राजाळे गाव सातारा जिल्ह्यात फलटणपासून पूर्वेला बारा किलोमीटर अंतरावर आहे. ते गाव सधन व विकसनशील आहे. गावाला ऐतिहासिक परंपरा आहे. गावाची लोकसंख्या सात ते आठ हजार आहे. गावातील पंच्याहत्तर टक्के लोक शेती, दहा टक्के लोक कामगार, पाच टक्के लोक व्यावसायिक आणि दहा टक्के लोक शासकीय व खाजगी नोकरीत असे लोकसंख्येचे विभाजन आहे. परंतु गावात संपूर्ण एकता आहे त्यामुळे ते गाव अभंग आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. समाजप्रबोधन हेच ब्रीद मानून वैचारिक परंपरा असलेले गाव म्हणून राजाळे गाव पंचक्रोशीतील रहिवाशांसाठी आणि गावांसाठी सर्वांच्या परिचयाचे आहे. नव्वद टक्के लोक साक्षर आहेत. गावामध्ये पहिली ते सातवी प्राथमिक केंद्रशाळा आहे. शाळेस सातारा जिल्ह्याचा आदर्श शाळा पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत माध्यमिक हायस्कूल आहे. त्याचा निकाल शंभर टक्के लागतो.
छत्रपती शिवाजी राजे यांची भेट गावाला झाली होती. छत्रपतींच्या येण्याने उत्साही होऊन गावातील लोक आनंद साजरा करत होते. तेव्हा ते ‘राजे आले, राजे आले, राजे आले’ असा जयघोष करू लागले. त्यातूनच गावाला राजाळे हे नाव पडले असे म्हणतात. त्याचबरोबर, दुसरी आख्यायिका अशी, की गावातील मंदिराभोवती पाण्याचे मोठे तळे होते, त्याला लोक ‘राजांचे तळे’ असे म्हणत.या गावाला राजांचे आळे या अर्थाने राजाळे हे नाव पडले. गावात शिवजयंतीचा उत्सव वैशिष्ट्यपूर्ण रीतीने साजरा करतात. शिवज्योत वेगवेगळ्या किल्ल्यांवरून प्रत्येक वर्षी आणली जाते. छत्रपतींची ऐतिहासिक मिरवणूक जिवंत देखाव्यांसह काढली जाते.
गावात श्री जानाई माता, मारूती, भैरवनाथ, महादेव, खंडोबा व तुळजाभवानी या देवतांची मंदिरे आहेत. गावामध्ये गेली एकोणतीस वर्षे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तर अखंड हरिनाम सप्ताह गेली एकोणचाळीस वर्षे चालत आला आहे. हरिनाम सप्ताहात सात दिवस कीर्तन, प्रवचन, भजन, भारुड असे विविध कार्यक्रम केले जातात. शेवटच्या दिवशी श्रीकृष्णावर आधारित काल्याच्या कीर्तनाने ‘सप्ताहा’ची सांगता होते आणि संपूर्ण गावाला महाप्रसाद दिला जातो. तो उत्सव सर्व जण एकत्र येऊन आनंदाने पार पाडतात.
गावात एकूण तेरा मंडळे गणेशोत्सव साजरा करत असत. परंतु त्यामुळे गावाची एकता कमी होत होती. म्हणून शासनाच्या योजनेनुसार ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम राबवला गेला. तो विचार स्वीकारणारे तालुक्यातील ते पहिलेच गाव म्हणून मानकरीदेखील ठरले. त्यामुळे गेली वीस वर्षे ‘एक गाव एक गणपती’ या पद्धतीने सण साजरा होतो. गणेशोत्सवात गावातील कलाकारांचे कार्यक्रम व नाट्यस्पर्धा होतात. गावातील या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा जिल्हा व तालुका स्तरावर ग्रामीण भागातील म्हणून प्रथम क्रमांक वारंवार आला आहे. विठ्ठलराव गुलाबराव निंबाळकर यांनी तालुक्यातील उत्कृष्ट पोलिस पाटील म्हणून 1965 ते 2005 पर्यंत काम केले आहे.
गावात स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचा कार्यक्रम हा दरवर्षी पाच दिवस चालतो. विचारवंत, ज्येष्ठ कलाकार, साहित्यिक, नामवंत वक्ते महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारताबाहेरूनही कार्यक्रमाला आलेले आहेत. त्यातून विचार घडवले जातात. त्याचे आयोजक रसिक कला, विचार, क्रीडा व सांस्कृतिक मंच हे आहेत.
राजाळे गावातील बोलीभाषा ग्रामीण मराठी आहे. तेथे आठवडा बाजार गुरुवारी भरतो. पंचक्रोशीतील वाडी-वस्तीवरील सर्व लोक गावात बाजारासाठी येतात. हॉटेले, कपड्यांची दुकाने, मोबाईल शॉपी, हार्डवेअर अशी सर्व प्रकारची व मेडिकल दुकाने, खाजगी व सरकारी दवाखाने आहेत. पावसाचे प्रमाण सर्वसाधारण चारशे मिलिमीटर आहे. पेरू, डाळींब यांच्या फळबागा आहेत. ऊस, मका, ज्वारी, बाजरी, गहू ही पिके घेतली जातात. ऊसाचे क्षेत्र सत्तर टक्के आहे. गावाला पाणी पुरवठ्यासाठी जुनी बारव आहे. पिकांसाठी कॅनॉल आहे. विहीर, बोअर, शेततळीही आहेत.
– प्रवीण निंबाळकर 9011380200 pravin24585@gmail.com
प्रवीण जगन्नाथ निंबाळकर यांचे एम ए, एम एड असे शिक्षण झाले आहे. ते गिरवी येथील अध्यापक विद्यालयात 2010 ते 2020 पर्यंत शिक्षकांना भाषाशास्त्र आणि इतिहास हे विषय शिकवत होते. त्यांची बदली मुंजवडी येथील श्रीराम खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात सहायक शिक्षक म्हणून 2020 साली झाली. त्यांनी मोडीलिपीचे प्रशिक्षण घेतले आहे. ते तबलावादन करतात. ते अखंड हरिनाम सप्ताहात सक्रिय सहभागी असतात. ———————————————————————————————