पस्तिसावे मराठी साहित्य संमेलन (Thirty fifth Marathi Literary Meet 1952)

पस्तिसावे साहित्य संमेलन अंमळनेर येथे 1952 साली झाले. त्या संमेलनाचे अध्यक्ष भाषाशास्त्रज्ञ आणि व्याकरणकार कृष्णाजी पांडुरंग (कृ.पां.) कुलकर्णी हे होते. त्यांचा जन्म 5 जानेवारी 1892 रोजी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे झाला. त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील ओंड हे होय. ते भाषेच्या व्युत्पत्तिशास्त्राचे प्रकांडपंडित मानले जातात. त्यांना मराठी भाषाशास्त्राच्या अभ्यासाची स्फूर्ती इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांच्यापासून मिळाली. कृ.पां. कुलकर्णी शिक्षणासाठी अनेक ठिकाणी हिंडले, अनेकांच्या आश्रयाने राहिले, पण त्यांनी ज्ञानाची जबरदस्त ओढ असल्यामुळे शिक्षण पुरे केले. त्यांना कोल्हापूरला शाळेत शिक्षण घेत असताना शिष्यवृत्ती मिळाली आणि ते 1911 साली मॅट्रिक झाले. त्यांनी पुढील शिक्षण कोल्हापूर आणि पुणे येथे पूर्ण केले.

त्यांना नोकरी सरकारी शाळेत मिळाली. प्रथम धुळ्यास नेमणूक, नंतर साताऱ्यास बदली. ते साताऱ्याहून एम ए झाले आणि मुंबईला येऊन बी टी झाले. ते मराठीचे प्राध्यापक म्हणून मुंबईतील एलफिन्स्टन कॉलेजात एक तप होते. ते रियासतकार सरदेसाई यांचे सहकारी काही काळ होते. ते पुण्यात सरदेसाई यांच्याबरोबर ‘पेशवे दफ्तर’ 1929 ते 1933 अशी चार वर्षे पाहत होते. त्यामुळे ते साहित्याकडून इतिहासाच्या प्रेमात पडले. त्यांच्या संशोधनकार्याला तेथून सुरूवात झाली. त्यांचा पहिला ग्रंथ ‘भाषाशास्त्र व मराठी भाषा’ हा 1925 सालीच प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर 1926 साली ‘संस्कृत नाटके व नाटककार’ हा ग्रंथ प्रकाशित झाला. त्यांना प्राध्यापकाची नोकरी मुंबईच्या कॉलेजात 1950 साली मिळाली. ते मुंबईच्या टोपीवाला कॉलेजात प्राचार्य झाले. ते निवृत्त 1959 साली झाले. त्याआधी ते रुपारेल महाविद्यालयातही मराठीचे प्राध्यापक होते.

ते ‘मराठी संशोधन मंडळा’चे संचालक होते. ते महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार मंडळाचे अध्यक्ष होते. तसेच ते शुद्धलेखन समितीचे कार्यवाह होते. भाषाशास्त्राची सामान्य तत्त्वे आणि मराठी आटोपशीरपणे मांडणारा ‘मराठी भाषा, उद्गम आणि विकास’ (1933) आणि मराठी शब्दांची तौलनिक माहिती देणारा ‘मराठी व्युत्पत्तिकोश’ (1946) हे कृ.पां. कुलकर्णी यांचे प्रमुख ग्रंथ आहेत. त्यांनी ‘महाराष्ट्र गाथा’, ‘विवेकसिंधू’ इत्यादींचे संपादन केले. त्यांचे आत्मचरित्र ‘कृष्णाकाठची माती’ या नावाने 1961 साली प्रसिद्ध झाले.

ते हाडाचा शिक्षक आणि ग्रंथकर्ता म्हणूनच साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. त्यांनी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना भाषिक प्रांतरचनेचा जोरदार पुरस्कार केला. ते म्हणाले, “प्रांताचा सर्व कारभार मराठीतच झाला पाहिजे. ज्ञानाच्या सर्व क्षेत्रांत लक्ष घातले पाहिजे. मराठी भाषा व वाङ्मय ह्यांच्या संरक्षणासाठीच नव्हे तर ती वाढवण्यासाठी वाङ्मयीन संस्था व सरकार यांनी उत्तेजन दिले पाहिजे. असे झाले तरच आपण ‘आपण’ म्हणून राहू.”

त्यांचे देहावसान मुंबई येथे 12 जून 1964 रोजी झाले.

– वामन देशपांडे 9167686695, अर्कचित्र – सुरेश लोटलीकर 9920089488

————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here