राजाळेच्या जानाई देवीचा यात्रोत्सव

राजाळे गावात मंदिरे जरी अनेक असली तरी जानाई देवीचे स्थान अनन्य आहे. ते मंदिर गावाच्या पूर्वेला आहे. ते इसवी सन 1600 (शके 1522) च्या अगोदर बांधण्यात आले आहे. जानाई मंदिराचा इतिहास शिवाजी महाराजांच्या जन्माअगोदरचा आहे. देवस्थानाला सापडलेल्या एका ताम्रपटावर श्री जानाई मंदिर इसवी सन 1689 (शके 1611) मधील असल्याचा उल्लेख आहे. ते राजाळेकरांचे व पंचक्रोशीतील लोकांचे ग्रामदैवत आहेच; परंतु जानाई हे महाराष्ट्रातील कित्येक लोकांचे दैवत आहे. लोक श्रावणात, नवरात्रोत्सवात व प्रत्येक सप्तमीला गावात दर्शनासाठी येतात. गावातील सर्व ग्रामस्थ मिळून देवीच्या यात्रेचा उत्सव पूर्वीपासून साजरा करतात. श्री जानाईच्या उत्सवाचा मान गावातील पाटील यांच्याकडे असतो. त्याचबरोबर सेवेचा मान गुरव, भोई, चांभार, माळी या सेवेकऱ्यांचा असतो. राजाळे गावातील जानाई देवी उत्सवात पाटीलकीचा मान दौलतरावजी निंबाळकर (पाटील) यांच्याकडे होता. देवीच्या उत्सवातील सर्व पूजाविधी, अभिषेक त्यांच्याकडून केले जात. श्रींची मूर्ती पालखीत ठेवण्याचे मानाचे स्थानही पाटलांकडे होते. तो मान निंबाळकर घराण्याकडेच आहे. फलटणचे निंबाळकर हे छत्रपतींचे वंशज. त्यांच्या संस्थानामार्फत (‘सरकार’मार्फत) जमीन पाटलांना त्यांच्या घोड्यांसाठी घोडेइनाम म्हणून दिली होती. मंदिराचेही सर्व अधिकार नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्ट यांच्याकडे आहेत. फलटण संस्थानाचे अधिपती मुधोजीराजे नाईक निंबाळकर यांच्यानंतर श्रीमंत मालोजीराजे आणि सध्याचे अधिपती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (सभापती, विधान परिषद) यांची जमीन राजाळे गावात आहे. जानाई देवी निंबाळकर घराण्याची कुलस्वामिनी असल्यामुळे सर्व राजघराणे जानाई मंदिरात दर्शनासाठी येत असतात.

देवीच्या उत्सवाचे आकर्षण म्हणजे देवीचे सोन्याचे मुकुट. ते इतर वेळी फलटण संस्थानाकडे ठेवलेले असतात. यात्रेच्या, उत्सवाच्या वेळी सोने व सोन्याचे मुकुट पोलिस बंदोबस्तात येतात आणि बंदोबस्तातच उत्सव असेपर्यंत मंदिरात राहतात. मंदिराला बाबासाहेब पुरंदरे आणि मालोजीराजे यांनी भेट दिली होती. मंदिराचा इतिहास लिखित स्वरूपात उपलब्ध नाही. मात्र तो पुणे पुराभिलेख विभागाकडे मोडी लिपीत उपलब्ध आहे असे सांगतात.

देवीचे सध्याचे मानकरी पुढीलप्रमाणे- पालखीचे मानकरी भोई समाजाचे खांदेकरी, मशालीचे मानकरी चांभार भोईटे, अब्दागिरी माळी समाजाचे मानकरी, पुजारी गुरव समाजाचे मानकरी, नगारा-ढोलताश्यांचे मुस्लिम मानकरी, श्रींची मूर्ती पूजा, विधी, अभिषेक, दागिने या सर्व विधींचा मान पुजारी व संभाजीराव निंबाळकर, हणुमंत गुरव, हरी गुरवे, सदाशिव जाधव यांच्याकडे आहे.

मंदिराचे बांधकाम दगड आणि चुना यांमध्ये केलेले आहे. मंदिराला दहा दगडी खांब असून पूर्वेला मुख्य दरवाजा आहे. दक्षिण दिशेला दुसरा दरवाजाही आहे. मंदिर तळ्यावर भर घालून बांधण्यात आले आहे. मंदिराचे काम कोरीव दगडात आहे. शिखराच्या बांधकामात विविध देवदेवतांच्या मूर्ती चुन्यामध्ये कोरलेल्या आहेत. चाळीस फूट दगडी तटबंदी मंदिराला चारही बाजूंनी आहे. आतील बाजूस दगडी फरशीकाम आहे. मंदिराचे खांब दहा फूट उंचीचे आहेत. गाभाऱ्याचे काम मार्बलमध्ये केलेले आहे. मंदिराच्या समोर पूर्वेला लाकडी पंचवीस फूट उंच असा भव्य दरवाजा आहे. त्याच्यासमोर दीपस्तंभ आहे. त्यावर मशाल पेटवली जात असे. मंदिराच्या आतील बाजूस मारूती, गणपती, दत्तात्रेय, विठ्ठल-रुक्मिणी यांची छोटी छोटी मंदिरे आहेत. मंदिराचे बांधकाम पाहण्यासारखे आहे. ‘एक होता जाणता राजा’ या मालिकेची चित्रे, चित्रपट त्या ठिकाणी तयार करण्यात आले होते.

मंदिराच्या समोर देवीच्या स्नानासाठी कोरीव दगडात बांधून काढलेल्या दोन जुन्या विहिरी आहेत. त्यांपैकी एका विहिरीच्या पाण्याचा पुरवठा संपूर्ण गावाला पिण्यासाठी केला जातो. त्या विहिरीमधील पाणी कधीच संपत नाही !

मंदिराची आणि तटबंदीची पडझड 11 डिसेंबर 1967 रोजीच्या कोयना येथे झालेल्या तीव्र भूकंपाच्या धक्क्याने झाली होती. मंदिराचे बांधकाम पुन्हा 1979 साली करण्यात आले. त्यामध्ये मंदिराचा भार जास्त असल्यामुळे मंदिर पाठीमागच्या बाजूला तीन फूट खचले आहे. मंदिराचे शिखर जमिनीपासून ऐंशी ते नव्वद फूट उंचीचे आहे. मंदिराच्या पुढील बाजूला गणपतीची भव्य मूर्ती स्वागत करण्यासाठी बसवलेली आहे. मंदिर जानाई सभागृह आणि मंगल कार्यालय म्हणून प्रसिद्ध आहे.

मंदिरामुळे गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे. भाविक श्री क्षेत्र राजाळे नगरीत कर्नाटकविजापूर, अहमदनगरपरभणीबीड, चंद्रपूर या ठिकाणांहून येत असतात. पुण्यातील सुपेकर कुटुंबीय मंदिरासाठी व देवीच्या सेवेसाठी दरवर्षी येत असतात. मंदिरात देवीची मूर्ती, चांदीची लहान मूर्ती व नवीन स्थापन केलेली अशा मूर्ती आहेत.

देवीच्या पूजेसाठी गुरव मंडळी आहेत. रोज सकाळी आणि संध्याकाळी देवीची पूजा/आरती केली जाते. देवीला हळदी-कुंकवाचा मळवट भरून साडीचोळी नेसवली जाते. फुलांच्या सजावटीचे काम गावातील माळी समाजाच्या लोकांकडे आहे.

मंदिराच्या पाठीमागे गुहा आहे. ती वाट कोठे जाते याबद्दल स्पष्ट माहिती नाही. परंतु मौखिक माहितीवरून ती गुहा शिखर शिंगणापूरकडे किंवा फलटणच्या राजवाड्यात जात असावी.

उत्सवाची तयारी यात्रेच्या दहा-पंधरा दिवस अगोदर सुरू होते. यात्रा कमिटी यात्रेच्या वर्गणीचा नारळ फोडून यात्रेच्या तयारीस लागते. गाव सुशोभित केले जाते. घरोघरी सर्वांच्या अंगणांत रांगोळी असते. गावातील रस्ता, प्रत्येक चौक स्वच्छ केला जातो. मंदिराच्या रस्त्याला दुतर्फा माळांच्या लाईटची शोभा असते. संपूर्ण मंदिरालाही फुलांच्या आणि लाईटच्या माळा खेळवलेल्या असतात. मंदिराच्या शिखरावर भगवा झेंडा फडकत असतो. सर्व गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते.

पुजारी देवीची महापूजा व अभिषेक करतात. देवीला साडीचोळी परिधान केली जाते. त्यानंतर देवीला संस्थानातून आलेले देवीचे दागिने व सोन्याचा मुकुट घातला जातो. तो कार्यक्रम संपूर्ण बंदोबस्तात पार पडतो. देवीचे मानकरी देवीला पुष्पहार व नैवेद्य दाखवतात. त्याच दिवशी गावात करमणुकीसाठी नाटक ठेवले जाते. पहिल्या दिवशी देवीला गोड पुरणपोळीचा प्रसाद दाखवला जातो. गावातील लोक, पाहुणे मंडळी यांची गर्दी वाढत जाते. दुसऱ्या दिवशी, म्हणजेच अष्टमीला पहाटे चार वाजता देवीचा छबिना मिरवणूक झाल्यानंतर देवीचे मानकरी फुलांच्या हारांनी सजवलेल्या पालखीमध्ये देवीची चांदीची मूर्ती ठेवतात. ढोल-ताश्यांच्या गजरात, झांज-लेझीम पथक यांच्या आवाजात मंदिरातून मानाच्या काठ्या घेऊन पालखीतून देवीची पालखी, छबिना निघतो. पालखीचे मानकरी शेलार व भोई पालखी घेतात. ग्रामस्थ मंदिरातून निघाल्यापासून कापडी पायघड्या पालखीच्या पुढे टाकत असतात. गुलालाची प्रचंड उधळण, फटाक्यांची आतषबाजी यामुळे गाव जागा झालेला असतो. लेझीम, झांज ही पथके पालखीपुढे-छबिन्याच्या पुढे नाचत असतात. पालखी मंदिरापासून गावात आल्यावर पालखीला विसावा आणि देवीला स्नान व अभिषेक मानाच्या पाटलांच्या घरासमोर होतो. त्यानंतर पूर्ण गावातून देवीच्या पालखीची प्रदक्षिणा होते. पालखीच्या स्वागतासाठी प्रत्येक रस्त्याच्या दोन्ही बाजूंला महिलावर्ग उपस्थित असतो. पालखी मंदिरात पुन्हा जाण्यासाठी सकाळचे दहा वाजतात. सर्वांच्या अंगावर गुलालच गुलाल दिसत असतो. फटाक्यांचे आवाज सतत होत असतात. पालखी मंदिरात पोचल्यानंतर महाराष्ट्रातून आलेले भाविक, पाहुणे मंडळी व गावकरी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात गर्दी करतात.

दुसऱ्या दिवशी गावातच लोकनाट्य हा तमाशा मंडळाचा कार्यक्रम ठेवलेला असतो. पाहुण्यांसाठी मांसाहारी व शाकाहारी या दोन्ही प्रकारचे जेवण गावातील मंडळींनी प्रत्येकाच्या घरी बनवलेले असते. लहान मुलांसाठी खेळण्यांची दुकाने रस्त्यांच्या दुतर्फा लागलेली असतात आणि त्याचबरोबर पाळणे, झोके, हत्ती, घोडे अशा प्रकारच्या मुलांच्या खेळण्याच्या वस्तू गावात आलेल्या असतात. त्यामुळे लहान मुलांचा आनंद शिखर गाठत असतो.

गावातील प्रत्येक घर, चौक माणसांनी गजबजलेला असतो. सर्वांच्या घरी जाऊन थोरांचे आशीर्वाद घेतले जातात. यात्रोत्सवात गावाला वेध लागलेले असतात ते कुस्त्यांचे. यात्रेमुळे सर्वांनी नवीन ड्रेस घेतलेले असतात. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी नवीन कपडे घातल्यामुळे सर्व वातावरण प्रसन्न झालेले असते. ताश्यांच्या, हलगीच्या आवाजात गावातील यात्रा कमिटी, ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सदस्य ही मंडळी बाहेरून आलेल्या मल्लांना वाजतगाजत घेऊन आखाड्याजवळ पोचतात. आखाड्याभोवती बंदोबस्तासाठी कळक लावून व पोलिस बंदोबस्त ठेवून सर्व वातावरण शिस्तबद्ध केलेले असते. यात्रा कमिटी आणि मल्ल यांच्यासाठी मंडप वेगळा असतो. महाराष्ट्रातून कित्येक नामवंत मल्ल (पैलवान) राजाळे गावात आलेले असतात. कुस्त्यांचा आखाडा पन्नासपासून दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांपर्यंत चालतो. कुस्त्या झाल्यानंतर, राजाळे गावातील जानाई देवी यात्रेचा दोन दिवस चालणारा उत्सव ‘जानाई देवीच्या नावानं चांगभलं’ म्हणून संपतो.

यात्रेचा अहवाल खर्च झालेले रुपये, जमा झालेले रुपये, आश्रयदात्यांची नावे अशा सर्व तपशिलांनिशी छापला जातो आणि जमाखर्च संपूर्ण गावाला दिला जातो.

– प्रवीण निंबाळकर 9011380200 pravin24585@gmail.com

———————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here