आणि आठ तास सुरू राही. पण त्याचा मराठी प्रेक्षकांना फारसा आनंद लुटता येत नसे, कारण सायंकाळी साडेसहा वाजता दिल्लीची मंडळी मुंबई केंद्रावरचे स्थानिक कार्यक्रम बंद करून दिल्लीहून हिंदी कार्यक्रम प्रक्षेपित करत. काही वेळा तर, एखादा मराठी कार्यक्रम सुरू असताना तो मध्येच बंद केला जाई आणि हिंदी कार्यक्रम प्रक्षेपित केले जात असत. त्यामुळे मराठी प्रेक्षकांचा हिरमोड होत असेच; पण त्याचबरोबर दिल्लीवाल्यांचा संतापही येत असे. या प्रकारामुळे मराठी माणसांमध्ये दिल्लीच्या अधिकारशाहीविरुद्ध असंतोषही निर्माण झालेला होता. मी मुंबई मराठी पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून 4 सप्टेंबर 1982 रोजी निवडून आलो. मी मूळचा शिवसैनिक. त्यामुळे, मी माझ्या पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून एक वर्षाच्या कारकिर्दीत मराठी भाषेच्या संदर्भातील सर्व विषयांना प्राधान्य दिले. दरम्यानच्या काळात, मुंबई दूरदर्शनवरून मराठी कार्यक्रमांची गळचेपी अधिकाधिक होत चालली होती. परिणामी, पत्रकार संघाने बेचैन झालेल्या मराठी माणसांच्या भावनांना एकत्रित स्वरूप देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आणि मराठीवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे ठरवले. त्यासाठी मी, माझे सहकारी भारतकुमार राऊत, दिनकर रायकर, दिवाकर देशपांडे, सुहास फडके, वैजयंती कुलकर्णी इत्यादींशी चर्चा केली. त्यावेळी दूरदर्शनवर मोर्चा काढावा अशी कल्पना पुढे आली. मात्र त्या मोर्च्याला राजकीय रंग येणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली जावी असेही स्पष्टपणे ठरवण्यात आले. मोर्च्याला सर्वकष स्वरूप देण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संघात मुंबईतील सर्व मराठी संघटनांचे पदाधिकारी आणि महत्त्वाच्या व्यक्ती यांची बैठक बोलावली. त्या बैठकीत मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, मराठी चित्रपट महामंडळ, मराठी नाट्य परिषद, मुंबई महानगर साहित्य संमेलन, मराठी वृत्तपत्र लेखक संघ, अखिल भारतीय मराठा महासंघ, स्थानिय लोकाधिकार समिती, कोकण विकास आघाडी, ग्रंथाली वाचक चळवळ, त्याचप्रमाणे सुधीर फडके, दाजी भाटवडेकर, सुधीर जोशी आदी दिग्गज मंडळी सहभागी झाली होती. त्या बैठकीत माझ्या अध्यक्षतेखाली ‘मुंबई मराठी पत्रकार संघ पुरस्कृत दूरदर्शन मराठी अन्यायविरोधी संघर्ष समिती’ची स्थापना करण्यात आली आणि लढ्याला अंतिम स्वरूप देण्यात आले. त्या समितीला सर्व स्तरांतील मराठी माणसांकडून प्रतिसाद मिळाला.

डावीकडून शरद आचार्य, सुधीर जोशी, छगन भुजबळ, रमणलाल अंकलेश्वरीया, मनोहर जोशी, प्रमोद नवलकर, प्रभाकर पै आणि कुमार कदम.

“दूरदर्शन मराठी अन्यायविरोधी संघर्ष समिती”तर्फे 7 मार्च 1983 रोजी माझ्या म्हणजेच मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली वरळी येथील दूरदर्शन केंद्रावर मोर्चा नेण्याचे ठरले. शिवसेनेची स्थानीय लोकाधिकार समिती आणि तिचे अध्यक्ष सुधीर जोशी हे त्यात प्रत्यक्ष सहभागी झाले. मुंबईतील सर्व राजकीय पक्ष; तसेच, अखिल भारतीय माथाडी कामगार युनियन, दत्ता सामंत यांची कामगार आघाडी, इतर कामगार संघटना, क्रीडापटूंच्या विविध संघटना यांनी मोर्च्याला पाठिंबा जाहीर केला. दादरच्या सिध्दीविनायक मंदिराशेजारच्या साने गुरूजी उद्यान ते मुंबई दूरदर्शन केंद्र एवढ्या अंतराचा तो मोर्चा होता. पण त्यात लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले. इतकेच नव्हे तर मुंबई महानगर पालिकेची त्या दिवशीची सर्वसाधारण सभा तहकूब करून सर्व नगरसेवक महापौर डॉ. मनमोहनसिंग बेदी यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्च्यात सामील झाले. मोर्चा शांततेने नेण्याचे आमच्या बैठकीत ठरले होते. मोर्च्यातील घोषणाही तशाच पद्धतीच्या असाव्यात असेही निश्चित केले गेले होते. पण मोर्च्याला सुरूवात झाली आणि उत्साही नगरसेवक छगन भुजबळ यांनी “जला दो, जला दो, दूरदर्शन केंद्र जला दो !” अशी घोषणा दिली. वातावरण एकदम गंभीर झाले. त्या घोषणेमुळे सुधीर फडके खूप अस्वस्थ झाले. ते धावत माझ्याकडे आले आणि म्हणाले, की “कदम, ही घोषणा प्रथम थांबवा, या मोर्चाला प्रतिष्ठा लाभली आहे, ती कोणाला घालवू देऊ नका”. मी लागलीच भुजबळ यांच्याकडे गेलो आणि त्यांना घोषणा थांबवण्याची विनंती केली, पण ऐकतील ते भुजबळ कसले? ते म्हणाले, “बाबूजींना सांगा, ताक पिऊन लढाई करता येत नाही”. मग मला अक्षरशः गयावया करावी लागली. इतर थोर मंडळींनीही मध्यस्थी केली आणि भुजबळ यांना शांत केले. मोर्चा खूपच चांगला आणि यशस्वीही झाला. मोर्च्याच्या वतीने दूरदर्शन केंद्राचे तत्कालीन संचालक तातारी यांना शिष्टमंडळातर्फे निवेदन देण्यात आले. त्याचप्रमाणे, नंतर तत्कालीन केंद्रीय माहिती आणि नभोवाणी मंत्री एल.के. भगत यांचीही भेट घेण्यात आली. मोर्च्याची खूप गांभीर्याने दखल घेतली ती महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी !

मोर्चा संपला आणि मी माझ्या ‘हिंदुस्थान समाचार’मधील ड्युटीवर गेलो. थोड्याच वेळात राज्याचे तत्कालीन गृहसचीव बी.के. ऊर्फ बापुसाहेब चौगुले यांचा मला लँडलाईनवर फोन आला. ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांना तुमच्याशी बोलायचे आहे.” दादा फोनवर आले. मला म्हणाले, ‘मी आता दिल्लीला निघालो आहे, तुमच्या संघर्षाचे गांभीर्य मी पंतप्रधानांच्या (तेव्हा इंदिराजी पंतप्रधान होत्या) कानी घालतो. प्रश्न तुमचा नाही, महाराष्ट्राचा आहे, तो मी सोडवून घेतो. पण तुम्ही आता या प्रश्नाला अधिक धार देऊ नका, असे माझे सांगणे आहे.” मी दादांना ठीक आहे असे म्हटले. काही दिवसांतच तत्कालीन केंद्रीय माहिती आणि नभोवाणी राज्यमंत्री विठ्ठलराव गाडगीळ मुंबईला आले. त्यांनी मला मलबार हिलवरील सह्याद्री गेस्ट हाऊसवर बोलावून घेतले आणि मुंबई दूरदर्शन केंद्रावरून खास मराठीसाठी दुसरे चॅनेल लवकरच सुरू केले जाणार असल्याची माहिती दिली !

कुमार देवराव कदम 9869612526, 8850458824 mahavrutta@gmail.com

——————————————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here