खोंगा खोंगा साखर

आई-मुलीचे शब्दांची गरज न भासता, एकमेकींना समजण्याचे अनुभव तसे वैश्विकच. वत्सलाबाई बापुराव भोंग यांनी आईबद्दलच्या आठवणी गप्पांतून सांगितल्या आहेत. सोप्या शब्दांतून, प्रामाणिक संवादातून त्यांच्या नात्यांमधले उमाळे, कढ, आपुलकी आणि स्नेह व्यक्त होतोय. नात्यातला ओलावा टिकवून धरणाऱ्या गोष्टींची अनुकरणीय जाणीव हा लेख वाचणाऱ्या सगळ्यांना झाल्यावाचून राहणार नाही. या गप्पांचे शब्दांकन केले आहे वत्सलाबाईंचे भाऊ, इंद्रजित भालेराव यांनी. ‘तुमची आमची माय’ या त्यांच्या आगामी पुस्तकातील हा उतारा आहे. मराठवाड्यातील खास बोलीला धक्का न लावता, तो वाचकांपुढे ठेवत आहोत.

अपर्णा महाजन 9822059678

——————————————————————————————————————————-

खोंगा खोंगा साखर

आमची माय एका खेड्यातली खात्यापित्या घरातली एक मुलगी. विवाहानंतर ती अगदी सामान्य कुटुंबात आली. इथं खाण्यापिण्याचे वांधे होते. घराला दाराऐवजी झोपाटा होता. तिनं स्वतःच्या मनगटातल्या कर्तृत्वानं आणि नवऱ्याच्या सहाय्यानं, हे घर मोठं केलं. नंतर तिनं सगळी संसारिक कर्तव्य पार पाडून, सुखानं आराम न करता संन्यास घेतला. ती विश्वाची आई झाली. सगळे तिला माय म्हणत.

वत्सलाबाई काळजात साठलेल्या आठवणी मोकळ्या करताना सांगतात, मी मायची सगळ्यात मोठी लेक. माझं नाव वत्सला. पण मला सगळे वच्छी म्हणतात. मी मायसारख्याच स्वभावाची आहे, असं सगळेजण म्हणतात. माय आझाद स्वभावाची होती. तिचा स्वभाव टिचरा होता. टिचरा म्हणजे स्वाभिमानी. थोडा जरी धक्का लागला तर काचेसारखं टिचणाऱ्या माणसाला टिचरा म्हणतात. म्हणून मी मायला ‘टिचरी माय’ असंच म्हणायची. माय मला म्हणायची, ‘तू कोणती कमी आहेस ? तुही माझ्यासारखीच.’

मलाही माय सारखा आझादपणा करावा वाटायचा. माझं लग्न खूप लहानपणी झालं. जवळच्याच कौडगावात मला दिलं. बाबा, भाऊ नेहमी तिथं येत राहायचे. मला सुरुवातीला करमत नसे. मला अंगावर घातलेलं लुगडं लई मोठं आणि जड वाटायचं. एकदा नदीला धुवायला गेल्यावर मी चार-पाच हात लुगडं फाडलं, नदीच्या पाण्यात सोडून दिलं. घरी परत आल्यावर दोरीवर वाळू घातलेलं लुगडं सासूनं पाहिलं. मला विचारलं, ‘वछे, लुगड्याचा पदर काय झाला गं’ ? तर मी सरळ सांगितलं, मला जड होऊ लागला म्हणून फाडून, नदीत सोडून दिला. सासूनं कपाळावर हात मारून घेतला. तिनं ही गोष्ट मायलाही सांगितली. मग मायनं मला संसाराबद्दलच्या लय गोष्टी समजून सांगितल्या. तिच्या शिकवणीनुसार मी वागण्याचा प्रयत्न करीत होते. पण शेवटी आझाद स्वभाव तो आझादच. त्याचा त्रास मला व्हायचा. मी तो सहनही करायची. हळुहळू माझा संसार सुरळीत झाला.

आमच्या लहानपणी साखर दुर्मीळ गोष्ट होती. सणावाराला जमा झालेल्या लेकीबाळींना काही गोडधोड करावं म्हटलं तर साखर आणणं अवघड वाटायचं. वडिलांना बाजारातून जास्तीची साखर आणायला सांगितली तरी ती पुरायची नाही. चार लेक, चार लेकी, त्यांची लेकरंबाळं इतक्या सगळ्यांना काही गोडधोड करावं, सगळ्यांचा सण गोड व्हावा अशी मायची इच्छा असायची. वर्षातून तिला दोन वेळा साखर लागायची. एकदा दिवाळीत आणि एकदा चैत्रात; देवाच्या जत्रला लेकीबाळी येत तेव्हा. आई युक्ती करायची. वर्षभर वडील बाजारातून किराणा सामानात जी साखर आणायचे त्यातली खोंगा खोंगा साखर ती बाजूला काढायची. तिच्याजवळ एक लोखंडी संदुक होता. त्यात ती साठवलेली साखर ठेवून त्याला कुलूप लावून टाकायची. मग लेकी आल्यावर ती  साखर काढून त्याचा सण साजरा करायची. बर्फी करायची. जत्रेतली बर्फी विकत घेणं परवडत नसे. दूध भरपूर होतंच. त्यामुळे घरची बर्फी यात्रेतल्या बर्फी पेक्षा जास्त चांगली लागायची. साळी देऊन गिरणीतून काढलेल्या पोह्याचा घरचा चिवडाही जत्रेतल्या चिवड्यापेक्षा जास्त चवदार असायचा. दिवाळीला तर ती करंज्या, बुंदीचे लाडू टोपलंभर करून ठेवायची. गरीबीतले सणही श्रीमंत करण्याची तिची ही युक्ती आठवली की माय काय असती ते कळतंय.

नंतर परिसरात साखर कारखाना आला. त्याआधी कुपनची स्वस्त साखरही गोरगरिबाला परवडत नसे. पूर्णा सहकारी साखर कारखाना झाल्यावर तर सवलतीच्या दरातली साखर भरपूर मिळू लागली. ती घेण्यासाठी पुरेसा पैसाही होता. अर्थात ती पुष्कळ नंतरची गोष्ट. पण मायनं खोंगा खोंगा साखर साठवून केलेले पदार्थ जितके गोड लागायचे. आता तितके लागत नाहीत कारण त्या साखरेत मायची माया मिसळलेली असायची.

मी पंचवीस वर्ष आळंदी ते पंढरी या दिंडी सोहळ्याला जात होते. काटाळाच्या घरातून आलेली माय भवाळ आणि भवाळाच्या घरातून आलेली मी तिची लेक वारकरी. धर्म कोणताही असो आपलं आचरण पक्क असलं, की सगळेच धर्म चांगलेच असतात, सारखेच असतात, हे आमच्या लक्षात आलं. पुढं घडलेल्या एका दुःखद घटनेनं माझं दिंडीसोबत पायी जाणं बंद झालं. मायच्या आणि माझ्या वाट्याला दुःखही सारखीच आली. मायची लेकरं जशी लहानपणी गेली तसा माझाही पहिला मुलगा मधुकर लहानपणी गेला. तो रिधोऱ्याला मायकडंच राहत होता. तिथंच शिकत होता. माझा मधु सगळ्यांच्या कौतुकाचा होता. पण त्याला ज्वरानं गाठलं आणि काही इलाज होऊ शकला नाही. मायच्या एका कर्तृत्ववान मुलावर जसा काळानं क्रूर घाला घातला तसाच माझ्याही  मुलावर घातला. दुःख काय असतं ते समदु:खी माणसालाच कळू शकतं. माय त्या दुःखातून गेलेली होती. त्यामुळे लेकीचं दुःख तिच्याशिवाय कुणाला कळणार? पण माझ्या आयुष्यात हे महादुःख आलं तेव्हा माय मला भेटायला येऊ शकत नव्हती. तिचे पाय निकामी झाले होते. तिचं चालणं फिरणं बंद झालेलं होतं. माझ्या आयुष्यातली ती दुर्घटना पुष्कळ दिवस तिला कोणी सांगितलीच नाही. एक दिवस इंद्रजितानं सांगितलं तेव्हा ती धाय मोकलून रडली. मला निरोप पाठवून भेटीला बोलावलं. आम्ही दोघी मायलेकी गळ्याला पडून रडलो. तिनं जवळ बसवून घेतलं. पाठीवरून हात फिरवत राहिली. कधीच आपलं दुःख हलकं होणार नाही असं वाटत असताना पाठीवरून फिरणारा मायचा हात मला खूपच आधाराचा वाटला.

बाबा हमेशा म्हणायचे, माय जाईल तिकडं तिच्यासंगं लक्ष्मी जाते. माय पूर्वी तिच्या माहेरात आहेरवाडीला होती तेव्हा तिच्या बापाचं घर कायम भरलेलं असायचं. घरादारात लक्ष्मी नांदताना दिसायची. लग्न झालं आणि माय रिधोर्‍याला आमच्या बाबाची बायको म्हणून आली. तर तिकडं बापाच्या घरातली लक्ष्मी गेली आणि इकडं मायसंगं इथल्या घरात आली. माय आली आणि इथं एक एक माडी उभी राहत गेली. घरादारात सगळीकडे लक्ष्मी नांदू लागली. मायनं अंगमेहनतीनं कष्ट करून, बाबानं अक्कल हुशारीनं हे सगळं जमवलं. आनंद आणि लक्ष्मी मायच्या संगंच असायच्या. माय नंतर इंद्रजिताकडं परभणीला राह्यला गेली. तिच्यासंगं लक्ष्मीही परभणीला गेली. गावाकडचं घर उध्वस्त होत गेलं. परभणीचं घर मात्र दिगंताला पोचलं. बाबाचं म्हणणं मला खरं वाटलं.

मी मायसारखंच मोठं कुंकू लावायला शिकले. मी मायसारखंच लुगडं घालून, मोठं कुंकू लावत राहिले. माय म्हणायची, कपाळभरून कुंकू असलं की माणूस भारनसुद दिसतंय. कुंकू, मेण हरप्रयत्नानं मिळवायची. माझ्यासमोर मायचा आदर्श होता. ती एक घरंदाज बाई होती. दळणकांडण, औषधपाणी, स्वयंपाक किंवा शेतातलं निंदनं-खुरपणं की देवधर्म असो, सगळ्यात माय कायम पुढं राह्यली. माझ्याकडं पाहून सगळ्यांना मायची आठवण येते असं म्हणतात. माहेरच्या आयाबाया जेव्हा मला मायची पडसावली म्हणतात, तेव्हा मला माझ्या आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. मायची आठवण झाली, की माय हमेशा जात्यावर एक गाणं म्हणायची ते गाणं मला आठवत राहतं. माय म्हणायची,

सुखाच्या दुःखाच्या बांधल्या बाई पुड्या
मायीपुढी रोज उकलीते थोड्या थोड्या

नऊ मास नऊ दिस ओझं वागविलं कुशी
माय मह्या हरणीला उलटून बोलू कशी

नदीला येतो पुर लवनाला येतो फेस
मायमावली ती मही गंगा वाहे बारोमास

शंभर माझं गोत काय करावं गोताला
मायबाई वाचुनिया कोणी धरीना हाताला

शंभर माझं गोत झाडीचा झाडपाला
माझ्या हरण्या बाईचा जाईचा वास आला

माय मंतिल्यानं माय साखर फुटाणा
गोड गोड तूव्हा बोल मला उठावं वाटना

माय मंतिल्यानं माय साखरची पुडी
तिच्या कुडीमधी जलमली मही कुडी

माई सारखी मया कोणाला येत नाही
समिंदर भरला तिथं पाण्याचा थांग नाही

माझी मायही अशीच होती. तिचं हे जात्यावरचं गाणं आठवलं, की मायची मूर्ती डोळ्यासमोर दिसत राहते.
– वत्सलाबाई भोंग (वच्छी)
शब्दांकन – इंद्रजित भालेराव 8432225585 inbhalerao@gmail.com

————————————————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here