पन्हाळेकाजी लेणी समूह : विविध तरी एकात्म ! (Panhalekaji cave sculpture – varied styles oneness)

0
293

दापोलीजवळचा पन्हाळेकाजी लेणी समूह म्हणजे भारतातील स्थापत्यकलेत व धार्मिक पंरपरेत बदल कसे होत गेले त्याचे उत्तम उदाहरण आहे. तेथे हीनयान, वज्रयान, शैव, गाणपत्य, नाथ अशा विविध धर्मसंप्रदायांचा वेगवेगळ्या काळातील प्रभाव दिसून येतो. लेणी मोठ्या कालखंडात खोदली गेली, तथापी त्याची शिल्पशैली त्यानुसार विविध तरी एकात्म दिसून येते…

पन्हाळे काजी हा लेणी समूह रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यात एकमेव आहे. त्या लेण्यांवर हीनयान, वज्रयान, शैव, गाणपत्य आणि नाथ संप्रदाय अशा विविध ऐतिहासिक विचारपंथांचा ठसा उमटलेला दिसून येतो. इतक्या विविध पंथांचे पूजनीय स्थान असलेला असा लेणी समूह अन्यत्र नाही. ते ठिकाण दापोलीपासून तीस किलोमीटर अंतरावर येते. ते अंतर दापोली-खेड रस्त्यावर वाकवली फाट्यापासून एकोणीस किलोमीटर आहे. गावाचे नाव पन्हाळे काजी.

पन्हाळे गावाच्या दक्षिणेकडील डोंगर-माथ्यावर ‘पद्मनाभ दुर्ग’ नावाचा एक प्राचीन किल्ला आहे. तो ‘पन्हाळे’ या नावाने अधिक ओळखला जातो. जवळच झोलाई देवी या ग्रामदेवतेचे मंदिर आहे. शिलाहारांच्या बाराव्या शतकातील दोन ताम्रपटांत या ठिकाणाला ‘प्रणालक’ म्हणून संबोधले आहे. पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधील संशोधक शोभना गोखले यांनी 1139 सालचा विक्रमादित्याचा ताम्रपट उजेडात आणला. त्यात त्या स्थानाचा उल्लेख आढळून येतो. वा.वि. मिराशी यांनी ‘कॉर्पस इन्स्क्रिप्शन इंडिकॅरम’च्या सहाव्या भागात त्या ताम्रपटाचे वाचन संपादित केले. त्या लेखावरून असे दिसून येते, की शिलाहार राजा पहिला अपरादित्य (1127–1148) याने कदंबांना कोकणातून हुसकावून लावले आणि त्याच्या विक्रमादित्य नावाच्या पुत्रास ‘प्रणालक’ या राजधानीच्या शहरी दक्षिण कोकणचा अधिपती बनवले. तेथे सतराव्या शतकात आदिलशाही राजवट होती. तेथे नियुक्त केलेल्या एका काजीमुळे पन्हाळे नावाबरोबर ‘काजी’ हा शब्द जोडला गेला. लेणी समूह कोटजाई नदीच्या खोऱ्यात आहे. त्याची निर्मिती तिसऱ्या शतकापासून ते चौदाव्या शतकापर्यंत करण्यात आली. समूहात एकूण एकोणतीस लेणी आहेत. त्यांपैकी अठ्ठावीस लेणी कोटजाई नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर असून एकोणतिसावे लेणे बागवाडीजवळ ‘गौर लेणे’ या नावाने ओळखले जाते.

पन्हाळे काजी हा लेणी समूह दाभोळमधील इतिहास संशोधक कै.अण्णा शिरगावकर यांनी 1970 साली उजेडात आणला. इंग्रजी अमदानीत 1870 मध्ये जेम्स बर्जेस यांनी त्या जागेची पाहणी करून तेथे काही कोरीव काम असल्याचे त्यांच्या अहवालात नमूद करून ठेवले होते. लेणी समूह उजेडात आला तेव्हा त्यांतील काही लेणी पूर्ण तर काही अर्धीअधिक गाळाने व ढासळलेल्या दरडींमुळे बुजलेली होती. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाने त्या लेण्यांतील बहुतांश राडारोडा काढून ती अभ्यासकांना; तसेच, पर्यटकांना मोकळी केली. इतिहास संशोधक म.न. देशपांडे यांनी त्या लेण्यांचा अभ्यास सखोल करून त्यांचे लिखाण केले आहे. ते लिखाण विदर्भ संशोधन मंडळाने प्रसिद्ध केले आहे.

पन्हाळे-काजी येथे लेणी इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात हीनयान पंथाच्या भिक्षूंसाठी कोरली गेली. त्या लेणी-समूहातील लेणी क्रमांक 4, 5, 6, 7, 8 व 9 क्रमांकांची लेणी अदमासे तिसऱ्या शतकात खोदली गेली. लेणी क्रमांक 2, 10, 11, 12, 13 व 18 ही साधारणतः चौथ्या-पाचव्या शतकात खोदली गेली. वज्रयान पंथीयांनी त्यांत अनेक बदल केले. ते साधारणतः दहाव्या शतकात. त्याच बरोबर त्यांनी लेणी क्र. 1, 3, 14, 15, 16, 17, 19, 21 व 27 ही नव्याने खोदली. त्यांतील लेणी क्रमांक 14, 15, 17, 19 व 21 ही हिंदू धर्माच्या प्रभावाखाली तेराव्या शतकात आली. हिंदू धर्मियांनी बाराव्या-तेराव्या शतकात लेणी क्र. 20, 22, 23, 24, 25, 26 व 28 ही नव्याने खोदली. काही काळानंतर लेणे क्रमांक 14 हे नाथ संप्रदायाच्या ताब्यात गेले. लेणे क्रमांक 22 नंतर चौदाव्या शतकात नाथ संप्रदायाच्या प्रभावाखाली आले, लेणे क्रमांक 29 नाथ-संप्रदायासाठी म्हणूनच चौदाव्या शतकात खोदण्यात आले.

लेणे क्रमांक 4, 5 व 6 मध्ये स्तूप असल्याचे दिसून येते. लेणे क्रमांक 5 मधील पाठीमागील भिंतीत अर्ध उठावातील स्तूप कोरलेला आहे. लेणी क्रमांक 7, 8 व 9 हे मुळात विहार होते. त्यांतील काही लेण्यांसमोर नंतर स्तूपही कोरले गेले. वज्रयान पंथीयांचे वास्तव्य तेथे आठव्या शतकापासून अकराव्या शतकापर्यंत होते. मूळच्या विहारात पाठीमागील भिंतीत कोनाडा व गर्भगृह खोदून त्यामध्ये तांत्रिक मूर्तींची स्थापना करण्यात आली. लेण्यात दिसणाऱ्या अष्टकोनी स्तंभात बदल करून दर्शनी स्तंभांच्या स्तंभ शीर्षावर नागबंध कोरले गेले. प्रवेशद्वारांवर ललाटबिंब कोरण्यात आले, काही खोल्या नव्याने खोदण्यात आल्या. ईशान्य भारतातील काही तांत्रिक देवतांची पूजा पन्हाळेकाजी येथे केली जात असे. लेणे क्रमांक 10 मध्ये वज्रयान पंथीयांची ‘महाचंडरोषण’ या देवतेची मूर्ती सापडली असून त्या दुर्मीळ मूर्तीचा आणि भिक्षूंचा संबंध बंगाल व ओरिसा येथील तांत्रिक केंद्रांशी आला असल्याचे मत अभ्यासकांनी नोंदले आहे.

नाथ संप्रदायाशी संबंधित शिल्पे लेणे क्रमांक 14 मध्ये कोरण्यात आलेली दिसतात. त्या लेण्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस मिळून एकूण बारा शिल्पे असून त्यात चौरंगीनाथ, कानिफनाथ व योगिनी यांची शिल्पे बघण्यास मिळतात. गर्भगृहातील शिल्पांपैकी आदिनाथ व मत्स्येंद्रनाथ यांची शिल्पे ओळखण्यास सोपी आहेत. गोरक्षनाथांचे खंडित व सुटे शिल्पही त्या लेण्यांत सापडले आहे. लेणे क्रमांक 15 हे लेणे गाणपत्य संप्रदायाशी जोडलेले दिसते. त्याकरता तेथे गणपतीची सुटी मूर्ती स्थापलेली दिसते. शिलाहारकालीन छोटेसे देवालय लेणे क्रमांक 16 च्या समोर आहे.

लेणी क्रमांक 18 ते 23 या लेणी समूहातील अठरावे लेणे वज्रयान पंथी असून त्यातील एकोणीस क्रमांकाचे लेणे हे अकराव्या शतकातील शिलाहार शैलीचे एकाश्म देवालय आहे. मंदिराच्या छतावर रामायण, महाभारत यांशी संबंधित शिल्पे कोरलेली आहेत. लेणे क्रमांक 21 हे ‘गणेश लेणे’ म्हणून ओळखले जाते. कारण त्यामध्ये गणपतीचे शिल्प आहे. लेणे क्रमांक 22 हे लेणे नाथ पंथीयांनी वापरण्यास सुरुवात चौदाव्या शतकात केली. त्या लेण्याच्या गर्भगृहात पद्मासनात बसलेली नाथपंथी योग्याची मूर्ती कोरण्यात आलेली आहे. नाथ संप्रदायाशी निगडित असलेले लेणे क्रमांक 29 हे मुख्य लेणी समूहापासून अदमासे दीड किलोमीटर अंतरावर आहे. त्याची रचना इतर लेण्यांपेक्षा वेगळी आहे. तेथील मुख्य गर्भगृहातील शिल्पांमध्ये चौऱ्याऐंशी सिद्ध याचबरोबर आदिनाथ, मत्स्येंद्र, गिरीजा, त्रिपुरसुंदरी व तसेच प्रांगणात समोर लक्ष्मी, गणेश व सरस्वती यांची शिल्पे बघण्यास मिळतात.

          तो लेणी समूह म्हणजे लेणी स्थापत्य कलेत आणि धार्मिक परंपरेत होत गेलेल्या बदलांचे महत्त्वाचे उदाहरण आहे.

संदीप परांजपे 9011020485 sparanjape0665@gmail.com

————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here