शैला मंडलीक- दापोलीचे आधुनिक महिला नेतृत्व (Shaila Mandalik- Women Reformist from Dapoli)

0
195

दापोलीच्या शैला(ताई) मंडलीक यांची जन्मशताब्दी 8 जानेवारी 2023 ला होऊन गेली. त्यांनी त्यांच्या वयाच्या सुमारे अर्धशतकाच्या वाटचालीत लोकसेवेच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली. त्या डॉ. पी.व्ही. मंडलीक ट्रस्टच्या विश्वस्त होत्या. संपर्कात येणाऱ्या माणसाची अडचण सोडवण्यासाठी निरपेक्ष बुद्धीने प्रयत्न करणारी माणसे समाजात थोडी असतात. शैला तशांपैकी एक होत्या. बालपणी आईचे संस्कार, विवाहानंतर डॉ.आप्पा मंडलीक यांची साथ आणि थोरले दीर समाजवादी नेते डॉ. पी.व्ही. मंडलीक यांचे मार्गदर्शन… त्यामुळे शैला समाजकार्य खंबीर मनाने करू शकल्या.

शैला यांचा जन्म जैतापूरजवळील दळे या गावचा. त्यांचे शिक्षण दळे, कोल्हापूर, पुणे असे झाले. त्यांचा परिचय त्या पुणे येथे शिकत असताना दापोलीचे डॉ.जी.व्ही. ऊर्फ आप्पा मंडलीक यांच्याशी झाला; पुढे, शैला यांच्या दापोली भेटीत परिचयाचे रूपांतर प्रेमात झाले व दोघांचा विवाहही यथाकाल होऊन गेला.

शैला लग्नानंतरची छप्पन वर्षे दापोलीत राहिल्या. दापोली हे तालुक्याचे ठिकाण असले तरी गावाच्या आजुबाजूला घनदाट जंगल होते. खूप पाऊस पडे. वीज नव्हती, कंदील किंवा रॉकेलचे मिणमिणते दिवे. मंडलीक यांचे घर गावापासून दूर, रस्त्यापासून आत, गर्द झाडीत होते. शेजारपाजार नाही. घराला लागून डोंगर. त्यावर आंबा, काजू व इतर दाट जंगली झाडे. घराच्या परिसराला लागून साहेब लोकांची स्मशानभूमी. घराच्या शेजारी सरकारी विश्रामधाम. तेही त्या काळी ओसाड असे. कधीतरी सहामाशी एखादा सरकारी अंमलदार येई.

मंडलीक यांचे घर बंगलेवजा अवाढव्य मोठे होते. घरासमोर भातशेतीची खाचरे. घराच्या शेजारी आंबा, चिकू, माड, पोफळी अशी विविध प्रकारची झाडे, गुरेढोरे असा मोठ्ठा कुटुंबकबिला सांभाळण्याचे काम शैला यांच्याकडे आले. शेतीवाडी आणि गुरेढोरे असल्यामुळे दोन-चार गडीमाणसे आणि दोन-तीन शालेय विद्यार्थी घरात असतच.

शैला यांचे सासरे वासुदेवराव मंडलीक दापोलीच्या कोर्टात वकिली करत. तेही त्यांचे वडील रावसाहेब यांच्यासारखे वक्तशीर. शैला यांचे पती गंगाधर वासुदेव ऊर्फ आप्पासाहेब मंडलीक हे दापोलीचे प्रसिद्ध डॉक्टर. त्यांना सर्वजण आप्पाशेट म्हणत. दापोली गाव इतके मागस होते की गावात लाल मातीचे, धुरळ्याने भरलेले रस्ते. वाहने फारशी नव्हती. त्यांना रोगी तपासण्यासाठी लांबलांबच्या गावी जावे लागे. घरी परतण्यास कधी दोन दिवस, कधी तीन दिवसही लागत. शैला यांना चार मुले. मोठी मुलगी व तीन मुलगे. त्यांनी लग्नानंतरची पहिली दहा वर्षे बालसंगोपनाचे काम केले. घरची शेतीवाडी, गुरेढोरे, गडी माणसे, गावातील माणसे यांना सांभाळण्याचे काम हे असेच.

शैला यांचे त्यानंतरचे जीवन मात्र सार्वजनिक कार्यात व्यतीत झाले. शैला यांच्या पुढाकाराने दापोली गावात पहिले महिला मंडळ 1941 साली स्थापन झाले. ते महिला मंडळ बहुजन समाजातील महिलांना एकत्र येता यावे, त्यांच्या समस्यांचा विचार करता यावा यासाठी स्थापन करण्यात आले होते. मंडळामुळे घरात कोंडल्या गेलेल्या दापोलीच्या महिलांना नवे दालन खुले झाले. महिलांच्या अंगी उत्साह संचारला. सांस्कृतिक कार्यक्रम, सण-उत्सव सामूहिक साजरे होऊ लागले. शैला यांनी समाजसेवेचे पहिले पाऊल असा विशाल दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून उचलले होते ! त्यांनी मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा बिनतक्रार आणि हौसेने कित्येक वर्षे सांभाळली. शैला यांनी सांगितलेली एक गंमत अशी, की गावातील ब्राह्मण समाजाच्या लग्न झालेल्या बायका नऊवारी साड्या नेसत असत. शैला मात्र पाचवारी गोल साडीत असत. त्यामुळे काही महिला नाक मुरडत, टिकाटिप्पणी करत. पण शैला यांनी तशा गोष्टींकडे कायम दुर्लक्ष केले.

मंडलीक यांच्या घरात काँग्रेसी वातावरण होते. भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळाले. त्या दिवशी, शैला यांच्या घराशेजारच्या डोंगरावर सर्वात उंच असलेल्या सुरूच्या झाडावर तिरंगा फडकत होता. दिवसभर मंडलीक यांच्या घरात जल्लोष चालला होता. गावातील लोक येत-जात होते. वीज नसली तरी तेलाच्या दिव्यांची रोषणाई सर्वदूर केली होती.

शैला स्वीकृत महिला सदस्य म्हणून दापोली ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत होत्या. त्या जिल्हा लोकल बोर्डाच्या निवडणुकीला 1951 साली उभ्या राहिल्या. त्या निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी निवडून आल्या. रत्नागिरी जिल्हा परिषदेची स्थापना 1962 साली झाली. तेव्हा शैला जवळपास दहा वर्षे जिल्हा परिषदेत कार्यरत होत्या. त्यांनी शिक्षण, समाज कल्याण अशा जिल्हा परिषदेच्या समित्यांवर काम केले.

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ 1957 साली जोरात सुरू होती. शैला यांचे दीर मुंबईचे डॉ.पी.व्ही. मंडलीक, प्रजा समाजवादी पक्षातर्फे दापोली-मंडणगड मतदारसंघातून विधानसभेसाठी उभे राहिले आणि निवडूनही आले. शैला आणि डॉ.आप्पा यांनी त्यावेळी स्वतःच्या काँग्रेस पक्षाचा विचार केला नाही. पी.व्ही. यांनी दापोली-गुहागर मतदारसंघातून पुन्हा 1962 साली निवडणूक लढवली. त्या वेळीही ते विधानसभेवर निवडून आले. दोन्ही वेळा आप्पा व शैला यांनी पी.व्ही. यांचा हिरीरिने प्रचार केला. त्यांचे त्या परिसरातील कार्य पी.व्ही. यांच्या निवडीच्या कामी आले !

शैला यांनी दापोलीच्या राजकारणात सुरुवातीला सक्रिय कार्यकर्ती म्हणून आणि नंतर मुरलेली सल्लागार म्हणून महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. पण समाजकारण हाच शैला यांचा आवडीचा आणि आत्मीयतेचा विषय होता. त्यांनी सामाजिक समतेचा विचार समाजामध्ये रूजवण्याचे महत्त्वाचे पण कठीण काम तळमळीने, निष्ठेने आणि प्रामाणिकपणे केले. शैला कुणबी सेवा संघ, भारत सेवक समाज या संस्थांच्या सभासद होत्या. त्यांनी दापोली अर्बन बँकेच्या कार्यकारिणीवर जागरूक सभासद म्हणून काम केले. त्या दापोलीमधील कुणबी छात्रालय – नवभारत छात्रालय यांच्या 1947 पासून अध्यक्ष होत्या. तेथे व्यवस्थापक – संचालक म्हणून काम करणारे पूज्य सामंत गुरुजी तेथील सर्व मुलांचा अभ्यास करून घेत असत. ते छात्रालय ऋषीमुनींच्या आश्रमासारखे होते. तेथे राहणाऱ्या प्रत्येक मुलाचे अक्षर सुंदर वळणदार असायचे. सामंत गुरुजींनंतर त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या शिंदे गुरुजींनी छात्रालय नावारूपाला आणले, छात्रालयाची वाटचाल स्वयंपूर्णतेकडे झाली. ते स्वयंपूर्ण, स्वावलंबी आहे. सामंत गुरुजींच्या नंतर त्यांच्याच नावाने त्याच आवारात मुलींचे छात्रालय सुरू झाले. शैला मुलींच्या त्या छात्रालयाच्याही अध्यक्ष होत्या. मुंबईतील डिप्रेस्ड क्लास सोसायटीच्या सौजन्याने हरिजन-गिरीजन, भटक्या-विमुक्त मुलींसाठी दापोलीमध्ये कस्तुरबा कन्या छात्रालयाची स्थापना झाली. शैला या शेवटपर्यंत त्या छात्रालयाच्या अध्यक्ष होत्या. त्यांनी अध्यक्षपदाची नुसती झूल पांघरली नव्हती. मुलींसाठी रेशन नसले तर घरात असलेल्या धान्यांचा त्या पुरवठा करत व नंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागे लागून रेशनचा प्रश्न सोडवत असत. कधीतरी जळणाचा प्रश्न उद्भवत असे, तेव्हा घरची गाडीभर लाकडे आधी छात्रालयाकडे रवाना होत असत.

शैला यांना मुलींच्या शिक्षणाबद्दल आस्था कमालीची होती. त्या मुलींनी शिकले पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे यासाठी झगडल्या. त्यांनी स्वतःच्या घरी निराधार, अनाथ मुलींना ठेवून त्यांना शिक्षणाची कवाडे उघडून दिली. कोणी एस एस सी झाल्या; काहींनी पुढचेही शिक्षण घेतले. त्यांनी सांभाळलेल्या मुलींची लग्नकार्येही करून दिली. त्या सर्वजणी स्वतःच्या संसारात सुखाने नांदत आहेत.

शैला स्वतः त्यांच्या शेतीवाडीची देखभाल करत असत. शैला यांच्या दापोलीच्या घराजवळ भातशेतीची तीन मोठी शेते होती. एका शेताचे दोन भाग सोयीसाठी केले होते. घराच्या एका बाजूला एक छोटी टेकडी होती. तीवर आंबे, काजू, फणस वगैरे मोठमोठी झाडे अजूनही आहेत. त्याशिवाय, घराजवळ चिकूची पाच-सहा झाडे होती. लिचीचे एक झाड होते- अजूनही आहे. दापोली-दाभोळ रस्त्यालगत पोफळी-नारळ यांची बाग होती. तेथे पेट्रोल पंप आहे. त्यांची कुंभवे गावात सुपारीची बाग मोठी म्हणजे आठ एकर होती. त्या जोडीला आंबे, काजू यांची लागवड केलेले दोन लाग होते. शैला कुंभव्याला आठवड्यातून दोन-तीन वेळा जात असत- सकाळी जात व संध्याकाळी घरी परत येत ! एकदा, आंबे-काजूच्या दिवसांत त्यांच्या कुंभव्याच्या लागात त्या फेरी मारण्यास गेल्या असताना, त्यांना एक गोरीगोमटी लहान मुलगी गुरांना चारण्यास घेऊन आलेली दिसली. त्यांनी त्या मुलीची चौकशी केली. शैला यांनी तिच्या वडिलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. ती मुलगी- मंगल ही शैला यांच्याकडे शिक्षणासाठी म्हणून राहिली. शैला यांनी सांभाळलेल्या मुलींपैकी ती पहिली मुलगी. मंगलची पाचवीपासूनची शाळा त्याच वर्षीच्या जूनमध्ये दापोलीला सुरू झाली. शैला यांचा धाकटा मुलगा अनिल त्याच शाळेत दुसरी-तिसरीत शिकत होता. त्यामुळे ती दोघे एकत्र शाळेत जाऊ लागली. मंगल घरात आणि शाळेत रमली. मंगल चांगल्या मार्कांनी एस एस सी पास झाली. पुढे तिने बी पी एन ए चा नर्सिंगचा चार वर्षांचा कोर्स केला. मंगल उत्तमपैकी नर्स झाली आणि मुंबईच्या हरकिसनदास हॉस्पिटलमध्ये नोकरीही करू लागली. शैला यांनी तिचे लग्नकार्यही करून दिले.

शैला यांनी लग्न झाल्यानंतर शेतीचे सर्व तंत्र-मंत्र शिकून घेतले. त्यांनी एकहाती कुंभव्याची शेती व सुपारीची बाग सांभाळली. त्या त्यासाठी आठ-आठ दिवस कुंभव्याला बागेतील घरात जाऊन राहत असत. ते घरही एक मजली होते. एखादा गडी व एक कुत्रा फक्त सोबतीला असे. रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या गावातील बायका सहजपणे शैला यांच्याजवळ गप्पा मारण्यास येत. तसेच, गावातील लोकही गप्पा मारण्यास येत असत. त्यामुळे शैला आनंदात त्या गावातील शेती करत असत. गावकऱ्यांशी त्यांचे घरोब्याचे संबंध होते.

दापोलीच्या घरी गाई, म्हशी व बैल असत. शेतीसाठी त्यांची फार गरज असे. शैला अनेक वेळा गरजेप्रमाणे गाई-म्हशींचे दूधही काढत असत. त्या दापोलीच्या शेतात भाजीचा मळा करत असत. त्या मळ्यात पालेभाजी, वांगी, काकडी, वगैरे भाजीपाला व पावटे, कुळीथ यांसारखी कडधान्ये पिकवत असत. हाताशी एखादा गडी असे. त्याही हौस म्हणून काम करत. त्या त्यांच्या मुलांनाही कामात सहभागी करून घेत असत. त्यामुळे त्यांच्या सर्व मुलांना नांगर धरणे, भात लावणे, कापणे आदी कामे सहजपणे करता येत. आप्पा त्यांना वेळ असेल त्यावेळी शेतात काम करत.

शैला या स्वत: त्यांचा थोरला मुलगा (डॉ.) अरुण याच्याबरोबर एस एस सी पास 1959 साली उत्तम मार्क मिळवून झाल्या. त्यांनी ड्राँईंगची दुसरी परीक्षा धाकटा मुलगा- अनिल याच्याबरोबर दिली. त्या मराठीची प्राज्ञ परीक्षाही उत्तम मार्क मिळवून पास झाल्या. त्यांना त्यांनी पदवीधर झाले पाहिजे असे वाटत असे. पण त्यांचे ते स्वप्न मात्र अधुरे राहिले.

आप्पा आणि शैला, दोघेही ए.जी. हायस्कूल या दापोलीच्या प्रसिद्ध शाळेच्या कार्यकारिणीवर अनेक वर्षे कार्यरत होती. त्यांचे विद्यार्थ्यांकडे आणि शिक्षकांकडे लक्ष बारकाईने असे. त्या त्यांच्या अडीअडचणी तत्परतेने दूर करत असत. पी.व्ही. व आप्पा हे दोघेही त्याच शाळेचे विद्यार्थी. शाळेला खूप मोठी परंपरा आहे. शाळेचा विस्तार सर्वांगांनी झाला आहे. डॉ. पी.व्ही. मंडलीक हेही काही वर्षे त्या शाळेचे अध्यक्ष होते. त्यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत त्यांच्या अखत्यारीत असलेली वळणे गावातील जमीन शाळेला दान म्हणून दिली. शैला यांची नेमणूक मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर राज्यपालांकडून झाली होती. तो त्यांच्यासाठी मानाचा तुराच होय !

नीला पटवर्धन 9869620946 patwardhanneela6@gmail.com

———————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here