दुसरे सरफोजी राजे
दुसरे सरफोजी राजे यांची तंजावूरमधील कारकीर्द तेथील मराठी प्रभावाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते. तंजावूर हे दक्षिण भारतातील प्रसिद्ध नगरराज्य आहे. ते चेन्नईपासून दोनशेअठरा मैल, तर कुंभकोणमपासून चोवीस मैल अंतरावर आहे. तंजावूरचे राज्य विजयालय चोळ याने मुत्तरैयर वंशाच्या राजाकडून इसवी सनाच्या नवव्या शतकात जिंकून घेतले आणि तेथे त्याची राजधानी वसवली. चोळ राजवंशाने तेथे सुमारे चारशे वर्षे राज्य केले. मात्र त्याच वंशातील राजेंद्र चोळ याने त्याची राजधानी गंगैकोंडचोळपुरम् येथे नेली. पांड्य वंशाची सत्ता तंजावूरवर पुढे, 1549 पर्यंत होती. त्यानंतर विजयनगर राज्यातील एक सेनापती शिवप्पा नायक याने तंजावूर येथे स्वतंत्र राज्य स्थापले. ते राज्य 1673 पर्यंत नांदले. शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी भोसले यांनी त्यांची सत्ता तेथे 1674मध्ये स्थापन केली. ते भोसले यांचे राज्य 1855 पर्यंत होते. नंतर ते इंग्रजांच्या ताब्यात गेले.
दुसरे सरफोजीयांना तंजावूरचे तुळाजी राजे भोसले यांनी 23 जानेवारी 1787 रोजी दत्तक घेतले, कारण ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशातीलच होते. दुसरे सरफोजी यांचा कार्यकाळ 1798 ते 1832 इतका राहिला. त्यांनीत्या कालावधीत केलेले काम केवळ उल्लेखनीय नाही तर तंजावूर राजवटीची शान वाढवणारे आहे! त्यांची ओळख जनतेचा राजा म्हणून कायम सांगितली जाते. दुसऱ्या सरफोजी राजांना राजकीय दृष्ट्या सुरूवातीच्या काळात बराच त्रास सहन करावा लागला. तुळाजी महाराजांचा मृत्यू झाल्यावर दुसऱ्या सरफोजी राजांची काळजी घेण्याची जबाबदारी प्रतापसिंहांचा दासीपुत्र अमरसिंग यांच्यावर सोपवण्यात आली होती. पण त्यांनीच राजगादी बळकावली! त्यांनी सरफोजीयांना शिक्षण देण्याचेही नाकारले. मात्र रेव्हरंड फ्रेडरिक ख्रिश्चन स्कॉर्टझ यांनी हस्तक्षेप करून सरफोजीयांना मद्रासला (चेन्नई) शिक्षणासाठी पाठवले. ल्युथरन मिशनच्या रेव्हरंड विल्हेम गेरिक यांनी त्यांना तेथे शिकवले. सरफोजी राजे तमिळ, तेलगू, उर्दू, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, ग्रीक, डच आणि लॅटिन अशा भाषांत पारंगत झाले. महाराजांनी त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भव्य चर्च तंजावूरच्या मध्यवर्ती भागात बांधून दिले. सरफोजी यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ब्रिटिशांनी तंजावूरच्या कारभारात हस्तक्षेप करून सरफोजी यांना 29 जून 1798 रोजी राज्यावर बसवले. अर्थात, त्या बदल्यात ब्रिटिशांनी त्यांच्या साम्राज्याला तंजावूरचे राज्य जोडून घेतले. राजांना एक लाख रुपये पेन्शन व राज्याच्या महसुलाचा एक तृतीयांश हिस्सा देण्याचे ठरवण्यात आले.
दुसरे सरफोजी महाराज यांची कारकीर्द विविध कारणांमुळे संस्मरणीय ठरली आहे. त्य़ांच्या आस्थेचे विषय धर्म, अर्थकारण, कलासंचार, संग्रहविद्या असे विविध होते. त्यांनी दक्षिण भारतातील पहिला देवनागरी छापखाना 1805 मध्ये उभारला. तो त्या प्रकारचाछापखाना उभा करण्याचा पहिला प्रयत्न होता. त्यांनी त्या दगडी छापखान्याचे नाव विद्याकलानिधी वर्ण यंत्रशाळा असे ठेवले होते. त्यात छपाईसाठी दगडी मुद्राक्षरे वापरण्यात आली होती. सरफोजी राजांनी तंजावूरच्या राजवाडा परिसरात तमिळनाडूमधील पहिले प्राणिसंग्रहालय निर्माण केले. त्यांनी तंजावूरपासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर गोदी बांधली. त्यांनी हवामान वेधशाळा उभी केली होती. व्यापारासाठी सुविधा हा त्यामागील हेतू होता. त्यांचा स्वतःचा बंदुका निर्माण करण्याचा कारखाना होता.
सरस्वती महाल हे तंजावूरच्या राजमहालातील ग्रंथालय ‘नायकर’ राजवटीत, 1535-1673 या काळात उभारले गेले. दुसऱ्या सरफोजी महाराजांचे श्रेय असे, की त्यांनी त्याग्रंथालयात अमूल्य ग्रंथ, नकाशे, शब्दार्थकोष, नाणी, कलाकृती संग्रहित केल्या. अशा रीतीने, त्याचे रुपांतर विविध वस्तूंनी समृद्ध अशा संग्रहालयात झाले! त्यांनी अनुरुद्रै, त्यागराज अय्यर, पुदुकोरै आणि नारायण पिलै यांना पुस्तके व हस्तलिखिते मिळवण्यासाठी दूरदूरच्या भागांत पाठवले आणि कित्येक पुस्तके व हस्तलिखिते संग्रही जमा केली. त्यांना पुस्तकांची आवड इतकी होती, की त्यांनी चार हजारांपेक्षा अधिक पुस्तके जगातील विविध देशांतून खरेदी करून ती ग्रंथालयात आणून ठेवली. ग्रंथालयात वेदांत, व्याकरण, संगीत, नृत्य आणि नाटक, शिल्पशास्त्र, खगोलशास्त्र, वैद्यक, हत्तींचे व घोड्यांचे प्रशिक्षण अशा विविध विषयांवरील ग्रंथसंपदा आहे. महाराजांनी स्वतः ग्रंथालयांतील सर्व पुस्तकांवर इंग्रजीमध्ये सह्या केलेल्या दिसतात. मराठी दरबारातील कामकाजाच्या मोडी लिपीतकेलेल्या नोंदी तेथे उपलब्ध आहेत. फ्रेंच व मराठी भाषांतील पत्रव्यवहारही जतन करण्यात आला आहे. एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाया प्रसिद्ध इंग्रजी विश्वकोशाने त्यांच्या ग्रंथालयांच्या सर्वेक्षणात भारतातील ते सर्वांत मोठे ग्रंथालय अशी नोंद केली आहे!
सरफोजी महाराजांनी माणसे व प्राणी यांच्यासाठी एतद्देशीय वनस्पतीजन्य औषधनिर्मिती आणि संशोधन यासाठी ‘धन्वंतरी महाल’ या संशोधन संस्थेची स्थापना केली. त्या संस्थेत आजारी असलेल्यांवर उपचार केले जात व त्यांची नोंदणीपत्रके ठेवली जात. तशी पद्धत भारतात त्या वेळपर्यंत रूढ नव्हती. त्या ठिकाणी आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि आधुनिक औषधे अशा चारही उपचारशाखांवर संशोधन केले जात असे. तेथे वनस्पती आणि त्यांचे औषधी उपयोग यांवर अठरा भागांत संशोधनपर ग्रंथ उपलब्ध आहेत. राजांकडे महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची रंगीत हस्तचित्रे होती. त्यांनी धन्वंतरी महालाच्या औषधोपचार पद्धतीचे तपशीलवार वर्णन करणारा एक कवितासंग्रह तयार केला होता. त्या कविता सभेंद्र वैद्य मेरैगल यांनी एकत्रित केल्या होत्या. राजांनी त्यांच्या हाताने नोंदी औषधींवरील ग्रंथांत इंग्रजीत केलेल्या आढळून येतात. दुसरे सरफोजी राजे हे त्यांच्या बरोबर शल्य–चिकित्सेची सामग्री नेहमी बाळगत. ते जेथे जेथे जात तेथे मोतिबिंदूच्या शस्त्रक्रिया करत. सरफोजी यांनी केलेल्या शस्त्रक्रियांच्या नोंदी इंग्रजीत तपशीलवार सापडतात. सरफोजी यांनी ज्या रोग्याची शस्त्रक्रिया केली त्याचा पूर्वेतिहासदेखील नोंदून ठेवला आहे. ते साहित्य सरस्वती महाल ग्रंथालयाच्या संग्रहात आहे. त्या नोंदणी पत्रकांमागील दूरदृष्टी नंतरच्या काळात फारच मान्यता पावली.
महाराजांनी नव विद्याकला विधी शाळेची स्थापना केली. तेथे भाषा, साहित्य, कला, कौशल्य यांशिवाय; वेद आणि शास्त्र यांचे शिक्षण दिले जात असे. महाराजांचे तरंगमबाडीशी घट्ट संबध होते (तरंगमबाडी म्हणजे गाणाऱ्या जललहरींचा प्रदेश, डॅनिश नाव ट्रॅन्क्युबर). त्यांनी तेथील शाळांना भेटी देऊन ती शिक्षणपद्धत त्यांच्या राज्यात लागू केली. ते भारतीय स्त्रियांच्या उद्धाराचे समर्थक होते. त्यांनी स्त्रियांची शिक्षक म्हणून नेमणूक करून शिक्षणक्षेत्रात क्रांती घडवून आणली. त्यांनी पाण्याचे दहा तलाव बांधले, कित्येक विहिरी खोदल्या आणि संपूर्ण तंजावूरसाठी जमिनीखालील मलनिस्सारण व्यवस्था अंमलात आणली.
दुसरे सरफोजीयांनी नवीन मंदिरे बांधलीच; बृहदेश्वराच्या मंदिराचा जसा जीर्णोध्दार केला तशाच प्रकारे इतर पुरातन मंदिरांचाही जीर्णोध्दार केला. सलुवनायकन्पट्मच्या किल्ल्यातील मनोरा; तसेच, तंजावूर राजवाड्यातील पाच मजले असलेली सरजा माडी ही दुसरे सरफोजी यांच्या काळातच बांधली गेली. ती वास्तू – तिचा वीज पडण्यापासून बचाव व्हावा यासाठी तिच्यावर धातूचे खांब बसवलेआहेत. त्यांनी भोसले घराण्याचा इतिहास बृहदेश्वर मंदिराच्या नैऋत्य दिशेच्या भिंतीवर दगडांत कोरून घेतलाआहे. ते जगातील सर्वात दीर्घ असे शीलालेखन आहे. ते रॉयल एशियाटिक सोसायटीचे सदस्यही होते. सरफोजी 1820-21 मध्ये यात्रेसाठी निघाले तेव्हा त्यांच्या बरोबर सुमारे तीन हजार यात्रेकरू अनुयायी होते. त्यांनी पुष्कळ ठिकाणी तंबू ठोकून वस्ती केली आणि गरिबांना दान दिले. तसेच, मार्गातील पवित्र जागांचे नुतनीकरणही केले. त्यांनी कित्येक धर्मशाळा रामेश्वरम ते वाराणसी या मार्गावर यात्रेकरूंसाठी निर्मिल्या; त्या अस्तित्वात आहेत. त्यांनी करवलेली रंगचित्रे गंगेच्या घाटावर; तसेच, अन्य पवित्र स्थानांवर त्यांच्या अभिरूचीसंपन्न जीवनाची साक्ष देत आहेत. सरफोजी राजे मोकळया मनाचे होते. ते अन्य धर्मपंथीय श्रद्धावंताच्या बाबतीत सहिष्णू होते. त्यांनी ख्रिश्चन मिशनरीनी चालवलेल्या शाळा आणि चर्चेस यांना देणग्या दिल्या.
त्यांचा मृत्यू चाळीस वर्षांच्या कारकिर्दीनंतर (1787 ते 1793 नंतर 1798 ते 1832) 7 मार्च 1832 रोजी झाला. त्यांच्या अंत्ययात्रेस सुमारे नव्वद हजार लोक उपस्थित होते.
सध्याचे महाराज शिवाजीराजे भोसले यांचा घरगुती सत्कार करताना श्रीप्रकाश अधिकारी |
भोसले राजघराण्याचे विद्यमान वारस हे दुसरे सरफोजी यांच्यापासूनची सहावी पिढी. ते चार भाऊ होते. पैकी दोघे मृत्यू पावले. शिवाजीराजे हे बँकेतील निवृत्त अधिकारी आहेत. ते राजघराण्यासंबंधातील बऱ्याचशा औपचारिकता सांभाळत असतात. दुसरे वीरेंद्रराजे हे शेती व अन्य व्यवसाय करतात. दोघांच्या पत्नी महाराष्ट्रातील बारामती व कोल्हापूर येथील आहेत. शिवाजीराजे व वीरेंद्रराजे हे दोघे व त्यांचे कुटुंबीय मराठी उत्तम बोलतात. शिवाजीराजे यांनी एक मोठा प्रकल्प जाहीर केला आहे.
तंजावूरमधील भोसले घराण्याची तंजावूरमधील राजकीय कारकीर्द –
व्यंकोजी भोसले – 1676- 1683, शहाजी (दुसरा)1684 – 1712, (पहिला) सरफोजी – 1712 – 1728
तुकोजी – 1728 – 1736, 1736 ते 1739 – अराजकता, प्रतापसिंग – 1739 ते 1763
तुळजाजी 1763 ते 1787, अमरसिंग ((प्रतापसिंग दासीपुत्र) 1787 ते 1798
दुसरा सरफोजी 1798 ते 1832, शिवाजी – 1833 ते 1856
– श्रीप्रकाश अधिकारी 9423806792/9273047889 shriprakashadhikari@gmail.com
—————————————————————————————————————————————
आत्ताच इंग्रजी माध्यमाच्या शाळांना का महत्त्व दिले जात आहे. पण हे सत्ताकारण,अर्थकारण आणि संकुचित मानसिकता तयार करण्यात आली आहे. प्रगल्भता ही भाषेबाबत असावी.मराठी भाषा संपन्न करण्यासाठी अन्य भाषा अवगत असाव्यात. बहुभाषिक व्हावे पण मराठी, संस्कृत यांचा वापर न थांबता झाला पाहिजे. यासाठी इतिहासात ज्या थोर व्यक्तींनी योगदानाबद्दल आदर्श घालून दिला आहे त्याचा अवलंब व्हायला पाहिजे.
अतिशय उद्बोधक माहिती आहे ही. आपला संपन्न इतिहास नव्या पिढीपर्यंत जाणे अत्यंत गरजेचे आहे. ह्या सुंदर लेखाने ते साध्य होईल.माननीय लेखक श्री.श्रीप्रकाश चंद्रकांत अधिकारी यांचे खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन. 🙏⚘
खूपछान. इतिहासाची दडलेली पाने उलगडणारा लेख. अत्याधुनिक विचारसरणीचे राजे सरफोजींनी देशाच्या सर्वच क्षेत्रातील विकासाची पायाभरणी केली होती. सविस्तर आढावा वाचायला मिळाला. धन्यवाद🙏🏼 प्रा. अधिकारी यांचे अभिनंदन👍🏼👏🏻👏🏻💐
प्रा. संध्या शहापुरे.
भूतकाळातील इतिहासाला वर्तमानाशी जोडणारा सुंदर लेख. अधिकारी सरांना धन्यवाद. शुभेच्छा…
लहानपणी इतिहास म्हणजे जुने किल्ले, मंदिरे अशा ठिकाणी झालेले उत्खनन एवढेच माहित होते. धरतीच्या पोटात दडलेला इतिहास आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाची, त्यांच्या बुद्धिमत्तेची जाणीव करून देत आलाय परंतु त्या कर्तृत्ववान व्यक्तिंच्या इतिहासात शिरून त्यांच्या स्वभावाचा, त्यांच्या कार्याचा अभ्यासपूर्ण आढावा घेणे हे फार कठीण आणि मेहनतीचे काम असते. श्री. श्रीप्रकाश अधिकारी यांनी सरफोजी महाराज यांच्या कार्याचा खूपच खोलवर अभ्यास करून सरफोजींचा इतिहास आपल्या समोर उलगडला आहे. मला मनापासून अस वाटत की शालेय शिक्षणात इतिहासाच्या पुस्तकात श्री. अधिकारी यांनी लिहिलेला हा लेख नक्कीच आला पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल आणि इतिहासाची आवड निर्माण होईल.
नवीन पिढीला अशी माहिती वाचावयास मिळाली पाहिजे.हाच खरा इतिहास आहे.
चिंतनशील लेखन आहे
अतिशय छान महिती मिळाली. ___ मी रजेन्द्र् किसनराव डोईफोडे. फलटण, जिल्हा सातारा.
अतिशय छान महिती मिळाली. ___ मी रजेन्द्र् किसनराव डोईफोडे. फलटण, जिल्हा सातारा.
इतिहसात घडले असलेली अनमोल आणि उपयुक्त माहिती असून अभिमान वाटावा अशी माहिती मिळाली
अत्यंत छान माहिती दिलेली आहे, मान अधिकारी यांना धन्यवाद, या टिपणीतील एक मुद्दा असा की, दुसरे सरफोजी महाराज यांना शिक्षण देणाऱ्या ख्रिश्चन मिशनरी आणि सरफोजी राजे यांच्यातील नंतरच्या काळात संबंध कसे होते, किंवा त्या मिशनऱ्यांच्या कार्याचा प्रभाव पडला होता का?? याची माहिती देखील शोधायला हवी
अत्यंत छान माहिती दिलेली आहे, मान अधिकारी यांना धन्यवाद, या टिपणीतील एक मुद्दा असा की, दुसरे सरफोजी महाराज यांना शिक्षण देणाऱ्या ख्रिश्चन मिशनरी आणि सरफोजी राजे यांच्यातील नंतरच्या काळात संबंध कसे होते, किंवा त्या मिशनऱ्यांच्या कार्याचा प्रभाव पडला होता का?? याची माहिती देखील शोधायला हवी