मुलांचे वाचन – एक विचार (Natural Learning a thought)

7
694

वय वर्षे तीन ते सहा ह्या वयोगटातील मुलांच्या शिक्षणाला बालशिक्षण म्हटले जाते. ह्यालाच 2020च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ‘पायाभूत शिक्षण’ असे म्हटले आहे. या पायाभूत शिक्षणात मुलांचा सर्वांगीण विकास अपेक्षित असतो. सर्वांगीण विकास ह्या संकल्पनेचे भाषाविकास, बौध्दिक, भावनिक, शारीरिक, सामाजिक विकास; आणि कलात्मक जाणिवेचा विकास असे घटक आहेत. मुलांच्या विकासात भाषाविकास हे महत्वाचे विकासक्षेत्र समजले जाते. ज्यात मुलांचे ऐकणे, बोलणे, लेखन आणि वाचन या कौशल्यांवर काम होणे अपेक्षित असते. पण असे दिसते की मुलांचे लेखन व वाचन म्हणजेच भाषाविकास असे गृहीत धरले जाते व त्यावरच जास्त भर दिला जातो. अनेकदा मुलांच्या सर्वांगीण विकासाला हे गृहितक बाधा आणते. बालशिक्षणातील सहजशिक्षणाचे महत्व, मुलांचा भाषाविकास, त्यांचे सहज वाचन, मुलांचा सर्वांगीण विकास आणि पालकांनी मुलांना समजून घेत त्यांच्या मुलांनाच वाचण्याचा एक महत्वाचा विचार ‘मोगरा फुलला’ या दालनात मांडत आहेत बालशिक्षणतज्ञ रती भोसेकर. तीन ते सहा या वयोगटातल्या मुलांना समजून घेण्यासाठी प्रत्येकाने हा लेख नक्की वाचावा. ‘मोगरा फुलला’ या दालनातील इतर लेख सोबतच्या लिंकवरुन वाचता येतील.
– सुनंदा भोसेकर
——————————————————————————————

मुलांचे वाचन – एक विचार

मुलांचे वाचन म्हणजे अर्थातच त्यांची वाचायला शिकण्याची प्रक्रिया. या विषयावर बोलायला सुरुवात अगदी प्राथमिक पातळीवरून करूया. वय वर्षे तीन ते सहा ह्या वयोगटातील मुलांच्या शिक्षणाला बालशिक्षण असे म्हणतात. ह्यालाच 2020च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पायाभूत शिक्षण असे म्हटले आहे. ह्या पायाभूत शिक्षणाचे किंवा बालशिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट मुलांचा सर्वांगीण विकास साधणे हे आहे. सर्वांगीण विकास ह्या संकल्पनेचे भाषाविकास, बौद्धिक, भावनिक, शारीरिक, सामाजिक विकास; सौंदर्य आणि कलात्मक जाणिवेचा विकास असे घटक आहेत. ह्या घटकांवर समग्रपणाने काम होणे हे बालशिक्षणामध्ये अपेक्षित असते.

या विविध विकासक्षेत्रांपैकी मुलांचा भाषाविकास हे बालशिक्षणामधील महत्त्वाचे विकासक्षेत्र समजले जाते. मुलांच्या जन्मापासून त्यांच्या अवतीभवती भाषा असतेच. गप्पा, गाणी, गोष्टी अशा विविध रूपांत ती मुलांभोवती फिरत असते. त्यातून त्यांचा भाषाविकास होत असतो. पण त्यावर विशेष लक्ष देत मुलांचा भाषाविकास करण्याला बालशिक्षणात प्राधान्य दिले जात. भाषाविकासामध्ये मुलांचे ऐकणे, बोलणे, लेखन आणि वाचन या कौशल्यांवर काम होणे अपेक्षित असते. पण त्यातही बहुतेक वेळा भाषा विकासासाठी लेखन व वाचन हीच कौशल्ये अतिशय महत्त्वाची समजली जातात. लेखन आणि वाचन म्हणजेच ‘भाषाविकास’ असे समजून त्यावर जास्त भर दिला जातो. जो बहुतेक ठिकाणी मुलांच्या सर्वांगीण विकासाला घातक ठरतो. किंबहुना अनेक ठिकाणी असेही अनुभवाला येते, की मुलांचे लेखन व वाचन म्हणजेच त्यांचे शिक्षण असे समजले जात आहे.

मी काही कारणाने एका ठिकाणी गेले होते. जिथे गेले होते तिथे नेमकी एक बालवाडी होती. आपसूक माझी पावले तिकडे वळली. एक शिक्षिका तीन ते चार या वयोगटातील मुलांकडून इंग्लिश मुळाक्षरे वाचून घेत होती. दुसरीकडे साधारणतः चार ते पाच वयोगटातली दोन मुले होती तीच अक्षरे पानभर लिहित होती. मुले अर्थातच कंटाळलेली होती. ना वाचणाऱ्याला वाचनात काही रस होता, ना लिहिणाऱ्याला लिहिण्यात काही मजा वाटत होती. मी माझा परिचय दिला आणि त्या वर्गशिक्षिकेला विचारले की, ‘हे का करत आहात?’ तर ती भाषाविकास वगैरे मुद्यांना बगल देत म्हणाली, ‘पालकांना हेच तर हवे असते. मुलांना घ्यायला येतात तेव्हा रोजचा प्रश्न असतो, आज काय लिहायला शिकला किंवा आज काय वाचायला शिकला ? पालकांच्या समाधानासाठी हे करावेच लागते.’ मुलाला शाळेत घातल्याबरोबर ते कधी वाचायला आणि लिहायला शिकते आहे याची प्रत्येक पालकाला घाई असते. मूल लिहित नाही किंवा मूल वाचत नाही ही पालकांसाठी मोठी चिंतेची बाब असते. एकदा ती लिहायला-वाचायला शिकली की पालकांच्या डोक्यावरचे ओझे उतरते.

पण तीन ते सहा वर्षांच्या मुलांचे वाचणे आणि लिहिणे म्हणजे त्यांचे शिक्षण नाही हे समजून घेऊन जर बालशिक्षणाकडे पाहिले तर ‘मुलांचे वाचन’ या कौशल्याची मोठी व्याप्ती आपल्या लक्षात येईल. त्यासाठी तीन ते सहा वर्षांच्या वयामध्ये मुलांचे वाचन म्हणजे नेमके काय व कसे होते हे समजून घेणे गरजेचे आहे. मुलांचे सहजशिक्षण म्हणजे काय आणि बालशिक्षणामध्ये सहजशिक्षणाला किती व कसा वाव द्यायचा याचा अभ्यास करताना मुलांच्या वाचनाच्या क्षमतेचा वेगळा आवाका माझ्या लक्षात येत गेला. ‘मुलांचे वाचन’ याविषयी पालकांनाही अधिक माहिती दिली, त्यांच्याशी संवाद होत गेला. मुळात मुलांचे वाचन म्हणजे सामान्यत: असे समजले जाते, की अक्षरे ओळखून ती वाचता येणे, त्या अक्षरांपासून तयार होणारे शब्द वाचता येणे आणि त्या शब्दांनी तयार होणारी वाक्ये वाचता येणे. त्याही पुढच्या पातळीवर वेगवेगळे शब्द, वाक्ये स्वतंत्रपणे वाचता येणे; वाचलेल्या शब्दांचा, वाक्यांचा अर्थ समजणे आणि त्यातून अपेक्षित असलेले ज्ञान, माहिती याचे आकलन होणे. चार-पाच वर्षांच्या मुलांना अक्षरओळख झाली आणि मूल अडखळत का होईना शब्द वाचायला लागले की मूल वाचायला लागले असे म्हणत ते शिक्षणाच्या धारेला लागले असे समजले जाते. पण या वयोगटातले हे वाचणे म्हणजेच शिकणे असते का? त्यातूनच मुलांना समज येते का? संवेदनशीलता येते का? हे प्रश्न नव्याने विचारायला हवेत. कितीतरी वेळा मुलांसाठी शब्दवाचन हे कंटाळवाणे असते. कारण त्या शब्दांचा अर्थ न समजता ते नुसते एकापुढे एक अक्षरे म्हणून वाचली जातात. जर वाचन अर्थपूर्ण होत नसेल तर ते वाचन आणि ती साक्षरता कितपत योग्य आहे याचा विचार व्हायला हवा.

‘वाचणे’ या शब्दाचा अर्थ लिहिलेली अक्षरे उच्चारणे, मग ती मनातल्या मनात असोत किंवा मोठ्याने बोलणे असोत; त्या उच्चारणात अर्थबोध अभिप्रेत आहे. ‘वाचणे’ या शब्दाचा दुसरा अर्थ जिवंत राहणे, राखणे असाही होतो. दोन्ही अर्थ महत्त्वाचे आहेत पण दुसरा अर्थ अधिक महत्त्वाचा आहे. दुसऱ्या अर्थाने वाचन या प्रक्रियेचे क्षितिज विस्तारत जाते. भोवतालचा परिसर वाचणे, एखादी घटना वाचणे, एखाद्या प्रसंगाचा संदर्भ कळणे, समग्रपणे एखाद्या गोष्टीचा बोध होणे, समस्या काय आहे ती समजणे, एकूणच आपल्या आजूबाजूचे जग वाचता येणे अशा सर्व गोष्टींचा समावेश या प्रक्रियेत होतो. या वाचनासाठी पालकांनी, शिक्षकांनी आणि एकूण सर्वजणांनी अत्यंत संवेदनक्षम असणे आवश्यक असते. मूल स्वत:च्या भोवतालचे जग प्रयत्नपूर्वक समजावून घेत असते. त्यातून होणारे शिक्षण हे जगण्यासाठी, तग धरून राहण्यासाठी आवश्यक आहे हे मोठ्यांनी समजून घेत मुलांच्या वाचनाचा प्रवास समजून घेतला पाहिजे. पण अक्षर आणि शब्दांच्या वाचनाच्या दुनियेत हे वाचन महत्त्वाचे राहत नाही. शब्द वाचता येणारे साक्षर आणि न वाचता येणारे निरक्षर ठरतात.

मुलांच्या सहजशिक्षणाचा अभ्यास करताना हे लक्षात येते, की निसर्गातील प्रत्येक सजीव स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी त्याच्या आजूबाजूचे जग सतत ‘वाचत’ असतो. स्वसंरक्षणासाठी त्याला ते करावेच लागते. शून्य ते सहा वर्षांची मुले ही निसर्गाच्या जवळ असतात. अत्यंत संवेदनशील असतात. आपल्या ज्ञानेंद्रियांमार्फत सतत ते आजूबाजूचे जग वाचत असतात. उदाहरणच द्यायचे झाले तर अगदी तान्ह्या बाळाला त्याच्या आईचा स्पर्श समजतो. म्हणजेच तो स्पर्श ते बाळ वाचते. स्वत:चे पोट भरण्यासाठी, स्वतःच्या सुरक्षेसाठी त्याला ते आवश्यकच असते. म्हणजेच ही वाचन प्रक्रिया मुलामध्ये उपजत असते. मूल आपल्या सभोवतालची माणसे सतत वाचते. आजूबाजूच्या माणसांचे, वस्तूंचे स्पर्श वाचते, चवी वाचते. विविध आवाज वाचते आणि या वाचनातून स्वतःची समज घडवते. मुलांची निरीक्षणशक्ती अफाट असते. आपल्याला न जाणवणाऱ्या आणि न दिसलेल्या अनेक गोष्टी मुलांच्या नजरेतून सुटत नाहीत एवढे त्यांचे परिस्थितीवाचन अफाट असते. मला आठवते, आमच्या घरात एकाच वयाची दोन मुले होती. त्यांची आपसात भांडणे नकोत म्हणून आम्ही त्यांना सारख्या वस्तू आणत असू. काही दिवसांनी कोणती वस्तू कोणाची हे मोठ्यांना कळत नसे. पण त्या तीन ते चार वर्षे वयोगटातील मुलांनी त्या वस्तूंचे एवढे ‘अचूक’ वाचन केलेले असायचे की आम्हाला सारख्या वाटणाऱ्या वस्तू नेमकी कोणाची आहे हे ती बरोबर सांगायची. हे त्यांचे वस्तुवाचनच होते. मुलांनी स्वतःहून काढलेली विविध चित्रे हेसुद्धा मुलांनी वाचलेले आजूबाजूचे जगच असते. त्यात कधी कधी ते समस्या मांडतात, त्या वाचतात. काही प्रसंगाची मांडणी करतात म्हणजे त्यांनी अनुभवलेल्या प्रसंगाचे वाचनच करतात. पण संवेदनशील वयातील मुलांच्या या अशा वाचनाला आपण वाव देत नाही. त्यांना साक्षर करणे मोठ्यांना आवश्यक वाटते. साक्षर करण्याच्या गडबडीत, मुलांच्या दृष्टीने निरर्थक अशा अक्षरांच्या गाडीत बसवून मोठी माणसे त्यांना शब्दांच्या दुनियेत नेतात. औपचारिक वाचनाच्या वाटेला लावण्याची घाई करतात. मूल जगण्यास आवश्यक वाचन करत असताना त्या वाचनाला पोषक आणि समृद्ध असे वातावरण न देता, मुलांचे वाचन म्हटले, की त्याला फक्त आणि फक्त अक्षरांच्या ओळखीतून शब्दांमध्ये अडकावून ठेवतो आणि नंतर मात्र त्याला माणसे कळत नाहीत, जग वाचता येत नाही असा दोष देतो. मुलांच्या सहजशिक्षणाचा अभ्यास असे म्हणतो, की मुलांना औपचारिक वाचनाकडे नेताना मोठ्यांनी आत्मपरीक्षण करणे जरुरीचे आहे. मुलांच्या प्रत्यक्ष जग वाचण्याच्या दिवसांत आपण त्यांना फक्त आणि फक्त शब्द अक्षरे यांच्यात अडकावत आहोत का? मुलाला प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असतो, तिथे नुसते वर्णन करत आहोत का? प्रत्यक्ष जग बघायचे असते, समजून घ्यायचे असते तिथे कल्पित त्यांच्यापुढे ठेवतो का? त्यांची समग्र समज आपण कृत्रिम टप्प्यात विभागतो का? त्यांच्या संदर्भांसह जगण्याला आपण संदर्भरहित करतो का? मुलांना प्रत्यक्ष अनुभव न देता कल्पना करायला लावतो का? याचा आपल्याला गंभीरपणे विचार करायला हवा.

मात्र मुलांच्या या अशा वाचनाला अवकाश देण्यासाठी मोठ्यांनी आधी एक उत्तम ‘मूल वाचक’ व्हायला लागेल. म्हणजेच मूल काय वाचू पहातेय हे समजून घेऊन आपल्याला त्याला वाव देता आला पाहिजे. मुलांच्या या वाचनासाठी समृद्ध आणि पोषक वातावरण तयार करता आले पाहिजे. त्याच्या या वाचनासाठी त्याचा त्याला अवकाश देता आला पाहिजे. ‘मूल वाचना’च्या या नव्या ओळखीला आणि नव्या दृष्टीला मोठ्यांनी सुरुवात करायला हवी तर मग त्यांचे मूलही मोठेपणी नक्कीच ‘एक उत्तम वाचक’ होईल.

– रती भोसेकर 9867937386 ratibhosekar@ymail.com
———————————————————————————————-

About Post Author

7 COMMENTS

  1. रती नेहमी प्रमाणे तू बाल शिक्षणातील मुलांच्या सहज शिक्षण क्षमता कशी वाढवावी ह्याची सोप्या शब्दात छान मांडणी केली आहेस . आम्हा मोठ्यांना आधी एक उत्तम मूल वाचक व्हावे लागेल आणि त्यासाठी तू सांगितलेली दृष्टी आम्ही नक्कीच आत्मसात करू . धन्यवाद .

  2. बालशिक्षणातील वाचन घटकाला वेगळे परिमाण रती भोसेकर यांनी दाखवून दिले आहे. नैसर्गिक वाचनप्रक्रिया गतीमान केली पाहिजे. लेख छान आहे.

  3. लहानग्यांच्या वेगवेगळ्या संवेदना उमलत असताना त्यांच्या पालकांनी आत्मनिरीक्षण करुन आणि स्वतःला ‘वाचवुन‘ सहजशिक्षणाने पाल्यांच अक्षर, शब्द, वाक्या पलिकडच्या ( जीवंत) जगाच वाचन अधोरेखित करणारा रतीचा लेख आवडला, भिडला.

  4. बालशिक्षणाविषयीच्या तळमळीतून उतरलेला हा लेख फार छान झाला आहे. सहजशिक्षणाची आजची गरज पालकांच्या मनात अधोरेखित करणारा माहितीपूर्ण लेख आहे. बालशिक्षणात सहजशिक्षण पद्धत अमलात आणण्यासाठी आणि पालकांना त्यात सहभागी करण्यासाठी असेच सहजसोपे लेख छोट्या छोट्या उदाहरणांसह यावेत ही अपेक्षा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here