Home संस्था नागपूरची नीरी – पाण्यासाठी प्यारी

नागपूरची नीरी – पाण्यासाठी प्यारी

1
_Neeri_1.jpg

देशात पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने कामे करणा-या ज्या संस्था आहेत, त्यातील आघाडीची आहे नागपूरची ‘नीरी’ (NEERI) म्हणजे ‘राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था’. ‘नीरी’ ही पर्यावरण विज्ञान आणि इंजिनीयरिंग क्षेत्रातील देशातील पहिली प्रयोगशाळा. ती महाराष्ट्रात आहे याचा अभिमान महाराष्ट्राला वाटला पाहिजे. ती भारत सरकारची संस्था आहे. तिचे कार्यालय नागपूर येथे १९५८ पासून सुरू झाले. संस्था स्थापनेचा मुख्य उद्देश म्हणजे पाणीपुरवठा, सांडपाण्याचे निर्मूलन व संसर्गजन्य आजारांचा बीमोड यांसाठी मदत करणे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने कारखान्यांवर नजर ठेवणे हा आहे. संस्था Council of Science and Industrial  Research (CSIR) चा एक भाग आहे. ‘नीरी’च्या प्रयोगशाळा देशात पाच ठिकाणी आहेत- चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता आणि मुंबई.

‘नीरी’चा व्याप खूप मोठा आहे आणि कार्य पण मोठे. संस्था १. वायू प्रदूषण नियंत्रण, २. अनॅलेटिकल उपकरणे, ३. जलवायू परिवर्तन, ४. इको सिस्टम, ५. एनव्हिरोनमेंटल बायोटेक्नॉलॉजी, ६. एनव्हिरोनमेंटल हेल्थ, ७. एनव्हिरोनमेंटल मटेरियल, ८. वॉटर टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, ९. वेस्ट वॉटर मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी इत्यादी विषयांतील कामास चालना देते. संस्थेचे वार्षिक बजेट तीस-पस्तीस कोटी रुपयांच्या दरम्यान असते. ‘नीरी’ने सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा पुनर्वापर करता यावा या दृष्टीने एक आश्रम शाळा आणि एक वसतिगृह येथे प्रयोग करून एक संयंत्र विकसित केले आहे. त्याला नाव आहे ‘ग्रे वॉटर ट्रीटमेंट प्लांट’. ते संयंत्र वापरण्यास आणि देखभालीला सोपे आहे. त्या संयंत्रामध्ये पाच हजार लिटर ते वीस हजार लिटरपर्यंत सांडपाण्याचे शुद्धिकरण करता येते आणि संयंत्राचे पैसे दोन वर्षांत भरून निघतात असे संस्थेचे म्हणणे आहे. त्या व्यतिरिक्त त्यामुळे वीस लिटर पाण्याची माणशी दर दिवशी बचत होते.

‘नीरी’ने युनिसेफबरोबर काम करून मध्य प्रदेशमध्ये शंभर आश्रमशाळांमध्ये आणि शंभर घरी व्यक्तिगत वापरासाठी ‘ग्रे वॉटर शुद्धिकरणा’चे संयंत्र बसवले आहे.

‘नीरी-झर’ हे पाणी शुद्ध करण्याचे आणखी एक संयंत्र आहे. त्या संयंत्राद्वारे पूरग्रस्तांना प्रत्येकी सहा ते दहा लिटर पाणी रोज पिण्याकरता आणि भोजन बनवण्यासाठी देता येऊ शकते. ते दिसण्यास सोपे पण पूरपरिस्थिती निर्माण झाल्यावर विजेचा वापर न करता लोकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यास उपयुक्त आहे. ‘नीरी’ने २००६ साली बारमेर जिल्ह्यात आणि २००९ साली सुंदरबन जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यावेळी अनुक्रमे शंभर आणि चारशे असे नीरी-झर इन्स्टंट वॉटर फिल्टर लावले होते. ‘ड्रिंकिंग वॉटर अॅण्ड सॅनिटेशन मंत्रालया’नुसार देशातील पंचवीस राज्ये पाण्यातील वाढत्या लोहमात्रेमुळे बाधित आहेत. त्याचा परिणाम मानवाच्या शरीरावर होत आहे. ‘नीरी’ने लोहमात्रेचा परिणाम कमी करण्याच्या उद्देशाने ‘हँड पंप अॅटॅच आयर्न रिमूवल’ असे संयंत्र विकसित केले आहे. त्या संयंत्रामुळे पाण्यात असलेले १-३० mg/l लोह, प्रमाणित केलेल्या ०.३ mg/l पर्यंत आणता येते. ‘नीरी’ची तशी संयंत्रे हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगड येथे काम करत आहेत.

‘सेंट्रल वॉटर कमिशन’च्या एप्रिल २०१५ च्या अहवालानुसार भारत देशात वर्षाला उपलब्ध होणारे एकंदरीत पाणी म्हणजे १८६९ BCM/year. त्यांपैकी उपयोगात येणा-या पाण्याची मात्रा असते ती ११२३ BCM/year. त्यांपैकी भूपृष्ठावरील साठा ६९० BCM/year असतो. भूपृष्ठावरील इतका मोठा साठा नद्या आणि तलाव यांच्या रूपात उपलब्ध असूनसुद्धा बाष्पीकरणामुळे पाण्याचा साठा कमी होत जातो. त्याचे प्रमाण पंचवीस ते तीस टक्के आहे. तेवढे पाणी हवेत उडून जाते! भारत देश उष्ण कटिबंधात असल्याकारणाने सत्तर टक्के भाग हा आठ ते नऊ महिने गरम राहतो. त्या दिवसांत पाण्याचे बाष्पीकरण सुरू असते. काही भागांत तर ते वर्षाला पंचवीसशे ते पस्तीसशे मिलिमीटर इतके असते. बाष्पीकरण कमी करण्याच्या दृष्टीने ‘ड्रिंकिंग वॉटर अँड सॅनिटेशन मंत्रालया’ने ‘नीरी’ला काही यंत्रणा विकसित करण्यास सुचवले. ‘नीरी’ने त्या अनुषंगाने दोन प्रणाली विकसित केल्या. पहिल्या प्रणालीत पाण्याच्या साठ्याला बांबूच्या तट्टयांनी झाकायचे आणि दुसरे म्हणजे पाण्याला रसायनाने झाकायचे. पाण्याच्या छोट्या साठ्याकरता ते बांबूच्या तट्टयांनी झाकणे प्रभावी ठरले असले तरी पाणी रासायनिक रीतीने झाकण्याकरता वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ‘नीरी’चा अभ्यास सुरू आहे.

‘शाश्वत पाणी योजना’ म्हणजे प्रत्येकाला कोणत्याही ऋतूत, दुष्काळ किंवा पूरपरिस्थिती निर्माण झाली तरी पिण्याकरता, स्वयंपाक करण्याकरता आणि इतर कामांकरता पाणी उपलब्ध करून देणे. ‘शाश्वत पाणी योजने’त जनावरांना पाणी देण्याचाही समावेश होतो. त्या योजनेअंतर्गत ‘नीरी’, UNICEF आणि पब्लिक हेल्थ इंजिनीयरिंग विभाग (छत्तीसगड) यांनी संयुक्तपणे राजनांदगाव जिल्ह्यातील बारा खेड्यांची निवड केली आहे. गावक-यांना एकत्र आणून, त्यांचा पाण्याचा उपलब्ध साठा गृहीत धरून आणि पाण्याचा दर्जा ह्या सगळ्याचा विचार करून त्यांना त्याची जाणीव करून द्यावी लागते.

‘नीरी’ने केलेली सगळी कामे मग ती पर्यावरणाच्या संबंधित असो किंवा पाण्यासंबंधित त्या सेवेचा फायदा झाला आहे.    

– विनोद हांडे

(जलसंवाद, जुलै २०१७ अंकावरून उद्धृत)

About Post Author

Previous articleकल्याणचा भिडे वाडा दीडशे वर्षे ताठ उभा!
Next articleसंगम माहुली
विनोद हांडे नागपूरला राहतात. ते 'बी.एस.एन.एल' कंपनीतून सहाय्यक मुख्‍य व्‍यवस्‍थापक पदावरून 2011 साली निवृत्‍त झाले. त्‍यांनी पाणी आणि पर्यावरण या विषयांवर लेख लिहिण्‍यास आणि भाषणे देण्‍यास सुरूवात 2012 पासून केली. त्‍यांनी ‘बिसलेरी सारख्या पाण्याचे व बाटलीचे, मनुष्यावर आणि पर्यावरणावर होणारे दुष्‍पपरिणाम’, धर्मांमधील दहन-अफन विधींमुळे पर्यावरणावर होणारे परिणाम, श्वास घेऊद्या गंगेला, मधुमेही' महाराष्ट्र असे अनेक विषय हाताळले आहेत. हांडे यांनी लिहिलेले लेख अनेक मासिके आणि वृत्तपत्रांतून प्रकाशित झाले आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9423677795

1 COMMENT

  1. माय मराठीच्या उज्ज्वल…
    माय मराठीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपण हाती घेतलेल्या स्तुत्य उपक्रमास हार्दिक शुभेच्छा..

    वैशाली जोशी 13 नोव्हेंबर 2017

Comments are closed.

Exit mobile version