एकतिसावे साहित्य संमेलन (Thirty-first Marathi Literary Meet -1947)

एकतिसावे साहित्य संमेलन हैदराबाद येथे 1947 साली झाले. नरहर रघुनाथ फाटक हे तेथे अध्यक्ष होते. त्यांचा जन्म 15 एप्रिल 1893 रोजी भोर संस्थानातील जांभळी येथे झाला. त्यांचे मूळ घराणे कोकणात कनोदचे, पण आजोबा भोर संस्थानचे कारभारी होते. ते तेथे स्थायिक झाले. वडील उत्तर हिंदुस्थानात सरकारी अधिकारी असल्याने त्यांच्या बदल्या नेहमी होत असत. त्यामुळे फाटक यांचे शिक्षण भोरप्रमाणे पुणे, अजमेर, इंदूर, अलाहाबाद येथेही झाले. ते तत्त्वज्ञान विषय घेऊन बी ए अलाहाबाद विद्यापीठातून 1917 साली झाले. ते अर्थशास्त्र व राज्यशास्त्र ह्यांचेही विद्यार्थी होते.

फाटक यांच्या आयुष्याची सुरुवात वृत्तपत्र लेखनाने आणि संपादन सहकार्याने झाली. पुढे, ते नाथीभाई ठाकरसी विद्यापीठ व रुईया कॉलेजात मराठीचे अध्यापक झाले. प्राध्यापक म्हणून त्यांचे वैशिष्ट्य असे, की त्यांचा भर वाङ्मयाभ्यास करताना त्याचे सामाजिक व सांस्कृतिक संदर्भ सांगण्यावर असे. ते ललित वाङ्मयकृतीची समीक्षा रसिकतेने करत नसत; तर ललित वाङ्मयकृतीकडे अलिप्तपणे कोरडेपणाने पाहत. ते प्राध्यापक म्हणून निवृत्त 1957 साली झाले.

त्यांचा वृत्तपत्र क्षेत्रात वावरताना नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्याशी संबंध आला. तो संबंध उत्तरोत्तर वाढत गेला आणि ‘नवाकाळ’चे ते नुसते सहसंपादक झाले नाहीत तर एक जबाबदार घटक होऊन गेले. पुढे, 1939 मध्ये ‘संध्या दैनिक’ सुरू झाले, तेव्हाही त्यांनी त्याचे संगोपन व जतन केले. खाडिलकर यांना तुरुंगवासाची शिक्षा 1929 साली झाली, ती फाटक यांनी लिहिलेल्या अग्रलेखामुळे. फाटक काही काळ ‘इंदुप्रकाश’चेही संपादक होते, त्यांनी त्या वृत्तपत्रात सतत लेखन केले, अगदी प्रारंभापासून ! ते ‘सुबोधपत्रिका’, ‘विविधवृत्त’ (रा.का. तटणीस), ‘आलमगीर’ (चं.वि. बावडेकर) ह्या वृत्तपत्रांमध्येही लिहित असत. त्यांनी ‘अंतर्भेदी’ या टोपणनावाने काही व्यक्तिचित्रे रेखाटली. त्यांनी ‘सत्यान्वेषी’, ‘फरिष्ता’ ह्या टोपणनावांनीही लिहिले.

नरहर रघुनाथ फाटक यांना शहाण्णव वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य लाभले. ते इतिहासाचार्य राजवाडे यांच्या सहवासामुळे इतिहास संशोधनाकडे वळले. इतिहास संशोधन हा त्यांच्या चिकित्सक वृत्तीमुळे व्यासंगाचा विषय झाला. ते मराठी संतवाङ्मयाचे अभ्यासक होते. त्यांचे संस्कृत आणि इंग्रजी भाषांवर प्रभुत्व होते.

त्यांनी साहित्याच्या प्रांतात स्वतःची नाममुद्रा उमटवणार्‍या दर्ज्याचे लेखन केले. त्यांच्या नावावर ‘ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी’, ‘श्री. एकनाथ वाङ्मय आणि कार्य’, ‘रामदासः वाङ्मय आणि कार्य’, ‘मराठेशाहीचा अभ्यास’, ‘अठराशे सत्तावन्नची शिपाई गर्दी’, ‘आदर्श भारतसेवक’, ‘नाट्याचार्य’, ‘भारतीय राष्ट्रवादाचा इतिहास’ इत्यादी महत्त्वपूर्ण ग्रंथ आहेत. त्यांनी आयुष्याच्या उत्तरावस्थेत ‘मुंबई शहराचा इतिहास’ लिहिला. ‘अर्वाचीन महाराष्ट्रातील सहा थोर पुरुष’ (1949) हे लोकहितवादी, जोतिबा फुले ह्यांचे महत्त्व सांगणारे पुस्तकही लिहिले. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी चीनचा व रशियाचा प्रवास केला होता. ‘रशियाचे संक्षिप्त दर्शन’ (1955) नामक प्रवासवर्णनही लिहिले होते. त्यांना कागद, पेने, पेन्सिली इत्यादी लेखन साहित्याच्या नाविन्याची आणि विविधतेची अतिशय हौस होती. साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी बाळ गंगाधर टिळक यांचे प्रदीर्घ चरित्र लिहिले. फाटक यांनी त्यातील घटना आणि व्यक्तिविषयक मांडलेले विचार किती चुकीचे आहेत हे लिहिले. ते लेख ‘विविध ज्ञानविस्तारा’त प्रसिद्ध झाले. त्यांनी बहुजन समाजाला धक्का देणारी मते न घाबरता मांडली. फाटक साठ वर्षे सतत लिहित होते, बोलत होते आणि चुकीच्या मतांचे खंडन करत होते.

न.र. फाटक हे नामदार गोखले यांचे कट्टर अनुयायी होते. त्यांच्यावर न्यायमूर्ती रानडे आणि नामदार गोखले यांच्या विचारप्रणालीचा पगडा होता.

त्यांचे मत 1857 चे स्वातंत्र्यसमर हे बंड नसून ती एक शिपाई गर्दी होती, असे होते. त्यासाठी त्यांच्यावर जबरदस्त टीका उभ्या महाराष्ट्राकडून झाली. ‘नवयुग’ने तर फाटक यांच्यावर टीका विशेषांकच प्रसिद्ध केला.

ते भारत इतिहास संशोधन मंडळ, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मुंबई मराठी साहित्य संघ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ अशा विविध संस्थांचे क्रियाशील सभासद होते. त्यांनी पुणे जाळणाऱ्या यशवंतराव होळकर यांचे चरित्र लिहून यशवंतराव होळकर यांचे आयुष्य उजेडात आणले.

त्यांच्या ‘आदर्श भारतसेवक’ या ग्रंथाला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. त्यांचे निधन 21 डिसेंबर 1979 रोजी झाले.

वामन देशपांडे 9167686695, अर्कचित्र – सुरेश लोटलीकर 9920089488

————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here