व्यक्त होणे हे मनमोकळ्या स्वभावाचे लक्षण असते. छोट्या मुलांना आणि स्त्री-पुरुषांना अभिव्यक्तीचे व्यासपीठ निर्माण करून देणारे श्रीकांत पेटकर आणि त्यांचे बंधू किशोर यांनी त्यांच्या शेगाव बुद्रुक या गावी ‘कवितेचे घर’ची स्थापना केली आहे. कवितेच्या शब्दांना पकडून मोठी होणारी मुले, त्यांच्या सुखांना कवितेत बांधणारे स्त्री-पुरुष, स्वतः कवी नसले तरी पारंपरिक कविता, ओव्या गुणगुणणारी माणसे अशा या सर्वांच्या सर्जनशीलतेने भारलेले हे ‘कवितेचे घर’…
याबरोबर आपण जेथे राहतो, तेथे अर्धवट अशी सार्वजनिक सरकारी कामे पडलेली असतात…रस्ते नाहीत, रस्त्यावर पडलेले खड्डे-गटार नाही-इकडून तिकडे जाण्यास नीट पूल नाही-पाणी नाही अशा अनंत सरकारी गैरसोयी ! अशा वेळेस ‘किती हेलपाटे मारले, काहीच उपयोग नाही’ असे म्हणणाऱ्या लोकांपेक्षा वेगळा विचार करणारे श्रीकांत आणि किशोर पेटकर हे दोघे भाऊ. ‘आपणच त्या दुरुस्ती करू या’ असे ठरवून, कोणी तरी येऊन ते काम करेल अशी वाट न बघता, सगळे गावकरी, लहान-थोर एकत्र येऊन दुरुस्ती करतात, सुधारणा करतात. त्यांनी निर्माण केलेला अनुकरणीय असा हा ‘व्हॉट्स ॲप’वरील ‘विकास ग्रूप’! ‘सद्भावनेचे व्यासपीठ’ या सदरातील सर्व लेख वाचण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करावे.
– अपर्णा महाजन
———————————————————————————————
सर्जनशील शेगाव – कवितेचे घर आणि स्व-विकास ग्रूप असलेले
काही लोक या पृथ्वीतलावर जन्म घेतात आणि चाकोरीबद्ध जीवन जगून निघून जातात. परंतु काही लोक मात्र कुसुमाग्रजांच्या कवितेतील नाविकाप्रमाणे कोठला तरी आगळावेगळा प्रयोग करण्यात मग्न असतात. तसे लोक काही तरी अद्वितीय कार्य करत असतात. अलौकिक अशी नवनिर्मिती त्यांच्या हातून घडत असते. त्यांनी नवे प्रयोग, नव्या कल्पना, नव्या संकल्पना, नवा विचारव्यूह मनात रुजवून त्यांना कृतीत उतरवण्याचा ध्यास घेतलेला असतो. खरे म्हणजे, असे लोक नव्या नभाचे नवे क्षितिजच निर्माण करत असतात ! त्यांच्या ध्येयवेड्या कल्पना त्यांना स्वस्थ बसू देत नाहीत, ते नव्या संकल्पनेचे वेड घेऊन वावरत असतात, ते त्यांच्या मनातील त्या संकल्पनांचा अंमल करण्यासाठी त्यांचे तन-मन-धन अर्पण करत असतात. बरेच लोक त्यांचे संपूर्ण आयुष्य खर्ची घालत असतात. असाच अभिनव निर्मितीचा एक प्रयोग म्हणजे ‘विकास ग्रूप’. ‘विकास ग्रूप’ वेगवेगळे कार्य करत आहे. त्यातील एक ‘कवितेचे घर’.
ग्रूप कसा निर्माण झाला त्यातच माणसाच्या मनाची विधायकता आहे. एकदा शेगावातील नादुरुस्त पूल दुरुस्त करण्याचे काम म्हणून किशोर पेटकर यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला विचारपूस केली असता त्या कामासाठी तीन हजार रुपये इतका खर्च येईल…त्यासाठी मीटिंग, मंजुरी असे चक्र… आणि काम कधी होईल हेही निश्चित नव्हते. मग त्याच्या डोक्यात आले, त्यानेच ते कार्य केले तर ! त्यातून समविचारी तरुणांनी व्हॉट्स अॅप ग्रूप काढला. दर महिन्याला सभासदांनी शंभर रुपये काढावे. त्या रकमेतून गावाची कामे करावी असे ठरले… पहिल्याच महिन्यात सत्तर जण जमले. सात हजारांत पहिले काम पार पडले. उत्साह वाढला. अशा प्रकारची कामे नियमित करावी असेही ठरले. दरमहा प्रत्येकाने फक्त शंभर रुपये द्यावे. एकाने हिशोब ठेवावा. पाच ते दहा तारखेपर्यंत कामे ठरवावी. ठरलेली कामे दहा ते तीस तारखेपर्यंत पार पाडावी. पैसे न देणार्या सभासदाला पुढील महिन्यात ग्रूपमधून काढून टाकावे. कोणी जास्त पैसे देऊ केले, तरी ते स्वीकारायचे नाहीत. नियमित शंभर रुपये देणारे फक्त गटात घ्यावे.
ग्रूपला भरभरून प्रतिसाद मिळू लागला. बसस्थानकाची रंगरंगोटी, रस्तादुरुस्ती, रस्त्यावरील स्वच्छता, शाळेतील विद्युत-रोषणाई, कचरापेटी वाटप, ऑक्सिजन सिलेंडर खरेदी… अशी कामे होऊ लागली. ती संकल्पना बाहेरील जनतेला आवडू लागली. त्यांचा शेगाव बुद्रुक गावाशी संबंध नसतानासुद्धा तेही दरमहा शंभर रुपये देत आहेत. नागपूर, वर्धा, अमरावती, कल्याण येथूनही सभासद तयार झाले आहेत. पैसे जमा करण्यासाठी एक तारखेला चढाओढच असते. आणखी सांगायचे म्हणजे… कोणाचा वाढदिवस असेल, कोणाला काही प्रमोशन मिळाले, परीक्षेत पास झाले, तर ते ग्रूपला त्या-त्या दिवशी दोन हजार – तीन हजार – पाच हजार रुपये अशी भेट देतात ! त्यामुळे मोठ्या बजेटचीही कामे हाती घेतली जात आहेत. कल्याणच्या अक्षता नावाच्या मुलीने आमच्या या गावाशी काहीही संबंध नसताना शंभर रुपये दरमहा देण्याचे ठरवून सभासद झाली… अन् एक ग्रूपचा छानसा लोगोही बनवून दिला. शासनच सारे करेल यावर अवलंबून न राहता जनतेच्या सहभागातून कामे होत आहेत. ग्रूपला आयएसओ सर्टिफिकेटही मिळाले आहे. त्यामुळे तसे उपक्रम आजूबाजूची खेमजई, शेगाव (खुर्द), दादापूर ही गावेही करत आहेत…
शेगावच्या विकासासाठी किशोर पेटकर, नितीन वैद्य, अमोल दातारकर, भालचंद्र लोडे आणि मी असा ठरवून ‘विकास ग्रूप’ स्थापन केला. यामुळे आमचा गावाशी आणि गावाच्या मातीशी असलेला ऋणानुबंध कायम राहिला. गावातील आणि गावाबाहेर गेलेले नागरिक मासिक पैसा विकासकामांसाठी जमा करत असतात.
तशातच किशोरने त्याच्या मनात घोळत असलेल्या ‘कवितेच्या घरा’ची कल्पना मांडली. ‘कविता’ हा तर माझ्या आवडीचा प्रांत. ‘ग्रंथाली’ने माझे चार काव्यसंग्रह प्रकाशित केले आहेत. आम्ही गावात लोककवी प्रशांत मोरे यांचा ‘आईच्या कविता’, ‘बहिणाई गावोगावी’ असे गाण्याचे कार्यक्रम राबवले होते. त्यामुळे मी लगेच किशोरच्या मनातील ती कल्पना उचलून धरली. किशोरची कल्पना, माझी साथ आणि माझ्या बहीण-भावंडांचा होकार ‘कवितेचे घर’ साकार होण्यास कारणीभूत ठरला. सर्वांच्या आर्थिक सहकार्यातून आणि विकास ग्रूप शेगाव बुद्रुकच्या सौजन्याने ‘कवितेचे घर’ ही सहाशे फूटांची अभिनव वास्तू उभी राहिली आहे.
प्रत्येक व्यक्तीला व्यक्त होण्यासाठी, तिचे अनुभव कोणाला सांगण्यासाठी, तिच्या प्रतिभेला चालना देण्यासाठी… सगळ्यांसाठी एक व्यासपीठ हवे असते. तसे एक मोठे दालन चंद्रपूर जिल्ह्यातील शेगाव बुद्रुक या गावी उघडले गेले आहे ! त्या गावात ‘कवितेचे घर’ तयार करण्यात आले आहे. त्या ‘कवितेच्या घरा’त गावातील आणि त्या भागातील महिला येऊन कविता सादर करतात, ओव्या गातात. त्यातून त्यांच्या भावभावना त्या ठिकाणी मोकळ्या होतात. तर शिक्षक तेथे येऊन विद्यार्थ्यांना कविता शिकवतात. स्त्रियांच्या त्या ओवीगीतांना भावभावनांचा विविधांगी स्पर्श असतो. परंपरेने चालत आलेला अलौकिक असा सुंगध त्या लोकगीतांना येत असतो. त्या गीतांचा दरवळ समाजमनात खोलवर रुजलेला आहे. ओवीगीते गेय स्वरूपात असल्याने त्यांना रचनेची अवीट गोडी असतेच, पण आशय-सौंदर्यांच्या दृष्टीने त्या गीतांना एक वेगळेच वैशिष्ट्य प्राप्त झालेले असते. कौसल्याबाई पेटकर चौऱ्याऐंशी वर्षांच्या आहेत. त्यांच्या आवाजातील गोडवा कायम आहे. त्या त्याच घरात त्यांनी गायिलेली ओवी-गीते आठवतात.
भाऊ काय बोलला,
ये नं बहिणा बस ताटी
नार भावजय बोलली
सारा कारभार माझ्या हाती
भाऊ काय बोलला,
ये नं बहिणा पान खाऊ
नार भावजय बोलली
कात चुना कुठे पाहू?
शेगाव बुद्रुक या गावाला वैदर्भीय संस्कृती लाभली आहे. तसेच, त्याला दंडकारण्याच्या झाडी संस्कृतीचे विलोभनीय अंग लाभले आहे. त्यामुळे ‘कवितेचे घर’ हा महिलांसाठी चांगला सांस्कृतिक ठेवा झाला आहे. त्यांच्यासाठी त्या घराशी नात्यांची एक वीण तयार झाली आहे.
शब्दांशी खेळत बसतो
मग अर्थ नव्याने कळतो
‘शब्द’ शब्द मज सांगती
जरी असती ते पुराणे !
अशी शब्दांची महती गाऊन एक प्रकारे शब्दांचे महत्त्व तेथील महिला अधोरेखित करतात.
मी मला शोधतो नव्याने
मी मला गवसतो नव्याने
शोधणे गवसणे, धुंडणे
हे आनंददायी जगणे
अरे संसार संसार | जसा तवा चुल्यावर || आधी हाताले चटके | तवा मियते भाकर || ही बहिणाबाई चौधरी यांची कविता तर तेथील स्त्रिया दळण-कांडण करत असताना सतत गात असतात. त्यांना जीवनाचे दुःख कमी करण्यासाठी त्या गीतामधून विसावा मिळतो. स्त्रिया त्यांच्या ओवीगीतांतून सामूहिक अनुभूतीचा प्रत्यय आणून देतात.
हे घर म्हणजे कवितेशी संबंधित कार्यक्रमांना आणि उपक्रमांना वाहिलेली वास्तू आहे. त्या ‘कवितेच्या घरा’त मराठीतील प्रसिद्ध कवींच्या कविता त्यांच्या छायाचित्रांसह लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे कवितेचे घर पाहण्यास येणाऱ्या काव्यप्रेमींना प्रसिद्ध कवींच्या कवितांची ओळख होणार आहे. लोकांना ती कल्पना भावत आहे. अनेकांनी ‘कवितेच्या घरा’चाच विषय घेऊन कविता रचल्या आहेत. हिंदी भाषिकही त्यांच्या कविता सादर करण्याबद्दल विचारत असतात. कवितांचे दर्शन या घरात होईलच; शिवाय, आम्ही ‘कवितेच्या घरा’चे पुढील उपक्रम ठरवले आहेत. ‘विकास ग्रूप’च्या सभासदांनी त्यांचा पुढील संकल्प हा किशोरकुमार, लतादीदी, मोहम्मद रफी अशा गायकांच्या आठवणीनिमित्त गाण्याचे कार्यक्रम आयोजित करण्याचा ठरवला आहे. तसेच, हिंदी भाषेतील कवींचेही संमेलन भरवणार आहेत. घराच्या पुढे मोठा परिसर आहे. मराठी कवितेत आलेल्या विविध फुलांची झाडे तेथे लावून त्यांच्याजवळ त्या फुलांविषयीच्या मराठीतील कविता लिहिल्या जातील. त्या माध्यमातून काव्यप्रेमींना फुलांची ओळख होईल आणि फुलांची कविताही वाचण्यास मिळेल.
काव्यातील गोंधळ, ओव्या, भजन-कीर्तन, भारूड, लोकगीते, पोवाडे असे सर्व प्रकार त्या घरात सादर केले जाणार आहेत. भविष्यात, कवितांचे मोठे दालन तयार करण्यात येणार असून मराठीतील नामवंत कवींच्या कवितासंग्रहाबरोबरच नव्याने प्रकाशित होणाऱ्या कवींच्या पुस्तकांचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राच्या बाहेर कोठेही कवितासंग्रह प्रकाशित झाला, तर कवितासंग्रहाची एक प्रत ‘कवितेचे घर’, शेगाव (बुद्रुक), ता. वरोरा, जि. चंद्रपूर या पत्त्यावर पाठवण्याची विनंतीही कवींना करण्यात येत आहे.
शेगाव बुद्रुक हे ताडोबा अभयारण्यापासून अगदी जवळ आहे. ताडोबा; तसेच, आनंदवन बघण्यास येणारे पर्यटक औत्सुक्याने कवितेच्या घराकडे वळतील अशी अपेक्षा आहे.
– श्रीकांत पेटकर 9769213913 shrikantpetkar@yahoo.com
————————————————————————————————-
*कवितेच्या घराच्या पुरस्कारांसाठी कवितासंग्रह पाठविण्याचे महाराष्ट्रातील कवींना आवाहन*
*यावर्षीपासून कवितेच्या घराचे तीन पुरस्कार*
सध्या महाराष्ट्राच्या काव्यप्रांतात अतिशय चर्चेचा विषय झालेल्या कवितेच्या घराच्या उपक्रमात एक नव्या व विशेष अशा उपक्रमाची भर पडली आहे. कवितेसाठी वाहिलेल्या शेगांव ( बु ), त. वरोरा जि. चंद्रपूर येथील कवितेच्या घरात महाराष्ट्रातील कवींच्या दर्जेदार कवितासंग्रहाचा सन्मान होणार आहे. या सन्मानार्थ तीन पुस्तकांना पुरस्कार देण्यात येणार आहेत.
*कवितेच्या घराचे तीन पुरस्कार*
१ ) बापुरावजी पेटकर कवितासंग्रह पुरस्कार ( डॉ. माधुरी मानवटकर, चंद्रपूर यांच्यातर्फे ५००० रूपये रोख, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह )
२ ) बापुरावजी पेटकर गझलसंग्रह पुरस्कार ( श्रीकांत पेटकर, कल्याण यांच्यातर्फे ५००० रूपये रोख, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह )
३ ) बापुरावजी पेटकर बालकवितासंग्रह पुरस्कार ( किशोर पेटकर, नागपूर यांच्यातर्फे ५००० रूपये रोख, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह )
कवींनी दि. ०१ जानेवारी २०२२ ते ३० जुलै २०२३ या काळात प्रकाशित झालेल्या ( प्रथम आवृत्ती ) आपल्या कवितासंग्रहाच्या / गझलसंग्रहाच्या / बालकवितासंग्रहाच्या तीन प्रती *प्रा. प्रमोद नारायणे, ( कार्यवाह, कवितेचे घर ) शाहू ले आऊट, प्रियदर्शिनी महिला महाविद्यालयाजवळ, वर्धा ४४२००१* या पत्त्यावर दि. ८ ऑगष्ट २०२३ पर्यंत पाठवाव्या असे आवाहन करण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील दोन प्रसिद्ध कवींच्या / समीक्षकांच्या मार्फत कवितासंग्रहाचे परीक्षण करण्यात येईल. ८ सप्टेंबर २०२३ रोजी या पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार असून बापुरावजी पेटकर यांच्या स्मृतिदिनानिमित्य दिनांक ८ आक्टोबर २०२३ रोजी कवितेचे घर, शेगांव ( बु ), त. वरोरा, जि. चंद्रपूर येथे आयोजित कार्यक्रमात सुप्रसिद्ध साहित्यिकांच्या हस्ते हे तीनही पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
या पुरस्कारासाठी जास्तीत जास्त कवींनी आपले साहित्य पाठवावे असे आवाहन श्रीकांत पेटकर, कल्याण ९७६९२१३९१३ ( संस्थापक, कवितेचे घर ), किशोर पेटकर, नागपूर ८८०६२४७६८६ ( संकल्पनाकार, कवितेचे घर ), प्रा. प्रमोद नारायणे, वर्धा ९८५०३०९६६५ ( कार्यवाह, कवितेचे घर ) डॉ. संदीप भेले, बदलापूर ९८८१४२२४५३ ( कार्यक्रम समन्वयक, कवितेचे घर ), सूर्यकांत पाटील, वरोरा ९४२२१९१५२४ ( प्रसिद्धी प्रमुख, कवितेचे घर ) यांनी केले आहे.
एका संवेदनशील व्यक्तीने सुरू केलेले सर्व उपक्रम गौरवास्पद व अभिनंदनीय आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या अनेकांना एक चांगला वाट्याड्या मिळाल्याने गावाला छान दिशा मिळाली आहे. कवितेच्या घरामुळे अनेकांचे हात लिहिते होतील. ग्रामीण मातीचा सुगंध, स्पर्श आणि जीवन-जाणीवा असलेलं अस्सल साहित्य निर्माण होईल, असा विश्वास वाटतो. श्रीकांत पेटकरांच्या कार्याला अनेक शुभेच्छा..!
कवितेचे घर हा अतिशय स्तुत्य , नविन व आगळावेगळा असा निराळाच उपक्रम आहे. या माध्यमातुन मातृभाषा जोपासली जातेच सोबत आमच्या सारख्या नवोदीत कवींना सुद्धा संधी या ‘ कवितेच्या घरामुळे ‘ प्राप्त होते . कवींना सुद्धा माहेरी जावं हा अनुभव हे कवितेचे घर मिळवून देते.
बाहोरगावी राहून गावाकडची नाळ जुळवून ठेवणारा उपक्रम म्हणजे विकास ग्रुप ! छोटी-मोठी कामे जी 5 ते 10 हजार रूपयात होते , अशी कामे या माध्यमातुन केली जातात. गाव विकासाची शाखा म्हणजे विकास ग्रुप होय.
या दोन्ही उपक्रमासाठी पेटकर बंधुंचे मी मन:पुर्वक आभार व्यक्त करतो . ताडोबा, रामदेगी, भटाळा या स्थळांना भेट देत असाल तर मग नक्कीच ‘कवितेचे घर’ इथे सुद्धा अवश्य भेट द्या.
अतिशय सुंदर…… दुसऱ्यावर अवलंबून न राहता आपणच काम करायला सुरुवात करणे हा अतिशय उच्च विचार आणि यातूनच तयार झालेला ‘विकास ग्रुप’ खरोखरच खूपच उल्लेखनीय कामगिरी आहे !! आणि कवितेचे घर ही संकल्पनाच अतिशय वेगळी आणि खूपच छान आहे. दोन्हीही उपक्रम खूपच वेगळे….या उपक्रमांना खूप खूप शुभेच्छा !!
आधुनिक युगात स्वार्थी जगात, पेटकर बंधूनी निस्सीम,निःस्वार्थ भावाने जगाला परतफेड करण्याचे अतिशय स्तुत्य आगळावेगळे उपक्रम आहेत. शेगांव ( बु ), ता.वरोरा, जि. चंद्रपूर स्तिथ कवितेच्या घराला विदर्भाचा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे.या माध्यमातुन मातृभाषा जोपासली जातेच सोबत नवोदित कवींना सुद्धा संधी या ‘ कवितेच्या घरामुळे ‘ प्राप्त झाली आहे.एका संवेदनशील व्यक्तीने सुरू केलेले सर्व उपक्रम गौरवास्पद व अभिनंदनीय आहेत.धकधकीच्या व धावपळीच्या आधुनिक जीवनातून स्वतःचा वेळ काढून अनेकांना एक चांगली दिशा देण्याचं अनमोल कार्य पेटकर बंधू करत आहेत. कवितेच्या घरामुळे अनेकांना लिहण्याचा छंद मिळेल. ग्रामीण मातीचा सुगंध, निसर्गाच सानिध्य, स्पर्श असलेलं अस्सल साहित्य निर्माण होईल असा विश्वास आहे. ताडोबा, रामदेगी, भटाळा या स्थळांना भेट देत असाल तर मग नक्कीच ‘कवितेचे घर’ इथे सुद्धा अवश्य भेट द्या. बाहोरगावी राहून शहरी जीवन जगता जगता गावाकडची नाळ जुळवून ठेवणारा उपक्रम म्हणजे विकास ग्रुप ! दोन्हीही उपक्रम खूपच आगळे वेगळे आहेत ….या उपक्रमांना भरघोस यश प्राप्त व्हावे ही आशा बाळगतो. तसेच पेटकर बंधूच्या उपक्रमांना खूप खूप शुभेच्छा !!
स्वतःच्या गावाला, आईबाबांना प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न
स्तुत्य असा आहें.
सरकारी कचेऱ्या आणि छोट्या छोट्या कामांसाठी सतत हेलपाटे घालायला लावणारा कारभार आणि त्या सगळ्यातून आलेला मानसिक ताण हा प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी नक्कीच अनुभवला असेल..त्यापेक्षा “विकास ग्रुप”सारखे ग्रुप प्रत्येक गावात तयार झाले तर गावाच्या विकासासाठी ग्रामविकास खात्यावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही या निमित्ताने पेरे पाटिल आणि त्यांच्या पाटोदा या गावाची आठवण झाली.. शिवाय कवितेच्या घरामुळे किती तरी नवोदित कवींना हक्काचं व्यासपीठ मिळालं
दोन्हीही उपक्रमांना खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद
आता अजून नवीन एक वाढले.