श्रीमंत नाना फडणीस यांचा वाडा (Nana Phadnis’s famous Menavali-Wai palace)

1
291

वाई-मेणवली आणि परिसराचे आध्यात्मिक व पौराणिक महत्त्व

वाई ही नगरी व परिसर प्राचीन आहे. वाई म्हणजे वई याचा अर्थ सीमा किंवा कुंपण असा होतो. वाई हे सातारा जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. समुद्रकाठचे कोकण आणि सह्याद्रीच्या पठारावरील पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारे ते मोक्याचे असे ठिकाण. त्याला पौराणिक काळापासून महत्त्व आहे. तो भाग महाभारतातील विराट राजाच्या स्वामित्वाखालील मानला जातो. विराटनगरी म्हणूनही वाईचे महात्म्य आहे. त्याशिवाय, तो परिसर वैराट गड, पांडवगड, मांदार देव अशा पौराणिक महत्त्वाच्या ठिकाणांनी वेढलेला आहे. नाना फडणीस यांनी बांधलेला मेणवलीचा वाडा ही तेथील ऐतिहासिक महत्त्वाची गोष्ट. तो तर उत्कृष्ट कामाचा नमुना आहे. नानांचे वंशज तेथे राहत आहेत. त्यांनी नानांच्या मेणवली व बेलबाग या दोन्ही वास्तू उत्तम प्रकारे जतन केल्या आहेत. धौम्य ऋषींच्या तपोवनाच्या व आश्रमाच्या खुणा तेथे आढळतात. तो शांत परिसर नानांच्या एकांतप्रिय मनाला भावला असणार; म्हणून नानांनी तेथे वास्तव्यासाठी सुंदर वास्तूंची व श्रीगंगास्नानासाठी भव्य, प्रशस्त, अतिसुंदर अशा घाटाची निर्मिती केली.

कोकण किनाऱ्यावरील इंग्रजांचे देशावरील लोकांकडे जाणेयेणे व देशावरील लोकांचे कोकणात इंग्रजांकडे जाणेयेणे होत असे. त्यावर देखरेख ठेवता यावी म्हणून कदाचित नानांनी मेणवली या ठिकाणाची निवड करून ते पेशव्यांकडून मागून घेतले असावे. मेणवलीचा नानांचा वाडा सुमारे दीड एकर परिसरात पसरलेला आहे. वाड्यास चहुबाजूंनी तटबंदी आहे. वाडा कृष्णेच्या काठावर आहे. वाड्याचे प्रवेशद्वार हे उत्तराभिमुख आहे. नीट अवलोकन करता वाड्याची रचना गोमुखीप्रमाणे दिसते. तिचा उद्देश असा, की हातात शस्त्र आहे की जपमाळ हे बाह्य स्वरूपावरून कळू नये. नगारखाना उत्तराभिमुख दरवाज्यावर आहे. देवडी द्वारपालासाठी प्रवेशद्वाराजवळ आहे. दरवाज्याच्या लगेच आत पहारेकऱ्यांसाठी डाव्या हातास जागा असून तेथे वेळ-कळावी म्हणून वाळूचे घड्याळ व टोल देण्यासाठी तास टांगलेला असे. पूर्वी त्याच्या शेजारी मोराचा मोठा पिंजरा होता व त्याच्या जवळच्याच खोलीत तांबटाचे वास्तव्य असे.

वाड्यास एकूण सहा चौक आहेत. प्रवेशद्वार ओलांडून आल्यावर लगेच वाड्याचा पहिला चौक येतो. चौकाच्या उत्तरेस कचेरी आहे. दक्षिणेस भाताचे बळद होते. चौकाच्या पुढे जोत्याच्या तीन पायऱ्या चढताच ओसरी आहे. ओसरीच्या डाव्या अंगास प्रशस्त देवघर आहे. पहिल्या चौकाच्या उत्तरेस श्री विहिरीचा चौक आहे. ती विहीर खोल बांधीव असून तिचे पाणी चवदार आहे. दक्षिणेस कारंज्याचा चौक आहे. चौकाच्या मध्यभागी दगडी बांधकाम केलेले मोठे कारंजे आहे. त्यास पूर्वी हळदी-कुंकवाचा चौक असे म्हणत असत. तेथे बायकांचे कार्यक्रम चालत, तेथील ओसरीचे खांब कोरीव आणि सुंदर असून, त्यावर सुंदर सुंदर भित्तिचित्रे आहेत. ती चित्रे फिकी पडलेली आहेत. स्वयंपाकाचा चौक नैऋत्य दिशेस आहे. तेथील काही भाग पडला आहे. मधला चौक वास्तुपुरुषाच्या नाभीस्थानी आहे. वायव्येस- कांडणसाळीचा अथवा तुळशी वृंदावनाचा चौक आहे. अजूनही तेथे तुळशीवृंदावन आहे. वाड्याच्या मध्य चौकातील पश्चिम दरवाज्यातून बाहेर पडताच दोन्ही बाजूंस नोकरचाकर, दुभती जनावरे यांच्यासाठी ओसऱ्या आहेत. तेथील दरवाजा ओलांडताच वाड्याचा परसभाग येतो. तेथेच वायव्येस आखिव बाग असून तुळशीवृंदावन असलेला, दगडी बांधकाम ओटा आहे. त्याच्या शेजारील फरसबंद भागातून पुढे गेले, की पश्चिम दरवाजा आहे. तो नदीकडील घाटाकडे उघडतो.

तो वाडा म्हणजे वास्तुशास्त्राचा उत्कृष्ठ नमुनाच आहे ! वाड्याचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. वाडा चिरेबंदी, दुमजली आणि पूर्ण तटबंदी असलेला आहे. त्यातील चौक हे त्या वास्तूला पश्चिमेकडून व उत्तरेकडूनही ताज्या हवेचा भरपूर पुरवठा करतात. त्याच बरोबर त्या देखण्या वास्तूला सूर्यप्रकाशही भरपूर पुरवतात. वाड्यातील भिंती रुंद व मजबूत असून जिने भिंतीतून काढलेले आहेत. भिंती माती, चुना इत्यादीचा वापर करून बांधल्या असाव्यात. वाड्यातील खांब, खांबण्या, तुळया, लगी; तसेच, छत सर्व सागवानी, उत्तम लाकडाचे आहेत.

वाड्यातील मधील तिन्ही चौक फरसबंद असून फरसबंदीत वेगळे वैशिष्ट्य राखून आहेत. मधल्या चौकात एकसारखे शंभर ताशीव चौरस फरस (दगड) सुबक रीतीने व कौशल्याने बसवलेले आहेत. प्रत्येक चौकात दोन फूट विटांनी बांधलेले उत्तम गटार त्या फरसाखाली आहे. दोन फरसांमधील सांधे हेतुत: दरजा न भरलेले आहेत. त्यावर पडणारे पावसाचे पाणी दोन दगडांमधील फटीत झिरपून खाली, विटांनी बांधलेल्या गटारात उतरावे हा त्यामागील उद्देश आहे.

दुसऱ्या मजल्यावर मुख्य दरवाज्याच्या वरच मोठा दिवाणखाना आहे. तेथील खांब कलाकुसर केलेले आहेत. छताचे काम लाकडी व कोरीव आहे. आतील बाजूस एक खोली असून तेथे नानांचा मोठा पलंग (संपूर्ण कोरीव काम केलेला शिसवीचा) आहे. त्याच मजल्यावर पश्चिमेकडील बाजूस चित्रांची खोली आहे. ती चित्रे वाड्याएवढीच जुनी आहेत. सर्व चित्रे रंगीत असून त्यात रामपंचायतन, कृष्ण व अष्टनायिका, शेषशाही भगवान विष्णू, शिव आणि त्यांचे पार्षद, महिषासुर मर्दिनी, दशावतार यांचा समावेश आहे. ती भित्तिचित्रे म्हणजे मराठा चित्रशैलीचा उत्कृष्ट नमुनाच होय. त्या खोलीतील गवाक्षातून (खिडकी) व त्याच्या शेजारील खोलीतील गवाक्षातून कृष्णानदीचे पात्र, घाट व मंदिरे यांचे मनोहारी दर्शन घडते. येथून तो सर्व परिसर सुंदर दिसतो. नानांची रसिकता, सौंदर्यदृष्टी वाड्यासंबंधीच्या सर्व बारीकसारीक तपशिलांमधून दिसून येते.

नानांनी वाईत चंद्रकोर आकाराचा घडीव दगडांचा घाट बांधला आहे. घाटाचा मध्यभाग मोठा असून कासवाच्या पाठीच्या आकाराचा आहे. त्यामुळे त्यास कासव घाट असेच म्हणतात. घाटाला उत्तरेकडील बाजूस उंच आणि मजबूत दगडी भिंत बांधली आहे. पावसामुळे उंचावरील माती वाहून घाटावर अथवा नदीतील डोहात येऊ नये हा त्यामागील उद्देश असावा. त्या भिंतीत लहान लहान कोनाडे करून पणत्या लावण्याची सोय केलेली आहे. रात्रीच्या वेळी त्यात सर्वत्र दिवे लावले, की तेथील दृश्य अप्रतिम दिसते; नदीच्या सौंदर्यात आणखी भर पडते. घाटावर दोन मोठे पिंपळपार बांधलेले आहेत. त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण बांधणीमुळे त्याची भव्यता उठून दिसते.

नानांनी बांधलेले वासुदेव-लक्ष्मीचे मोठे मंदिर पश्चिमेकडील बाजूस आहे. शेजारी अमृतेश्वराचे (शंकराचे) मंदिर आहे. दोन्ही मंदिरांचे कळस रेखीव आहेत. शंकराच्या मंदिराच्या समोर घंटेचेही छोटेसे मंदिर बांधले आहे. ती घंटा चिमाजीअप्पांनी जिंकून आणलेली आहे. ती पंचधातूची असून तिचा घेर मोठा व वजनदार आहे. वासुदेवाच्या मंदिरासमोर धर्मशाळा आहे. ती साधुसंतांना राहण्यासाठी असावी.

नानांनी बांधलेला वाडा आणि घाट यांचा त्या काळातील खर्च दीड लाख रुपयापर्यंत असावा. त्यांनी बांधलेले असे वाडे, देवालये, घाट, धर्मशाळा, पाणपोया या वास्तू अनेक ठिकाणी आहेत. त्या नानांच्या कर्तृत्वाच्या खुणा जपतात.

– अनघा फडणीस 8275755182 anagha.phadnis06@gmail.com

About Post Author

1 COMMENT

  1. छान लेख. एकदा वाईला जाऊन वाड्याला भेट देण्याची इच्छा झाली…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here