रेव्हरंड टिळक अर्थात नारायण वामन टिळक हे मराठीतील प्रसिद्ध कवी. त्यांच्या पत्नीने – लक्ष्मीबाई यांनी लिहिलेले अविस्मरणीय आत्मकथन ‘स्मृतिचित्रे’ या नावाने प्रसिद्ध आहे. या पुस्तकात हिंदू संस्कारांमध्ये वाढलेली स्त्री बदलत कशी जाते आणि तिचा विकास कसा होतो याचा आलेख दिसतो…
रेव्हरंड टिळक अर्थात नारायण वामन टिळक हे मराठीतील प्रसिद्ध कवी. त्यांच्या पत्नीने – लक्ष्मीबाई यांनी लिहिलेले अविस्मरणीय आत्मकथन ‘स्मृतिचित्रे’ या नावाने प्रसिद्ध आहे. लक्ष्मीबाई यांच्या वाट्याला लहानपणापासून जे वातावरण आले त्यात कोणत्याही माणसाची घुसमट झाली असती किंवा त्या माणसामध्ये विकृती निर्माण झाली असती; पण लक्ष्मीबाई यांनी ते सर्व सहजतेने स्वीकारले. त्यांचा स्वभाव खेळकर व आनंदी होता. त्यांनी स्वतःचे वर्णन मनाने व शरीराने चिवट असे केले आहे. ‘स्मृतिचित्रे’ या पुस्तकात हिंदू संस्कारांमध्ये वाढलेली स्त्री बदलत कशी जाते आणि तिचा विकास कसा होतो याचा आलेख दिसतो.
लक्ष्मीबाई यांच्या वडिलांनी आयुष्यभर सोवळे पाळले. त्या काळात जातिभेदाच्या भिंती किती कडेकोट होत्या ते पुस्तकातून समजते. त्यांच्या वडिलांनी दलित समाजातील एका माणसाच्या हातातील पाण्याचा थेंब उडाल्यामुळे सोवळे पाळले. त्या नादात त्यांनी कोणतीच जबाबदारी पूर्ण केली नाही. त्यांचा दुराग्रह खाण्याचे पदार्थदेखील धुऊन घ्यावेत असा होता. ते पदार्थ धुतले न गेल्याचे कळले, की ते अख्खे घर धुण्यास सांगत. लक्ष्मीबाईंना मार बाहुलीच्या कपड्याचा स्पर्श गव्हाच्या राशीला झाल्याने खावा लागला होता. भिकुताई ही लक्ष्मीबाई यांच्या वडिलांची मोठी बहीण. तिचे यजमान नानासाहेब पेंडसे. पेंडसे लक्ष्मीबाई यांच्या वडिलांचे लक्ष घरात नाही म्हणून सर्वांची काळजी घेत. लक्ष्मीबाई यांचा विवाह टिळकांसोबत त्यांची कीर्ती कवी म्हणून ऐकल्यानंतर ठरला. त्या काळच्या धार्मिक व सामाजिक चालीरीतींचे दर्शन पुस्तकात अनेक ठिकाणी घडते. उदाहरणार्थ, समान गोत्रांमध्ये विवाह करण्याची पद्धत नव्हती. त्यामुळे लक्ष्मीबाई यांना त्यांच्या आत्याबाई यांनी दत्तक घेतले. त्यांचे वडील त्या दत्तक समारंभालाही हजर नव्हते. शेवटी आईने लक्ष्मीबाई यांना दत्तक दिले.
सर्वजण मामा, आत्याबाई यांच्या नवऱ्याला बोलत. त्यांचे जावयावर प्रेम होते. पण आत्याबाई यांचे जावयावर प्रेम नव्हते. त्या दोघांचे त्यामुळे फारसे पटत नसे. आत्याचे घर जलालपूरला होते. टिळक व आत्याबाईंचे पटत नसल्यामुळे लक्ष्मीबाई त्यांच्या सासरी परतल्या. त्या पुस्तकात त्यांच्या आजूबाजूच्या माणसांचे अतिशय प्रभावी असे चित्रण आले आहे. लक्ष्मीबाई यांची शैली इतकी ओघवती आहे, की पुस्तकातील सर्व व्यक्तिरेखा जिवंत उतरल्या आहेत.
लक्ष्मीबाई यांच्या सासूबाई व सासरे यांचे चित्रण ‘सासुरवास’ या प्रकरणात येते. सासुबाई यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचा प्रत्यक्ष सहवास त्यांना फारसा मिळाला नाही. पण त्यांनी ऐकून आठवणी सांगितल्या. त्या काळात, स्त्रियांनी स्वतंत्रपणे काही केले तर ते सहन केले जात नसे. उदाहरणार्थ, सासुबाई कविता करत. ते न आवडल्यामुळे मामंजी त्या जाळून टाकत. सासुबाईनी एका ख्रिस्ती स्त्रीकडून शिवणकाम, बायबल माहीत करून घेतले होते. पण मामंजी यांनी बायबल जाळून टाकले. मामंजी मुला-मुलांमध्ये भेद करायचे. उदाहरणार्थ त्यांनी सखाराम भाऊजी व टिळक यांच्यात कायम भेदभाव केला. टिळक आईला मदत करत, म्हणून ते त्यांना पाणक्या या नावाने चिडवत. त्यांनी ते कामाकरता मुखड्याला गेल्यावर आजारी असल्याचे खोटे पत्र घरी पाठवले. सासुबाई एका मुलाची व्यवस्था करून व दोन मुलांना सोबत घेऊन कशाबशा तेथपर्यंत गेल्या. पण तेथे पाण्याचा हंडा उतरवण्याची विनंती केली याचा राग येऊन मामंजी यांनी सासूबाई यांना लाथ मारली. त्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. टिळक आईच्या मृत्यूनंतर वडिलांच्या घरून नाशिकला पळून गेले. लक्ष्मीबाई यांच्या मामंजींचा स्वभाव अतिशय टोकाचा होता. त्यांनी त्या प्रकरणात लग्नानंतर त्यांच्या मामंजींकडील सासुरवासाच्या आठवणी सांगितल्या आहेत. मामंजी ‘मोलाची दळणी करा नि लुगडी घ्या, बांगड्या भरा’ असे उद्गार ऐकवत. त्या मामंजींची चांगली बाजूही सांगतात. ते चारित्र्यशुद्ध व्यक्ती होते. ते पत्नी गेल्यावर लग्न न करणे आणि घराची सगळी व्यवस्था पाहणे ही कामे; तसेच, स्वयंपाक करणे अशी सर्व कामे करत. लक्ष्मीबाई यांनी सासुरवास या प्रकरणात त्यांच्या मिश्किलपणाचे वर्णन केले आहे.
त्या भाकरी पहिल्या पावसानंतर जमिनीला भेगा पडाव्यात तशी करत. लक्ष्मीबाई यांना देशावरील कोकणी पदार्थांतील भदे याची माहिती नव्हती. त्यांचे मामंजी जेवण्यास नीट देत नसत. ते भांड्यांना डाग पडल्यावर अपशब्द बोलत. त्यावेळी पाण्याचा प्रश्न मोठा होता. त्यांचे मामंजी अंधारात पाणी आणण्यासाठी पाठवत. पण, टिळक तशा वेळी बाहेर गेल्यावर मदत करत. त्या प्रसंगातून नवऱ्याच्या मनातील ओलावा व्यक्त झाला आहे. लक्ष्मीबाई यांनी मामंजींचे कौतुक त्यांनी अपशब्द वापरले नाहीत व अंगाला बोटे लावली नाहीत या शब्दांत केले आहे. त्या प्रत्येक माणसाच्या चांगुलपणाच्या नोंदी आवर्जून करतात. टिळक जेथे जात तेथे रमत. मामंजी त्यांच्याविषयी वाईट बोलत. कुलपात लाडू लपवून ठेवून लक्ष्मीबाई यांना चोर सिद्ध करणे, लक्ष्मीबाई यांच्याबद्दल टिळकांचे मत कलुषित करणे हे प्रसंग आले आहेत.
लक्ष्मीबाई यांनी मुंबईला जातानाच्या प्रवासाची हकिगत सांगितली आहे. त्यात टिळक यांच्या वाद घालत राहणे, तिकिट काढण्याचे विसरणे, सोबत घेतलेली भाजी बाहेर फेकणे, वाटणे वगैरे वगैरे.
टिळक खूप फिरत, स्थलांतरे करत व जेथील घर सोडत तेथील सामान वाटून टाकत. कवितेच्या नादात जेवणाचे विसरून जाणारे टिळक अतिशय कलंदर स्वभावाचे होते. त्यांचा वाटेल त्या माणसावर विश्वास बसे. त्यामुळे लोक त्यांना फसवत. त्यांचा चोरावरही विश्वास बसे. ते चिडले, की कविता करत. लक्ष्मीबाई व ते यांच्यात सोंगट्या खेळताना वाद झाल्यावर टिळक यांनी त्यांना ढकलून दिले होते. त्यांचा स्वभाव एखाद्या लहान मुलाप्रमाणे होता. टिळक यांच्या स्वभावाचे अनेक पैलू पुस्तकात दिसतात. त्यांनी कीर्तनकारांना कीर्तने लिहून दिली आहेत. ते स्वतः उत्तम कीर्तने करत. ते कविता बोलता बोलता करतात याची भिकुताईला भीती वाटे. त्यांनी भिकुताईची मुलगी खारूमाई हिने दागिन्यांचा हट्ट केल्यानंतर दागिन्यांची नावे घालून कविता करून दिली. त्यांना स्वतःकडील सर्व इतरांना देऊन टाकण्यात आनंद वाटे. त्यांनी वाईट भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषाला किर्तन करून गप्प बसवले. ते पैसा असला किंवा नसला तरी दोन्ही स्थितींत आनंदात असत. लक्ष्मीबाई त्यांच्या त्या स्वभावाकडेही मिश्कीलपणे पाहतात. त्या म्हणतात, त्या स्वतः पैसा असला की तो कसा जाईल याच्या काळजीत असत. लक्ष्मीबाई यांनी टिळक यांचा स्वभाव उलगडणारे प्रसंग दिलखुलासपणे सांगितले आहेत- एकदा घरात धान्य नाही व खिशात एकच रुपया म्हणून तांदूळ आणण्यास पाठवल्यावर टिळक दौत घेऊन आले. लक्ष्मीबाई यांना वाटे, दोघांनीही संसारात लक्ष दिले नाही तर उपासच घडेल. त्या काळात ब्राह्मणांच्या बायका बाजारात जात नसत, पण लक्ष्मीबाई मात्र त्याकरताच पापड, बोरे वगैरे साठवून ठेवत. लक्ष्मीबाई संसारात फारच गुरफटतात हे टिळक यांना पसंत नव्हते. त्यांचा आग्रह लक्ष्मीबाई यांनी शिकावे हा होता. त्यांच्यातील लहानमोठ्या भांडणाचे खुमासदार वर्णन अनेक ठिकाणी आले आहे. टिळक यांना भीती नावाची गोष्ट कधी वाटत नसे. त्या ‘ते जगात देव आणि लक्ष्मीबाई अशा दोन गोष्टींना घाबरत’ असे म्हणतात.
लक्ष्मीबाई यांनी गरिबीमुळे घरात धान्य नसणे, पैसे नसणे अशा सर्व परिस्थितीला तोंड दिले. त्यांनी कितीही हाल झाले तरी चालेल पण स्वतःची हलाखीची परिस्थिती माहेरी शक्यतो कळू नये याची काळजी घेतली. लक्ष्मीबाई यांनी अन्नाचा सन्मान नेहमीच केला. राजनांदगाव, नगर, बुटी अशा वेगवेगळ्या ठिकाणचे वर्णन पुस्तकात आले आहे. ना.वा.टिळक यांनी राजनांदगाव येथे लिहिलेली डायरी; तसेच, लक्ष्मीबाई यांनी गरोदर असूनही ओल असलेल्या झोपडीत दिवस काढण्याची दाखवलेली तयारी. टिळक यांच्या स्वभावाचा फायदा घेणारी माणसे, त्यांच्या धाकट्या मुलाचा मृत्यू असे अनेक प्रसंग राजनांदगाव या प्रकरणात आहेत. टिळक यांच्या वक्तृत्व शैलीचा, त्यांनी जिंकलेल्या बक्षिसांचा उल्लेख त्या प्रकरणात येतो.
टिळक यांच्या धर्मांतराचा भाग ‘स्मृतिचित्रे’मध्ये सविस्तर येतो. त्यामुळे लक्ष्मीबाई यांची झालेली स्थिती, नातेवाईकांचे त्याबाबतचे समज, लोकांचा ख्रिस्ती धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन यांची माहिती कळते. ख्रिस्ती लोक मांस खातात, अनेक लग्ने करतात. अशा प्रकारच्या लोकांच्या समजुती होत्या. त्यामुळे त्यांची बहीण किंवा जवळचे नातेवाईक त्यांना टिळक यांच्याकडे पाठवण्यास तयार नव्हते. टिळक यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याचे जेव्हा कळले, त्यानंतर भिकुताईच्या घरी असलेल्या लक्ष्मीबाई यांच्यावर प्रचंड परिणाम झाला. त्यांना घेण्यास तेथे मामासुद्धा आले. त्यांना प्रत्येकजण उपदेश देत होता. तशा वेळी, लक्ष्मीबाई ठामपणे म्हणतात, टिळक कोठेही सुखरूप असले म्हणजे झाले. लक्ष्मीबाई स्वतःचा जीव देतील अशी भीती जवळच्या माणसांना वाटत होती. टिळक यांच्या धर्मांतरानंतर लक्ष्मीबाई काही काळ निर्जीव ओंडक्याप्रमाणे आयुष्य जगल्या. त्यांचा कशावरच ताबा नव्हता. त्या वेड्या होतील, की काय अशी भीती बहिणीला वाटत होती. त्या काळात लक्ष्मीबाई कविता लिहू लागल्या. त्यामुळे त्यांना मानसिक शांती लाभली. पुढे टिळक यांचा व त्यांचा पत्रव्यवहार सुरू झाला. लक्ष्मीबाई यांनी टिळक व त्यांची झालेली धर्मांतरानंतरची भेट भावस्पर्शी शब्दांत उभी केली आहे. तो काळ दोघांच्याही आयुष्यातील सर्वात कठीण होता. परंतु ती परीक्षा त्या दोघांनीही दिली. त्यावेळी त्यांची बहीण गाणे म्हणत असे, ते म्हणजे ‘मैने तुझा ग पिंजरा मायेचा’ म्हणजे आमची तुझ्यावर माया आहे. म्हणून आम्ही तुला ठेवले आहे. तुला कोंडले आहे असे तू समजू नकोस. त्या आत्मचरित्रात अनेक लोकांची गर्दी दिसून येते. भाऊ-भावजया, मामा यांचे वर्णन ‘बहिणीच्या घरट्यात’ व ‘भाऊ-भावजय यांचा आसरा’ या प्रकरणात आले आहे. टिळक यांनी धर्मांतर केल्याच्या काळात भाऊ-भावजयींनी त्यांच्यावर खूप माया केली. लक्ष्मीबाई यांची गणना त्या काळात सवाष्ण स्त्रियांमध्ये होत नसे. त्यांनी स्त्रियासुद्धा एकमेकींचे जगणे कठीण करतात हे त्या प्रकरणात दाखवले आहे. तशा वेळी लक्ष्मीबाई यांची बाजू त्यांच्या भावजयीने घेतली. दत्तूची मुंज वेळच्या वेळेला झाली पाहिजे. त्याची भाऊ-भावजय यांना काळजी वाटत होती. तसेच, भिकुताईचे पती नाना पेंडसे हेही काळजीत होते. त्यांचा हट्ट त्या प्रेमामुळेच त्यांनी ख्रिस्ती झालेल्या नवऱ्याकडे जाऊ नये असा होता. दत्तूच्या मुंजीनंतर टिळक यांच्या आलेल्या एका पत्रात त्यांनी असे म्हटले, की ‘जगाने तुला सोडले तरी मी सोडणार नाही’. त्यावेळी ते वाचून त्यांनी परत पतीजवळ जावे हा निर्णय घेतला. त्या निर्णयापर्यंत त्या कशा आल्या तो प्रवास वाचनीय झाला आहे.
डॉ. ह्यूम यांनी टिळक पती-पत्नींना धर्मांतरानंतर टप्प्याटप्प्यावर मदत केली आहे. लक्ष्मीबाई टिळक यांच्या घरी ख्रिस्ती होण्यासाठी आलेल्या बापू गृहस्थाविषयी सविस्तर लिहितात. लक्ष्मीबाई यांना मानसशास्त्र कळत नाही व टिळक यांना व्यवहार कळत नाही हा वाद त्या दोघांमध्ये नेहमीच चाले. त्या काळात समाजाचे विचार ख्रिस्ती धर्म वाईट, मुसलमानांच्या हातचे पाणी पिऊ नये, दलितांमुळे विटाळ होतो अशा प्रकारचे होते. त्यांचा उल्लेख पुस्तकात येतो. लक्ष्मीबाई यांनी स्वतःमध्ये जो बदल हळुहळू घडवला त्याबद्दलची विचारप्रक्रिया ‘दोघांचा एक संवाद’ या प्रकरणात आला आहे.
लक्ष्मीबाई यांना प्राणी व पक्षी यांमध्ये भेदभाव नाही, तसा माणसांमध्येही असू नये ही जाणीव येते. त्या मी सर्वांच्या हातचे खाईन व पिईन असा निश्चय करतात. त्या आशमाबाई या मुस्लिम स्त्रीबद्दल प्रेमाने लिहितात. ख्रिस्ती लोक ज्या पद्धतीची काचेची भांडी वापरतात ती खरेदी टिळक यांनी केलेली लक्ष्मीबाई यांना आवडत नाही. एका बाजूला संसारातील लहानसहान गोष्टी व दुसरीकडे समाज व जीवन यांबद्दलचे चित्रण आले आहे. लक्ष्मीबाई दोघांच्याही स्वभावाबद्दल म्हणतात, टिळक यांची हौस वेगळीच होती. त्यांनी लग्नाच्या वेळेला ‘फिकिरीची माळ माझ्या गळ्यात घातली व बेफिकिरीची माळ त्यांच्या गळ्यात घातली’. पुस्तकाच्या उत्तरार्धात, त्या दोघांनाही इतरांच्या साहय्याला धावून जाण्याची सवय होती त्याचे उल्लेख येतात. त्यांना प्रवासात एकदा एक भिकारी मुलगी दिसली तेव्हा लक्ष्मीबाई तिला घेऊन घरी आल्या. तिचे नाव नकुशी असे होते. पण लक्ष्मीबाई यांना ती हवीशी वाटली, म्हणून तिचे नाव ‘हौशी’ असे ठेवले. त्यांनी तिला स्वतःची मुलगी मानले. लक्ष्मीबाई यांच्या मनात ती कशी वागेल याबद्दल शंका होती, पण ती खूपच चांगली वागली. त्यांची लहान मुलांबद्दलची आपुलकी पुस्तकात ठळकपणे दिसते. लक्ष्मीबाई यांनी घेतलेल्या निर्णयाचा टिळक यांनी आदर केला. त्यांनी हौशीसारखीच आणखी एक मुलगी त्यांच्या घरात आणली. एका मिशनमध्ये काही मुले होती, पण दुष्काळातील तीव्र अडचणींमुळे बोर्डिंगमधील जवळपास बावीस मुलांना काढून टाकले गेले. लक्ष्मीबाई यांनी घरात फारशी शिल्लक नसतानाही त्यांना घरी आणले. तसेच, स्वतःच्या मुलाला, दत्तूला त्यांच्याशी जुळवून घेण्यास समजावले. त्यांना अडचणीत असलेल्या लहान मुलांना मदत करण्याचा छंदच जडला. त्यांनी पुढे दोन महिन्यांचे व पंधरा दिवसांचे, अशी दोन मुले सांभाळली. लक्ष्मीबाई टिळक यांच्या स्वभावाचे चांगले पैलू सांगताना म्हणतात, त्यांना मान-अपमान, कीर्ती याची अजिबात पर्वा नसे. त्यांनी लक्ष्मीबाई यांना माझ्याविषयी ‘जर लिहिले तर माझ्या दोषांवर पांघरून घालू नको’ असे सांगितले होते.
हे ही लेख वाचा-
ना.वा. टिळक – फुलांमुलांचे कवी (Narayan Vaman Tilak)
निसर्गकवी बालकवी (Balkavi)
साहित्य संमेलनांचा इतिहास
टिळक यांचा विचार आयुष्याच्या उत्तरार्धात किती व्यापक झाला होता त्याचा उल्लेख पुस्तकात आला आहे. त्यांनी मिशनचे काम पैसे घेऊन करायचे नाही असे ठरवले. ते धर्माच्या बाबतीत जुन्या परंपरांना चिकटून न राहता परिवर्तन घडवले पाहिजे असे मानत. त्या दोघांनीही आजारी माणसांची सेवा करण्यात कधी कसूर केली नाही. दोघांनी स्वतःची पर्वा न करता प्लेगच्या साथीमध्ये रोग्यांची सेवा केली. टिळक यांनी भजने व अभंग ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यावर पुष्कळ लिहिले. त्यांच्यात ईश्वराला शरण जाण्याची वृत्ती शेवटी शेवटी अधिक वाढली. त्यांना ख्रिस्ती प्रार्थनेच्या पद्धतीत पाश्चात्य रूढी आहेत, त्यातही बदल व्हावा असे वाटते. त्यामुळे त्यांनी भारतीय व मराठी भजनांची रचना केली. टिळक यांच्या स्वभावाचा फायदा घेणारे गोसावीबुवा, कर्ज घेणारी माणसे सतत घरी येत. टिळक त्यांच्याकडील सामानही देऊन टाकण्याची कृती करत. लक्ष्मीबाई संसारातील खस्तांकडे समंजसपणे पाहतात. एकदा एक म्हैस उधळली असता तिला सांभाळणे किती कठीण आहे हे तिच्यामागे धावल्यावर टिळक यांना कळले. त्यानंतर त्यांनी गुराख्याचे पैसे डबल केले. लक्ष्मीबाई यांनी जगण्याच्या छोट्या छोट्या गोष्टींमधील सौंदर्य टिपले आहे. टिळकांची स्वतःच्या वस्तू हरवणे हीदेखील सवय होती. त्या वेळेवर सापडल्या नाहीत, की कोणाला माझी परवा नाही अशी तक्रार करण्याचा एक अतिशय विनोदी प्रसंग लक्ष्मीबाई यांनी रंगवून सांगितला आहे.
लक्ष्मीबाई यांनी स्वतःच्या वक्तृत्वशैलीचा विकास कसा झाला तेसुद्धा सांगितले आहे. टिळक यांनी त्यांना पहिल्या वेळेस भाषण लिहून दिले होते, तरी लक्ष्मीबाई यांनी त्या ह्यापुढे लिहून दिलेले भाषण म्हणणार नाही असा निर्धार केला. टिळक यांनी स्वभावाच्या सरळपणामुळे कधी कोणाचे मन दुखावले नाही. पण लक्ष्मीबाई मात्र एखाद्याची चूक त्याला बरोबर दाखवून देत. लक्ष्मीबाई यांनी त्यांच्या घरी आलेल्या तरुण ब्राह्मणाचा शंकेखोर स्वभाव पाहिला आणि त्याची कानउघडणी केली.
‘बालकवी यांच्या आठवणी’ हे लक्ष्मीबाई टिळक यांच्या ‘स्मृतिचित्रे’ या पुस्तकातील एक स्वतंत्र प्रकरण आहे. जळगावमध्ये झालेल्या 1907 मधील पहिल्या मराठी कविसंमेलनात उत्स्फूर्तपणे कविता करणाऱ्या मुलाला रेव्हरंड ना.वा. टिळक यांनी पाहिले व त्याला ‘बालकवी’ ही पदवी दिली. लक्ष्मीबाई म्हणतात, ‘बालकवी घरात आल्याचा काळ कवितांचाच काळ होता.’ लक्ष्मीबाई यांनी बालकवी यांच्या मनावर कोणाचा कधी अपमान करू नये हा संस्कार केला. बालकवी यांचा स्वभाव चंचल होता; सतत बदलत असे. ते लक्ष्मीबाई यांच्याकडे असताना, आनंदी, खेळकर असत. पण तेथून बाहेर पडल्यावर त्यांची वृत्ती खिन्न आणि निराश अशी होई.
‘स्मृतीचित्रे’मध्ये आलेल्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमधील एक म्हणजे घारूमाई. ती लक्ष्मीबाई यांची भाची. तिला कॅन्सर झाला होता. लक्ष्मीबाई तिच्याकडे दोन महिने राहिल्या. टिळकांनीही त्यांना साथ दिली.
‘ख्रिस्तायन’ या टिळक यांच्या ग्रंथाचा उल्लेख पुस्तकात आला आहे. टिळक यांनी तो ग्रंथ पूर्ण करण्याचा ध्यास घेतला होता. तो अपुरा राहिलेला ग्रंथ लक्ष्मीबाई यांच्याकडून टिळक यांच्या मृत्यूनंतर पूर्ण झाला. ते त्यांच्या हातून घडलेले फार मोठे काम होय. नवऱ्याने हाती घेतलेले काम अशा प्रकारे बायकोकडून पूर्ण व्हावे व तिने तेवढी विद्वत्ता मिळवावी हे खरोखर कौतुकास्पद आहे. टिळक यांनी ‘ख्रिस्तायन’चे साडेदहा अध्याय लिहिले होते. लक्ष्मीबाई यांनी तो ग्रंथ पुढे चौसष्ठ अध्याय लिहून पूर्ण केला. शेवटी शेवटी, टिळक यांचा तापट स्वभाव, राग नाहीसा झाला. कोणी काहीही बोलले, की ते म्हणत, त्यामुळे माझ्या कामाला स्फूर्ती मिळते. लक्ष्मीबाई व टिळक यांचे अनेक मानसपुत्र व मानसकन्या होत्या. लक्ष्मीबाई यांनी त्यांची नात चिक्की तिच्याबद्दलही लिहिले आहे. चिक्कीला तिच्या आजी-आजोबांचा मोठेपणा सांगणे फार आवडत असे. लक्ष्मीबार्इ यांची विविधरूपे -पत्नी, आई, सून व बहीण – आत्मचरित्रात प्रकट झाली आहेत. टिळक यांनी ख्रिस्ती धर्म व हिंदू धर्म दोघांचा सखोल अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांनी ख्रिस्ती धर्मातील चुका व हिंदू धर्मातील बुरसटलेल्या रूढी नेमकेपणाने दाखवल्या. ते मृत्यूला देवाज्ञा समजत. त्यांनी स्वतःचे मृत्युपत्र करून ठेवले होते. त्यांची मृत्यूनंतर दफन करावे अशी इच्छा होती. त्यांनी डॉ. ह्यूम यांचे चित्र त्यांच्या अस्थीजवळ ठेवावे असेही लिहून ठेवले.
टिळक गेल्यानंतर, हिंदू आणि ख्रिस्ती अशा दोन्ही लोकांनी गर्दी केली. लोक त्यांनी लिहिलेले भजन त्यांच्या प्रेतयात्रेत म्हणत होते. ‘श्रीमती’ हे आत्मचरित्रातील शेवटचे प्रकरण आहे. त्या प्रकरणात टिळक गेल्यानंतर, लक्ष्मीबाई यांच्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त झाल्या आहेत. त्यांना त्यांच्या नावाच्या आधीचे ‘सौ’ हे अक्षर जाऊन श्रीमती लागले गेल्याचा मानसिक त्रास होत होता. त्यांना त्या काळात कवितेने आधार दिला. त्या कविता वेगाने करू लागल्या होत्या. त्यांच्या मनाची भावना ‘माझ्या आयुष्याचा सूत्रधार गेला’ अशी झाली होती. त्यावेळी त्यांना मुंबईला मेट्रनचे काम मिळाले.
बालकवींचाही टिळक यांच्या मृत्यूनंतर अतिशय कमी काळात मृत्यू झाला. लक्ष्मीबाई यांनी त्यांचे वडील, भाऊ, चिक्की, ज्यांना त्या मुली समजत होत्या अशा अकरा मुली, कवी रेंदाळकर, पंडिता रमाबाई असे एकामागोमाग एक जवळपास वीस-बावीस मृत्यू पाहिले. लक्ष्मीबाई यांनी चिक्कीला स्वतःची नात समजून नऊ महिन्यांपासून सांभाळले होते. त्यांना तिच्या मृत्यूचा चटका सोसावा लागला.
लक्ष्मीबाई यांच्याकडे कराचीहून ताराबाई आल्या होत्या. ताराबाई यांची आई लक्ष्मीबाई यांना बहीण मानत असे. त्यांनी लक्ष्मीबाई यांना कराचीला येण्याचे आमंत्रण दिले आणि त्यांनी ते स्वीकारले. स्वतंत्र बाण्याच्या लक्ष्मीबाई यांनी अनेक वेळा ठामपणे निर्णय घेतले. त्या कलंदर स्वभावाचा पती, सततची गरिबी या गोष्टींशी आयुष्यभर झगडल्या. पण त्यांनी जी आध्यात्मिक उन्नती, बुद्धीची परिपक्वता प्राप्त करून घेतली त्याला तोड नाही. ज्या काळात स्त्रिया पतीच्या सावलीत जगत होत्या. तशा काळात लक्ष्मीबाई यांची क्षमता उठून दिसते. ‘स्मृतिचित्रे’चे वर्णन प्रांजळपणे व पारदर्शकपणे लिहिलेल्या आठवणी या शब्दांत करता येईल.
– नितेश शिंदे 9323343406 info@thinkmaharashtra.com
Atishay sundar aani marmik…
Atishay sundar aani marmik lekh aahe dhanyawad nkki wachawe aase lekhan aahe lakshmibaiche smrutichite