दापोली तालुक्यातील दाभोळ या जुन्या बंदरातून मालाची आयातनिर्यात मोठ्या प्रमाणात अनेक शतके होत आलेली आहे. बंदरापर्यंत मालाची नेआण पश्चिम घाटापासूनच्या विविध भूप्रदेशांतून नदीमार्गानेदेखील होत असे. त्या मार्गांवरील वाहतुकीचे संरक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी किल्ले बांधले. प्रणालक ऊर्फ पद्मनाभ ऊर्फ पन्हाळेकाजी हा छोटेखानी किल्ला त्यांपैकीच एक …
दाभोळ बंदराचे आणि तेथे विविध दिशांनी पोचणाऱ्या व्यापारी मार्गांचे संरक्षण करण्यासाठी त्या प्रदेशांत छोट् छोट्या किल्ल्यांची निर्मिती विविध राजवटींत केली गेली. दाभोळ बंदराचा व तेथपर्यंत जाणाऱ्या व्यापारी मार्गांचा वापर मध्ययुगात कमी झाला. त्यामुळे त्या मार्गावरील किल्ल्यांचे महत्त्व कमी होऊन ते किल्ले विस्मृतीत गेले ! त्या व्यापारी मार्गांवरील सर्वात प्राचीन किल्ला म्हणजे ‘प्रणालक दुर्ग’ अथवा ‘पन्हाळे दुर्ग’. तो किल्ला त्याच्या पायथ्याशी असलेल्या ‘पन्हाळे काजी’ लेण्यांच्या नावाने ओळखला जातो. त्याचे मूळ नाव पद्मनाभ, परंतु तो त्या नावाने कधीच ओळखला गेला नाही. प्रथम प्रणालक व नंतर पन्हाळे काजी हीच त्याची नावे लोकांच्या परिचयाची आहेत. त्याची उंची समुद्रसपाटीपासून दोनशेचौऱ्याहत्तर मीटर (आठशेनव्याण्णव फूट) आहे. खेड-दापोली मार्गावरील वाकवली फाट्यावरून पन्हाळे काजीला जाता येते. तो रस्ता अरुंद आणि खराब आहे. त्यामुळे अंतर अठरा किलोमीटर असले तरी ते पार करण्यास पाऊण तास लागतो !
किल्ल्यावर जाण्याचा रस्ता गावाबाहेरच्या झोलाई देवी मंदिरापुढून आहे. किल्ला असलेल्या डोंगराच्या दोन्ही बाजूंनी निळी आणि कोडजाई अशा दोन नद्या वाहतात. त्या नद्यांमधून छोट्या होड्यांच्या साहाय्याने दाभोळ बंदरातून येणाऱ्या-जाणाऱ्या मालाची वाहतूक होत असे. प्रणालक या दुर्गाची निर्मिती त्या मार्गाचे रक्षण करण्यासाठी झाली होती.
ग्रामदेवता झोलाई देवीचे मंदिर गावाबाहेर टेकडीवर आहे. झोलाई देवीचे मंदिर काळ्या पाषाणात बांधलेले होते. ते अस्तित्वात नाही. त्या जागी जीर्णोद्धार केलेले सिमेंटचे मंदिर आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी पंधरा पायऱ्या चढून जावे लागते. त्या पायऱ्यांसाठी झोलाई देवीच्या प्राचीन मंदिराचे कोरीव दगड वापरण्यात आले आहेत ! देवीच्या प्राचीन मंदिराचे आणखी दगड आजूबाजूला विखुरलेले नजरेस पडतात. झोलाई देवी मंदिराच्या समोर व मागील बाजूंस झाडीने भरलेल्या टेकड्या आहेत. मंदिराच्या बाहेर एक रंगमंच उभारला आहे. तेथे गावकऱ्यांचे विविध कार्यक्रम होतात. त्या ‘स्टेज’च्या बाजूने जाणारी पायवाट झोलाई देवीची टेकडी आणि प्रणालक दुर्ग ऊर्फ पन्हाळे दुर्ग यांच्या मधील खिंडीत जाते. खिंडीतून किल्ल्यावर जाण्यासाठी मार्ग आहे.
किल्ल्याला तटबंदी दुहेरी आहे. त्यांतील पहिली तटबंदी पार केल्यानंतर पाच मिनिटांत कोरीव टाके दिसते. टाक्याच्या अलिकडे कातळात कोरलेल्या पायर्या आहेत. वरील बाजूस किल्ल्याच्या दुसऱ्या तटबंदीचे अवशेष दिसतात. ती तुटलेली आहे. तटबंदीतून किल्ल्यात प्रवेश होतो. किल्ल्याच्या माथ्यावर गेल्या काही वर्षांपूर्वीपर्यंत शेती करण्यात येत असे, त्यामुळे माथ्यावरील अवशेष नष्ट होऊन विखुरलेले आहेत. किल्ल्यावर वेगवेगळ्या शतकांतील मातीच्या भाजलेल्या विटा, खापरांचे तुकडे सापडतात. किल्ल्याच्या माथ्यावर चुन्याच्या घाणीचे चाक आहे.
गावकर्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा किल्ल्यावर 1994 साली उभारला. त्याच्या डाव्या बाजूस दगडात कोरलेला चार फूटी एक स्तंभ पडलेला आहे. माथ्यावर बांधकामाची चार जोती आहेत. त्या जोत्यांवर विटांचे बांधकाम दिसून येते. पुतळ्याच्या उजव्या बाजूंस किल्ल्यावरून खाली उतरणारी वाट आहे. त्या वाटेने झोलाई देवी मंदिराच्या विरुद्ध दिशेने गेल्यास कोरडे पडलेले पाण्याचे खांब टाके लागते. गावाच्या विरुद्ध बाजूने खिंड उतरताना उजव्या बाजूला जाणारी एक पायवाट असून त्या वाटेवर बुजलेले टाके दिसते. ते पार करून झोलाई देवी मंदिरापाशी पोचले, की दुर्गदर्शन पूर्ण होते ! किल्ल्यावर जाण्याच्या वाटा मोडलेल्या आहेत. किल्ल्यावरील अवशेषांचे, टाक्यांचे स्थान शोधण्यासाठी स्थानिक वाटाड्यांची मदत घ्यावी लागते.
पन्हाळे काजी लेणी ही हीनयान बौद्ध पंथीयांची आहेत. त्या लेण्यांचा काळ इसवी सनपूर्व (पहिले) शतक ते इसवी सनाचे चौथे शतक असा पाचशे वर्षांचा मानला जातो. त्या लेणी समूहात वज्रयान आणि गाणपत्य पंथ यांची लेणीही पाहण्यास मिळतात. शिलाहार राजा अपरादित्य (1127-1148) याने त्याचा पुत्र विक्रमादित्य याला दुसऱ्या जमकेशीचा पराभव करून, प्रणाल येथे राजधानी वसवून दक्षिण कोकणचा अधिपती बनवले. राजा अपरादित्य याने प्रणालक हा किल्ला बांधला. अपरादित्याचा ताम्रपट पन्हाळे येथे सापडला आहे. (9 डिसेंबर 1139) त्यात ‘प्रणालक’ वा ‘पन्हाळे’ या गावाचा उल्लेख येतो. मात्र नंतरच्या आदिलशाही, शिवाजी महाराज, पेशवे व इंग्रज यांच्या राजवटींत त्या किल्ल्याच्या वापरासंबंधी अथवा त्या भागात किल्ला असल्याचे ऐतिहासिक उल्लेख सापडत नाहीत.
खाजगी वाहनाने दोन दिवसांत प्रणालदुर्ग व त्याखालील पन्हाळे काजी लेणी, सुवर्णदुर्ग, गोवा किल्ला, कनकदुर्ग हे किल्ले आणि आसुदचे केशवराज, व्याघ्रेश्वर आणि मुरुडचे दुर्गादेवी मंदिर असे वास्तुवैभव पाहणे शक्य आहे.
– संदीप परांजपे 9011020485 sparanjape0665@gmail.com
————————————————————————————————