वाडवळी बोली – अम्लान लेणे (Dictionary of Wadvali Dialect)

या वर्षी ग्रंथाली वाचक दिनाच्या दिवशी म्हणजे 25 डिसेंबर 2023 रोजी ‘ग्रंथाली’तर्फे वाडवळी बोलीचा शब्दकोश प्रकाशित होत आहे. वाडवळी ही उत्तर कोकणपट्टीतली प्रचलित बोली. कोंकणी, पोर्तुगीज, लॅटीन, फारसी, अरबी आणि मराठी अशा विविध भाषांमधले शब्द सामावून घेणारी ही एक मनोज्ञ बोलीभाषा आहे. या बोलीभाषेचा शब्दकोश मूळचे वसईचे असलेले आणि सध्या ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेले रिचर्ड नुनीस यांनी संपादित केला आहे. मराठीला कोशवाङ्मयाची समृद्ध परंपरा आहे त्या परंपरेत हा शब्दकोश मोलाची भर घालेल. या शब्दकोशाला डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे. त्या प्रस्तावनेतला हा संपादित अंश. ‘मोगरा फुलला’ या ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वरील दालनातील इतर लेख सोबतच्या लिंकवरून वाचता येतील.

-सुनंदा भोसेकर

वाडवळी बोली – अम्लान लेणे

भाषा ही विचारांची जननी असते. विचार, भावना, कल्पना अभिव्यक्त करण्याचे सर्वात सोपे असे साधन म्हणजे भाषा. अर्थात स्वर – यंत्राची पूर्ण वाढ आणि बोलता येणं हे यात अपेक्षित आहे. समाजाला एकत्रित आणण्याचे, एकत्र सांधण्याचे बलिष्ठ असे साधन आहे भाषा ! किंबहुना भाषा ही एक सामाजिक संस्था आहे. कारण भाषा ही अर्जित संपत्ती आहे. माणूस जन्मताच बोलू शकत नाही. तथापि, आईच्या गर्भात असल्यापासूनच त्याच्यावर मायबोलीचे संस्कार झालेले असतात; तेथूनच तो गर्भभाषा आत्मसात करू लागलेला असतो. शरीराची पूर्ण वाढ झाली, की मगच तो बोलू शकतो. गर्भातून मिळालेले संस्कार आणि भवतालच्या परिणामातून व्यक्ती घडत जाते, तसतसे त्याचे भाषेविषयीचे आकलन वाढत जाते. तो समृद्ध होत जातो. त्यामुळे मायबोलीशी असलेलं आपलं नातं; हे गर्भ-नातं असतं. त्याचबरोबर मायबोली अनेक शतकांचा प्रवास करून आपल्यापर्यंत पोचलेली असते. आपले पूर्वज ज्या बोलीत, ज्या भाषेत बोलत होते, ती बोली, थोड्याफार फरकाने का होईना, परंतु आपल्यापर्यंत आलेली असते. आपली मायबोली म्हणजे शब्दांच्या सुवर्णमुद्रांचा खजिनाच असतो. तो सांभाळण्याची जबाबदारी मात्र आपल्यावर असते.

प्रमाण भाषेत अनेक बोलींचा समुच्चय असतो. किंबहुना प्रमाण भाषा ही कोणत्या तरी बोलीच्या रूपातच बोलली जात असते. छोट्या-छोट्या विभागातून वाहणारे बोलींचे निर्झर भाषा नामक नदाला वा नदीला जाऊन मिळतात; हा नद समुद्राला जाऊन मिळतो. आणि सारं विश्व आपल्या कवेत घेणाऱ्या समुद्राने तर जगभरच्या नद्या त्याच्या पोटात घेतलेल्या असतात… कोणत्याही भागातील भाषेचेही असेच असते. आपापल्या परिसरातील विविध बोली प्रमाणभाषेत गुण्या-गोविंदाने एकत्र नांदत असतात. विविध बोलींतील शब्दांनी प्रमाण भाषा म्हणून समजलेल्या आणि सर्वमान्य झालेल्या अशा भाषा प्रवाहात आपापले स्थान पटकावलेले असते; जगभरातील बोली अशा रीतीने एकमेकींशी आंतरसंबंधित असतात; बोलींची मुळं शोधत असताना असा प्रत्यय प्रकर्षाने येतो.

वसईतील मराठी भाषक ख्रिस्ती समाजात मराठीच्या बोलींपैकी काही बोली प्रचलित आहेत. वाडवळी, कोळी, वलकर, पूरकर या त्यापैकी काही बोलीभाषा ! पोर्तुगीजांच्या काळात (1509 – 23 मे 1739) ज्या ज्या समाजातील लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकार केला त्या त्या मूळ समाजाची बोलीच त्या त्या नवख्रिस्ती समाजाची मायबोली झाली. तो समाज नंतर ख्रिस्ती धर्मग्राम आणि त्या धर्मग्रामातील चर्चशी जोडला गेला. तत्कालीन चर्चमधील विधी लॅटीन आणि पोर्तुगीज भाषेत होत असल्यामुळे ख्रिस्तीधर्म स्वीकाराच्या आरंभीच्या काळातील एकूणच मराठी भाषक समाजावर वा त्या विशिष्ट बोलीवर पोर्तुगीज, लॅटीन, इंग्रजी अशा परकीय भाषांचा मोठा प्रभाव आहे.

ख्रिस्तीधर्म स्वीकार केलेला मराठी भाषक समाज, चर्चमधील धार्मिक विधीवेळी केल्या जाणाऱ्या प्रवचनांवर विसंबून असल्यामुळे, शिवाय समूहाने राहात असल्यामुळे चर्चमध्ये वापरली जाणारी मिशनरी वळणाची भाषा आत्मसात करत होता. जेज्वीट संस्थेतील (येशूसंघीय) बरेचसे धर्मप्रसारक आणि अन्य धर्मगुरूही पोर्तुगीज, स्पॅनिश होते. त्यांच्या दैनंदिन जीवनात ते इंग्रजी, पोर्तुगीज, स्पॅनिश आणि धार्मिक विधीवेळी लॅटीन भाषेचा वापर करत होते; त्यामुळे पोर्तुगीज, स्पॅनिश, इंग्रजी भाषांचे संस्कार तेथील समाजावर होत होते. त्यामुळे साहजिकच स्थानिक जनतेवर त्याचा प्रभाव उमटत गेला. शिवाय स्थानिकांच्या मराठी भाषेचा प्रभाव परदेशी ख्रिस्ती धर्मप्रसारकांवर पडत होता. त्यामुळे त्यांच्याही उच्चारणावर संमिश्र भाषा-संस्कृतीचा परिणाम होत होता. तसाच परिणाम थोड्या-फार फरकाने स्थानिकांवरही होत असल्याने त्यांचंही मराठी, मिशनरी वळणावर गेलेलं होतं.

उत्तर कोकणात कार्यरत असणारे पोर्तुगीज, स्पॅनिश, इंग्लिश धर्मगुरुंना जेवणा-खाण्याची व्यवस्था करण्यासाठी, स्वयंपाकासाठी स्थानिक, मराठी भाषक नवख्रिस्ती असलेले आणि काही गोव्यातून आणलेले असे पुरुष, ‘मेरनी’ म्हणजे मदतनीस म्हणून नेमलेले असल्याने यांच्याकडून पोर्तुगीज, स्पॅनिश, इंग्रजी मिश्रित अशी आणि प्राकृत स्वरूपाची मराठी बोली बाजारात पोहचली. कित्येकदा ‘मेरनी हा पोर्तुगीज भाषक असे, पोर्तुगाल, स्पेनमधून आलेले असे काही सामान्यजनही असतीलच. पोर्तुगीज भाषक मेरनी, बाजारहाट करण्यासाठी बाहेर पडत असल्याने, त्यांच्याकडून पोर्तुगीज भाषा, बाजारात जाणाऱ्या-येणाऱ्या, भाजी विकणारे, मासे विकणाऱ्या अशांपर्यंत पोचली असणार आणि तेथूनच ख्रिस्ती कुटुंबातील स्वयंपाकघरापर्यंत देखील पोचली. पुरुषमंडळी कामानिमित्त, शेतीवाडी करताना, नोकरी निमित्त वावरतानादेखील याच भाषेचा उपयोग संवाद साधण्यासाठी करत असत. घरकामात निमग्न असलेल्या गृहिणींकडून ही सरमिसळ झालेली भाषा ख्रिस्ती कुटुंबात, समाजात बोलली जाणे स्वाभाविकच होते. किंबहुना ख्रिस्ती आणि हिंदू धर्मीय वाडवळ समाजात कमालीचा सलोखा असल्याने  वाडवळी शब्द दोन्ही समाजाच्या बोलीत सहज वावरू लागले. त्यामुळे चर्चच्या स्वयंपाकघरातून सामान्य प्रापंचिकांच्या स्वयंपाकघरापर्यंत चालत आलेला वसईतील बोलीभाषेचा प्रवास मोठा रोमांचक, श्रवणीय, रूपसुंदर असाच आहे.

वसई हा कोकण किनारपट्टीचा भाग असून गुजरातच्या सीमेलगत आहे. डहाणू, पालघर या गुजरात सीमावर्ती भागातील बोलींवर गुजराती भाषेचा प्रभाव आहे; तसा तो वाडवळी समाजीय मराठी भाषकांच्या बोलींवर देखील आहे. अगदी यादवकालीन मराठीपासून कोकणी, कुणबी, आगरी-कानडी अशा भाषांचाही प्रभाव तेथील स्थानिक बोलींवर आहे. व्यापार-उदीमानिमित्त संवाद-संपर्क यामुळे देखील असे घडलेले आहे. पोर्तुगीज आणि इंग्रजांची सत्ता येण्यापूर्वी उत्तर कोकणावर यवनी अंमल होता. त्यामुळे प्रोटो इंडो युरोपीय भाषाकुळातील पोर्तुगीज, स्पॅनीश, इंग्रजी शब्दांबरोबरच फारसी, उर्दू शब्द देखील वाडवळीने समाविष्ट केले आणि भाषेच्या संप्रेषणाचे एक आवर्तन पूर्ण केले.

शब्द चलनी नाण्यांसारखे असतात, चलनात वापरात नसलेले नाणे इतिहासजमा होते, काळाची छाप उमटवलेले शिक्के मग संग्रहरूपात ठेवावे लागतात आाणि ते काळाची साक्ष देत राहतात. शब्दही अशाच सुवर्णमुद्रा असतात; त्या काळाच्या उदरात निश्चेष्ट पडलेल्या असतात. गौतम ऋषीच्या शापाने अहल्या शिळा होऊन पडली होती; तथापि श्रीरामाच्या पदस्पर्शाने ती जिवंत झाल्याचे म्हणतात भाषेचेही असेच होते. यंत्रयुगामुळे वा तंत्रज्ञानाच्या विकासामुळे नवीन भाषा आत्मसात केल्या जातात आणि मायबोली, मातृभाषा, मूळ भाषा यांपासून दुरावत जाऊन ती कोनाड्यात पडून राहते, दुर्लक्षित राहते. मग कधीतरी, कोणीतरी आर्किमिडीजसारखा ‘युरेका युरेका’ म्हणून नाचत सुटतो… कारण त्यांना कोठेतरी बोलीतील शब्दांच्या सुवर्णमुद्रा सापडतात, खजिना सापडतो. मग मायबोलीचे महत्त्व पटू लागते. अशा मुद्रांचा कोश असण्याची आवश्यकता त्यासाठीच तर आहे. अन्यथा आपण सांस्कृतिक मरणाला सामोरे जातो. यातून वाचण्यासाठी बोलींचे, भाषेचे पुनरुज्जीवन करण्याची आवश्यकता असते. साहित्यप्रकारातून समाजसंस्कृतीचे दर्शन घडणे तर आलेच परंतु संशोधन, शब्दकोश निर्मिती ही तर काळाची गरजच ठरते. बोलीभाषेतून होणारी अर्थाभिव्यक्ती परिणामकारक असल्याने शब्दा-शब्दातून प्रतीत होणारे समाज-मानसशास्त्र देखील समजून घेणे त्यामुळे सुलभ जाते. शिवाय बोलीभाषेतील कित्येक शब्द, शब्दकोशात नसतात, अशी ही भाषा हरवली; तर सांस्कृतिक वारसाही हरवतो. बोलीभाषेतूनच सांस्कृतिक भांडार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते. जीवन प्रवाही असते. संवाद माध्यमामुळे जीवनाला वेग, गती असल्याचे जाणवते. म्हणूनच, ‘चार कोसपर बदले पानी, आठ कोसपर बानी’. ही लोकोक्ती भाषेच्या परिवर्तनाचीच साक्ष देते. ‘भाषा बदलते म्हणजे नष्ट होते असे नाही. तिच्या स्वरूपात बदल घडून नव्या युगाची नवी भाषा अस्तित्वात येते. ’

बोलीतील सुवर्णमुद्रा लोप पावू नयेत म्हणून शब्दकोशात जतन करण्याचे अवघड आणि अनवट काम कित्येक संशोधकांनी करून ठेवले आहे, जेम्स मोल्स्वर्थ (1795-1871), थॉमस कँडी (1804-1877), जॉर्ज अब्राहम ग्रिअरसन (1851-1941) या परदेशी भाषाशास्त्रज्ञांनी भारतीय भाषांचे सर्वेक्षण करून शब्दकोश निर्मितीचे शिवधनुष्य उचलले होते. अलिकडच्या काळात डॉ. गणेश देवी (1950) यांनी भारतीय भाषांचे सर्वेक्षण केले. विविध समाज-संस्कृतीच्या तळपातळीचा शोध या सर्वांनी घेतलेला आहे. दियोगु रिबैरू नावाच्या जेज्वीट येशूसंघीय धर्मगुरूंनी भारतीय भाषा शिकण्यासाठी म्हणून आणि त्या भाषेचे (विशेषत्वाने कोंकणी बोली) संगोपन करण्यासाठी 1626 साली शब्दकोश तयार केला होता. तो देशी शब्दसंग्रह गोवा सरकारच्या ग्रंथालयात असल्याचा निर्वाळा सुप्रसिद्ध संशोधक प्रा. अ.का. प्रियोळकर यांनी दिलेला आहे. शब्दकोश तयार करणाऱ्या संशोधकांनी, अभ्यासकांनी, गुणवंतांनी त्यांचे आयुष्य त्यासाठी खर्ची घातलेले आहे.

अनेक शतकांपासून, वाडवडलांपासून चालत आलेली आपली मायबोली शब्दकोशरूपात जतन करण्याचे काम अनेक अभ्यासक आणि संस्था यांनी हाती घेतले आहे. असा एक संकल्प ग्रंथाली वाचक चळवळीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमिताने ‘ग्रंथाली’ने सोडलेला आहे. मराठी बोलींच्या शब्दकोश निर्मितीचा प्रकल्प रिचर्ड नुनीस यांनी हाती घेतलेला आहे.

त्यांनी त्या प्रकल्पाअंतर्गत वसईतील मराठी भाषक ख्रिस्ती समाजात बोलल्या जाणाऱ्या वाडवळी बोलीचा शब्दकोश म्हणजेच प्रोटो-इंडो-युरोपीय शब्दकोश प्रकाशित करण्याचे आव्हान स्वीकारले. ‘ग्रंथाली’ने अशोक परशुराम सावे यांचा ‘अपरान्तातील प्राचीन बोलीभाषा: वाडवळी शब्दकोश, ऑक्टोबर 2017 साली प्रकाशित केलेला आहे. अशोक परशुराम सावे यांनी मेहनतपूर्वक सदर शब्दकोश तयार केलेला आहे. कोकणच्या उत्तरपट्ट्यात लाखो लोक वाडवळी बोलतात, तथापि सोळाव्या शतकात या भागात बहुसंख्य लोकांनी ख्रिस्तीधर्म स्वीकार केल्यानंतर वाडवळी ख्रिस्ती समाजातील वाडवळी बोलीला वेगळे रूपडे प्राप्त झाले. परदेशातील मातीचा आणि संस्कृतीचा गंध आणि रंग मिसळून भारतीय चवीचे स्वादिष्ट पक्वान्न तयार झाले. या वाडवळीचा शब्दकोश ऑस्ट्रेलियास्थित रिचर्ड नुनीस यांनी त्यांच्या अथक प्रयत्नांतून साकार केला. त्यांचे हे सांस्कृतिक कार्य गेल्या कित्येक वर्षांपासून निष्ठेने चालले होते. त्यांच्या सांस्कृतिक कार्यावरील ही निष्ठा जाणून ‘ग्रंथाली’ने शब्दकोश प्रकाशनाची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे मराठी भाषक वाडवळी ख्रिस्ती समाजाचा भाषिक ठेवा ‘प्रोटो-इंडो-युरोपीय ‘अक्षर’ शब्दयात्रा’ या स्वरूपात आपल्यापुढे खुला होत आहे, याबद्दल आनंद आणि आभार व्यक्त करते.

– सिसिलिया कार्व्हालो  9422385050 drceciliacar@gmail.com

About Post Author

Previous articleरुक्ष, ओसाड बरड : पालखीचा तेवढा विसावा ! (Barren Barad)
Next article सोशल मीडिया : वरदान की बुमरँग ? (Social Media : a boon or a boomerang?)
सिसिलिया कार्व्हालो या मराठी कवी आणि लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी ललितगद्य कथा, आस्वादनपर, संशोधनात्मक, चरित्रपर, अनुवाद अशा सर्व प्रकारच्या लेखनावर त्यांच्या ललितरम्य लेखनशैलीची मुद्रा उमटवली आहे. त्यांच्या ललितगद्य लेखनास अनंत काणेकर, पु.ल.देशपांडे आणि मधुकर केचे यांच्या नावांचे राज्यशासनाचे तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी महाविद्यालय आणि विद्यापीठ पातळीवर साहित्याचे अध्यापन केले आहे. त्या पदवी महाविद्यालयाच्या प्राचार्य म्हणून निवृत्त झाल्या. त्यांनी बालभारती, उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रम आणि मुंबई विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष म्हणून शैक्षणिक कार्यात योगदान दिले. त्यांनी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण समिती, ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार समिती, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ अशा शासकीय समित्यांवर सदस्य म्हणून केलेले कार्य संस्मरणीय आहे. त्यांनी मराठी भाषक ख्रिस्ती समाजीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे. तसेच, गुजरात, गोवा, कर्नाटक येथील विभागीय साहित्य संमेलनांचेही अध्यक्षपद भूषवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here