छेदी जगन – आधुनिक गायानाचे शिल्पकार (Chhedi Jagan – Architect of Modern Guyana)

वेस्ट इंडिजमधील गायाना, त्रिनिदाद हे देश भारतीय लोकांना क्रिकेटमुळे परिचित आहेत. व्ही. एस. (विद्याधर सुरजप्रसाद) नायपॉल हे मूळ भारतीय होते. ते त्रिनिदादचे नोबेल विजेते लेखक होते. त्यांची पुस्तके भारतात विशेष लोकप्रिय झाली होती. मागील पिढीतील क्रिकेटचे फिरकी गोलंदाज सुभाष गुप्ते हेदेखील त्रिनिदादमध्ये स्थायिक झाले होते. ते मुंबईच्या शिवाजी पार्क जिमखान्याच्या संपर्कात अखेरपर्यंत असत. त्रिनिदाद ही गायानाची राजधानी आहे. भारताचा संघ क्रिकेट मॅच खेळत असेल तर गायानातील तरुणी नटूनथटून येतात आणि भारतीय संघाला ‘चिअर’ करतात. इतका तेथे भारताचा/भारतीयत्वाचा प्रभाव जाणवतो. तेथील लोकवस्तीत मूळ भारतातून गेलेल्या लोकांचा समावेश भरपूर आहे. भारताने ‘प्रवासी भारतीय दिवस’ 9 जानेवारी 2022 रोजी साजरा केला. त्यावेळेस गायाना आणि सुरिनाम यांचे पंतप्रधान व राष्ट्रपती भारतात येऊन गेले. छेदी जगन हे गायानाचे पहिले पंतप्रधान मूळ भारतीय वंशाचे होते.

भौगोलिक दृष्ट्या, दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेकडील भागाला गायाना असे संबोधतात. त्याचे पाच राजकीय तुकडे आहेत- व्हेनेझुएला, ब्रिटिश, डच, फ्रेंच आणि ब्राझील गायाना. इंग्रज, डच व फ्रेंच लोकांनी त्या वसाहती सोळाव्या-सतराव्या शतकात वसवल्या. त्यांनी आफ्रिकेतून गुलाम आणून तेथे साखर, रम वगैरेचे उत्पादन चालू केले. अमेरिका खंडातील गुलामगिरी एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात बंद झाली. त्यामुळे स्वतंत्र झालेली गुलाम मंडळी कामे करीनात, म्हणून वसाहती राष्ट्रांनी भारतातून ‘इंडेन्चर्ड लेबरर्स’ (करारबद्ध श्रमिक) म्हणून हजारो मजूर वेस्ट इंडीजला नेले. छेदी यांचे उत्तर प्रदेशातील आजोबा-आजी तेव्हाच शिडाच्या जहाजातून आफ्रिकेला वळसा घालून दोन-तीन महिन्यांच्या प्रवासानंतर गायानाला पोचले होते. भारतीय मजुरांची स्थिती गुलामांइतकी वाईट नव्हती, तरी हलाखीची होती. त्याचे वर्णन 1910 सालच्या ‘एन-सायक्लोपिडिया ब्रिटानिका’ने मात्र ‘फार उदार आणि सुस्थिती’ असे केले ! तेव्हा त्यावर गोपाळ कृष्ण गोखले यांनी त्यांचे लेख आणि व्याख्याने यांमधून ब्रिटिशांचा मानभावीपणा उघड केला होता.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात ज्या मोठ्या सामाजिक आणि धार्मिक सुधारणा झाल्या त्यांच्या आधीच ह्या मजुरांनी भारत सोडला होता. त्यामुळे तेथील भारतीय लोकांना त्या सुधारणांची माहिती फारशी नाही. छेदी यांच्या आई-वडिलांचे लग्न अगदी लहान वयात झाले. छेदी बेरेत जगन हे त्यांचे पूर्ण नाव. त्यांचा जन्म ब्रिटिश गायाना ह्या दक्षिण अमेरिकेतील लहानशा ब्रिटिश वसाहतीत 1918 साली झाला. तो भाग जॉर्ज टाउन जवळील मुरांत प्लांटेशनचा होता. छेदी यांना शालेय शिक्षणानंतर गायानात नोकरी मिळणे दुरापास्त होते. तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवले. त्यांनी वॉशिंग्टन डीसीतील हॉर्वर्ड आणि शिकागो येथील नॉर्थ वेस्टर्न या दोन विद्यापीठांतून दंतवैद्यकीचा अभ्यास पूर्ण केला. त्यांना अमेरिकेतील सात वर्षांचे बहुतेक शिक्षण शिष्यवृत्तीवर किंवा लहानसहान नोकऱ्या करून मिळवावे लागले. त्यांची ओळख जॅनेट रोझेनबर्ग ह्या तरुणीशी अमेरिकेतच शिकागो शहरात झाली. त्या दोघांचा विवाह झाला.

दोघे जॉर्ज टाउनला येऊन प्रॅक्टिस करू लागले. त्यांचे स्वातंत्र्याच्या चळवळीतही लक्ष होते. छेदी जगन 1947 साली प्रथमच झालेल्या निवडणुकीत विजयी होऊन ‘चीफ मिनिस्टर’ झाले. त्यांनी पीपल्स प्रोग्रेसिव पार्टी हा गायानातील पहिला राजकीय पक्ष स्थापन केला. पीपीपीला पुन्हा, 1953 साली झालेल्या निवडणुकीत बहुमत मिळाले. छेदी जगन हे कम्युनिस्ट विचारसरणीचे आहेत असा समज ब्रिटिश पंतप्रधान चर्चिल यांचा होता. त्यांना अमेरिकन गोलार्धात कम्युनिस्टांना पाय ठेवण्यास गायानातून जागा मिळेल अशी भीती वाटत होती. शिवाय ‘मन्रो डॉक्टरिन’प्रमाणे युरोपीयन देशांनी अमेरिकी खंडात कोठलाही हस्तक्षेप करू नये असे मत अमेरिकन सरकारचे होते. चर्चिल यांनी एक युद्धनौका पाठवून गायानातील निवडणुका रद्दबादल ठरवल्या होत्या. जगन दाम्पत्याला त्यानंतर पाच महिने कारावासही भोगावा लागला.

दरम्यान, फोर्ब्स बर्न्हम हा आफ्रिकी वंशाचा पीपीपी मधील साथीदार फुटून त्याने पीपल्स नॅशनल काँग्रेस ही वेगळी पार्टी काढली. तिचे मतदार बहुतेक आफ्रिकी वंशाचे होते. बर्न्हमला ब्रिटन-अमेरिकेची फूस होती. गायाना हा छोटासा देश त्यामुळे भारतीय आणि आफ्रिकी वंशांच्या मतदारांत विभागला गेला. इंग्रजांनी फोडा आणि झोडा ही त्यांची जुनी राजकीय नीती तेथेही यशस्वी रीत्या वापरली. जगन पतिपत्नी क्युबाला जाऊन आले होते. त्यांनी क्युबाला तांदूळ निर्यात करून बदल्यात आर्थिक मदत मिळवण्याचा करार केला. त्यामुळे गायानातील भारतीय शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ उत्पन्न झाली. पण त्यामुळे गायाना कम्युनिस्टधार्जिणा होत आहे हा अमेरिकेचा संशय आणखी बळावला. वेस्ट इंडीजमधील देशात पर्यटन हा परकीय चलन मिळवण्याचा मोठा व्यवसाय आहे. गायानात भारतीय वंशाचे लोक सुमारे पंचावन्न टक्के होते, चाळीस टक्के आफ्रिकन, बाकी मिश्र वंशाचे आणि थोडे चिनी वगैरे…

ब्रिटिश गायानाला स्वातंत्र्य मिळून देशाचे नाव 26 मे 1966 ला गायाना (Guyana) असे ठेवण्यात आले. परंतु फोर्ब्ज बर्न्हम निवडून आले. त्यासाठी त्यांनी सर्व प्रकारची बेकायदेशीर किंवा अनैतिक कृत्ये केली, त्यांना अमेरिकेची फूस होती. तो आणि त्याचा पक्ष त्याच्या मृत्यूपर्यंत निवडून येत राहिले. त्याच्या कारकिर्दीत देशाची अर्थव्यवस्था पार घसरली; भारतीयांवर अन्याय होत राहिला. दंगलींमध्ये दुकाने लुटून आगी लावल्या गेल्या. त्या काळात छेदी जगन हे विरोधी पक्ष नेते म्हणून काम करत राहिले. ते शांतताप्रेमी व अहिंसा तत्त्व मानणारे होते. त्यांनी आफ्रिकन लोकांच्या दंगलींना दंगलीनेच उत्तर द्यावे अशी पक्षाच्या काही हिंदी सभासदांच्या मागणीला कधीच मान्यता दिली नाही. त्यामुळे छेदी यांना गायानाचे महात्मा गांधी म्हटले जाते. त्यांच्या विरुद्ध अमेरिकेचा अपप्रचार चालू राहिला. जगन यांच्या पत्नीबद्दलही व्यभिचाराच्या अफवा पसरवल्या गेल्या. जगन त्यांना इंग्लंडने पदच्युत केल्यावर ते भारतात आले असताना त्यांचे स्वागत उत्साहाने झाले होते. त्यांना लोकसभेत भाषण द्यायचे होते, पण तशी पद्धत भारतात नाही असे नेहरू यांनी त्यांना स्पष्ट केले. मात्र त्यांच्या भेटी अनेक लोकसभा सदस्यांशी झाल्या.

सोव्हिएत संघराज्याच्या विघटनानंतर (1990) अमेरिकेने निवडणुकीत भानगडी करणे बंद केले. त्याबरोबर जगन आणि पीपी पार्टी गायानामध्ये सर्वाधिक मतांनी 1992 साली निवडून आले. त्यांना हृदयाच्या दुखण्यासाठी फेब्रुवारी 1997 मध्ये वाशिंग्टनला हलवले. तेथेच त्यांचा मृत्यू 6 मार्च रोजी झाला. त्यांच्या मागे जॅनेट जगन दोन वर्षे देशाच्या अध्यक्ष होत्या. मग त्याही निवृत्त झाल्या. जॅनेट 28 मार्च 2009 ला जॉर्ज टाउनमध्येच निधन पावल्या.

जगन यांना नादिरा ही मुलगी आणि छेदी जुनिअर हा मुलगा अशी अपत्ये आहेत. जगन यांनी लिहिलेल्या काही महत्त्वाच्या पुस्तकांची यादी अशी:

Forbidden Freedom: The Story of British Guiana(Hansib: 1954)
The West On Trial: My Fight for Guyana’s Freedom (Harpy: 1966)
The Caribbean Revolution (1979)
The Caribbean, Whose Backyard (1984)
Selected Speeches 1992-1994 (Hansib: 1995)
The USA in South America (Hansib: 1998)
A New Global Human Order (Harpy: 1999)
Selected Correspondences 1953-1965 (Dido Press, 2004)

मिलिंद रा. परांजपे 9869631895 captparanjpe@gmail.com
———————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here