साहित्य संमेलनांचा इतिहास (History Of Literary Conferances)

1
46
-history-sahityasammelan

मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन 11  मे 1878 या दिवशी पुण्यात भरले होते. आधुनिक महाराष्ट्रातील अनेक उपक्रमांचे प्रणेते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे होते. पहिल्या ग्रंथकार संमेलनाची प्रेरणा ही न्यायमूर्ती रानडे आणि रावबहादूर गोपाळराव हरी देशमुख (लोकहितवादी) यांची होती. ते दोघे पहिल्या संमेलनाचे आणि पर्यायाने भविष्यकाळातील साहित्य संमेलनांचे शिल्पकार होते. रानडे यांचा यात विशेष पुढाकार होता. “ग्रंथकारांना उत्तेजन द्यावे, स्वस्त दराने ग्रंथ प्रसिद्ध व्हावेत, वाचकांनी दरवर्षी पाच रुपयांचे ग्रंथ विकत घ्यावेत” असा त्या सभेचा मर्यादित हेतू होता.

पहिल्यावहिल्या संमेलनाचे स्वरूप हे मर्यादित होते. त्यानंतर मधील सात वर्षें तशीच गेली. ग्रंथकारांचे दुसरे संमेलन 24 मे 1885 या दिवशी सार्वजनिक संस्थेच्या ‘जोशी हॉल’मध्ये भरले. ते संमेलन वेदशास्त्रसंपन्न कृष्णशास्त्री राजवाडे यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते. त्या संमेलनात सूचना मागवण्यात आल्या होत्या. सूचना करणाऱ्यांत महात्मा फुले, जंगली महाराज, डॉ. कान्होबा रामछोडदास कीर्तिकर, महादेव चिमणाजी आपटे आदी मान्यवरांचा समावेश होता. त्या संमेलनाचा वृत्तांत ‘केसरी’मध्ये आला होता. “गेले रविवारी जोशीबाबांचे दिवाणखाण्यात ग्रंथकर्त्यांची सभा भरली होती. शे-सव्वाशे ग्रंथकार आले होते. मराठी ही सर्वांस अवगत भाषा करण्याची खटपट करणे इत्यादी सूचनांचा विचार करून पुढे काय करावे, हे ठरवण्याचे पुढील वर्षावर ठेवून सभा विसर्जन झाली.” तिसरे संमेलन 1885 वीस वर्षांनी, म्हणजे 1905  झाले. त्या विलंबाला उद्देशून महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार म्हणाले होते, “ग्रंथकारांच्या संमेलनाने वीस वर्षें एकसारखी झोप काढून कुंभकर्णावर ताण केली!” तिसरे संमेलन साताऱ्याच्या काही पुढाऱ्यांच्या खटपटीने भरले. त्या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी रघुनाथ पांडुरंग ऊर्फ दादासाहेब करंदीकर होते. ‘केसरी’ने त्या संमेलनाचा वृत्तांत देऊन पुढे असे म्हटले होते, “मराठी भाषेतील ग्रंथकार किंवा विद्वान मौजेकरता का होईना, पण एके ठिकाणी जमले, ही आनंदाची गोष्ट आहे. आम्ही त्यांच्या करमणुकीची व्यवस्था नीट ठेवल्याबद्दल सातारकरांचे अभिनंदन करतो.” चौथे संमेलन मात्र लगेच एका वर्षाने पुण्यात भरले. साताऱ्याच्या संमेलनात भरपूर पाहुणचार, करमणूक यांवर भर होता. पुण्यातील चौथ्या संमेलनात तसे होऊ न देण्याची काळजी घेण्यात आली. “महाराष्ट्र साहित्य परिषदे’ची स्थापना होऊनही तिला प्रत्यक्ष चालना मिळण्यास वेळ लागला. ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’ची स्थापना 1906  झाली. त्यावेळी सभासदांची संख्या साठ होती. दोन वर्षांनी ती संख्या कशीबशी नव्वदपर्यंत गेली. वासुदेव गोविंद आपटे आणि कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी परिषदेला गतिमान करण्याची खटपट केली. ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’ची घटना तयार होऊन ती मंजूर होण्यास 1912 हे वर्ष उजाडावे लागले. हरी नारायण आपटे यांच्या अध्यक्षतेखाली अकोला येथे 1912 मध्ये जे साहित्य संमेलन झाले त्या वेळी परिषदेची घटना मंजूर करण्यात आली. परिषदेचे कार्यालय घटना मंजूर झाल्यानंतर प्रारंभीची वीस वर्षें मुंबईमध्ये होते. कार्य त्या वीस वर्षांत फारसे झाले नाही. बडोदा येथे 1921 संमेलनात पुणे-मुंबई प्रश्नावर जोरदार वाद झाले. परिणामी, पुढे सुमारे सहा वर्षें संमेलन भरलेच नाही. पुणेकर संमेलने भरवण्याच्या बाबतीत आघाडीवर होते. कार्यालय मुंबईला असावे, की पुण्याला याचा वाद विकोपाला गेला होता. कार्यवाह कृ.पां. कुलकर्णी वैतागून म्हणाले, “‘म.सा.प’चे दप्तर समुद्रात फेकून द्या.” नंतर वाद निवळला. कार्यालय पुण्याला असावे असे सर्वांच्या संमतीने ठरले. कार्यालय पुण्याला आल्यावर ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’ला स्वतःच्या मालकीची वास्तू मिळाली आणि तिला स्थैर्य प्राप्त झाले.

हे ही लेख वाचा –
अरुणा ढेरे – साहित्यातील सर्वंकष जाणिवांना स्पर्श
साहित्य संमेलनाच्या अलिकडे – पलिकडे
साहित्य संमेलन आणि सुसंस्कृत समाज
साहित्य संमेलनांचे अध्यक्ष – नाण्याची दुसरी बाजू

साहित्य संमेलने ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’च्या वतीने भरवली जाऊ लागली. परिषदेचा पाया पक्का झाल्यावर कार्याला चांगला आकार आला. संमेलने महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर रीतसर भरवली जाऊ लागली. तशी संमेलने 1964 पर्यंत भरवली गेली. त्या कालावधीत न्यायमूर्ती म. गो. रानडे (पहिले अध्यक्ष),  कृष्णशास्त्री राजवाडे, र.पां. करंदीकर, गो.वा. कानिटकर, चिंतामणराव वैद्य, ह.ना. आपटे, न.चिं. केळकर, श्री.कृ. कोल्हटकर, मा.श्री. अणे, शि.म. परांजपे, वा.म. जोशी, श्री.व्यं. केतकर, सयाजीराव गायकवाड, कृ.प्र. खाडिलकर, मा.त्र्यं. पटवर्धन, वि.दा. सावरकर, द.वा. पोतदार, ना.सी. फडके, वि.स. खांडेकर, प्र.के. अत्रे, श्री.म. माटे, ग.त्र्यं. माडखोलकर, न.र. फाटक, य.दि. पेंढरकर, लक्ष्मणशास्त्री जोशी, अनंत काणेकर, अनिल, कुसुमावती देशपांडे, न.वि. गाडगीळ, वि.वा.शिरवाडकर आदी मोठमोठ्या साहित्यिकांनी संमेलनांची अध्यक्षपदे भूषवली. वि.वा. शिरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली गोव्यातील मडगाव येथे 1964  मध्ये संमेलन भरले होते. ‘म.सा.प.’तर्फे भरलेले ते शेवटचे संमेलन होते. त्यानंतरची आजपर्यंतची संमेलने ‘अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ’ या विस्तारित महामंडळाच्या विद्यमाने भरली. ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’, ‘मुंबई मराठी साहित्य संघ’, ‘विदर्भ साहित्य संघ’ आणि ‘मराठवाडा साहित्य परिषद’ या चार संस्थांचे एकत्रीकरण करून महामंडळाची स्थापना झाली. ‘अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ’ हे सर्व मराठी भाषकांचे साहित्यासंबंधीचे प्रतिनिधित्व करणारे सर्वोच्च महामंडळ आहे. महामंडळातर्फे पहिले साहित्य संमेलन 1965  मध्ये वा.ल. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली हैदराबाद येथे भरले. त्यानंतरच्या संमेलनांत वि.भि. कोलते, पु.शि. रेगे, ग.दि. माडगूळकर, पु.ल. देशपांडे, दुर्गा भागवत, पु.भा. भावे, वामन चोरघडे, गं.बा. सरदार, गो.नी. दांडेकर, गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर, शंकरराव खरात, शंकर पाटील, विश्राम बेडेकर, वसंत कानेटकर, विद्याधर गोखले, के.ज. पुरोहित, रमेश मंत्री, शांता शेळके, यू.म. पठाण, ना.सं. इनामदार, मधु मंगेश कर्णिक, द.मा. मिरासदार, वसंत बापट आदी साहित्यिकांना संमेलनाध्यक्ष होण्याचा मान लाभला होता.

हे झाले मोठ्या साहित्यिकांबद्दल; परंतु ज्यांचा साहित्याशी फारसा संबंध नाही अशा अन्य क्षेत्रांत मोठ्या असलेल्या व्यक्तींनाही संमेलनाध्यक्षपद मिळाले होते. त्याचप्रमाणे साहित्य क्षेत्रात मानाचे असणारे कित्येक थोर साहित्यिक संमेलनाध्यक्षपदापासून वंचित राहिले होते. व्यासंगी विद्वान कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना संमेलनाध्यक्षपदाचा सन्मान प्राप्त झाला नाही. तो सन्मान कृष्णशास्त्री चिपळूणकरांचे पुत्र विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनाही मिळाला नाही. लोकमान्य टिळक, गो.ग. आगरकर, लोकहितवादी देशमुख, वि.का.राजवाडे आदी लेखन कर्तृत्वाने तळपणाऱ्या महापुरुषांना संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले नाही. पांगारकर, वि.ल. भावे, वा.गो. आपटे, रेव्हरंड टिळक, रा.ग. गडकरी, भा.रा. तांबे, चिं.वि. जोशी, पडिता रमाबाई, य.खु. देशपांडे, इरावती कर्व, पां.वा. काणे, साने गुरुजी, विनोबा अशा कित्येक व्यक्तींना साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले नव्हते.

पहिल्या सत्तावीस वर्षांत तीन संमेलने झाली. पुन्हा खंड पडला. 1909 ते 1926 काळातसुद्धा संमेलने भरलीच नाहीत. पुढे मात्र एखाद्या वर्षाचा अपवाद वगळता संमेलने नियमितपणे भरू लागली.

‘अखिल भारतीय’ या बिरुदापासून ते थेट जिल्हा, तालुका या संकोचापर्यंत अनेक साहित्य संमेलने भरत असतात. प्रादेशिक साहित्य संमेलने भरतात. त्याशिवाय धर्मनिहाय संमेलनेही भरतात. कामगार साहित्य संमेलन भरते. इतकी संमेलने प्रत्येक वर्षी भरतात, की पूर्वीचा जणू काही अनुशेष भरून काढला जात आहे असे वाटते. हल्लीची संमेलने महागडी झाली आहेत. रांजणभर पैसे जमा केल्याशिवाय संमेलन होतच नाही. त्यातल्या त्यात एक बरे आहे. गर्दी चांगली जमते. पन्नास टक्के साहित्यप्रेमी आणि पन्नास मौजे अशा प्रकारची ती साहित्यजत्रा असते.

– वि. आ. बुवा
(मुंबई सकाळ – 31 जानेवारी 1999 वरून उद्धृत)

About Post Author

1 COMMENT

  1. खप छान……
    खप छान……

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here