अठ्ठेचाळिसावे साहित्य संमेलन (Forty-Eighth Marathi Literary Meet 1969)

वर्धा येथे 1969 साली झालेल्या अठ्ठेचाळिसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते कवी प्रा. पुरुषोत्तम शिवराम रेगे. ते नवकवितेत स्वतःचा वेगळा प्रवाह जपणारे तरल कवी, अल्पाक्षराच्या वाटेने जाणारे कादंबरीकार आणि समीक्षक-संपादक म्हणून प्रसिद्ध आहेत. रेगे यांनी ‘सुहृद चम्पा’ आणि ‘रूपकथ्थक’ या टोपणनावांनीही लिखाण केले आहे. रेगे हे मूलतः सर्जनशील कलावंत होते. त्यांचा जन्म 2 ऑगस्ट 1910 रोजी झाला. त्यांचे शिक्षण बी ए – ऑनर्स (मुंबई-1931), बी एस्सी – ऑनर्स (लंडन-1934) असे झाले होते.

रेगे यांनी त्यांच्या लेखनाला ‘बालमित्र’ नावाच्या हस्तलिखित मासिकातून सुरुवात केली. त्यांनी खूप गोष्टी लिहिल्या. त्यांच्या कथा पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या ‘शालापत्रक’ मासिकात येऊ लागल्या. त्यांना त्यांतील एका गोष्टीला बक्षीसही मिळाले होते. त्यांनी छोट्या वयात तीन-चार नाटके लिहिली. त्यांनी कविता मात्र वयाच्या पंधराव्या वर्षी लिहिण्यास सुरुवात केली. त्यांनी कविता प्रथम इंग्रजीतून लिहिल्या. विल्सन हायस्कूलचे प्रिन्सिपॉल रेव्हरंड कथबर्ट यांनी त्यांना इंग्रजी कवितेची गोडी लावली; साधे आणि सोपे कसे लिहावे ते शिकवले. मग रेगे यांनी मराठी कविता लिहिली. त्यांचा संस्कृत वाङ्मयाचा अभ्यास झाला होता. त्यांना शाळेत असतानाच कवितेची गोडी लागली. त्यांच्यावर मराठीतील जुन्या काव्याचा संस्कार होता.

त्यांची ‘मनु’ ही कथा तीन भागांत ‘सत्यकथे’त 1950 साली प्रसिद्ध झाली आणि एक हळुवार साहित्यविश्व जणू जन्मास आले ! त्यांनी ती ‘रूपकथ्थक’ या टोपणनावाने प्रसिद्ध केली होती. तिचे इंग्रजी भाषांतर ‘टाइम्स’मधून नंतर प्रसिद्ध झाले आणि तेथून ती बऱ्याच भारतीय व परदेशी भाषांत पसरली. त्यांनी ‘छंद’ नावाचे मासिक 1954 साली काढले आणि त्यांनी स्वत: त्यातून लिहिले. त्यांनी अनेक कथा, कादंबऱ्या आणि नाटके लिहिली. रेगे यांची ‘सावित्री’ ही कादंबरी हा मराठी कादंबरी विश्वातील महत्त्वाचा व अभिनव टप्पा आहे.

त्यांचे कविता संग्रह साधना (1931), फुलोरा (1937), हिमसेक (1943), दोला (1950), गंधरेखा (1953), पुष्कळा (1960), दुसरा पक्षी (1966), स्वानंदबोध (1970), प्रिया (1972), सहृदगाथा (1975), अनीह (1964) असे आहेत. त्यांचे कथासंग्रह रूपकथ्थक (1956) आणि मनवा (1968) हे प्रसिद्ध आहेत. त्यांनी कादंबऱ्या सावित्री (1962), अवलोकिता (1964), रेणू (1973), मातृका (1978) या लिहिल्या. त्यांनी व्यवसायानिमित्त वेगळे असे इंग्रजी ग्रंथ सिव्हिक्स अँड अॅडमिनिस्ट्रेशन (1950), सायंटिफिक मेथड (1952), आर्टिकल्स ऑन ट्रेड ट्रान्सपोर्ट एण्ड अलाइड टॉपिक्स हे लिहिले.

ते केरळ येथे झालेल्या अखिल भारतीय लेखक परिषदेचे (1965) उदघाटक होते. तसेच पु.शि.रेगे यांनी भारताचे प्रतिनिधित्व रशियामधील मॉस्को येथे लघुकथा या विषयावर आयोजित झालेल्या परिसंवादात केले होते.

त्यांनी त्यांच्या साहित्यातून स्त्रीसुलभ तरलतेच्या सूक्ष्म छटा रेखाटल्या. पु.शि. रेगे हे मराठी साहित्याला पडलेले एक आश्चर्य-कोडे होय असेच मानतात. त्यांनी फार थोडे लिहिले असले तरी पु.शि. रेगे नावाचे स्वतंत्र साहित्यविश्व मराठीत ठरले. रेगे यांच्या साहित्यातून तत्त्वचिंतनाचा गाभा पाझरतो. त्यांच्यासारखी भाषा मराठी साहित्यात त्यापूर्वी कधी उमटली नाही, की ती पुन्हा रेगे यांच्यानंतर प्रवर्तित झाली नाही. त्यांच्या साहित्यातील भावानुभवांचे सप्तरंगी प्रेमविश्व त्यांचे स्वतःचे होते. त्यावर ‘रेगे मोहोर’ उमटलेली आहे. रेगे यांनी ‘साहित्य जगले तरच जगण्यासारखे मागे काही उरणार आहे’ हे जाणले होते. कलावंताने त्याची सामाजिक जबाबदारी खुशाल पाळावी, पण त्याची कला त्या करता राबवू नये असे त्यांचे ठाम मत होते. ते त्यांनी जपले.

पु. शि. रेगे हे त्यांच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, की भिन्न परिसरांतील लेखकांनीही एक साहित्यिक पथ्य पाळणे आवश्यक आहे. त्यांनी केवळ महाराष्ट्रातील लेखनाच्या नकला करण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनी ते ज्या भूमीत राहतात-वावरतात, त्या भूमीचे वैशिष्ट्य आत्मसात करून एक आगळे मराठीपण उभे करण्याचा ध्यास घेतला पाहिजे. मराठी भाषा आणि साहित्य, दोन्ही त्यामुळे अधिक समृद्ध होतील. बी. रघुनाथ यांनी पूर्वी निजामाच्या राजवटीत जे केले आणि हैदराबादेतील ए.वि. जोशी जे करत आहेत किंवा पूर्वी माळव्यातील भालचंद्र लोवलेकरांनी जे केले आणि धारवाडचे जी. ए. कुलकर्णी जे करत आहेत; त्यांचा आदर्श लेखकांनी पुढे ठेवला पाहिजे. अजमेरात राहून शिवाजी पार्की किंवा सातारी गोष्ट लिहून भागणार नाही. ती अजमेरची, तिच्या परिसराची गोष्ट झाली पाहिजे. तिकडच्या भूमीत रुजून, बहरलेली गोष्ट झाली पाहिजे. असले जिवंत लिखाण मग सर्वांनाच हवेहवेसे होईल.

त्यांचे निधन 17 फेब्रुवारी 1978 रोजी झाले.

– संकलित, टीम ‘थिंक महाराष्ट्र’, अर्कचित्र – सुरेश लोटलीकर 99200 89488
———————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here