शेवगाव तालुक्याच्या नागलवाडी या गावचे काशी केदारेश्वर हे महादेवाचे मंदिर ऋषी काशिनाथबाबा यांच्या वास्तव्याने पावन मानले जाते. ते ठिकाण निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे. चहुबाजूंनी डोंगर व मध्ये दरी; झाडे-वेली यांनी वेढलेला परिसर मन मोहून टाकतो ! मंदिरही सुबक आहे. जवळच पाण्याचे तळे आहे. तळ्याच्या काठावर बसून पाण्याकडे एकटक बघत बसावेसे वाटते. अनेक पर्यटक डोंगरावरून खाली पायी चालत जातात. बरोबर आणलेली शिदोरी उघडून तळ्याकाठी वनभोजनाचा आनंद घेतात. काही भाविक या ठिकाणाला काशी केदारेश्वर असेही म्हणतात. पण या काशीचा काशी नगरीशी संबंध नसावा, तर काशिनाथ बाबा या साधू पुरुषाशी असावा. काशिनाथ बाबा यांनी येथे समाधी घेतली.
नागलवाडी क्षेत्र शेवगाव येथून साधारणत: चाळीस किलोमीटर अंतरावर आहे. या परिसरामध्ये सप्तऋषींचे वास्तव्य होते अशी समजूत आहे. त्या ऋषींपैकी श्री वाल्मिकी ऋषी यांचा हा आश्रम होय असे मानले जाते. तशी वास्तू (मंदिर) येथे आहेही. वाल्मिकी ऋषींनी तपश्चर्येकरता एकांतवास मिळावा म्हणून नैसर्गिक दृष्ट्या फळाफुलांनी बहरलेले आणि वृक्ष-लता-वेलींनी घातलेला मंडप असे निसर्ग रमणीय स्थान शोधले. रामाने त्याग केल्यावर ज्या वेळी सीतामातेला अरण्यवास घडला त्यावेळी सीतामाई याच ठिकाणी वाल्मिकी ऋषी यांच्या सान्निध्यात राहू लागली. सीतामाई वाल्मिकींना पितृस्थानी मानून ‘तात’ म्हणत असे. म्हणून या ठिकाणाला तातोबाबांचा मठ असेही म्हणतात. याच ठिकाणी ‘सीतेची न्हाणी’ म्हणून जिवंत पाण्याचा कुंड आहे. सीतामार्इच्या स्नानासाठी गरम पाण्याची व्यवस्था म्हणून गरम पाण्याचा कुंडदेखील त्या काळी होता, म्हणे ! सीतामार्इला दंडकाराण्यात सोडण्यासाठी लक्ष्मण आला असताना, सीतामाई तहानेने व्याकुळ झाली तेव्हा लक्ष्मणाने खडकात बाण मारून निर्माण केलेला जिवंत पाण्याचा झरादेखील तेथे आहे ! त्या झऱ्याची खोली केवळ साडेसात फूट असून, ते ठिकाण ऋषी काशिनाथ बाबा यांच्या समाधीपासून दक्षिणेस सुमारे दीडशे मीटर अंतरावर आहे. ऋषी वाल्मिकी यांनी भगवान शिवाची या ठिकाणी अनेक वर्षे तपश्चर्या करून भगवत् प्राप्ती करून घेतली.
काशिनाथ बाबा हे त्या ऋषिपरंपरेतील ‘महान तपस्वी तपोनिधी’ मानले जातात. त्यांनीही या ठिकाणी तपश्चर्या करून भगवान शिवजींना प्रसन्न करून घेतले आणि शिवलिंगाची स्थापना व उपासना केली. म्हणून काशिनाथ बाबा यांच्या नावाच्या अद्याक्षरांवरून या देवस्थानाला ‘काशी केदारेश्वर’ असे संबोधले जाऊ लागले. ज्ञानेश्वरांनी या स्थानाचे ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात ओवी क्रमांक 179 मध्ये वर्णन केले आहे, जणू ! इतके ते या स्थानाला अगदी तंतोतंत लागू पडते. माऊली म्हणतात..“ परी आवश्यक पांडवा, ऐसा ठावो जोडावा, तेथ निगुड मठ होआवा, का शिवालय” असे हे पवित्र स्थान ! या मंदिराची पूजाअर्चा व परंपरा चालवण्यासाठी काशी केदारेश्वरपासून सरळ पूर्वेकडे एक हजार फूट अंतरावर अकराव्या शतकामध्ये मठाची स्थापना करून काशिनाथ बाबांनी स्वतः समाधी घेतली. काशिनाथ बाबा यांच्या समाधीच्या उजव्या बाजूस त्यांची बहीण दुर्गामाता यांचे काळ्या पाषाणातील मंदिर आहे. बाबांचे समाधी मंदिर अतिशय सुंदर, रेखीव चुना-पाषाणामधील आहे.
त्या ठिकाणी ‘सीतामातेचा संसार’ म्हणून एक विस्मयकारक भुयार आहे. त्याच भुयारातून काशिनाथबाबा समाधिस्थ होण्यासाठी गेले. भुयारात मोठी शिळा आडवी टाकलेली आहे. भुयारामधील त्या शिळेवर ब्रह्मानंदीची मूर्ती आहे. पुरातन दगडी जाते, दगडी रांजण असे संसारोपयोगी दगडी साहित्य भुयारामध्ये पाहण्यास मिळते. काही वस्तू कालौघात नष्ट झाल्या आहेत.
आणखी एक आश्चर्य म्हणजे काशिनाथबाबांच्या समाधी मंदिरापासून दक्षिणेकडे सहाशे फूट अंतरावर टेकडी आहे. त्या टेकडीवर उभे राहून बाबांच्या मंदिराकडे तोंड करून आवाज दिला तर त्याचा प्रतिध्वनी घुमलेला पुन्हा ऐकू येतो. खरे तर, तेथे कोठलेही कडी-कपार नाही. मोकळे माळरान आहे, तरी हा प्रतिध्वनी ! या तीर्थक्षेत्राची पुराणता- प्राचीनता शांतिब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या पुढील अभंगावरून येते. ते त्या स्थानाबद्दल लिहितात, “अधिष्ठाण देवगिरी, मग आले ब्रह्मपूरी. धरीला दक्षिणेचा पंथ, स्वामी आले केदारात. पूजा केदाराची केली, इच्छा समाधीची झाली. दक्षिणेसी हरीहर, धौम्य ऋषींचा डोंगर. तेथे घेतली समाधी, एका जनार्दन बंदी.”
या देवस्थानामध्ये श्रावण महिन्यात तिसर्या सोमवारी एकदिवशीय यात्रा भरते. महाशिवरात्रीला अखंड हरिनाम सप्ताह भव्य प्रमाणात होतो.
– सीताराम यशवंत काळे (भाऊ काळे) 8855850055, 7588602429 bhaukale76@gmail.com
——————————————————————————————————————————–