कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव विलास शिंदे हे शैक्षणिक पात्रतेनुसार व्हायचे मातब्बर प्राध्यापक; परंतु वास्तवात ते शिरले विद्यापीठ प्रशासनात आणि झाले कुलसचिव. अर्थात, त्याआधी उप, प्रभारी अशी कुलसचिवपदे त्यांना निभावावी लागलीच. एका अर्थाने तेही बरे झाले. त्यामुळे शिवाजी विद्यापीठास उत्तम, अनुभवी प्रशासक लाभला, विद्यापीठाच्या टेकडीवर निसर्गसृष्टी बहरली, विद्यापीठ हे पाण्याने मालेमाल झाले; तेवढेच नव्हे तर संकटसमयी विद्यापीठ साऱ्या कोल्हापूर शहराला पाणी पुरवू लागले ! विलास शिंदे यांच्यात एकाच वेळी शिक्षणप्रेमी प्राध्यापक, कुशल व्यवस्थापक, हाडाचा निसर्गवेडा आणि लेखनकुशल विज्ञानप्रसारक अशी चार व्यक्तिमत्त्वे लपली आहेत. मात्र लोकांच्या लेखी ते ‘पाणीवाला बाबा’ किंवा इंद्रजित भालेराव यांच्यासारख्या कविमनाच्या व्यक्तीस ‘झाड कवेत घेणारा माणूस’ असतात.
प्रशासक व माणूस म्हणून विलास शिंदे यांच्याबाबतचे दोन प्रसंग नमूद करण्यासारखे आहेत. एक – विद्यापीठ परिसरातील अंडर पास तयार करताना आपट्याच्या तीन झाडांपैकी एक झाड कापले जाणार होते, तर शिंदे यांनी रस्त्याचे काम थांबवले आणि रस्त्याचा मार्ग बदलून टाकला. संवेदनाशील लोकांना वाटले, की अधिकारी असावा तर असा ! दोन – विद्यापीठात काही रस्त्यांवर एका निसर्गप्रेमी माणसाने आफ्रिकन ट्युलिपची झाडे लावली होती. त्यांचा परिणाम म्हणून विद्यापीठ परिसरातील मधमाश्या पळून गेल्या आणि पोळी नष्ट झाली. शिंदे यांनी ती आफ्रिकन ट्युलिपची झाडे काढून टाकली. शिंदे म्हणतात, की नुसती झाडे वाढवून चालणार नाही, तर जैवविविधता जपणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.
विलास नेताजी शिंदे यांचा जन्म सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील चिंचोली या खेडेगावात झाला. त्यांचे सातवीपर्यंतचे शालेय शिक्षण गावातील प्राथमिक शाळेत झाले. पुढील माध्यमिक शिक्षण पांगरी, मुंबई आणि बार्शीच्या सुलाखे हायस्कूल येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण शिवाजी महाविद्यालय (बार्शी) येथे झाले. ते पदवी शिक्षणासाठी दयानंद महाविद्यालय (सोलापूर) येथे गेले. त्यांनी पदव्युत्तर आणि डॉक्टरेट पदवी शिक्षण शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अधिविभागात पूर्ण केले. ते एम एस्सी (भौतिकशास्त्र) परीक्षेत शिवाजी विद्यापीठात सर्वप्रथम आले. तसेच, ते ‘क्रायोजेनिक्स’ विषयातील विकासात्मक संशोधनासाठी एम.सी. जोशी पुरस्काराचे सहमानकरी ठरले. त्यांना त्यांचे आजोबा व वडील शिक्षक असल्याने शिक्षणाचा वारसा मिळाला. ते त्यांना शुद्ध उच्चारांची शिकवण आईकडून आणि सुंदर हस्ताक्षर वडिलांच्या संस्कारातून मिळाल्याचे सांगतात. त्यामुळेच विलास शिंदे यांची शैक्षणिक कारकीर्द उज्ज्वल राहिली.
ते निसर्गाप्रती संवेदनशील आहेत. मात्र त्यांचा प्रयत्न निसर्ग वाचला पाहिजे अशा केवळ गप्पा न मारता, त्यासाठी कृती करावी असा असतो. त्यासाठी त्यांचा स्वत:चा ‘अजेंडा’ आहे. त्यांचा ‘अजेंडा’ अन्न, वस्त्र व निवारा असा नव्हे तर अन्न, पाणी आणि हवा यांवर बेतलेला आहे. त्याला धरून ते त्यांचे विचार मांडत असतात व मानवी जीवनातील मूळ समस्यांकडे लक्ष वेधतात. पृथ्वीवरील जीवसृष्टी वाचवण्याचे प्रमुख सूत्र जल, जंगल आणि जमीन यांचा समतोल हे आहे. त्यासाठी नुसती वृक्षलागवड महत्त्वाची नाही तर ते वृक्ष जगवले पाहिजेत. ‘झाडे’ हा त्यांचा जवळचा व जिव्हाळ्याचा विषय. त्यासाठी त्यांनी ‘विद्यापीठ हीच माझी प्रयोगशाळा आहे’ असे वेळोवेळी सांगितले आहे आणि तशी निसर्गसृष्टी विद्यापीठ आवारात निर्माणदेखील केली आहे ! या कार्यात 2012 पासून क्रियाशील झाल्यानंतर विद्यापीठाचे कुलगुरू, अन्य अधिकारी यांचा पाठिंबा आणि खालच्या स्तरावरील कर्मचारी लाभले, त्यांच्यामुळेच हे शक्य होऊ शकले असे ते आवर्जून सांगतात.
विलास शिंदे हे मान्यताप्राप्त विज्ञानलेखक आहेत. त्याचे बरेच श्रेय ते धायगुडे दांपत्यास देतात. त्यांचे गुरुशिष्य नाते हेदेखील मनोज्ञ आहे. त्या दांपत्याने त्यांना विज्ञानप्रसारासाठी लेखनाचे बाळकडू दिले असे ते सांगतात. प्राचार्य नागेश धायगुडे आणि वैशाली धायगुडे हे दोघे सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयातील भौतिकशास्त्राचे शिक्षक दांपत्य. विलास शिंदे हे त्यांचे मानसपुत्रच. विलास शिंदे सांगतात, की ते माझे सुरुवातीचे लेखन पूर्णत: तपासून व्याकरण, योग्य शब्दप्रयोग याबाबत सातत्याने मार्गदर्शन करत. त्यांना स्वत:ला मर्यादा येत आहेत असे जाणवले तर योग्य माणसाचे नाव सुचवत, त्यांना फोन करून सांगत आणि मला त्यांना भेटण्यास पाठवत. त्यांच्यामुळेच मंगेश पाडगावकर, रा.चिं. ढेरे, जयंत नारळीकर, अनिल काकोडकर, व्ही.एन. बापट, रा.वि. सोवनी, वि.गो. कुलकर्णी, अ.पां. देशपांडे अशा अनेक मान्यवरांचा विद्यार्थिदशेतच परिचय झाला. ते आयुष्यातील निर्णय घेताना नेहमी मार्गदर्शन करत, मात्र निर्णय स्वत: घेण्यास सांगत. धायगुडेसर हयात नाहीत. धायगुडे मॅडम कधी पुण्यात तर कधी जर्मनीतील मुलीकडे किंवा अमेरिकेतील मुलाकडे राहतात. माझ्याकडेही अनेक दिवस राहत. मी त्यांच्याकडून चित्रकला, गायन, सुंदर हस्ताक्षर, विषय मांडण्याची शैली अशा अनेक पैलूंचे अनुकरण जमवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याच मार्गदर्शनामुळे माझी लेखनशैली माझ्यात उतरली अशी माझी भावना आहे – विलास शिंदे आठवणी सांगतात.
शिंदे यांचे लेखन पदवी शिक्षण घेत असतानाच प्रकाशित होऊ लागले. त्यांनी महाराष्ट्रातील सर्व प्रसिद्ध दैनिकांत सदर लेखन केले आणि करत आहेत. त्यांच्या लेखनात सोप्या भाषेत विज्ञान लोकांपर्यंत पोचवण्याचे कौशल्य दिसते. त्यांनी विज्ञानासारखा रूक्ष विषय रंजक पद्धतीने, सर्वसामान्यांना वाचावा असे वाटेल अशा रीतीने मांडला. त्यातून त्यांची स्वत:ची आकर्षक शैली निर्माण झाली. त्यांच्या नावे मोठी ग्रंथसंपदा आहे. मुद्दाम नोंद केली पाहिजे ती दोन ग्रंथांची – त्यांनी ‘क्रायोजेनिक्स अँड इटस ॲप्लिकेशन्स’ या पुस्तकाचे सहसंपादन आणि ‘सक्सेस गाईड फॉर एमएचसीईटी’ या पुस्तकाचे सहलेखन केले आहे.
त्यांनी मराठी विज्ञान साहित्याच्या क्षेत्रात प्रवेश केला तो भौतिकशास्त्राच्या मापनपद्धतीतील एमकेएस एककांना ज्या संशोधकांची नावे देण्यात आली आहेत अशा मानकऱ्यांवरील ‘एककांचे मानकरी’ (2015) या पुस्तकाच्या माध्यमातून. त्यांच्या वेधक लेखनशैलीचे प्रत्यंतर त्या पहिल्याच पुस्तकातून आले. त्याची तिसरी सुधारित आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे. त्यानंतर त्यांची सहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत – भारतीय संशोधकांच्या यशोगाथा ‘असे घडले भारतीय वैज्ञानिक’ (2017), कृषी संशोधकांच्या जीवनगाथा ‘हिरव्या बोटांचे किमयागार’ (2017), आंतरराष्ट्रीय आवर्त सारणी वर्षानिमित्त आवर्त सारणीतील सर्व एकशेअठरा मूलद्रव्यांची ओळख- ‘आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया’ (2019), मापनपद्धतीतील सीजीएस एककांचे संशोधक ‘एककांचे इतर मानकरी’ (2024), कृषी, कृषिपूरक उद्योग, वृक्ष आणि जलसंधारण क्षेत्रातील ‘कृषी क्रांतीचे शिलेदार’ (2024) आणि दहा झाडांची सर्वंकष माहिती – ‘बांधावरची झाडे’ (2024).
‘बांधावरची झाडे’ हे पुस्तक वैशिष्ट्यपूर्ण आहे. सर्वसामान्य वाचकालाही रस वाटेल अशी माहिती त्यामध्ये आहे. झाडांच्या कथा-बोधकथा-पुराणकथा असे सर्व साहित्य त्यात येते. पुस्तकात आंबा, आवळा, चिंच, शेवगा, हादगा अशा निरनिराळ्या गृहोपयोगी झाडांच्या रसभरित माहितीचा समावेश आहे. त्यांनी ग्रंथ व सदर लेखनाखेरीज मराठी विश्वकोषामध्ये वैज्ञानिक चरित्र नोंदींचे लेखन केले आहे. तसेच त्यांनी कोशाकरता वैज्ञानिक माहितीच्या नोंदीही लिहिल्या आहेत. त्यांची काही पुस्तके वा पुस्तकांतील अंश विद्यापीठ अभ्यासक्रमात समाविष्ट झाले आहेत. ‘एककांचे मानकरी’ हे पुस्तक क्रमिक म्हणून (2020-21पासून) सोलापूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे.
त्यांचे वृक्षप्रेम अजोड आहे. त्यांनी जेथे संधी मिळेल तेथे वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन यावर लक्ष दिले आहे. त्यांनी विद्यापीठ आवारात तर एके ठिकाणी साडेनऊ एकरांत जंगल उभे केले आहे ! तेथे तऱ्हतऱ्हेची, वेगवेगळ्या उंचीची झाडे आहेत. त्या ‘राना’त गवत कापणे आणि भटकणे याशिवाय मनुष्यप्राण्याला कोणतीही गोष्ट करण्यास मज्जाव आहे. शिंदे यांनी हे जंगल फक्त दहा वर्षांत उभे केले आहे. हा प्रयेाग ‘काळजीविना वृक्षलागवड’ (नो केअर प्लँटेशन) म्हणून प्रसिद्ध आहे. तो मार्गदर्शकही समजला जातो. विद्यार्थ्यांचे नाते त्यांना मातीशी जोडायला शिकवण्यात आहे हे विचारसूत्र त्यामागे आहे. त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ (सोलापूर) व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ (नांदेड) परिसरातही वृक्षसंवर्धनाचे तसेच मोठे कार्य केले आहे.
जलसंवर्धन हाही शिंदे यांचा ध्यास असतो. शिवाजी विद्यापीठाला दररोज सहा लाख लिटर पाणी लागते. ते पाणी त्यांनी स्वत: ‘निर्माण केले’ आहे. विद्यापीठात दोन तलाव, दहा विहिरी आणि चोवीस शेततळी आहेत. विद्यापीठ 2017 पासून ‘जलस्वयंपूर्ण’ म्हणून नावारूपास आले. विद्यापीठाच्या पाणी खर्चामध्ये मोठी बचत झाली. त्यामुळे शहराच्या मोठ्या भागातील जलपातळीदेखील उंचावली आहे. विद्यापीठाने 2019 व 2021 या दोन वर्षीच्या महापूरात कोल्हापूर शहरात पाणीटंचाई असताना महापालिकेला लाखो लिटर पाणी दिले. या कामी त्यांना विद्यापीठाचा अभियांत्रिकी विभाग, स्वयंप्रेरणेने सहभागी होणारे कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांचे सहाय्य झाले.
त्यांनी निसर्ग निरीक्षणातून सांगितलेला पावसाचा अंदाज मागील काही वर्षांपासून अचूक येतो असा अनुभव आहे. विलास शिंदे सांगतात, की पाऊस कधी आणि कसा येणार याचे संकेत निसर्ग देत असतो. कावळा, टिटवी, पावशा असे अनेक पक्षी अंडी कशी, कोठे आणि किती घालतात-कसे वागतात यावरून अंदाज येऊ शकतो आणि तो अचूक असतो. उदाहरणार्थ, टिटवी साधारणपणे मार्चच्या अखेरीस अंडी घालते. तिने नियोजित वेळी अंडी घातली तर पावसाळा जूनमध्ये सुरू होतो. अंडी मे नंतर दिसू लागली तर पावसाळा जुलैच्या अखेरीस सुरू होतो. अंडी नदी किंवा तलाव यांच्या आत दिसली तर पूरपरिस्थिती येत नाही. मात्र अंडी नदी-तलावाच्या पात्रात घातली नाहीत तर पूर परिस्थिती उदभवू शकते. अंडी चार किंवा चारपेक्षा जास्त असली तर पाऊस जबरदस्त पडतो. तीन असतील तर पीकपाणी चांगले येणारा, पुरेसा पाऊस पडतो; अंडी दोन किंवा त्यापेक्षा कमी असली तर अवर्षणाची परिस्थिती उद्भवते. त्याचबरोबर पावसाचे संकेत बहावा, पांढरफळी, धामण ही झाडे कधी आणि कशी फुलतात यावरूनही मिळतात. मात्र त्यासाठी झाडे आणि पशू-पक्षी यांचे सूक्ष्म निरीक्षण करावे लागते. विलास शिंदे यांनी मागील पाच वर्षांपासून असा बांधलेला पावसाचा अंदाज अचूक निघत आला आहे. त्यांनी 2024 च्या पावसाबाबतचा अंदाज तर युट्युबवरही सादर केला होता आणि त्यात पडताळणी केलेल्या घटकांचे चित्रणही आहे. त्याची लिंक सोबत दिली आहे.
विलास शिंदे यांचे लेखक व विज्ञानप्रसारक म्हणून मोठेच कार्य आहे. त्यांचा वाचन-लेखन हा ध्यास आहे. ते वृक्षसंवर्धन, जलसंधारण, वैश्वि
विलास शिंदे यांचे जीवनध्येय व त्यांचा कार्यानुभव यामधून निर्माण झालेले त्यांचे चिंतन मौलिक वाटते – मानवाचे निसर्गाशी नाते खूप महत्त्वाचे आहे. झाडे, प्राणी, पक्षी काही सांगत असतात, ते सर्व जीवसृष्टी जाणत होती – मनुष्यमात्राचे पूर्वजही ते समजून घेत. ते नाते तुटत चालले आहे. अनेक वनस्पती आणि प्राणी यांच्या प्रजाती नष्ट होत आहेत. आता निसर्गसृष्टीचे कथन केवळ पशूपक्षी ओळखू शकतात. मात्र आधुनिक लोकांकडे ते समजावून घेण्यासाठी वेळ नाही. असेच चालू राहिले तर पृथ्वीवरील मानव जात नष्ट होण्यास वेळ लागणार नाही. म्हणूनच निसर्ग, जैवविविधता जपायला हवी !
विलास (व्ही.एन.) शिंदे 9420638840 / 9673784400
– नगिना माळी 8975295297 naginamali2012@gmail.com
© www.thinkmaharashtra.com 2024. सदर लेख अथवा लेखातील कोठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
खूपच छान कार्य तरूणांना प्रेरणादायक व आपल्या मातीशी घट्ट नाळ जोडणारा लेख .
खूप सुंदर लेख आहे
, Great great work Dr V N . Shinde sir
👌🏻 kup chan aahe and great work Dr. V. N. Shinde sir
लेख फारच सुंदर आहे. एका विज्ञान प्रेमी शिक्षकाचे निसर्गाप्रति असलेले प्रेम तसेच कार्यकुशल प्रशासकाच्या कार्याप्रति व्यक्त केलेली कृतज्ञता खरोखर कौतुकास्पद आहे.