Home वैभव इतिहास संगम माहुली

संगम माहुली

1

संगम माहुली या गावी मराठा इतिहासाच्या खुणा आढळतात. ते ठिकाण साताऱ्यापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. ते कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमावर असल्यामुळे त्या गावाचे दोन भाग पडतात – अलीकडे ‘संगम माहुली’ आणि पलीकडे ‘क्षेत्र माहुली’.

छत्रपती शाहू महाराजांची आणि महाराणी ताराबाई यांच्या समाधी संगम माहुली येथे नदीच्या काठी आहेत. त्याशिवाय, प्रतिनिधी घराण्याने अठराव्या शतकात तेथे एकूण दहा मंदिरे बांधली. ती सर्व नदीच्या काठावर आहेत. त्यातील विश्वेश्वराचे मंदिर वेण्णा नदीच्या दक्षिण काठावर, कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमस्थानावर आहे. ते मंदिर सातारा गॅझेटिअरनुसार १७३५ मध्ये श्रीपतराव पंत प्रतिनिधी यांनी बांधले. मंदिराचे बांधकाम दगडी आहे. नदीच्या बाजूने प्रवेश असलेल्या मंदिराला प्रशस्त दगडी पायऱ्या आहेत. तारकाकृती असणाऱ्या त्या मंदिराची गर्भगृह, अंतराळ आणि सभामंडप अशी रचना आहे. गर्भगृहातील शिवपिंडीवर पितळेचे आवरण आहे. गर्भगृहाच्या उंबरठ्यावर कीर्तिमुख कोरलेले आहे.

_Sangam_Mahuli_2.pngअंतराळ चार स्तंभांवर आधारलेले असून दोन अर्धस्तंभ व दोन पूर्णस्तंभ आहेत. सभामंडप तिन्ही बाजूंनी मोकळा आहे. देवकोष्टकात डाव्या बाजूस गणपती आणि उजव्या बाजूस महिषासुरमर्दिनी यांच्या मूर्ती आहेत. सभामंडपात मोठी घंटा आहे. मुख्य मंदिरावर विटांचे शिखर असून त्यावर चुन्याचा गिलावा केलेला आहे. शिखराला अनेक देवकोष्टके आहेत. मंदिरासमोर नंदीमंडप आहे, त्यावर अष्टकोनी शिखर आहे.

मंदिराच्या उत्तर आणि पश्चिम बाजूला ओवऱ्या आहेत. त्याचा उपयोग यात्रेकरूंना राहण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी होतो. कृष्णा-वेण्णा उत्सव दरवर्षी माघ महिन्यात होत असतो. ते मंदिर राज्य संरक्षित स्मारक आहे.

मंदिराच्यासमोर कृष्णा नदीच्या काठावर छत्रपती शाहू महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्या समाधी आहेत. त्या समाधी पावसाळ्यात नदीचे पाणी वाढल्यावर पाण्याखाली जातात. (या समाधी नक्की कोणाच्या याबद्दल दुमत आहे)

– संतोष अशोक तुपे
santoshtupe707@gmail.com

छायाचित्रे – संतोष तुपे

About Post Author

1 COMMENT

  1. Very Fine Information about…
    Very Fine Information about Sangam Mahuli. Pl. give details about Ramshastri Prabhune in Sangam Mahuli ( historical things like home and other things)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version