नांदगावचे खंडेश्वर मंदिर

शिवालय भारतात गावोगावी, अगदी पाच-पंचवीस उंबऱ्यांच्या गावामध्येही असते. मंदिरांची नावेही भक्तांनी प्रेमाने व गाव परिसराशी संबंध राखून ठेवलेली असतात- कोठे सोमेश्वर, कोठे कोंडेश्वर, कोठे कोळेश्वर अशी ! अमरावती जिल्ह्यात तर गावाचे नावच शंकरावरून दिले गेले आहे – नांदगाव खंडेश्वर ! भक्त तेथे दर्शनाला विदर्भातून आणि मध्यप्रदेशातून येत असतात. नांदगाव खंडेश्वर हे अमरावती जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. ते अमरावतीपासून छत्तीस किलोमीटर अंतरावर आहे. चारशेपन्नास घरे गावात आहेत. गावच्या मध्यवस्तीत उंच टेकाडावर शंकराचे मंदिर आहे. त्याला खंडेश्वर असे म्हणतात. टेकाडावर जाण्यासाठी तेथे पंचवीस-तीस दगडी पायऱ्या होत्या; त्या आता सिमेंटच्या बांधलेल्या आहेत.

मंदिरास काळ्या दगडांचा भव्य परकोट आहे. परकोटामधून आत शिरले, की प्रशस्त प्रांगणाच्या मध्यभागी थोड्या उंचावर आखीवरेखीव मंदिर दिसते. मंदिर आठशेपन्नास वर्षांपूर्वी बांधले आहे. तसा शिलालेख मंदिराच्या भिंतीवर कोरलेला आहे. मंदिराचे बांधकाम राजा रामदेवराय यांचे पंतप्रधान हेमाद्रीपंत (हेमाडपंत) यांनी इसवी सन 1154 मध्ये केले. मंदिर त्यांच्या नावाने प्रसिद्ध बांधकाम शैलीनुसार कोरीव दगडांचे आहे. पण त्याचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या बांधकामात विटांचाही वापर करण्यात आला आहे. त्या विटा विशिष्ट पद्धतीने घडवलेल्या आहेत. त्या आकाराने मोठ्या आहेत आणि विटा पाण्यात टाकल्या की पाण्यावर तरंगतात !

मंदिरातील कोरीव काम पाहण्यासारखे आहे. राजपरिवार, राजनर्तकी, शिवपार्वती आणि परिवार यांच्या आकृती आहेत. दागिने, वस्त्रांचा पोत, नाजुकपणा ही वैशिष्ट्ये नजाकतीने टिपली आहेत. मंदिराचे कोरीव कामाचे खांब हेही वैशिष्ट्य आहे. तेही तशाच हलक्या हातांनी केले आहे. प्रशस्त सभामंडपामध्ये तीन मंदिरे आहेत. पूर्वेकडे भव्य शिवलिंग आहे. शिवलिंगापाशी खाली गाभाऱ्यात तीनचार पायऱ्या उतरून जाता येते. शिवलिंग काळ्या पाषाणातील आहे. वरील बाजूला आणखी एक गाभारा आहे. त्याला ध्यानगृह म्हणतात. ते ठिकाण ऋषींच्या तपसाधनेसाठी बांधण्यात आले होते असे सांगतात. ते ध्यानगृह बंद करण्यात आले आहे. उत्तरेला शिवपार्वतीच्या कोरीव मूर्ती असलेले मंदिर आहे आणि दक्षिणेला नरसिंहाचे मंदिर आहे. तिन्ही मंदिरांसमोर मिळून एक मोठा नंदी आहे. मंदिराच्या आवारात शंभर फूट उंचीची दीपमाळ आहे. त्या दीपमाळेवर चढून जाण्यास पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून वर गेले, की नांदगाव खंडेश्वर आणि आजूबाजूची खेडी असे विहंगम दृश्य दिसते.

त्या ठिकाणाला आणि महादेवाला खंडेश्वर का म्हणतात, याची दंतकथा अशी, की तेथे कौंडिण्य ऋषींचा आश्रम होता. खंड्या नावाचा त्यांचा पट्टशिष्य होता. त्यांनी त्या पट्टशिष्याच्या आराधनेसाठी शिवलिंगाची स्थापना केली आणि त्या महादेवाचे नाव खंडेश्वर पडले !

खंडेश्वराला पहाटे आणि संध्याकाळी अशा दोन वेळी पूजा बांधली जाते. महाशिवरात्र हा तेथील मुख्य उत्सव. तेव्हा मोठी यात्रा भरते. त्याशिवाय श्रावण सोमवारचेही महत्त्व आहे. स्थानिक लोकांमध्ये श्रद्धा अशी आहे, की श्रावण सोमवारी कोंडेश्वर, खंडेश्वर आणि बोंडेश्वर यांचे दर्शन घेणाऱ्याला काशीला गेल्याचे समाधान (पुण्य !) मिळते. त्यांपैकी बोंडेश्वराच्या खाणाखुणा सापडत नसल्या तरी कोंडेश्वर आणि खंडेश्वर येथे पायी जाणारे लोक आहेत.

(फोटो – शुभम भगवे)

– आशुतोष गोडबोले

———————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here