भाषिणी हे भारत सरकारचे अनुवादासाठी वापरले जाणारे अॅप आहे. त्याद्वारे बावीस भारतीय भाषांत मोफत अनुवाद करता येतो. भाषिक अडथळ्यांना पार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाद्वारे सुरू आहे. त्याचे नाव राष्ट्रीय भाषा अनुवाद अभियान. भाषिणी हा त्या अभियानाचाच भाग आहे.
भाषादान हा भाषिणीचा एक भाग आहे. त्यामार्फत बावीस भारतीय भाषांसाठी ‘क्राउडसोर्स भाषा इनपुट’चा उपक्रम राबवला जात आहे. भाषाप्रेमी व्यक्तींना स्वतःची भाषा तेथे डिजिटल पद्धतीने समृद्ध करण्यासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. त्यातून माहितीचे खुल्या स्वरूपातील भांडार तयार होणार आहे. त्याचा हेतू भारताची भाषिक विविधता सक्षम करणे असा आहे. त्यासाठी एक गाणेही तयार करण्यात आले आहे. त्या गाण्यातही बावीस भाषांचा समावेश आहे.
भाषिणीचा भाषादान हा उपक्रम कसे कार्य करतो? त्याचे मुख्य घटक चार आहेत. पहिल्या घटकात बोलो इंडिया, लिखो इंडिया, सुनो इंडिया आणि देखो इंडिया अशा श्रेणी दिलेल्या आहेत. त्यांपैकी एक निवडून पुढे जाता येते. त्यासाठी इच्छुक व्यक्तीला त्या वेबसाइटवर सर्वप्रथम खाते तयार करावे लागते. व्यक्तीने ते तिचे नाव, इमेल आयडी टाकून आणि तिच्या आवडीचा पासवर्ड टाकून ‘ओके’ केले की ‘लॉगिन’चा पर्याय येतो. लॉगिन केल्यावर ‘बोलो इंडिया’ हा पर्याय दिसतो.
हे असे व्यासपीठ आहे, की जेथे व्यक्ती तिचा आवाज देऊन किंवा इतरांच्या आवाजाचे प्रमाणीकरण करून भाषा समृद्ध करू शकते. त्यासाठी सर्वप्रथम भाषा उदाहरणार्थ, मराठी निवडावी लागते. भाषेची निवड केल्यानंतर काही सर्वसामान्य टीपांची सूची दिसते. संबंधित काम करताना खबरदारी कोणती घ्यावी ते तेथे नमूद केलेले आहे; फार अवघड असे काही नाही. तेथे कार्य सुरू करण्यापूर्वी व्यक्ती जे मशीन वापरत आहे त्याचा माईक, स्पीकर तिने तपासून घ्यावा; रेकॉर्डिंग करताना ईको किंवा इतर आवाज येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. तशा आशयाच्या सूचना तेथे दिसतातच.
त्यानंतर एक वाक्य दिसते, ते रेकॉर्डिंग बटन क्लिक करून वाचायचे असते. वाक्य वाचून पूर्ण झाले की ‘सबमीट’ पर्यायावर ‘क्लिक’ करायचे. तसे दुसरे, तिसरे, चौथे आणि पाचवे अशी वाक्ये येतात. पाच वाक्ये एकापाठोपाठ एक वाचून पूर्ण केल्यावर इच्छुक व्यक्तीने तेथे केलेल्या कामगिरीबद्दल कांस्य पदक मिळते; पन्नास वाक्ये पूर्ण केल्यावर रौप्य पदक मिळते आणि दीडशे वाक्ये पूर्ण केल्यावर सुवर्ण पदक फोटो स्वरूपात मिळते.

व्यक्तीला भाषा समर्थक म्हणून तिच्या भाषेतील वाक्यांचे योगदान तिने द्यावे अथवा त्यांना प्रमाणित करावे आणि बॅज मिळवावा असा मजकूर त्या खाली दिसतो. त्याच विभागात ‘व्हॅलिडेट’ म्हणजे तपासावे हा पर्यायही दिसतो. तेथे इतरांनी ‘रेकॉर्ड’ केलेले वाक्य बरोबर आहे की चूक असे विचारले जाते.
दुसरी श्रेणी आहे, ‘सुनो इंडिया’. त्यात तेथे दिलेला ध्वनी ऐकून टाइप करून किंवा इतरांनी लिप्यंतरित केलेला मजकूर प्रमाणित करून भाषा समृद्ध करणे शक्य आहे. दुसऱ्या व्यक्तीने रेकॉर्ड केलेले वाक्य देवनागरी लिपीत लिहावे आणि ‘सबमीट’ करावे. त्यासाठीही आधी वर्णन केल्याप्रमाणे बॅज मिळू शकतात. त्यामध्येही इतरांनी केलेले लेखन तपासण्याचा पर्याय असतो. ते वाक्य बरोबर आहे की चूक असे तपासण्यास सुचवले जाते.
चौथी श्रेणी आहे, ‘देखो इंडिया’. तेथे व्यक्ती पाहत असलेला मजकूर ‘टाइप’ करता येतो किंवा इतरांनी लिहिलेल्या प्रतिमांची तपासणी करता येते. म्हणजेच एखादे वाक्य दिसते ते देवनागरीत ‘टाइप’ करायचे असते किंवा त्यातील दुसरा पर्याय म्हणजे इतरांनी केलेले काम तपासायचे असते. त्या खाली लगेचच ‘सहभागी होण्यास सुरुवात करावी’ असा मजकूर दिसतो. यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा ‘लीडर बोर्ड’ असतो.

खूप छान! अभिनंदन नितेश सर. वीस बॅज मिळाले , ” लीडर बोर्ड ” मधे सत्तरावा क्रमांक. उत्कृष्ट कामगिरी .
“भाषिणी” अँप खरोखर मस्त आहे.22 भारतीय भाषात मोफत अनुवाद. आपला देश प्रगतीपथावर चालल्याचे हे लक्षण.
मला तर हे सगळे कठीण वाटते. डोक्यावरून जाते ते.पण आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात तुमच्यासारख्या तरूण मंडळींना खूपच फायदेशीर ठरेल. तुमच्या कार्याला खूप शुभेच्छा , अनेक आशीर्वाद. पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन.
संजीवनी साव.