सुशिक्षित, सुसंस्कृत समाजात संवेदनेचे नेटवर्किंग जाणीवपूर्वक साधले तर आज जाणवणाऱ्या अस्वस्थता, असहाय्यता, हतबलता या भावना नष्ट होऊ शकतील आणि एक सुसंस्कृत संवेदनापूर्ण रसिक समुदाय बांधला जाऊ शकेल अशा तऱ्हेचा अभिप्राय ‘ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालय’ व ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या संस्थांनी स्वातंत्र्यदिनी योजलेल्या नागरिकांच्या सभेत व्यक्त झाला. मुख्यत: टेलिव्हिजन व सोशल मीडिया यांच्या द्वारा समाजात जो विखार, विषाद व नकारात्मकता अशा भावना पसरल्या जात आहेत त्या दुर्बल भावनांना चांगुलपणाचे, सज्जनतेचे आणि हितसंबंध नसलेले असे नेटवर्क हेच उत्तर ठरू शकेल अशा शब्दांत सभेचा समारोप झाला.
जवळ जवळ तीन तास चालू असलेल्या या ‘गोलगप्पां’मध्ये (सिंपोझियम) प्रमुख सहभाग भारती सहस्रबुद्धे, सुवर्णा धानोरकर आणि अभिजित कांबळे या मीडियातील व्यक्तींचा होता. सूत्रसंचालन माध्यम सहाय्यक किरण क्षीरसागर यांनी केले. त्यांनी जी मांडणी केली त्यावर उपस्थित नागरिकांनी उलटसुलट, खुलासेवार मते व्यक्त केली. त्यात विशेष सहभाग चरित्रलेखिका वीणा गवाणकर व परभणीचे सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत कुळकर्णी यांचा होता.
गवाणकर यांनी मूल्यव्यवस्था ढासळली आहे या मुद्याकडे लक्ष वेधले आणि माध्यमांइतकेच घरातील वातावरण चांगले असले पाहिजे असे बजावले. त्या म्हणाल्या, की गावात पुतळे, मंदिरे, हॉस्पिटले बांधली जातात, मात्र ग्रंथालय असायला पाहिजे असा आग्रह नसतो. तशीच स्थिती घराघरात असते. पालक मुलांबरोबर वाचण्यास किती वेळ देतात– पालक काय प्रकारचा आदर्श मुलांसमोर ठेवतात? अशा परिस्थितीत समाजव्यवस्था, कुटुंबव्यवस्था ढासळतच जाणार ! मी मोठमोठ्या माणसांची चरित्रे लिहिली ती सगळी उत्तम मूल्ये मांडणारी, प्रस्थापित करणारी आहेत. काही वेळा मला वाटते, की मी एकच पुस्तक वेगवेगळ्या नावाने लिहिते की काय – इतका त्या सर्व थोर व्यक्तींचा मूल्यात्मक आधार पक्का व सारखा होता.
सूर्यकांत कुळकर्णी यांनी त्यांच्या ‘स्वप्नभूमी’ संस्थे
कुळकर्णी यांच्या कार्यास धरूनच खेडोपाडी चालू असलेल्या वेगळ्या, ‘पॉझिटिव्ह’ कामाचे पाच नमुने व्हिडियोच्या माध्यमातून सभेसमोर सादर करण्यात आले. ते बरेचसे प्रेरक होते.
भारती सहस्रबुद्धे यांना तरुण पिढीचे समाजापासून तुटलेपण मोठ्या विचारी समाजसमूहाला खटकत नाही याचे आश्चर्य वाटते. त्या म्हणाल्या, की सध्याच्या अस्वस्थतेवर उपाय म्हणजे व्यक्तीने सोशल मीडियाच्या वापराबाबत स्वत:वर बंधने घालणे आणि युवा पिढीला ‘मोटिव्हेशन’ देणे एवढाच सुचतो.
सुवर्णा धानोरकर म्हणाल्या, की पालक मुलांना फार वेळ देऊ शकत नाहीत हे खरेच, परंतु जो वेळ देतात तो ‘क्वालिटी टाइम’ ठरतो का हे महत्त्वाचे आहे. युट्युब चॅनेल, मोबाइल या बाबतीत हे अधिक दक्षतेने करता येऊ शकते अशी उदाहरणे त्यांनी दिली.
अभिजित कांबळे यांनी विद्वेष, विखार, विषमता हे सद्यकाळाचे ग्लोबल दुखणे आहे व जगातील सर्व देशांना धार्मिक, वांशिक, आर्थिक असमानतेला, ध्रुवीकरणाला तोंड द्यावे लागत आहे असे सांगितले. त्यामुळे ते म्हणाले, की संवेदनाशील व विचारी मनांमध्ये अस्वस्थता येणारच ! आरोग्य, शिक्षण हे समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय जगभरच्या सरकारांच्या हातातून सुटले आहेत असेच आढळून येईल, आज येथे पन्नास नागरिक एकत्र जमून अस्वस्थ सद्यस्थितीचा विचार करत आहेत- त्या पन्नासांचे नेटवर्किंगमधून पाचशे होतील – तसेच संख्याबळ वाढत जाऊन त्यांचे प्रश्न मीडियाला, सत्ताधीशांना विचारात घ्यावेच लागतील.
सभेला उपस्थित नागरिकांमध्ये मान्यवरांची संख्या मोठी होती – साहित्य समीक्षक अनंत देशमुख, ‘पाठारे जिम’चे सुहास पाठारे दाम्पत्य हे ज्येष्ठ नागरिक- ‘पूजा सॉफ्टवेअर’चे माधव शिरवळकर, कलासमीक्षक दीपक घारे, चित्रकार रंजन जोशी, कवी सतीश सोलांकूरकर, चंद्रशेखर सानेकर, ‘यंग जनरेशन’चा कवी आदित्य दवणे (तो शहापूर येथील कॉलेजातील पाच संस्थांनी आयोजित केलेला ‘व्याख्यानसत्रा’चा कार्यक्रम संपवून उपस्थित झाला होता), आकाशवाणीच्या उमा दीक्षित, जान्हवी पाटील, श्रुती शालिनी (आरोग्य भान, पुणे), संजय रत्नपारखी, राणी दुर्वे, सुनंदा भोसेकर, निर्मोही फडके… सगळ्यांनाच सद्यकालीन महत्त्वाच्या या विषयावर बोलता आले असे नाही. परंतु त्यांच्या बोलण्यामध्ये राजकारणी व चॅनेल यांचे बेताल वर्तन आणि मराठी भाषेची दुरवस्था हे विषय प्रामुख्याने व्यक्त होत होते. उदाहरणार्थ रामदास खरे म्हणाले, की चॅनेलवरील वृथा प्रसिद्धीमुळे राजकारणी चेकाळले आहेत. साहित्यिक त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. सुप्रिया हळबे म्हणाल्या, की कुटुंबात संस्कार कोण करणार हा प्रश्न आहे. विकास ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा मांडताना म्हटले, की माहितीचा स्फोट होत असताना ज्ञान महत्त्वाचे की ते कोणत्या भाषेतून मिळवले हे महत्त्वाचे? सतीश मोघे म्हणाले, की अर्थकारण बळावले, त्यामुळे संस्कृतीचा ऱ्हास होत आहे. उलट, सतीशचंद्र कोर्डे म्हणाले, की मराठी माणसाने शेअर बाजारात उतरले पाहिजे. तो पैसे मिळवण्याचा उत्तम असा खात्रीशीर मार्ग आहे. निवृत्तांनी कार्यमग्न राहिले पाहिजे असेही त्यांनी ठासून सांगितले.
या ‘गोलगप्पांचा’ उत्कट बिंदू मध्यंतरात गाठला गेला. त्यावेळी ‘समाजातील सज्जनतेचे व सद्भावनेचे प्रतीक’ अशा वीणा गवाणकर यांचा सत्कार ‘ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालया’चे विद्याधर ठाणेकर, लेखक चांगदेव काळे, ग्रंथालय कार्यकर्ते विनायक गोखले आणि ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चे मुख्य संपादक दिनकर गांगल यांनी केला. सर्व उपस्थित मंडळी उत्कट भावनेने त्यात सामील झाली. त्यावर गवाणकर उद्गारल्या, “असं स्वागत मला अकल्पित होतं. मी सद्यस्थितीमुळे अस्वस्थ असलेली नागरिक म्हणून येथे आले होते.”
लेखक-समीक्षक निर्मोही फडके म्हणाल्या, की कलेतील परात्मभाव वास्तव जीवनात आला आहे. माणसाची संवेदनेची पातळी/नाडी हरवत चालली आहे. कवी-लेखिका राणी दुर्वे व सुनंदा भोसेकर यांना अशा चळवळीची आवश्यकता पटते. त्यांनी त्या त्यात सामील होणार आहेत असे जाहीर केले. त्या म्हणाल्या, की आम्ही आर्थिक साक्षरतेसारखे उपक्रम करत होतोच. अस्वस्थता ही वैयक्तिक गोष्ट आहे-सकारात्मकता हा त्यावर उपाय आहे. संस्कृतिकारण हेही व्यक्तिगत पातळीवर सुरू होते. स्वत:ला गोष्ट पटली-आवडली तर ती सोशल मीडियावरून नि:शंकपणे जाहीर करणे हाच तो आरंभ होय. मराठी माणसात बोटचेपेपणा शिरला आहे, त्याने तो सोडला पाहिजे !
‘गोलगप्पां’चा हा कार्यक्रम स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त योजलेल्या ‘व्याख्यानसत्रा’चा भाग होता. पाच संस्थांनी एकत्र येऊन पंच्याहत्तर व्याख्यानस्वरूप कार्यक्रमांचा हा महोत्सव करण्याचे योजले आहे. तो 30 जानेवारी 2024 पर्यंत महाराष्ट्रभर ठिकठिकाणी चालू राहील.
(समन्वयक : अपर्णा महाजन 9822059678, सुनील जोशी 9322642360, नितेश शिंदे 9892611767)
——————————
गोलगप्पा कार्यक्रम चा वृत्तात व फोटो पाहून आनंद वाटला. चागला उपक्रम आहे. चांगले मान्यवर उपस्थित होते. त्यांची मतेही विस्तृत लिहिल्याने आम्हालाही ( जे उपस्थित नव्हते) कळाले की काय काय मुद्दे चर्चिले गेले. अस्वस्थतेकडून सकारात्मक स्वस्थ संस्कृतीकडे या उपक्रमास शुभेच्छा!
अॅडव्होकेट नीलिमा म्हैसूर.