Home वैभव इतिहास मराठा घराण्यांची ऐतिहासिक नाणी

मराठा घराण्यांची ऐतिहासिक नाणी

1
571

इतिहासात अनेक मराठा पराक्रमी घराणी होऊन गेली. मध्ययुगातील इतिहासप्रसिद्ध म्हणजे यादव राजघराणे. ते (इसवी सन 850 ते 1317 शतक) देवगिरी (सध्याचे दौलताबाद, जिल्हा औरंगाबाद) येथून राज्य करत होते. यादव राजवंशाची नाणी मुख्यतः सोने या धातूमध्ये आढळून येतात. यादवकालीन नाण्यांचे धातूची शुद्धता हे वैशिष्ट्य दिसून येते. त्यांनी चांदी व काही प्रमाणात तांबे या धातूंमध्येही नाणी पाडली.

यादव नृपतींपैकी चांदीची नाणी सेऊणचंद्र दुसरा (अकरावे शतक) या राजाने प्रथम पाडली. त्यानंतर त्याच घराण्यातील भिल्लम पाचवा याच्यापासून जैतुगी वगळता त्याच्यानंतर आलेल्या सिंघण दुसरा, कृष्ण, महादेव, आमण, रामचंद्र या राजांची नाणी आढळली आहेत. यादवांची चांदीची नाणी आकाराने अतिशय लहान 0.4 सेंटिमीटर ते 0.8 सेंटिमीटर व वजनाने 0.2288 ग्रॅम ते 1.8810 ग्रॅम वजनाची आहेत. नाण्यांच्या दर्शनी भागावर सिंह प्रतिमा, तर मागील बाजूस राजाच्या नावाचा असणारा लेख दिसून येतो. त्यांनी चांदीची नाणी ठसा पद्धतीने (Die-Struck) तयार केलेली आहेत.

यादवांची तांब्याची काही नाणी आढळली आहेत; तथापि त्यांची संख्या अगदी कमी आहे. त्यामुळे त्यांविषयी काही ठोस विधान करणे शक्य नाही. यादवांची नाणी दख्खनच्या सर्व भागांत आढळून येतात. ती महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, ओडिशा या राज्यांमध्ये सापडली आहेत.

शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेकापासून शिवराई नाणी चलनात आणली. तो निर्णय त्या काळी क्रांतिकारी होता. शिवाजी आणि संभाजी महाराज यांच्या काळात सतराव्या शतकात घडलेल्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देते ते हिंदवी स्वराज्याचे चलन ! शिवाजी राजे यांनी स्वतःचा राज्याभिषेक “ज्येष्ठ शुद्ध 12, शुक्रवार घटी 21, पळे 34, विष्कंभ 38, घटिका 40,पळे सिं 42 तीन घटिका रात्र उरली” असताना म्हणजेच 6 मे 1674 रोजी करून घेतला आणि सार्वभौम राजाचे प्रतीक म्हणून स्वतःचे चलन सुरू केले ! पर्शियन भाषेचा प्रभाव झुगारून देवनागरी लिपीत पाडलेले चलन आणणे हा निर्णय क्रांतिकारी होता.

शिवराई‘ हे नाणे 1674ला टांकसाळीतून आलेले. ते तांब्याचे होते. ‘शिवराई’चा उल्लेख 1683 च्या एका पत्रात आलेला आहे. त्या नाण्याच्या पुढील बाजूस बिंदुमय वर्तुळामध्ये ‘श्री/राजा/शिव’ असा मजकूर तीन ओळींत, तर मागील बाजूस ‘छत्र/पती’ असा मजकूर दोन ओळींत असतो. त्या नाण्यांचा आकार साधारणतः वाटोळा असून, त्यावरील अक्षरे अत्यंत सुबक आहेत. ती नाणी अकरा ते तेरा ग्रॅम वजनात आढळतात. शिवराईची किंमत त्या काळात एक पैसा होती. चौसष्ट शिवराई मिळून एक रुपया होत असे. जास्त वजन आणि सुबक अक्षरे यांवरून शिवराईची (1674) ओळख पटते. पूर्ण ‘शिवराई’ ही साधारणतः अकरा ते तेरा ग्रॅम वजनाची मानल्यास, अर्धी शिवराई सहा ते सात ग्रॅमची असावी आणि पाव शिवराई तीन-चार ग्रॅमची. या विविध परिमाणांच्या शिवरार्इंचे अक्षरवळण साधारणतः सारखेच आहे आणि अक्षरलेखन पद्धतही तशीच आहे. शिवराई नाणे 1674 पासून एकोणिसाव्या शतकापर्यंत चलनात राहिले. ते स्वराज्यात लोकप्रिय झाले. महाराजांनंतर त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी तशीच नाणी पाडून चलनात आणली. रायगडावर राज्याभिषेक सोहळा सुरू होता त्यावेळी इंग्रज वकील हेन्री रायगडावर उपस्थित होता. त्याने कंपनीतर्फे जी कलमे मंजुरीसाठी आणली होती, त्यातील एकोणिसावे कलम इंग्रजी नाणी राज्यात चालावी असे होते. मात्र, महाराजांनी ती मागणी नाकारली. महाराजांची चलनासंदर्भात असलेली ती दूरदृष्टी होय. इंग्रजांना शिवराई हे चलन एकोणिसाव्या शतकात बंद करण्यासाठी फार प्रयत्न करावे लागले.

शिंदे घराणे हे मराठेशाहीतील पराक्रमी घराणे होय. कण्हेरखेड (जिल्हा सातारा) येथील पाटीलकी त्या घराण्यात होती. शिंदे हिंदीमध्ये सिंधीया असे उच्चारले गेले. ते मध्य भारतातील ग्वाल्हेर येथील राज्यकर्ते होत. ते राज्यकर्ते होण्याआधी मराठा साम्राज्याचे मुख्य सरदार होते. त्यांची मराठा साम्राज्याच्या विस्तारामधील कामगिरी महत्त्वाची होती. शिंदे घराण्याची राजधानी ग्वाल्हेर येथे 1810 मध्ये झाली. शिंदे यांच्या राजचिन्हात नागशिल्प आहे. ग्वाल्हेरच्या जयविलास पॅलेसच्या मुख्य द्वारावरदेखील द्वारशिल्प म्हणून नाग विराजित आहे. शिंद्यांची जी नाणी आहेत त्यात सुद्धा त्यांनी नागाला पूज्यस्थानी मानले आहे. नागदेवतेला नाण्यांवर स्थान दिले आहे. अलिजाबहाद्दर श्रीमंत जयाजीराव शिंदे यांच्या काळातील असून 1843-1886 या काळातील आहे. त्यांच्या उजव्या बाजूला भाला व डाव्या बाजूस त्रिशूळ आहे. त्या दोन्हींच्या मध्यात नाग असून त्यावर ‘जी’ हे अक्षर आहे.

पवार हे पेशवाईतील प्रसिद्ध मराठा घराणे. पवारांनी शिंदे व होळकर यांच्याबरोबर उत्तरेत मराठी राज्याचा विस्तार केला. त्या घराण्याचा मूळ पुरुष कृष्णाजी शिवकालात होता. त्याचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील सुपे. तो छत्रपती शिवाजी यांच्या सैन्यात एका तुकडीचा प्रमुख म्हणून काम करत होता. पवार यांचे वारसदार मध्यप्रदेश व छत्रपुर या राज्यांत धार संस्थान व देवास संस्थान येथे आहेत. त्यांचे साम्राज्य हे गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश येथपर्यंत होते. पवार घराण्यातील मराठा सरदार वंशज महाराज आनंद राव तृतीय यांनी 1860 ते 1898 मध्ये तांब्याचे पैसे सुरू केले. त्यावर भगवी पताका घेऊन हनुमान आहे आणि दुसऱ्या बाजूला देवनागरी लिपीत ‘धार’ असे लिहिलेले आहे.

प्रसिद्ध गायकवाड घराणे हे मराठेशाहीतील प्रमुख. त्यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील धावडी हे होय. त्या घराण्याचा पूर्वज दमाजी हा खंडेराव दाभाड्यांच्या सैन्यात सरदार होता. पुढे, तो गुजरातवर स्वतंत्रपणे स्वाऱ्या करी. दमाजीने निजामाबरोबर बाळापूर येथे झालेल्या लढाईमध्ये बराच नावलौकिक मिळवला. म्हणून खंडेरावाने त्याची शाहू छत्रपती यांच्याकडे शिफारस केली. तेव्हा त्यास समशेरबहाद्दर हा किताब देण्यात आला. बडोद्याचे गायकवाड घराणे हे पेशवेकालीन इतिहासात प्रख्यात असे गणले गेले आहे. बाजीराव पेशव्यांनी मध्य-उत्तर हिंदुस्थानातील शिंदे, होळकर, पवार यांच्यासमवेत गुजरातेत उभारलेला हा हिंदवी स्वराज्यरक्षक गायकवाड घराण्याचा बलदंड बुरूज उभारला होता. त्या सर्वांनी मिळून दिल्लीच्या सम्राटाला आव्हान दिले होते. गायकवाडांना समशेरबहाद्दर हा किताब शाहू छत्रपतींच्या अनुज्ञेने प्राप्त झाला होता. बडोद्याच्या नाण्यांवर त्या किताबाचा उल्लेख आहे. बडोद्याचे संस्थापक दमाजी पहिले, पिलाजीराव, दमाजीराव दुसरे यांनी त्यांच्या अधिकारात कोणतीही नाणी पाडली नाहीत. ते राजे बडोदा राज्य स्थिरस्थावर करण्याच्या प्रक्रियेत गुंतले होते बहुधा. बडोद्याचे पहिले स्वतंत्र नाणे हे मानाजीराव गायकवाड यांनी इसवी सन 1789 ते 1793 या त्यांच्या कारकीर्दीत पाडले अशी नोंद दिसून येते. तो चांदीचा रुपया असून मराठेशाहीच्या नाण्यांच्या धर्तीवर आहे. मुघल बादशाह शाहआलम दुसरा याचे नावही त्या नाण्यावर प्रथेनुसार छापलेले आहे. मात्र बडोद्याच्या राज्यकर्त्यांचे नाणे म्हणून त्यावर देवनागरीत ‘मा’ हे मानाजीराव महाराज यांचे आद्याक्षर आणि उभी छोटी तलवार/ समशेर आढळते. त्याचप्रमाणे फत्तेसिंहराव महाराज, गोविंदराव महाराज यांची चांदीची नाणीदेखील त्याच धर्तीवर पाडलेली आढळतात. गोविंदराव गायकवाड यांच्या रुपयावर त्यांच्या नावाचे आद्याक्षर ‘गो’ हे अक्षर समशेरीसोबत पर्शियन लिपीत छापलेले आहे. फत्तेसिंहराव महाराज यांच्या रुपयावरही उभी समशेर आढळून येते.

होळकर घराणे हे भारतातील इंदूर येथील संस्थानिक होते. संस्थानिक बनण्याअगोदर होळकर घराण्याचा कर्ता मल्हारराव होळकर यांनी त्यांच्या पराक्रमाच्या जोरावर मराठी सेनेमध्ये अठराव्या शतकाच्या सुरुवातीला महत्त्वाचे स्थान मिळवले. त्यांनी मराठ्यांचे वर्चस्व उत्तर भारतात प्रस्थापित करण्यात मोठा वाटा उचलला. पेशव्यांनी उत्तर भारतातील माळवा प्रांतातील व्यवस्था चोख राहवी यासाठी मल्हारराव होळकर यांना इंदूर संस्थानाची जहागीर दिली होती. दौलतीचा कारभार मोठा होता. पण त्यांचे निधन 1766 मध्ये झाले आणि अहिल्याबार्इंवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली. त्या धार्मिक होत्या. त्यांनी अयोध्या, नाशिक, द्वारका, पुष्कर, हृषीकेश, जेजुरी, पंढरपूर, गया, उदेपूर, चौंढी येथे मंदिरे बांधली. त्याशिवाय सोरटी सोमनाथ, ओंकारेश्वर, मल्लिकार्जुन, औंढानागनाथ, काशीविश्वेश्वर, विष्णुपाद, महाकाळेश्वर आदी मंदिरांचा जीर्णोद्धारही केला. वाराणसी, प्रयाग, पुणतांबे, चौंढी, नाशिक, जांब (इंदूर), त्र्यंबकेश्वर येथे नद्यांना विस्तीर्ण घाट बांधले आणि गोकर्ण महाबळेश्वर, उज्जयिनी, रामेश्‍वर, भीमाशंकर आदी ठिकाणी अन्नछत्रे उघडली. सप्तपुरे-चारधाम या ठिकाणी घाट, बाग, मंदिरे, कुंडे, धर्मशाळा बांधून यात्रिकांची सोय केली. शिवाय, त्यांनी जेजुरी येथे श्री मल्हारी गौतमेश्वराची छत्री, इंदूरला मालेराव व गौतमीबाई यांच्या छत्र्या आणि महेश्वरला मुक्ताबाई यांच्या स्मरणार्थ नाजूक कारागिरी केलेले मंदिर बांधले. होळकर यांच्या टांकसाळीतील नाण्यांवर बिल्वपत्र व शिवलिंग यांचे छाप दिसून येतात.

सचिन सुभाष भगत 9922011123 sachainbhagat1982@gmail.com

—————————————————————————————————————–

About Post Author

1 COMMENT

  1. सुंदर…
    चांगली माहिती दिली आहे. अभ्यासक म्हणून सचिन भगत यांची दृष्टी चांगली आहे. अधिक लेखन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा…
    धोंडिराम (डी डी) पाटील, बिसूर सांगली
    ९८८१२५०२५१ ९९२२४३०६८०

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here