पंडित भगवानलाल इंद्रजी (1839 - 1888) हे नाव सर्वसामान्य वाचकांना माहीत नसते. तसे ते माहीत असण्याचे कारणही नाही. भगवानलाल इंद्रजी हे मुळचे जुनागढचे. ते पुरातत्त्वशास्त्रज्ञ, शिलालेखांचे संशोधक आणि पुराणवस्तूंचे संग्राहक होते. ते मुळचे गुजरातचे असले तरी त्यांनी बरेचसे काम डॉ. भाऊ दाजी लाड यांच्याबरोबर केले. त्यांनी भारतभरच्या ब्राह्मी लिपीतल्या इतर असंख्य शिलालेखांचे वाचन केले आहे. पण त्यांचे नाव कायमचे जोडले गेले आहे ते रुद्रदमनच्या गिरनार येथील अडीच हजार वर्षांपूर्वीच्या शिलालेखाशी ! भगवानलाल इंद्रजींनी डॉ. भाऊ दाजी लाड यांचे साहायक म्हणून अनेक वर्षे काम केले. भाऊ दाजी यांनी त्यांच्या संशोधनासाठी, प्रवासासाठी, उत्खननासाठी निधी उपलब्ध करून दिला...