सोलापूर शहरात 8 मे 1930 रोजी इंग्रजी हत्यारी पोलिसांकडून जालियनवाला बागेची छोटी आवृत्ती घडली होती. सोलापुरात जे हत्याकांड सरकारने घडवले होते, त्याची खबर जगाला नव्हती. पंचवीसाहून अधिक बळी त्यात गेले होते. सोलापूरचे ते गाऱ्हाणे जगाच्या वेशीवर टांगले रामचंद्र शंकर उपाख्य रामभाऊ राजवाडे यांनी. त्यांचे वृत्तपत्र होते ‘कर्मयोगी’ या नावाचे.
राजवाडे हे कट्टर टिळकभक्त. त्यांच्यावर लोकमान्यांच्या नंतर तात्यासाहेब केळकर यांचा प्रभाव होता. साहजिकच, त्यांना महात्मा गांधी यांचे राजकारण तितकेसे रुचत नव्हते. त्यामुळे राजवाडे सविनय कायदेभंगाच्या चळवळीपासून काहीसे अलिप्त होते. मात्र सोलापुरात 8 मे 1930 रोजी निरपराध लोकांवर जो अकारण गोळीबार केला गेला, ती क्रूरतेची परमावधी होती. आणि त्यावर कडी म्हणजे तसा काही गोळीबार झाला आहे याची कबुलीही सरकार देत नव्हते. सरकार गोळीबार फक्त दंगेखोरांवर झाला असे म्हणत होते. राजवाडे यांनी प्रत्यक्ष फिरून माहिती गोळा केली आणि गोळीबारात मरण पावलेल्या व जखमी झालेल्या निरपराध नागरिकांची यादीच नावांसहित प्रसिद्ध केली ! राजवाडे यांनी त्यांच्या ‘कर्मयोगी’ वर्तमानपत्राचा खास अंक काढून 10 मे 1930 रोजी ‘सोलापूरच्या दंग्याची खरी हकिकत’ या मथळ्याखाली पोलिसांनी अकारण केलेल्या त्या गोळीबाराची माहिती प्रकाशात आणली. ती हकिगत ‘केसरी’ने त्यांच्या 13 मे च्या व ‘ज्ञानप्रकाश’ने 14 मे च्या अंकात पुनःप्रकाशित केली. त्या वृत्तांताची भाषांतरे विदेशात पोचून सोलापूर प्रकरणाचे गाऱ्हाणे जगाच्या वेशीवर टांगले गेले. तोपर्यंत मुंबईच्या इंग्रजी वृत्तपत्रांनी सोलापूरविषयी ज्या बातम्या दिलेल्या होत्या, त्या एकांगी व खोडसाळ होत्या, त्याचा राजवाडे यांनी तीव्र निषेध केला. ते म्हणतात- ‘टाइम्सकारांच्या बातमीदारांनी ‘लोकांच्या अत्याचारा’चे भडक रंगाने वर्णन दिले आहे; मात्र त्यांना पोलिसांच्या अमानुष अत्याचाराचा, निरुपद्रवी शहरवासीयांच्या कत्तलीचा मागमूसही लागलेला दिसत नाही… दंगेखोरांनी अत्याचार केले ते पोलिसांवर केले; मुसलमान म्हणून नव्हे, हे कोणासही सहज समजण्यासारखे आहे. जातिवैमनस्य जे सोलापुरात सध्या नाही, ते उत्पन्न करण्याचा ‘टाइम्स’पत्राचा हा हलकट प्रयत्न पाहिला म्हणजे त्याचा कोणीही झाले तरी तीव्र निषेधच करील.’
राजवाडे यांचा ‘कर्मयोगी’ 10 मे 1930 रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर निरपराध जनतेवर झालेल्या गोळीबाराची बातमी सोलापूरबाहेर समजली. राजवाडे यांनी नाव, स्थळ अशी मृत व्यक्तींची यादीच छापून प्रसिद्ध केल्याने सरकारचे गौप्य उघड झाले व गोळीबाराच्या चौकशीची मागणी पुढे आली. गॅलरीत बसणारी बालके, परसाकडे जाणारे लोक, म्हाताऱ्या बायका या साऱ्यांना सरकारने दंगेखोर ठरवून टाकले. त्यामुळेच गोळीबार झाला, तो दंगेखोरांवरच आणि तोदेखील सरकारी आदेशाने, असे सरकार म्हणत राहिले. इंग्रजांचा कायदा, त्यांची शिस्त, त्यांची न्यायप्रियता याविषयी साऱ्या जगभर जो एक दबदबा होता, त्याचे पितळ ‘कर्मयोगी’ने उघडे पाडले ! राजवाडे यांनी सोलापूर गोळीबाराची जी हकीकत प्रसिद्ध केली, त्याचे पडसाद मुंबईच्या कायदेमंडळात उमटले. एवढेच नव्हे, तर इंग्लंडच्या पार्लमेंटातदेखील सोलापूर प्रकरणी सरकारला जाब देण्याची वेळ आली.
सोलापूर शहरात लष्कराने 12 मे च्या रात्री प्रवेश केला, शहरात ‘मार्शल लॉ’चा अंमल सुरू झाला. पोलिसांनी राजवाडे यांना अटक 13 मे 1930 रोजी केली. त्यांना लष्करी कोर्टाने सात वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. ‘कर्मयोगी’वर बंदी घातली गेली, राजवाडे यांचा छापखाना जप्त केला गेला. इंग्रजांची न्यायप्रियता अशी होती, की जेथे पाप करणे शक्य होते; मात्र पापाचा पाढा वाचणे अक्षम्य होते. राजवाडे यांना माफीचा फायदा देण्यासदेखील मुंबई सरकारने विरोध केला. अखेर, महात्माजींनी ती बाब प्रतिष्ठेची केली. गांधी-आयर्विन कराराची पूर्वअट म्हणून राजवाडे यांची सुटका झाली.
– अनिरुद्ध बिडवे (0218) 2220430, 9423333912 bidweanirudha@gmail.com
————————————————————————————————————-