गौडमल्हारचा परिचय तसा उशिराच झाला ; पण पहिल्या श्रवणापासून जिवाभावाचा बनलेला तो खास आवडता राग ! त्या रागाने मला किशोरी आमोणकर यांच्या संगीताशी जोडले. त्यामुळे त्याबद्दल विशेष जिव्हाळा ! ‘मान ना करिये गोरी’ ही बंदिश जयपूर घराण्यात विलंबित स्वरूपात गायली जाते. मी किशोरी यांचे त्या बंदिशीचे रेकॉर्डिंग ऐकले आणि मला काय वाटले ते शब्दांत सांगणे अवघड आहे. त्यांची काहीशी ठोस; पण नाजूकपणा, अलवारपणा ल्यालेली आलापी आणि सळसळत जाणाऱ्या ताना, भावपूर्ण बोल-आलाप यांतून त्या जणू मनातील भावना सांगीतिक रूपाने ऐकवतात ! मानवी भावनांचे, सुखदुःखांचे संगीत होणे यापेक्षा अपूर्व क्षण तो कोणता ! किशोरी यांची स्वरचित ‘बरखा बैरी भयो’ ही रचना माझ्या सर्वाधिक प्रिय रचनांपैकी एक ! त्यातील ‘जाने ना देत मोहे पी की नगरिया’ या ओळीतील भाव थेट हृदयाला भिडणारा आहे. त्यामधून प्रत्येकाला त्याच्या स्वत:च्या आयुष्यातील असा क्षण आठवेल, की प्रिय व्यक्तीची भेट होऊ शकली नाही याची हुरहूर मनाला लागून राहील. भावनांचे किती असे नाजूक पदर !
गौडमल्हाराबद्दल वाचनात आले, की तो मिया मल्हाराच्याही आधीचा राग आहे. एका संगीतकाराने कुमार गंधर्वांना ‘कुमार, तुमचा गौडमल्हार पटला नाही’ असे उद्गार काढले. त्यानंतर कुमार यांनी गौडमल्हाराचा सखोल अभ्यास केला आणि तीन तासांच्या कार्यक्रमात गौडमल्हाराची निरनिराळी अंगे दर्शवली. तो कार्यक्रम यूट्यूबवर उपलब्ध आहे. त्यांनी गौडमल्हार राग हा, गौड सारंग आणि शुद्ध मल्हार या रागांच्या मिश्रणातून निर्माण झाला आहे हे सप्रयोग विशद केले आहे. गौडमल्हाराच्या काही पारंपरिक बंदिशी त्या कार्यक्रमात ऐकण्यास मिळतात. ‘मान ना करिये गोरी’ ही प्रसिद्ध बंदिश जयपूर घराण्यात विलंबित स्वरूपात गायली जात असली तरी ती मूलतः ग्वाल्हेर घराण्याची मध्यलयीची बंदिश आहे हे कुमार यांनी सांगितले आहे आणि त्यांनी ती चीज स्वत:च्या ढंगाने पेश केली आहे. खास कुमार ‘टच’ असलेल्या गौडमल्हाराच्या तशा बंदिशी त्यात आहेत. ‘झुकी आई बदरिया’ ही प्रसिद्ध बंदिश कुमार यांनी खूप सजवली आहे. गौडमल्हार हा फार मोठा राग आहे असे कुमार का म्हणतात ते तो कार्यक्रम ऐकला की लक्षात येईल.
गौडमल्हार हा वक्रचलनाचा स्वरावली प्रधान राग ! तो काही विशिष्ट स्वराकृतींनी सिद्ध होतो. त्यात निषाद कोमल आहे, पण त्यात दोन्ही निषाद लावण्याची पद्धतही आहे. दोन्ही निषाद काही बंदिशींमध्येही वापरले असल्याचे लक्षात येते. ‘सा सा रे ग म, म ग म रे ऽ प, प ऽ ग प म’ या गौडमल्हाराच्या खास स्वराकृती ! जयपूर घराण्यात ‘म ग म रे म ऽ सा रे सा’ अशी षड्जावर येण्याची पद्धत आहे. ते त्यांचे इतर घराण्यांपेक्षा वेगळे वैशिष्ट्य ! ग्वाल्हेर घराण्यात ‘रे ग ग रे सा’ असाही षड्जावर येण्याचा मार्ग आहे. मला असे वाटते, की गंधाराचा तो वापर रागाच्या भावात फरक करतो. गंधार प्रामुख्याने वापरून गायलेला गौडमल्हार हा जास्त गोड भासतो. ग्वाल्हेर घराण्याचा प्रसिद्ध खयाल ‘काहे हो हमसन’ हा मालिनी राजूरकर, डी.व्ही. पलुस्कर यांचा ऐकावा ! अवीट गोडवा व प्रेमाने केलेले आर्जव हे सुरासुरांतून जाणवते. मी गौडमल्हाराला प्रेमाचा पाऊस यासाठी म्हटले, की तो मुसळधार, गडगडाट करत कोसळणारा पाऊस नसून शरीरावरून अलगद ओघळणाऱ्या रिमझिम पावसासारखा आहे. म्हणूनच की काय अशा सहज, तरल प्रेमाची अभिव्यक्ती करणाऱ्या चीजा त्यात मुख्यत्वे आहेत. ‘सैंया मोरा रे’ ही तशीच एक चीज नव्या पिढीची गायिका दीपिका भिडे-भागवत ही फार लडिवाळपणे म्हणते. कुमार यांनी गायलेली ‘बोल रे पपैयरा अब मोरे पियू की बात’, पारंपरिक चीज ‘बलमा बहार आई’ या बंदिशी वर मांडलेल्या दृष्टिकोनाला पुष्टी देतील.
गौडमल्हाराचे स्वरूप बरेचसे चलनप्रधान असल्यामुळे वेगवेगळ्या खयालाच्या चिजांमधून त्याची वेगवेगळी रूपे समोर येतात. गौडमल्हाराचे प्रकारही बरेच आहेत. ज्येष्ठ संगीतज्ञ व गायक के.जी. गिंडे यांनी नऊ प्रकारचे गौडमल्हार सांगितले आहेत. त्यांत ‘दोन गंधारांचा’, ‘गंधारवर्जित’, ‘नट अंगाचा’– ‘खमाज अंगाचा’ असे काही प्रकार आहेत. नट अंगाच्या गौड मल्हारात मिया मौज यांची एक गोड चीज आहे. ‘जिसको ऐसी बात हो’ ही चीज उल्हास कशाळकर खूप रंगवून मांडतात; तसेच, ‘तुम्हरे मन की सब जानी बात’ ही गंधारवर्जित गौडमल्हाराची बंदिश सत्यशील देशपांडे यांनी ढंगदार पद्धतीने सादर केली आहे.
गौडमल्हाराचे सांगीतिक वैभव खूप आहे. त्या प्रत्येक प्रकारातून-रचनेतून एक वेगळा पदर, एक वेगळी भावना रसिकांपर्यंत पोचते. ती फक्त तांत्रिक नव्हे तर वैचारिक व भावनिक समृद्धी आहे. ‘नजरा नही आंदा वे’, ‘कोऊ या को बरजत नाही, घन गरजे लरजत प्राण’ असे खयाल तर ‘पापी दादरवा बुलाये’, ‘प्यारी लाडीसी झूली’, ‘गरजत बरसत भिजत आईलो’ यांसारख्या चिजा त्याच बाबीची उत्तम उदाहरणे आहेत. ‘प्यारी लाडीसी झुली’ ही चीज यशवंतबुवा जोशी यांची ऐकावी ! शब्दांची रेलचेल आहे व त्यातून निर्माण होणारे नादसौंदर्य हे एक वेगळे आकर्षक वैशिष्ट्य आहे. रातंजनकरांची ‘उमड घन गगन आयोरी’ आणि अश्विनी भिडे–देशपांडे यांनी बांधलेली ‘बादरवा जा रे जा’ या आडाचौतालातील रचना त्यातील लयीच्या अंगाने गौडमल्हाराला अधिक खुलवतात. ग्वाल्हेर घराण्याचा तराणादेखील अप्रतिम आहे… !
थोडे सुगम संगीताबद्दल लिहितो. गौडमल्हाराच्या भावविश्वाचा आवाका मोठा असल्यामुळे अनेक नाटक-सिनेमांत त्याचा वापर केलेला आढळतो. लता मंगेशकर यांच्या आवाजात ‘गरजत बरसत भिजत आईलो’ ही बंदिश श्रोत्याला ‘मल्हार’ या सिनेमात ऐकण्यास मिळते. संगीतकार रोशन यांनी त्याच बंदिशीवर नवे शब्द लिहून घेऊन ‘गरजत बरसत सावन आयो रे’ हे गाणे त्यांच्या ‘बरसात की रात’ या सिनेमात वापरले. सुमन कल्याणपूर आणि कमल बारोट यांनी ते गायले आहे. लता मंगेशकर यांचे ‘जाओ रे जोगी तुम जाओ रे’ हे गाणे गौडमल्हारची छाया दाखवते. अलिकडच्या ‘तुम्हारी सुलु’ या सिनेमातील ‘रफू’ हे गाणेही गौडमल्हारच्या छटा दाखवते. नाट्यसंगीत क्षेत्रात असा खचितच कोणी असेल की ज्याने ‘नभ मेघांनी आक्रमिले’ हे ‘संगीत सौभद्र’मधील नाट्यगीत ऐकले–गायले नसेल. मीसुद्धा या लेखासाठी ते पद गाण्याचा प्रयत्न केला आहे, त्यात गौडमल्हार अप्रतिम दिसतो. अभिषेकीबुवांचे ‘स्वप्नात पाहिले जे’ हे पदही गौडमल्हारच ! मेहंदी हसन यांनी गायलेली ‘फूलही फूल खिल उठे’ ही गझल गौडमल्हार दाखवते. तीही श्रवणीय आहे.
जिवलगाला भेटण्यास आतुर असलेली ती ! ती वाट पाहत उभी असते. ऐनवेळी आलेला पाऊस आणि त्याला येण्यास झालेला उशीर यामुळे चिडचिड होत असताना, अचानक तो समोर येऊन उभा राहतो ! त्याच्या चेहऱ्यावरून ओघळणाऱ्या पावसात तिचा रागही वाहून जातो. अनेक दिवसांनी ती दोघे समुद्रकिनारी भेटतात. पावसाची रिमझिम चालूच आहे. किनाऱ्यावरून दोघेही हातात हात घालून चालू लागतात. अंगावर पडणारे पावसाचे थेंब, पायाला वेढून जाणाऱ्या लाटा आणि अस्ताला चाललेला सूर्य यांच्या सान्निध्यात ती दोघे काहीही न बोलता चालत राहतात… थोडे समुद्रात, थोडे किनाऱ्यावर. त्या शांततेचा संवाद सारी संध्याकाळ अनुभवते… प्रेमाच्या त्या पावसाने गौडमल्हार होऊन मनाला आणि शरीराला चिंब भिजवलेले असते…
– सौमित्र कुलकर्णी 9833318384 saumitrapk94@gmail.
सौमित्र,
खूप छान लिहिलंय तुम्ही… तुमच्या अभ्यासपूर्ण लेखांतून आमच्यासारख्या श्रवणभक्तांना अधिक ज्ञान मिळते आणि श्रवणानंद दुणावतो,हे नक्की…
मनापासून खूप खूप अभिनंदन
Thank you so much