इंदूर येथे भरलेल्या दहाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गणेश जनार्दन आगाशे हे व्युत्पन्न पंडित होते. त्यांचे प्रभुत्व मराठी, इंग्रजी आणि संस्कृत ह्या तिन्ही भाषांवर होते. त्यांनी त्या तिन्ही भाषांमध्ये कविता लिहिल्या होत्या. त्यांनी अनेक मासिकांतून विद्वत्ताप्रचुर लेख लिहिले होते. जबरदस्त पाठांतर हा त्यांचा एक विशेष होता. त्यांनी लहानपणीच ‘रघुवंश’, ‘अमरकोश’, ‘शब्द रूपकला’ ही संस्कृतकाव्ये तोंडपाठ केली होती.
आगाशे यांचे मूळ गाव रत्नागिरीजवळील ‘कोळंबे’ हे होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण आळंदी व सासवड येथे झाले. त्यांना मॅट्रिकला जगन्नाथ शंकरशेट स्कॉलरशिप (1869) मिळाली. त्यांना बी ए ला भगवानदास पुरुषोत्तमदास संस्कृत शिष्यवृत्ती मिळाली होती. त्यांना मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत शिष्यवृत्त्याही मिळाल्या होत्या. ‘अर्थशास्त्र’ हाही त्यांचा विशेष आवडता विषय होता. त्यांनी ‘अर्थशास्त्राची मूलतत्त्वे’ (मिसेस फॉसेटकृत इंग्रजी ग्रंथाच्या आधारे, स्वैर रूपांतर) 1891 मध्ये लिहिले. त्यांनी तो ग्रंथ अर्थशास्त्र विवेचनास कोणतीही परिभाषा हाताशी नसताना दक्षतापूर्वक लिहिला. त्या ग्रंथाला दक्षिणा प्राइझ कमिटीचा विशेष पुरस्कार मिळाला.
गणेश जनार्दन आगाशे यांचा जन्म 13 सप्टेंबर 1852 रोजी पुणे येथे झाला. त्यांनी एम ए पर्यंतचे शिक्षण घेतले होते. त्यांचे सारे आयुष्य हे शाळेत शिकवण्यात गेले. ते हेडमास्तर म्हणूनच ठाणे, पुणे, नगर, धुळे येथे काम करत होते. त्यांनी निवृत्त झाल्यावर एक-दोन वर्षें डेक्कन कॉलेजात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून काम केले. ते उत्तम वक्ते होते. त्यांनी पुणे येथे पदवीधर होण्यापूर्वी शिक्षकाची नोकरी केली. ते पुणे येथे हेडमास्तर असतानाच मुंबईच्या सेंट्रल बुक डेपोचे क्युरेटर (1902) झाले. मुंबई विद्यापीठाने त्यांना अनेक परीक्षांत संस्कृतचे परीक्षक म्हणून नेमले. त्यांचे विशेष काव्य म्हणून ‘बिरुदावली’ (1901) आणि ‘राज्यारोहण’ (1912) यांची नावे सांगितली जातात. त्यातील ‘बिरुदावली’ ही कविता त्यांचे गुरू न्यायमूर्ती रावसाहेब रानडे यांच्यावर केलेली आहे. आगाशे यांनी ‘बाष्पांजली’ हे(1916) काव्य स्वत:च्या मुलाच्या मृत्यूनंतर लिहिले. समीक्षकांनी या काव्यसंग्रहाची दखल घेत, ते काव्य सरस, नवीन वळणाचे व अत्यंत प्रभावी असल्याचे म्हटले आहे. ‘बाष्पांजली’हे काव्य तेनाशे पस्तीस श्लोकांचे आहे. आगाशे यांनी त्यांतून अकाली मृत्यू आलेल्या त्यांच्या मुलाशी भावोत्कट संवाद साधला आहे. त्यांच्या कविता ‘विविधज्ञानविस्तार’, ‘काव्यरत्नावली’ अशा नियतकालिकांत प्रसिद्ध होत.
अध्यक्षीय भाषणात त्यांनी म्हटले आहे, की ‘राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने भौतिक शास्त्रे आणि औद्योगिक कला या विषयांवर इंग्रजीतील तशा वाङ्मयाप्रमाणे सुलभ आणि सोपपत्तिक ग्रंथमाला मराठीत अवश्य करण्याची ती वेळ आहे… त्यांचा विशेष भर औद्योगिक स्वरूपाच्या पुस्तकांवर दिसतो.’त्यांचा मृत्यू 13 जुलै 1919 रोजी झाला.
– वामन देशपांडे 91676 86695, अर्कचित्र – सुरेश लोटलीकर 99200 89488
———————————————————————————————————