सीडींना अर्थशास्त्रातील प्राविण्य लाभले कोठे? (Biographical writing about C D Deshmukh – a missing point)

0
329

‘लोकसत्ता’ दैनिकाने सीडी ऊर्फ चिंतामणराव देशमुख ह्यांच्या कार्याचा वेध घेणारा एक विशेषांक त्यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त, प्रसिद्ध केला आहे (30 मे 2021). तो वाचताना मला त्यात काही उणिवा जाणवल्या. वाटले, इतक्या महान व्यक्तीचे कार्य ग्रंथित करताना, तो अंक सत्याधारित, सर्वसमावेशक आणि सखोल संशोधनपूर्वक व्हायला हवा होता. महाराष्ट्रात सीडींबद्दल आदर व प्रेम आहे. ते अर्थशास्त्रावर अधिकारवाणीने लिहू/बोलू शकणारे मान्यवर आहेत. तेव्हा सीडींना अर्थशास्त्रात जे प्राविण्य प्राप्त झाले ते त्यांनी कोठे व केव्हा मिळवले? त्यांच्या तज्ज्ञतेची प्रचीती कशी येत गेली? त्यांचे नाव झाले, ते घडत कसे गेले? त्यामागील कारण काय? अर्थशास्त्र विषयात गती, सखोल अभ्यास, कालानुरूप दृष्टिकोन ठेवण्यास कारणीभूत झालेले मार्गदर्शन, त्यांची स्वत:ची दृष्टी, मिळालेल्या संधी आणि त्यांचे त्यांनी केलेले सोने ! ह्यावर प्रकाश टाकणारे लेखन जाणकारांकडून वाचण्यास मिळेल अशी अपेक्षा होती. पण वास्तवात बऱ्यापैकी निराशा झाली. त्यासंबंधात काही नोंदी –

  1. ‘महाराष्ट्राचा चिंतामणी’ : चिंतामणराव देशमुख -125 वी जयंती विशेषांक(30/5/2021) हे ‘लोकसत्ता’ दैनिकाने खास केलेले प्रकाशन विकत घेऊन वाचले. अंक compact/संक्षिप्त पण नेटका, नीटस वाटला.
  2. चिंतामणरावांच्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्व पैलूंना विशेषांकात स्पर्श झाला आहे; काहींना उडत उडत तर काहींना पुनरावृत्तीने. ती पुनरावृत्ती योग्य संपादकीय नियोजनाने वा संस्कारातून टाळली गेली असती. त्यामुळे अंक सुटसुटीत व रोचक झाला असता. उदाहरणार्थ, अनेकांनी त्यांचे कार्य/त्यांनी स्थापलेल्या संस्था ह्यांविषयी लिहिले आहे. त्याऐवजी एका लेखात त्या सर्व संस्था, त्यांचे स्थापना वर्ष, त्या संस्थांचे उद्देश-महत्त्व-कार्य-कार्यपद्धत-कार्यक्षेत्र, चिंतामणरावांचे योगदान, सद्यस्थिती असे सारे संकलित करता आले असते. त्यामुळे सर्वसामान्य वाचकाला चिंतामणरावांचे महत्त्व व वेगळेपण यांचे नीट आकलन झाले असते. उदाहरण म्हणून लिहितो. नरेंद्र जाधव यांनी जागतिक नाणे निधी (IMF) व जागतिक बँक (IBRD) यांतील फरक नेमका सांगितलाआहे. ते अंक प्रकाशनाच्या वेळी असे म्हणाले, की “जागतिक बँक ही व्यायामशाळेसारखीआहे. ती कोणत्याही देशाच्या दीर्घावधीच्या विकासाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीत मदत करून, त्या देशाला धष्टपुष्ट करते. त्याउलट, नाणेनिधीचे स्वरूप हे रुग्णालयातील अतिदक्षता विभागासारखे आहे. म्हणजे कोणत्याही देशाची परकीय गंगाजळी आटून गेली आहे आणि त्या देशाकडे आयातीसाठी कोणतेही परकीय चलन शिल्लक नाही; अशा आर्थिक आणीबाणीच्या स्थितीत, नाणेनिधी त्या देशाला कर्जाऊ मदत देऊ करते. भारताने तसे कर्ज 1981 व 1991 साली घेतले आहे.” वर्तमानपत्राने कठीण विषय असे सुबोध व सुगम करून सांगावे अशी अपेक्षा असते. जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ जॉन मेनार्ड केन्स यांनी चिंतामणरावांची जागतिक नाणेनिधीच्या संस्थापक-व्यवस्थापकीय संचालक पदासाठी शिफारस केली होती. म्हणजे ते किती मोठे अर्थतज्ज्ञ होते हे समजते. त्याप्रमाणेच India International Centre, Indian Statistical Institute, National Book Trust अशा अन्य संस्था, त्यांचे कार्य, महत्त्व आणि त्यांतील चिंतामणरावांचे योगदान इत्यादी माहिती एकत्र देणे उपयुक्त ठरले असते.
  1. सीडींच्या बहुआयामी प्रतिभेचे दर्शन अंकात सर्वत्र होत असले, तरीसगळ्यांचा ‘फोकस’ अर्थतज्ज्ञ चिंतामणरावयावर आहे. विशेषतः, त्यांची निवड ब्रिटिश सरकारने रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर (1943-1949) म्हणून व पंडित नेहरू यांनी अर्थमंत्री (1950-1956) म्हणून केली. म्हणजे त्यांचे ज्ञान अर्थ विषयात सखोल आणि अद्ययावत असणार. शिवाय, उपरोल्लेखित दोघांचा सीडींची त्यावेळच्या आर्थिक समस्यांची जाण व त्यावरील उपाययोजना या संबंधातील त्यांचे विचार यावर विश्वास असणार. पण सीडींनी अर्थ विषयातील तेवढे ज्ञान व तशी असाधारण तज्ज्ञता हे गुण कधी आणि कसे प्राप्त केले याबद्दल अंकात नीट प्रकाश पडत नाही.

अ. “ते मॅट्रिकला मुंबई विद्यापीठात सर्वप्रथम आले (1912). त्यांचे इंग्लंडला 1915 साली प्रयाण. त्यांनी केम्ब्रिज महाविद्यालयातून Natural Sciences with Botany, Chemistry and Geology या विषयांत 1917 साली प्रथम येऊन पदवी प्राप्त केली. सोबत, त्यांनी Frank Smart  हा प्रसिद्ध पुरस्कार पटकावला. ते IAS प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण 1918 साली झाले.” (पान 59) तर

ब. त्यांनी “मॅट्रिकनंतर (1912) पुढील दोन वर्षे प्रिव्हिअस व इंटरमिजिएट परीक्षांत एल्फिन्स्टन महाविद्यालयात पहिला क्रमांक कायम राखला. (पान 45), ते केम्ब्रिजला गणितातून बी ए केल्यावर 1915 साली गेले.

त्यांनी अर्थशास्त्रात पदवी घेतली होती असेही या व अशा माहितीत दिसत नाही.

क. एक वाचलेला वेगळा किस्सा आठवतो. नाटककार वसंत कानेटकर व त्यांच्या पत्नी (उषा) सिंधुताई, दोघे एका साहित्यिक कार्यक्रमासाठी हैदराबादला 1971-72 साली गेली होती. तेव्हा ती दोघे चिंतामणरावांच्या निमंत्रणावरून त्यांच्याकडे गेली. वसंतरावांनी गप्पांच्या ओघात सीडींना विचारले: “लोकमान्य टिळक यांनी तुमचे भविष्य तुम्ही कॉलेजात असतानाच सांगितले होते, की तुम्ही स्वतंत्र भारताचे अर्थमंत्री होणार; हा किस्सा खरा आहे का?” ते (सीडी) म्हणाले, “खरा आहे. मला अर्थशास्त्राच्या एका पुस्तकातील काही संदर्भ वाचायचे होते. ते पुस्तक कॉलेजच्या लायब्ररीत नव्हते. ते पुण्यात फक्त टिळक यांच्याकडे होते. तेव्हा प्राध्यापकांनी टिळक यांना चिठ्ठी लिहून, मला त्यांच्याकडे पाठवले. टिळक यांनी, मी कोणकोणती पुस्तके वाचली आहेत- हव्या असलेल्या पुस्तकातून नेमके काय वाचायचे आहे? अशी बारीक चौकशी केली. टिळक यांनी मला ते पुस्तक बहुधा मी अभ्यासू विद्यार्थी वाटल्यामुळे दुसऱ्या दिवशी परत करायचे या बोलीवर  दिले. दुसऱ्या दिवशी फर्ग्युसन विरूद्ध एस.पी. कॉलेज अशी क्रिकेटची फायनल मॅच होती. मी ती निग्रहाने बाजूस सारून, पुस्तक वाचून पुरे केले. तेव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते. मी टिळक यांच्याकडे गेलो. टिळक यांनी माझी परीक्षाच घेतली, त्या पुस्तकासंदर्भात. त्यांचे समाधान झाले. त्यांनी आणखी दोन पुस्तके सुचवली. निरोपाच्या वेळी, मी त्यांना वाकून नमस्कार केला, तेव्हा ते म्हणाले, ‘तू स्वतंत्र भारताचा अर्थमंत्री होशील !’” म्हणजे बहुधा चिंतामणराव इंटरनंतर पुण्याला शिकण्यास गेले होते. तेथेच त्यांनी अर्थशास्त्र घेऊन बी ए केले असावे. पण त्यांनी तसे केल्याचे ‘लोकसत्ते’च्या एकाही मान्यवरांच्या लेखात नमूद केलेले नाही. शिवाय, त्यांनी अर्थशास्त्रात प्राविण्य कसे मिळवले याचाही उल्लेख नाही; त्या बाबतची चर्चा राहिली बाजूला !

संपादक गिरीश कुबेर ‘अन्यथा’ नावाचे सदर लिहीत. त्यात त्यांनी ‘आकड्यांच्या पलीकडले…’ या शीर्षकाखाली काही अर्थमंत्र्यांचा परिचय अर्थसंकल्प दिनानिमित्त ‘लोकसत्ते’च्या 17 मार्च 2012च्या दैनिक अंकात करून दिला होता. त्याला प्रतिसाद म्हणून मी हा प्रसंग त्या वेळी लिहून कळवला होता. तो ‘आठवले ते, असेही…’ या शीर्षकाखाली 24 मार्च 2012 ला लोकसत्तेत प्रसिद्ध झाला होता. (संदर्भ: ‘साथसंगत’ – (उषा) सिंधू वसंत कानेटकर, पान 88 ते 93 : ‘सी.डी. देशमुख-एक अनोखं दर्शन’)

4. संस्कृतप्रेम : अनेकांनी चिंतामणरावांचे संस्कृत भाषाप्रेम व त्यांचे त्या भाषेवरील प्रभुत्व यांबद्दल लिहिले आहे. प्रा. मंजुषा गोखले यांनी‘विदग्ध संस्कृतप्रेमी’ या नावाने लेखहीलिहिला आहे. एका  वृत्तानुसार, मराठीत बत्तीस मान्यवरांनी ‘मेघदूता’चा अनुवाद केला आहे. पण फक्त चिंतामणरावांनी तो, मूळ ‘मेघदूत’ ज्या मंदाक्रांता वृत्तात आहे त्या वृत्तात केला आहे. गोखले मॅडम यांनी मोघमपणे अनुवाद ‘समश्लोकी, समवृत्तात आहे’ अशी त्याची बोळवण केली आहे.

  1. पुस्तकाच्या शेवटी चिंतामणरावांचा जीवनवृत्तांत :

अ. जसे: तारीखवार जन्म, पदवी, विवाह, संतती, मृत्यू इत्यादी.

ब. तसेच, त्यांच्याशी संबंधित प्रत्येक संस्थेचे नाव व ती केव्हा स्थापन झाली?

क. त्यांची प्रसिद्ध झालेली/लिहिलेली/अप्रकाशित ग्रंथसंपदा अशी यादी देण्यास हवी होती व त्यानुसार प्रकाशन वर्ष आणि लेखन वर्ष देण्यास हवे होते.

  1. सदर पुस्तक हा एक संदर्भ ग्रंथ व्हावा ही ‘लोकसत्ते’च्या संपादकांची इच्छा असणार. तेव्हा त्यात किरकोळ चुकासुद्धा दृष्टीस पडू नयेत अशी अपेक्षा.उदाहरणार्थ,

अ. चिंतामणरावांचा जन्म महाडमधील नाते या गावी 14 जानेवारी 1896 रोजी  झाला. तत्संबधित दोन उल्लेख – (पान 117) चिंतामणराव हे पहिले अपत्य. कारण मुलीचे पहिले बाळंतपण माहेरी करण्याची प्रथा असल्याने भागीरथी (आई) तळ्याहून नात्याला आल्या होत्या. पंढरीनाथ दुसरा. (पान 44) याला छेद देईल असे विधान “चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख हे नऊ भावंडांमध्ये सर्वांत लहान” असा उल्लेख आहे.

चिंतामणराव पहिले अपत्य की नववे?

ब. त्यांनी अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्याचे कारण, अनेक लेखांत नेमकेपणाने दिलेले नाही. त्यामुळे वाचणाऱ्याचा गोंधळ उडू शकतो.

क. इंदिराजींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केल्यावर, त्यांच्या घरासमोर जयजयकार करणाऱ्या जमावाचे फोटो आणि बातम्या अनेक दिवस येत होत्या. पण राष्ट्रीय झालेल्या बँकांचे कार्य नंतर डबघाईला आले आहे. उलट, चिंतामणरावांनी तत्काळी अस्तित्वात असलेल्या सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केले. अतिशय गुप्तपणे, सावधानतेने आणि यशस्वी रीत्या. तसेच, त्याचे योग्य नियमन केले. आज राष्ट्रीयीकरण झालेल्या बँकांचे कार्य/ परिस्थिती डबघाईला आलेली दिसते. ते अर्थमंत्री असताना, पावसाळ्यातील गवताप्रमाणे, अनेक कंपन्या बाजारात उगवत. गरजूंना वारेमाप आश्वासने देत. विमा रक्कम देणे अशक्यप्राय झाले की बाजारातून गायब होत. त्यामुळे सर्वसामान्य माणूस फसवला /नागवला जाई. त्यामुळे, चिंतामणरावांनी अस्तित्वात असलेल्या सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केले: ‘आयुर्विमा महामंडळ’ (Life  Insurance  Corporation Of  India). त्यामुळेच आयुर्विमा महामंडळ भक्कम उभे आहे. चिंतामणरावांच्या त्या कार्याचे पाहिजे तेवढे कौतुक अंकात झालेले नाही.

ड. त्यांची पहिली पत्नी व तिची मुलगी याबद्दल अधिक माहिती अपेक्षित होती. ‘साथसंगत’ पुस्तकात (3 क हा संदर्भ पाहवा) “चिंतामणरावांनी इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या त्यांच्या मुलीचे आणि नातवंडांचे फोटो दाखवले” असे म्हटले आहे.

इ. ते अव्वल इंग्रजी कालखंडात शिकले असल्याने व इंग्लंड येथील वास्तव्य, शिक्षण व त्यांची ब्रिटिश सरकारची नोकरी यांमुळे ते बहुतांश इंग्रजीचा वापर करत, पण त्यांनी आत्मचरित्रात लिहिल्याचे आठवते, की ते कुलाबा (रायगड) मतदारसंघात निवडणूक प्रचार करताना ‘शुद्ध मराठी’त बोलत, एकही इंग्रजी शब्द न वापरता.

7. त्यांनी नेहरू यांच्याशी वितुष्ट आल्याने राजीनामा दिला. त्यामुळे ते काँग्रेस व काँग्रेसी जनांना बहिष्कृत ठरले. त्यामुळेच, त्यांची जन्मशताब्दी काँग्रेस सरकारकडून साजरी होणे शक्य नव्हते. काँग्रेसने नरसिंह राव यांच्याप्रमाणे चिंतामणरावांना त्यामुळेच दुर्लक्षित केले असावे. परंतु महाराष्ट्रात, भाजप-शिवसेना युतीचे मनोहर जोशी (14/3/1995 ते 31/1/1999) यांचे सरकार होते. सीडींची जन्मशताब्दी 14 जानेवारी1996 या दिवशी येत होती. रिमोट कंट्रोल बाळासाहेबांच्या कडेहोता. त्यामुळे त्यांची जन्मशताब्दी महाराष्ट्रात का साजरी झाली नाही याचा खुलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देण्यास हरकत नाही.

या अंकातील उणिवांवर प्रकाश टाकणारा लेख जाणकारांकडून मिळावा, ही अपेक्षा.

श्रीधर गांगल 9619420495 shreedhargangal@gmail.com

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here