सोशल मीडिया : वरदान की बुमरँग ? (Social Media : a boon or a boomerang?)

समाज माध्यमे हाताळण्याची जबाबदारी हे सजगतेचे लक्षण आहे. आपल्याला हवे तसे आणि हवे तशा शब्दांत लिहिणे आणि एखाद्या व्यक्तीचे किंवा समाजाचे मानसिक स्थैर्य ढासळवणे याला मर्दुमकी नाही तर भ्याडपणा समजतात. एकाचवेळी अनेकांपर्यंत पोचण्याची क्षमता असलेले हे माध्यम ! त्याचे अनेक गुण आणि फायदे आहेत. पण त्याबरोबर प्रत्येकाची समाजाप्रती नैतिक बांधिलकी आहे. त्याविषयी मांडलेली अभ्यासपूर्ण मते जरूर वाचावी…
– अपर्णा महाजन

संवाद माध्यमांच्या विपुलतेनंतर माणसे जोडली जाण्याऐवजी दुरावत चालली आहेत. संध्याकाळी घरी एकत्र जेवण करत दिवसभराच्या घटना एकमेकांना सांगणारे कुटुंबीय त्यांच्या त्यांच्या खोल्यांत ज्याचा त्याचा हँडसेट हातात घेऊन किंवा पीसीवर बसलेले आढळतात. ब्राझीलमध्ये स्फोट झाल्याची बातमी क्षणार्धात कळते पण घरामध्ये दुसऱ्या खोलीत आईची तब्येत चांगली नाही हे मात्र लक्षात येत नाही. या ‘माध्यम सुनामी’तून येणाऱ्या माहितीच्या पुराचा माणसांवर इतका प्रभाव पडला आहे, की माणूस त्याचे स्वत:चे असे मत अमुक एका विषयावर काय आहे याचा विचार करण्याचेच विसरून गेला आहे.

अमेरिकेत झालेल्या एका सर्वेक्षणात असे आढळून आले की रेडिओला पाच कोटी लोकांपर्यंत पोचण्यास अडतीस वर्षे लागली होती. दूरचित्रवाणीला तेवढ्या लोकांपर्यंत पोचण्यास तेरा वर्षे लागली. इंटरनेट तेवढ्याच लोकांत लोकप्रिय होण्यासाठी केवळ चार वर्षे पुरली ! आयपॉडला तीन वर्षे लागली. परंतु फेसबुकने मात्र फक्त एका वर्षात त्या संख्येच्या चक्क चौपट म्हणजे वीस कोटी लोकांना आपलेसे केले ! त्याने जवळजवळ ‘कर लो दुनिया मुठ्ठी मे’ खरे करून टाकले आहे. जर ‘फेसबुक वापरणाऱ्यांचा देश एक’ आहे अशी कल्पना केली तर लोकसंख्येच्या बाबतीत तो देश चीन आणि भारत यांच्यानंतर जगात तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरेल.

सामाजिक संवादसाधनांचा हा प्रभाव रोजच्या जीवनात इतका वाढला आहे, की अन्न, वस्त्र, निवारा यांच्याबरोबर स्मार्ट फोनचीही गरज महत्त्वाची वाटू लागली आहे. स्मार्टफोन घेऊन दिला नाही म्हणून लहान मुलांनी आत्महत्या केल्याच्याही बातम्या ऐकतो. संवादसाधनांचा प्रभाव वाढत आहे असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा, खरे तर, एक अगदी उघड अशीच गोष्ट पुन्हा सांगितलेली असते. कारण संवादसाधने प्रस्थापित झाली तीच मुळी त्यांच्या समाजावर पडणाऱ्या प्रभावामुळे ! त्यात ट्विटर, फेसबुक, व्हॉटसअॅप, इन्स्टाग्राम, यु-ट्यूब इत्यादीचा समावेश आहे. त्यांच्या प्रभावाचे मूळ त्यांच्या अत्यंत व्यक्तिगत अशा स्वरूपात आहे. तसेच, ते त्यांच्या अंगीभूत सामाजिकतेतही आहे. पूर्वी एखादी घटना घडली तर त्याची बातमी येण्यासाठी रात्री सात किंवा सकाळी सातच्या रेडीओवरील किंवा दूरदर्शनवरील बातमीपत्राची वाट बघावी लागे. ‘सोशल मीडिया’मुळे घटना घडल्यावर त्वरित नव्हे, तर ती घडत असतानाच, तिची सविस्तर माहिती चित्रांसह सगळ्यादूर पसरते.

सकाळी उठल्या उठल्या जेव्हा एखादी व्यक्ती तिला व्हॉटसअॅपवर आलेले संदेश वाचत असते तेव्हा तो तिचा अत्यंत खाजगी आणि व्यक्तिगत अनुभव असतो. परंतु जेव्हा तो संदेश ती व्यक्ती एखाद्या समूहात पोस्ट करते तेव्हा तिचे ते वर्तन सामाजिक असते. त्याशिवाय गंमत अशी, की जर ते संवादसाधन सामाजिक रीत्या वापरले नाही तर त्याचा उपयोग करण्याची गरजच नसते. कारण मग ज्याच्याशी केवळ व्यक्तिगत संवाद साधण्याचा आहे त्याला फोन लावता येतो किंवा भ्रमणध्वनीमार्फत लघुसंदेश पाठवता येतो ! म्हणजे या साधनांचा उपयोग एकाच वेळी सामूहिक आणि खाजगी असा एकत्र होणे अपेक्षित असते.

माणूस त्याच्या अमेरिकेतील मित्राला काल रात्री झालेल्या नवजात बाळाचे छायाचित्र जेव्हा लगेच फेसबुकवर पाहतो तेव्हा तो संदेश केवळ त्याला उपलब्ध नसतो. तो जगातील असंख्य लोकांना एकाच वेळी उपलब्ध झालेला असतो. म्हणजे तो अनुभव त्याचा खाजगी आणि व्यक्तिगत असला तरी तो एकाच वेळी तितकाच सामूहिकही असतो. वृत्तसंस्था जेव्हा घटनेच्या बातमीचा व्हिडिओ त्यांच्या फेसबुक भिंतीवर टाकते तेव्हा तो मजकूर जणू तिने आकाशात टांगलेल्या एका भव्य काल्पनिक फळ्यावर लिहिलेला असतो. तो जगातील कोणालाही, कोठूनही दिसत असतो. त्यांतील माहितीचा प्रभाव सर्व जगातील नागरिकांवर पडू शकतो. घटना किंवा तिच्याबद्दलची माहिती केवळ तिच्याशी संबधित लोकांना कळवली जात नसून ती त्या घटनेशी दुरान्वयेही संबंध नसलेल्या कोट्यवधी लोकांपर्यंत आपोआप पोचवली जाते हेच त्या माध्यमांच्या लोकप्रियतेचे महत्त्वाचे कारण आहे.

प्रत्येक राजकारणी व्यक्तीला यात पडावे लागते. तिला त्यांचे एक खाते फेसबुक आणि ट्विटरवर ठेवून तिच्या पक्षाची विविध विषयांबद्दलची मते, प्रतिक्रिया द्याव्या लागतात. कारण अलिकडे अनेक निवडणुकांत या माध्यमांचा प्रभाव जाणवला होता. जवळजवळ सगळा युवावर्ग ही माध्यमे वापरत असल्याने आणि तो वृत्तपत्रे, टीव्ही, रेडिओ या पारंपारिक माध्यमांपासून बराच दूर गेल्याने सामाजिक संवादमाध्यमांचा वापर राजकारणात अपरिहार्य झाला आहे. प्रत्येक राजकारण्याला लोकांचे मत त्यांना अनुकूल करणे, विरोधी पक्षाचे मुद्दे खोडून काढणे भाग असते. त्यामुळे त्यापासून कोणाला दूर राहता येत नाही. चीनसारख्या लोकशाही नसलेल्या देशातही सोशल मीडियामुळे चळवळी चालवणे शक्य झाले आहे.

व्यापारी आणि कंपन्या विविध उत्पादनांची जाहिरात करणे, ग्राहकांशी सततचा संपर्क ठेवणे, त्यांच्या मनातील कंपनीबाबतची मते जाणून घेणे, नव्या उत्पादनाची माहिती देणे, विविध ग्राहकलाभ योजना लोकांपर्यंत पोचवणे यासाठी सामाजिक संवादसाधनाचा वापर करत आहेत. कित्येकदा तर, मालाची अद्ययावत माहिती पुरवल्यावर ऑर्डर देण्याची सोय ग्राहकांना सोशल मीडियावर उपलब्ध करून दिलेली असते. त्यामुळे उत्पादक आणि ग्राहक यांतील दलालांची यादी कमी होऊन माल कमी किंमतीत पुरवता येऊन व्यापार वाढतो. शिवाय, सोशल मीडियावरील जाहिराती टीव्हीवरील किंवा अन्य प्रकारे दिलेल्या जाहिरातींपेक्षा फार स्वस्त पडत असतात.

सोशल मीडियामुळे पंचवीस-तीस वर्षापूर्वीपासून संपर्क तुटलेल्या वर्गमित्राला शोधता येते. समान रुची असलेले नवे मित्र जोडता येतात. विविध स्थानिक आणि जागतिक विषयांचे अद्ययावत ज्ञान मिळवता येते. वेगवेगळ्या मोहिमांत, चळवळींत, समान रुची असलेल्या समूहात कल्पनांचे आदानप्रदान करणे शक्य होते. मोठमोठ्या घटनांवर प्रतिक्रिया देऊन भावनांचा निचरा करता येतो. पूर्वी असे करणे केवळ वृत्तपत्रे, रेडिओ, टीव्ही वाहिनीच्या संपादकीय टीमच्या सहकार्याने व निवडक व्यक्तींना ‘वाचकांच्या पत्रव्यवहारा’द्वारे शक्य होई. आता, कोणीही त्याचे मत मांडू शकतो, त्याच्या प्रभावाने सामाजिक स्वास्थ्य सुधारू किंवा बिघडवू शकतो. लोक त्यांच्या करियरमधील संधीत आणि लोकसंपर्कात (नेटवर्क) वाढ ‘लिंक्ड-इन’सारख्या संकेतस्थळावरून करू शकतात. विद्यार्थी आणि शिक्षकही या साधनाचा वापर शिक्षणासाठी करतात.

याचे काही नकारात्मक परिणामही समाजावर झाले आहेत. असामाजिक प्रवृत्ती आणि गुन्हेगारी वृत्तीचे लोकही या माध्यमांचा सर्रास वापर करत आहेत. त्यातून लोकांना घाबरवणे, फसवणे असे प्रकार केले जात आहेत. त्यामुळे पोलिस यंत्रणेनेही ‘सायबर क्राईम’ ही शाखा सुरू केली आहे. एखाद्याला मानसिक त्रास देणे, फसवणे, परस्परद्वेष पसरवून सामाजिक वातावरण दूषित करणे, देशाविरुद्ध वागण्यासाठी उद्युक्त करणे, एखाद्याची बदनामी करणे असे गुन्हे करणाऱ्यांविरुद्ध कायदाही करण्यात आला आहे.

या साधनांचा दुसरा तोटा असा, की त्यांचे चक्क व्यसन लागू शकते. त्यांचा खूप वेळ या साधनांचा गैरवाजवी वापर करण्यात निघून जातो. त्यातून मानसिक विकार वाढले आहेत. कर्मचाऱ्यांची कामाच्या जागी उत्पादकता कमी झाली आहे. काही कंपन्यांनी कामाच्या जागी ‘सोशल मीडिया’ साधनांच्या वापरास बंदी घातली होती. अशीच बंदी काही दिवसांपूर्वी विद्यापीठे आणि महाविद्यालये येथेही घालण्यात आली होती मात्र ती शिक्षणासाठी होऊ शकणारा चांगला उपयोग लक्षात आल्यावर उठवून प्रसंगी त्यांना चक्क उत्तेजन देण्यात आले.

सामाजिक संवादसाधनांवर जर योग्य ती काळजी घेतली नाही, विशेषत: व्यक्तिगत माहितीबाबतची सुरक्षितता बाळगली नाही तर गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक व्यक्तीला अडचणीत आणू शकतात. ते त्यांची ओळख चोरून, वेगळे खाते काढून, गुन्हे करून, त्यात व्यक्तीला अडकावू शकतात. अनेक कंपन्या कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यापूर्वी त्याच्या सामाजिक संवादसाधनांवरील वर्तनाचा अभ्यास करतात. तो असामाजिक गोष्टीचा पुरस्कार करत असेल तर त्याची नेमणूक करण्यापूर्वीच रद्द होऊ शकते. जेव्हा काही लोकांनी ‘आम्ही पंधरा दिवसांसाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहोत’ असे त्यांच्या फेसबुक भिंतीवर लिहिले तेव्हा त्यांच्या घरचा पत्ता त्याच साईटवरून मिळवून चोरांनी तेथे दरोडा टाकल्याच्या घटना आहेत. तसेच, व्यक्तिगत चारित्र्याच्या संशयावरून घटस्फोटही झाले आहेत. फारसा विवेक अंगी नसणारे तरुण धार्मिक कट्टरवादाला उत्तेजन देणाऱ्या लोकांच्या संपर्कात आल्याने आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या तावडीत सापडल्याचीही उदाहरणे आहेत. ‘इसीस’सारख्या प्रतिगामी, विघातक, धर्मांध विचाराला जगाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे महापाप याच माध्यमांच्या खात्यावर जमा आहे. त्यातून जगभरचे तरुण अमानुष विचारधारेच्या आहारी गेल्याची उदाहरणे आहेत.

सामाजिक संवादसाधनांचा प्रचंड प्रभाव व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनावर नक्कीच पडला आहे. त्याने व्यक्तिगत आणि सामाजिक, फॉर्मल आणि इन्फॉर्मल शिक्षणासाठी अनेक उत्तम साधने निर्माण केली आहेत. व्यापार आणि सामाजिक आदानप्रदान वाढले आहे. लोकांतील परस्परसंवाद वाढला आहे. मात्र त्याच वेळी माणूस टोकाचा आत्मकेंद्री, प्रसंगी स्वार्थी आणि एकलकोंडाही झालेला दिसतो. ज्ञानप्रसाराची संधी निर्माण झाली तसेच परस्पर-विद्वेष, भीती आणि अफवा पसरवण्यासाठी या साधनांचा वापर होत आहे. सोशल मीडियाचे नकारात्मक परिणाम विवेकीपणे टाळून केवळ सकारात्मक लाभ घेणे शक्य आहे. त्यासाठी कठोर असा सामूहिक निर्धार लागेल. एक देश म्हणून जनतेत, विशेषत: तरुणवर्गात, किती प्रमाणात स्वतंत्र विचारशक्ती, विवेकी चिंतन, व्यक्तिगत शिस्त आणि राष्ट्रवादी, सकारात्मक, सर्वांना सामावून घेणारा दृष्टिकोन निर्माण करू शकतो त्यावर हे अवलंबून असणार आहे.

– श्रीनिवास बेलसरे 9969921283 shreeneevas@gmail.com

About Post Author

2 COMMENTS

  1. श्रीनिवास बेलसरे यांचा लेख संवाद माध्यमातील कळीच्या मुद्द्यांना स्पर्श करणारा आहे. सामाजिक माध्यमे ही वरकरणी हवीशी जरी वाटली तरी त्याचा वापर आणि वावर याबाबत काहीच निश्चितता नाही. त्यामुळे आपल्या जीवनात तो मुक्तपणे संचार करत आहे. आपण त्याच्या आहारी गेलो आहोत. यामुळे मानवी संबंध तांत्रिक पातळीवर गेले आहेत.
    मानवी जीवन हे मूलतः सर्जनशील आणि भावनात्मक आहे. हे दोन्ही घटक सामाजिक माध्यमे विचारात घेत नाहीत. यासाठी ही माध्यमे आपल्यासाठी पूरक असणे, ठीक आहे. त्यांनी आपला ताबा घेणं योग्य नाही. मानवी संबंध हे नैसर्गिक पातळीवरील अतांत्रिक संबधातून पुढे जायला हवेत.

  2. श्रीनिवास बेलसरे यांच्या मताशी पूर्ण सहमत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here