नाना फडणीस यांनी त्यांच्या असामान्य बुद्धिचार्तुयाने, कर्तृत्वाने आणि अपार कष्टांनी स्वराज्याचे रक्षण करण्याचे, ते टिकवण्याचे आणि वाढवण्याचेही कार्य मराठ्यांच्या इतिहासात केले आहे. त्यांची ख्याती निष्ठावंत प्रशासक आणि कर्तबगार स्वराज्यसेवक अशी आहे.
नाना फडणीस यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1742 रोजी (माघ कृष्ण 4) झाला. त्यांचे जन्मगाव सातारा. नानांचे पूर्ण नाव बाळाजी जनार्दन भानू असे होते. नानांच्या वडिलांचे नाव जनार्दन तर आईचे नाव रुक्मिणी असे होते. त्यांचे मूळ घराणे वेळास येथील भानू यांचे. ते गाव रत्नागिरी जिल्ह्यात आहे. भानू हेच त्यांचे मूळ आडनाव. नानांच्या आजोबांना पेशवाईची फडणवीशी मिळाली होती. फडणवीस या हुद्यावरून त्यांचे आडनाव फडणीस असे पडले. ती फडणवीशी नानांच्या वडिलांकडे चालत आली. नानांचे वडील व चुलते, दोघे फडणवीशी सांभाळत. ते जास्त काळ मोहिमेवर असत.
नानांची आई नानांच्या शिक्षणाच्या बाबतीत सतर्क असे. ती नानांनी चांगला विद्याभ्यास करावा म्हणून प्रयत्न करत असे; नानांची बुद्धिमत्ता कुशाग्र होती; वृत्ती अभ्यासू होती. मात्र नानांचा कल शिक्षणाकडे फारसा नव्हता. त्यांचे शिक्षण व्रतबंध (मुंज) होईपर्यंत फारसे होऊ शकले नाही. नंतर त्यांच्या शिक्षणाची सोय खुद्द पेशव्यांबरोबर झाली. नानांची शरीरप्रकृती किरकोळ होती. त्यांना शारीरिक व्यायाम रुचत नसे. त्यांनी सर्व विद्या आत्मसात करून घेतल्या. त्यांच्या चाणाक्षपणाचे कौतुक सर्वत्र होई. नानांची मुंज 1746 साली झाली. त्या काळी लग्न लवकर करण्याची पद्धत होती. त्यांचे लग्न वयाच्या दहाव्या वर्षी झाले. त्यांना लग्ने अनेक करावी लागली. त्यांची मुले जगत नसल्याने, पत्नी जगत नसल्याने किंवा अन्य कारणांमुळे तसे घडले.
नानांना फडणवीशीची वस्त्रे वयाच्या पंधराव्या वर्षीच मिळाली. नानांच्या वडिलांचा मृत्यू अचानक झाला. तेव्हा त्यांच्यावर मोठी जबाबदारी येऊन पडली. पेशवे व फडणीस एकदिलाने काम करत असत. पेशव्यांनी नानांची हुशारी आणि कर्तव्यनिष्ठा बरोबर हेरली होती. पेशव्यांची त्यांच्यावर विशेष मर्जी होती. पानिपताचे युद्ध 1761 साली झाले. नानाही पेशव्यांबरोबर युद्धासाठी गेले होते. त्यांची पत्नी आणि आई या दोघी त्यांच्या सोबत होत्या. त्या युद्धात नाना, त्यांची आई; तसेच, पत्नी या सर्वांची ताटातूट झाली. नाना अत्यंत कठीण परिस्थितीतून कसेबसे वाचले. त्यांची पत्नीही सापडली, मात्र त्यांच्या आईचा शोध लागला नाही. ती गेल्याचेच नंतर कळले.
तो काळ नानासाहेब पेशव्यांच्या कारकिर्दीचा होता. नानांनीच माधवराव पेशव्यांच्या काळात त्यांचा सर्व कारभार सांभाळला. राघोबादादा व माधवराव पेशवे या काका-पुतण्यांच्यातील दुही वाढत गेली. तिचे पर्यवसान नारायणराव पेशवे यांच्या खुनात झाले. राघोबादादांनी पेशवेपदासाठी बऱ्याच कारवाया केल्या. नारायणरावांच्या पत्नी नारायणरावांच्या खुनानंतर, प्रसूत होऊन त्यांना पुत्ररत्न झाले. त्यांचे नाव सवाई माधवराव (पेशवे) असे ठेवण्यात आले. नानांनी त्यांच्यासाठी पेशवाईची वस्त्रे साताऱ्याच्या महाराजांकडून मिळवली. त्यावेळी सवाई माधवराव यांचे वय अवघे चाळीस दिवसांचे होते. नानांनी सवाई माधवराव यांना पेशवेपदावर बसवून त्यांच्यामार्फत कारभार सांभाळला. सरदारांनी त्यांना सहकार्य केले. त्यांनी जुळवलेले बारभाईचे कारस्थान अनेकांच्या सहकार्याने यशस्वी झाले. सवाई माधवराव पेशवे यांचा कालखंड वैभवाचा होता, प्रजा सुखी-समाधानी होती. राज्यकारभार व्यवस्थित चालला होता. पण सवाई माधवरावांनी आत्महत्या केली. तेव्हा दुसऱ्या बाजीरावास पेशवेपद मिळाले. दुसरा बाजीराव व नाना या दोघांत मात्र सामंजस्य नव्हते. बाजीरावांनी नानांना कैदेत ठेवले, त्यांची मालमत्ता जप्त केली. नानांची प्रकृती उतरत्या वयात खालावली; ज्वरामुळे प्रकृती बिघडत गेली. त्यांचे देहावसान 1800 साली फाल्गुन महिन्यात झाले. तो जणू स्वराज्याचा अंत ठरला !
नाना गेल्यानंतर त्यांची शेवटची पत्नी जी हयात होती, तिला वैधव्य आले. पत्नीचे नाव जिऊबाई असे होते. त्या वयाने लहान होत्या. त्यांना त्रास फार सहन करावा लागला, पण त्या न घाबरता खंबीरपणे उभ्या राहिल्या. नानांची सर्व इस्टेट जप्तीत होती. त्यांनी काही काळ पुण्यात काढून, नंतर त्या लोहगडाच्या आश्रयाला जाऊन राहिल्या. तेथे वैशंपायन, नित्सुरे कुटुंबीयांनी त्यांना मदत केली. नानांनी वाडे अनेक ठिकाणी बांधले होते. त्यांपैकी वाईजवळच्या मेणवली गावी असलेला वाडा जिऊबार्इंना सुरक्षित वाटला. त्या त्याच वाड्यात येऊन राहिल्या. नानांना श्रीभवानराव त्र्यंबक पंतप्रतिनिधी, माधवराव पेशवे, घनश्याम मंत्री यांजकडून मेणवली हा गाव इनाम मिळाला होता. पुढे, बेलबाग संस्थानही जप्तीतून मोकळे झाले. जिऊबार्इंनी इंग्रजांशी त्यासाठी बराच पत्रव्यवहार केला.
नानांनी उत्पन्न भरपूर मिळवले होते. त्यांना खुद्द पेशव्यांकडून अनेक गावे इनाम मिळाली होती. त्याशिवाय, निजाम सिद्दी यांच्याकडूनही त्यांना बक्षिसी व इनामे मिळाली होती. नानांनी त्यांना जेथे जेथे इनामे मिळाली होती त्यांतील अनेक ठिकाणी देवालये, घाट, वाडे बांधले; जागोजागी वाटसरूंसाठी पाणपोया, पाण्याचे नळ, विहिरी बांधून त्यांची सोय केली; धर्मशाळा व अन्नछत्रे उभारली; रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली. नानांनी बांधलेले वाडे, घाट, मंदिरे, धर्मशाळा यांची यादी भलीमोठी आहे.
नानांची कारकीर्द भारदस्त व उत्तुंग अशी होती. त्यांचा अंतकाळ मात्र फारसा चांगला गेला नाही. नानांनी 1800 साली (फाल्गुन वद्य तृतीयेस) देह ठेवला. नानांबरोबर स्वराज्याचे शहाणपण लयास गेले. नानांना दोन मुलगे झाले होते, पण ते अल्पायुषी ठरले. त्यांचा दत्तकपुत्रही लवकर वारला. अखेरीस, त्यांच्या पत्नी जिऊबाई यांनी मिरजेचे रामकृष्ण गंगाधर भानू यांचा मुलगा दत्तक घेतला. त्यांचे नाव महादजी असे होते. नाना फडणीस पुणे येथे नाना वाड्यात वास्तव्यास असत. तो नाना वाडा म्हणून ओळखला जातो. ते मेणवली येथील वाड्यात राज्यकारभारातून फुरसत मिळाल्यास कधी कधी येत असत.
– अनघा फडणीस 8275755182 anagha.phadnis06@gmail.com