तिरुपतीचे बालाजी कुऱ्हा येथील बाळासाहेब (Tirupati Balaji’s temple in Kurha, Maharashtra)

0
343

कुऱ्हा हे गाव अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यात आहे. तेथे लोकवस्ती पंधरा हजार आहे. कम्युनिस्टांचा बालेकिल्ला म्हणून गावाची ओळख. परंतु तेथेच तिरुपती व्यंकटेश दोन ठिकाणी सुमारे साडेतीनशे वर्षांपासून विराजमान आहे ! त्या दोन ठिकाणच्या देवांना लहान बाळासाहेब व मोठे बाळासाहेब या नावांनी ओळखले जाते; इतकी ती देवता गावाशी एकरूप होऊन गेली आहे. वाकाटकांचा अंमल वऱ्हाड प्रांतावर बराच काळ होता. त्या काळात तेलंगणा व विदर्भ यांच्यात व्यापार संबंध असे. त्या निमित्ताने तेलंगी ब्राह्मणांचा वावर असे. त्यांचे दैवत व्यंकटेश बालाजी. त्यांच्यापैकीच कोणी बालाजीची मूर्ती कुऱ्हा येथे यजुर्वेदी ब्राह्मण ‘गान’ यांच्याकडे आणली. त्यांनी मूर्तीची स्थापना घरीच केली. त्यास पुढे मंदिराचे स्वरूप प्राप्त झाले. तो मोठा बालाजी किंवा मोठे बाळासाहेब. त्या मंदिरातील घंटा तिरुपती येथून डोक्यावरून आणली गेली आहे. तिला जमिनीचा स्पर्श कधी झालेलाच नाही अशी त्या मंदिराची ख्याती. पुढे, गान यांच्या आर्थिक अडचणींमुळे मंदिराचे व्यवस्थापन डांगे सावकार यांच्याकडे आले. दिलीप डांगे हे ती धुरा समर्थपणे सांभाळत आहेत.

कुऱ्हा या गावीच वझरकर म्हणून सोनार जमातीचे सावकार राहत होते. त्यांना स्वप्नात व्यंकटेशाचा दृष्टांत झाला, की ‘मला तुझ्या घरी घेऊन ये.’ दैवी आज्ञाच ती ! त्यानुसार एका तेलंगी ब्राह्मणाने त्यांना मूर्ती आणून दिली. त्यांनी मूर्तीची स्थापना घरीच केली. पुढे त्या मूर्तीचे मंदिरही झाले. ते मोठ्या बालाजीनंतर साधारणपणे सहा ते आठ वर्षांनंतर घडले. सावकार निपुत्रिक होते. त्यांनी वृद्धापकाळात मंदिराचा कारभार शिवराम गणेश देशमुख यांच्यावर सोपवला. त्यांच्या निधनानंतर त्यांचे लहान बंधू देविदास यांनी ती धुरा वाहिली. कालौघात पुरुषोत्तम नीलकंठ देशमुख व त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव डॉ. विजय देशमुख असा मंदिराचा कारभार पाहिला गेला आहे. ते लहान बाळासाहेब संस्थान.

दोन्ही मंदिरांना उत्पन्नासाठी जमिनी होत्या. परंतु जमिनीचे उत्पन्न तुटपुंजे असे. मंदिराचा खर्च भागला जाऊ शकत नसल्यामुळे पर्यायी व्यवस्था करणे भाग पडले. लहान बालाजी संस्थानच्या विश्वस्तांनी जमिनी विकून भव्य मंदिर; तसेच, एक मंगल कार्यालय निर्माण केले आहे. मोठे संस्थानही त्याच प्रक्रियेतून सध्या जात आहे. त्यामुळे संस्थानाचा खर्च बऱ्यापैकी भागत आहे. मंदिरासाठी अडुसष्ट लाख रुपये खर्च झाला असून अजूनही काम चालू आहे.

दोन्ही मंदिरांतील उत्सव, परंपरा तिरुपती येथील मंदिराप्रमाणे आहे. उत्सव अश्विन शुद्ध प्रतिपदा ते एकादशी असा दहा दिवस असतो. अष्टमीपर्यंत रोज अनुक्रमे नाग, चक्र, मोर, वाघ, गरुड, मारोती, पाळणा, घोडा या वाहनांवर स्वार होऊन रात्री बाळासाहेब नगर प्रदक्षिणा करतात. वाहन लाकडी आहे. त्यास पालखीसारखी उचलण्याची व्यवस्था आहे. उचलणारे मानकरी असतात. नवमीच्या दिवशी सुट्टी  (विश्राम) असते. गावकरी प्रदक्षिणेदरम्यान बालाजीस औक्षण करून पूजा करतात, प्रसाद अर्पण करतात आणि धुळीने माखलेल्या रस्त्यावर लोटांगणे घालतात. पालखी सीमोल्लंघन करून पुन्हा मंदिरात दशमीला (दसरा सण) येते. त्यानंतर गावकरी बालाजीस ‘सोने’ अर्पण करून आप्तांना ‘सोने’ वाटण्यास जातात. मिरवणूक एकादशीस सकाळी साधारणपणे अकराच्या सुमारास निघून मंदिरात परत येण्यास दुपारचे चार वाजतात. त्या दिवशी सर्व रस्ते सडा-रांगोळी व काही ठिकाणी फुलांनी सजवण्यात येतात. बालाजीस अर्पण केलेले नारळ, पोहे, अनारसे, पेढे रात्री प्रसाद म्हणून वाटले जातात. रात्री भजन होऊन उत्सवाची सांगता होते. ही परंपरा कोरोना वर्ष (2020-21) वगळल्यास साडेतीनशे वर्षांपासून टिकून आहे. मिरवणूक कोरोना काळातही उपचार गर्भगृह ते मंदिराचा परिसर अशी निघत होती.

दोन्ही ठिकाणी अगदी एकसारखी परंपरा आहे. परंतु मोठ्या बालाजीचा मान पहिला. लहान बालाजी मंदिरात कार्तिकी व आषाढी एकादश्या, गजानन महाराज प्रगट दिन व महाशिवरात्र हे उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात.

या व्यतिरिक्त एकादशीस लहान बालाजी मंदिरात रात्री ‘हरीला’ वितरण होते. हरीला म्हणजे दुधात कलमी, मिरे, लेंडी पिंपळी व सुका मेवा टाकून ते आटवले जाते. ते पिऊन पाहिल्याशिवाय त्याची मजा समजणार नाही. त्याचा उद्देश- दहा दिवसांच्या श्रमाचा परिहार; तसेच, पुढील ऋतू बदलामुळे होणारा पित्त प्रकोप टाळणे हा सांगितला जातो.

कुऱ्ह्याच्या कम्युनिस्ट पक्षाचा इतिहास त्याच्या स्थापनेपासून म्हणजे 1925 सालापासून सापडतो. कॉ.सुमेरसिंह नाहटे हे जुन्या काळातील नेते. ते स्वातंत्र्यसैनिकही होते. स्वातंत्र्यानंतर अपवाद वगळता जवळपास चाळीस वर्षे ग्रामपंचायतीवर कम्युनिस्ट पक्षाची सत्ता होती. दरम्यानच्या काळात, बहुतेक आंदोलनांचे कुऱ्हा हे केंद्र होते. सुदाम देशमुख, भाई मंगळे, ए.बी. बर्धन, तारा रेड्डी असे काही पक्के कम्युनिस्ट नेते कुऱ्ह्याला नेहमी येत. त्या काळात कुऱ्ह्याच्या कम्युनिस्ट पक्षाचे कार्यालय म्हणजे बाळासाहेब देशमुख यांचे घर. तेथे सर्व नेते मंडळींची राहण्याची, खाण्याची व्यवस्था होई. बाळासाहेब देशमुख स्वतः पक्षाचे पदाधिकारी नसले तरी त्यांनी तन-मन-धनाने पक्षाची सेवा केली. कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार ह्या भागातून त्या काळात, पंचायत समिती सदस्यत्वापासून ते खासदार पदापर्यंत निवडून आले. सध्याही कम्युनिस्ट पक्षाचा उपसरपंच कुऱ्हा येथे विद्यमान आहे.

– विनय देशपांडे (खंडाळकर) 9325066915 deshpandevinay02@gmail.com

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here