कचऱ्यातून समृद्धी (Prosperity from Waste)

4
1078

मानवाने निर्माण केलेला कचरा स्वतः जिरवला पाहिजे. माणसामुळे सभोवताल अस्वच्छ होता कामा नये, ही विकसित माणसाची वृत्ती आहे. तो जीवनशैलीचा एक अविभाज्य घटक असतो. ओला कचरा आणि घन कचरा एकत्र पाहिल्यावर मनाला त्रास होणे, हे ज्यांच्या बाबतीत होते, ते ‘कचरा’ या गोष्टीकडे प्रेमाने बघू शकतात. त्याला हाताळू शकतात, त्यापासून पर्यावरणाला पूरक अशी त्याची निरवानिरव करतात. ओल्या कचऱ्याचे नियोजन सुरुवातीला अवघड वाटत असले तरी आठ दिवसांत त्याचे स्वत:चे जीवन चक्र सुरू होते आणि सात्विक, सेंद्रिय खताची त्यापासून निर्मिती होऊ शकते. ती निर्मिती आणि त्यापासून तयार झालेली फुलाफळांची बाग, पालेभाज्या पाहणे हे इतर कोणत्याही निर्मितीप्रमाणे आनंददायी असते. जयंत जोशी यांनी या विषयात केलेले काम नुसते कौतुकास्पद ठरू नये, तर हा लेख वाचणाऱ्या प्रत्येकाने ही जीवन शैली वापरात आणली तर तो समृद्धीकडे जाण्याचा मार्ग सगळ्यांना परिचित होईल. हे स्वतः अनुभवण्यासाठी हा लेख नक्की वाचा. ‘सद्भावनेचे व्यासपीठ’चे इतर लेख सोबतच्या लिंकवरून वाचता येतील.
-अपर्णा महाजन
———————————————————————————————

कचऱ्यातून समृद्धी  (Prosperity from Waste)

आत्ताच बातमी आली आहे की दुर्गंधीला कंटाळून कांजूरमार्गचे डंपिंग ग्राउंड बंद करण्यासाठी पश्चिम द्रुतगती मार्ग आजूबाजूच्या नागरिकांनी अडवला आहे आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे ! अशा बातम्या पेपरमध्ये वारंवार येतात. डंपिंग ग्राउंडवर प्रचंड आगी लागणे, त्यातून दुर्गंधी येणे, म्हणून त्या जवळच्या नागरिकांची आंदोलने हे सध्या नेहमीच घडत आहे.

मी स्वतः मायक्रोबायोलॉजिस्ट असल्याने पंधरा वर्षांपूर्वी विचार केला, की  कचरा साठतोच का? मग पहिल्यांदा ह्या समस्येचे मूळ कारण शोधू लागलो. माझ्या लहानपणी हा प्रश्न कधीच नव्हता, तर मग आता का? आमच्या कल्याणमध्ये डंपिंग ग्राउंड नव्हतेच. खाडीच्या किनारी एका निर्जन जागी कचरा टाकला जायचा आणि त्याचे काही दिवसांनी कुजून खत व्हायचे. शेतकरी ते घेऊन जात आणि शेतात टाकत. मग आता, सगळीकडे नेहमी त्या उलट का होत आहे? अभ्यास केल्यावर समजले की ओला कचरा आणि सुका कचरा मिक्स केले की कंपोस्ट होत नाही आणि तो सडू लागतो. त्यातून दुर्गंधी येते. ओला म्हणजे कुजतो तो आणि सुका म्हणजे प्लास्टिक, जे कुजत नाही. लोकवस्ती प्रचंड वाढली आणि कचरादेखील वाढला. तो एकत्र झाल्यावर त्याचे खत करणे हे खूप खर्चिक मेहनतीचे काम आहे, त्यामुळे ते अशक्य होते आणि तो ढिगाने साठला जातो. मग कचरा एकत्र होऊच द्यायचा नसेल तर त्याचे घरातच खत केले तर? असा विचार मी केला.

माझे बालपण आठवले, माझ्या लहानपणी दूधवाला घरी येऊन मापाने दूध घालायचा; नाहीतर, आम्ही कल्याणला दूध नाक्यावर जाऊन दूध आणायचो. मुंबईला दुधाच्या बाटल्यांमधून दूध यायचे आणि बाटल्या परत जायच्या. दुधाच्या पिशव्या माहीतच नव्हत्या. भाजी आणायला आई कापडी पिशवी घरातून घेऊन जायची, सर्व सामान खाकी कागदाच्या पिशव्यांतून यायचे. फारफार तर न्यूज पेपरमध्ये गुंडाळून यायचे. कपडे पेपरमध्येच गुंडाळून यायचे. ब्रेडसुद्धा मेणाचे कोटिंग असलेल्या कागदाच्या वेष्टनात यायचा; आता, तो प्लास्टिकमध्ये येतो. अॅल्युमिनियम फॉईल, पाण्याच्या प्लास्टिक बॉटल्स ह्या माहीतच नव्हत्या. त्या काळी इतके प्लास्टिक तयार होत नव्हते. आम्ही घरातील कचरा बाहेर कचरा कुंडीत टाकायचो. तो नगरपालिका उचलून गावाबाहेर फेकून द्यायची. काही दिवसांनी त्याचे खत व्हायचे आणि शेतकरी ते काढून नेऊन शेतात टाकायचे. त्यामुळे ढीग कधी व्हायचाच नाही.

पुढे प्लास्टिक अवतरले. सगळ्या वस्तू प्लास्टिकमध्येच मिळू लागल्या. सुरुवातीला दुधाच्या पिशव्या साठवून त्या भंगारमध्ये विकल्या जायच्या. पण ज्यावेळी कॅरीबॅग आल्या त्यानंतर मात्र त्या कचऱ्यात जायला लागल्या. कारण त्या उचलून स्वच्छ करून, वाळवून विकायला भावच मिळत नाही. प्लास्टिक इतके स्वस्त झाले, की त्याच्या भंगारला किंमत येईना. त्यामुळे लोक ते कचऱ्यात टाकू लागले, त्यामुळे पर्यावरणाचे मात्र भयंकर नुकसान झाले आहे. भाज्यांची साले, उरलेले अन्न सगळ्या गोष्टी प्लास्टिक मधूनच टाकू लागले. त्यात लोकवस्ती दहा पटींनी किंवा त्याहून अधिक वाढली आणि कचराही वाढला. त्यामुळे त्याचे डोंगर इतके वाढू लागले की जागा अपुरी पडायला लागली. त्यात केंद्र सरकारने एक कायदा काढला, की कोठलाही कचरा प्रक्रिया न करता कोठल्याही सार्वजनिक जागेत टाकायला बंदी घातली. कारण तेथील जवळच्या नागरिकांनाच फक्त दुर्गंधीचा त्रास होऊ लागला. म्हणून कचरा प्रक्रिया प्रकल्प या नावाने खोटे प्रकल्प चालू झाले, ते आजही चालूच आहेत. ओला-सुका कचरा एकत्र झाला की त्याचे विलगीकरण होत नाही आणि त्यामुळे खतदेखील करता येत नाही. तो ढिगाने साठून कुजू लागतो. हेच फुरसुंगी, देवाची उरळी, कल्याणच्या कुंभार्डीमध्ये सुरू आहे. यावर उपाय म्हणून ओला/सुका कचरा वेगळा करा म्हणून जनजागृतीला सुरुवात केली, पण आपल्याकडे जबरदस्त शिक्षा नसेल तर कोणीही कायदा पाळत नाहीत. त्यामुळे प्लास्टिक पिशव्यांवरच बंदी आणली. पण जोपर्यंत नागरिक शहाणे होत नाहीत तोपर्यत पिशव्या तयार होतच राहणार त्या कचऱ्यातच जात राहणार. या समस्येवर उपाय शोधून काढायचे ठरवले. पंधरा वर्षांपूर्वी ओला कचरा घरातच खतात रूपांतर करता येईल का असा प्रयत्न केला. मग फक्त प्लास्टिक विकले जाईल ही कल्पना. तो खूप संशोधनानंतर सफल झाला आणि कचरा खाणारी बास्केट म्हणजेच किचन कंपोस्ट बास्केट जन्माला आली.

घरातील गृहिणी ही खूप कामात असते. त्यामुळे तिला गुंतागुंतीची अशी वेळखाऊ गोष्ट आवडणार नाही. मुंबईसारख्या शहरांत स्वयंपाकघरात खूप जागा नसते. सगळ्यांकडे गच्चीवर, गॅलरीत, बागबगीचा नसतो. त्यामुळे अगदी थोड्याशा जागेत सहज वापरता येईल अशी बास्केट बनवली. त्यासाठी लागणारी मशीनरी बनवली. तसेच सुरुवातीला टाकायचे विरजण किंवा स्टार्टर कल्चर विकसित केले. जे सुरुवातीला एकदाच टाकायचे.

ती बास्केट अगदी स्वयंपाकघरात ठेवायची. घरातील एकूणएक गोष्टी कंपोस्ट करते. त्यात फक्त नारळाची करवंटी आणि चिकन मटण बोन्स सोडून सगळे टाकायचे. थोडक्यात अन्न, खरकटे, भाज्या, फळे, फुले, झाडांची पाने, चहाचा चोथा, सडलेले-किडलेले कडधान्यसुद्धा कंपोस्ट होते. आंब्याची बाठसुद्धा कंपोस्ट होते. ही बास्केट स्वयंपाकघरात ठेवायची. त्याला बिलकुल वास येत नाही. त्यातून कोठलेही पाणी बाहेर पडत नाही. मुख्य म्हणजे कचऱ्याचे वजन आणि आकारमान जवळजवळ ऐंशी टक्क्यांनी कमी होते. म्हणजे शंभर किलो कचऱ्याचे वीस-बावीस किलो इतके खत तयार होते.

त्यात रोजचा साधारण सातशे-आठशे ग्रॅम म्हणजे चार-पाच लोकांचा कचरा सहज जातो, तरीसुद्धा ती बास्केट तीन-चार महिने भरत नाही. तीन-चार महिन्यांनी भरलेल्या बास्केटमधून पंधरा-वीस किलो उत्तम कंपोस्ट खत निघते. ती रिकामी केली की लगेच पुन्हा सुरू करायची. त्यासाठी रोज साधारण फक्त दोन ते तीन मिनिटे खर्च करावी लागतात.

मेथी-कोथिंबिरींची देठे फक्त कापून टाकावी लागतात. कलिंगडाची साले थोडी तुकडे करून टाकावी लागतात. फळे, फळांची साले, फुले तशीच टाकली तरी चालतात. चहाची पावडर न धुता टाकायची, बेसिनमधील अन्नसुद्धा टाकायचे. सुरवातीला, ती मी बनवली- मी वापरली- मग माझ्या नातेवाईकांना दिली, मित्रांना दिली. त्यानंतर त्याचा प्रसार सुरू केला. आज पस्तीस हजारांच्यावर बास्केट्स लोकांना वापरण्यास दिल्या आहेत. माझी बास्केट अगदी केरळ आणि जालंदर येथेही जाते. ही बास्केट थोड्याशा ट्रेनिंगनंतर ऐंशी वर्षांची आजी किंवा दहा वर्षांचा मुलगादेखील सहज हाताळतो. माझ्या घरातून गेली पंधरा वर्षे भाजीची एक काडीदेखील बाहेर गेली नाही. फक्त सुका कचरा बाहेर जातो. म्हणजे प्लास्टिक, काच, कागद, मेटल आणि ईवेस्ट. सुरुवातीला आपण टाकायला विरजण किंवा बायो कल्चर देतो. तसेच कोकोपीट, मिक्स करण्यासाठी विशिष्ट दांडा देतो. वापरायची संपूर्ण कृती, माझे फोन नंबर सगळे देतो. त्यानंतर त्याचा पाठपुरावाही करतो. एकदा बास्केट घेतली की खूप वर्षे चालते. त्यासाठी मी महापालिका, सोसायट्या, कॉलेज, महिला मंडळे, लायन्स क्लब, रोटरी क्लबमध्ये शेकड्यानी भाषणे दिली, प्रात्यक्षिकेही केली.

नवी मुंबई महापालिकेचे कमिशनर डॉ. रामस्वामी हे स्वतः बायोकेमिस्ट होते. त्यांना ही कल्पना अतिशय आवडली. त्यांनी एका ॲड एजन्सीतर्फे क्लिप काढून ती प्रसिद्ध केली. माझे भाषण विष्णुदास भावे सभागृहात ठेवले. शेकडो सोसायट्यांचे सेक्रेटरी; तसेच, सामान्य नागरिक आणि हॉटेलमालक यांनी तेथे हजेरी लावली. त्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले. अंबेजोगाईमध्ये दोन दिवसांत पंधरा भाषणे दिली. लातूरमध्येही महिलांनी माझ्या बास्केटचे प्रात्यक्षिक ठेवले. तेथे संक्रांतीला पन्नास बास्केट वाटल्या. कर्नाटकच्या गुलबर्गामध्येही नगरपालिकेत भाषण ठेवले होते. मला दिल्लीमध्ये दिल्ली विकास निगमने (DDA) बोलावले होते. असे कितीतरी प्रयत्न केले. तरीही सगळ्यांनी ही सुरवात केली का? नाही. कारण कचऱ्याबद्दल गैरसमज खूप आहेत. लोकांना भाजीखरेदीला, ती निवडायला वेळ आहे; पण त्याची देठे कापणे हे दोन-तीन मिनिटांचे काम वेळखाऊ वाटते. लोकांनी संडास घरात आणले. अगदी अॅटॅच बाथ या नावाखाली संडास बेडरूम मध्येही आले. पण बास्केट मात्र त्यांना घाण वाटते. ‘हे मी का करायचे? म्युन्सिपालटी काय करते? आम्ही कर कशाला भरतो? कचरा कामगारांना काय काम असते? अशा प्रश्नांनी ते पळवाट काढतात. श्रीमंतांची, मध्यम वर्गाची बेपर्वाई तर गरिबांची वेगळीच अडचण. परंतु त्यातही आशेचा किरण आहे. ‘हे सहज होणार असेल तर करून बघू’ असे म्हणणारेही थोडे लोक आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर लेखिका शुभदा चौकर यांनी सांगितले, ‘मी वाटेल ते करेन माझ्या घरातील कचरा बाहेर जाता कामा नये’ बीएआरसीचे डॉ. शरद काळे यांनी मला घरी बोलावून ही बास्केट समजावून घेऊन मागून घेतली.

आता कॅरीबॅग प्लास्टिक विकाऊ नाही, हल्ली दुधाच्या पिशव्यासुद्धा भंगारवाले घेत नाहीत कारण भाव मिळत नाही. म्हणून लोक त्या कचऱ्यात टाकतात. त्यामुळे फुरसुंगीसारखी प्रकरणे घडत आहेत. शहरे वाढत आहेत. प्लास्टिकचे प्रमाण वाढते आहे. कचरा साठणे म्हणजे त्यातील उपयुक्त घटक कायमचे डंपिंग ग्राउंडच्या ढिगात बंदिस्त करणे. त्यातून घाण काळे पाणी बाहेर पडते आणि जमिनीखालील पाण्यात, तळ्यात, नदीत मिसळते आणि चांगल्या पाण्याची वाट लागते. हे सगळे थांबवायचे असेल तर लोकांनी घरच्या घरी कंपोस्ट करायला शिकले पाहिजे.

आता, मी सोसायटी पातळीवरदेखील कचरा खत प्रकल्प करून देतो. घरटी दीड दोन हजार रुपयांत हा उभा राहतो. मी सोसायटीमधील कचरा नेणाऱ्या व्यक्तीलाच तो चालवायला शिकवतो. अशा पन्नास सोसायट्यांत मी काम केले आहे. त्यातून निघणाऱ्या खतावर भाजीपाला, फुलझाडे कशी लावावीत हेही शिकवतो. आता, थोडे थोडे यश येत आहे.

या कामाबद्दल ‘दि ठाणे जनता सहकारी बँके’ने मला ‘पर्यावरण मित्र’ हा पुरस्कार दिला आहे. रोटरी क्लब (ठाणे) यांनी या संशोधनाबद्दल ‘Innovation Excellance Award’ दिले. अनेक नगरपालिका, ग्रामपंचायत, महापालिका यांनी हा उपक्रम गौरवला. ‘मुंबई ग्राहक पंचायत’च्या ठाणे युनिटनेसुद्धा त्यांच्या मेंबर्सना याचे वाटप केले. आता, मलाही आशा आहे, की एक दिवस कचरा गाडी बंद होईल अशी वेळ येईल. त्या डंपिंग ग्राउंडवर बेघर लोकांना राहायला घरे बांधता येतील. खेळांची स्टेडियम होतील. शाळा होतील. शेवटी हे काम सुबुद्ध नागरिकांचे आहे, सरकारचे नाही. मुंबई महानगरपालिकेचे सोळाशे कोटींचे कचरा वाहतुकीचे बजेट चांगल्या कामासाठी वापरता येईल. लोक त्या कचऱ्याच्या खतावर भाजीपाला पिकवतील आणि रासायनिक खतावरील खर्च कमी होईल. असे झाले, की भारत खऱ्या अर्थाने ‘सुजलाम सुफलाम’ होईल.

– जयंत जोशी 9969634182 jayantjoshi55@gmail.com
——————————————————————————————–

About Post Author

4 COMMENTS

  1. खूपच शिकण्यासारखे आहे आणि मुख्य म्हणजे कृती झाली पाहिजे …मी 99% प्लास्टिक चा वापर टाळते.

  2. Segregation and composting household waste is a good model to help nature nurture and help procreate further. Small steps will help save this mother earth.

  3. गांभीर्याने विचार आणि कृती होणे आवश्यक आहे. मुख्य म्हणजे प्लास्टिक च अतिरेकी वापर नागरिकांनी स्वतः हून थांबवावा. प्रत्येक वेळी शासनाकडून अपेक्षा करणे चुकीचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here