गोत्र आणि विवाह संबंध

0
237

प्रश्नः गोत्रांचा इतिहास काय आहे?

ऋग्वेदाच्या नवव्या मंडळात गोत्राचा उल्लेख एकशेअडतीस वेळा आला आहे. प्राचीन काळी ऋषींकडे शिकण्यास आलेले शिष्य एका गोत्राचे समजले जात. सुरुवातीला अशा ऋषींची संख्या आठ होती. त्या-त्या गोत्रातील व्यक्ती हे बहीण-भाऊ मानले जाऊ लागले. पुढे गोत्रांची संख्या वाढत गेली. गोत्रे पशुपक्ष्यांच्या व इतर नावांनी ओळखली जाऊ लागली. काही लोकांनी गोत्रे हुशारीने वाटून घेतली. अगोदर गोत्र निर्माण झाले. वर्ण नंतर आले. एक गोत्र अनेक जातींत दिसून येते. उदाहरणार्थ, ‘पुनिया’ हे गोत्र ब्राह्मण व क्षत्रिय या दोन्हींतही आढळून येते. जाट समूह हा अगोदर खालच्या वर्णात होता; परंतु आर्य समाजाच्या प्रभावामुळे तो समाज वरच्या वर्णात गेला. अशा पद्धतीने वर्ण खालीवर झालेला आढळतो. मूळ गोत्र वाढत गेले आहे.

प्रश्नः सगोत्र विवाह करण्याला वैज्ञानिक आधार काय आहे?

हिस्सार येथील विद्यापीठात महिला व बालकल्याण मंत्रालयातर्फे ‘ऑनर किलिंग’वर एक चर्चासत्र घेण्यात आले. त्यात सीनियर प्लांट ब्रीडर महावीर सिंग नरवाल यांनी असे सांगितले, की एकाच गोत्रात दोन लाख सदस्य असल्यास ते बहीण-भाऊ कसे

होऊ शकतील? त्यांच्या विधानात तथ्य आहे. सुरुवातीला, खाप पंचायतीनुसार सगोत्र विवाह हा चार व्यक्तींच्या गोत्रात वर्ज्य मानला जात असे. स्वतःचे गोत्र, आईचे गोत्र, आईच्या आईचे गोत्र व वडिलांच्या आईचे गोत्र यांपैकी कोणाचेही गोत्र समोरच्या होणाऱ्या जोडीदाराशी सारखे आल्यास लग्न रद्द केले जाई. आता, आईच्या आईचे गोत्र जे आहे त्याला सूट देण्यात आली आहे. एकाच गोत्रात लग्न केल्याने अपंगत्व येते, याला वैज्ञानिक आधार काही नाही असे अभ्यासक समजतात. एका गोत्रात कमीत कमी पन्नास लग्ने होऊन त्यांचा अभ्यास झाला तर निष्कर्ष निघू शकेल; परंतु अजून तसा अभ्यास झालेला नाही. पंजाबी, मुसलमान, पारशी अशा लोकांत जवळच्या नात्यात विवाह होतात; परंतु तसा वाईट परिणाम झाल्याचे दिसून येत नाही.

प्रश्नः मग तरीही सगोत्र विवाहाला विरोध का होतो?

खरे तर, यामागे पितृसत्ताक पद्धत कारणीभूत आहे. सगोत्र विवाह केल्याने मुलगी मिळकतीत भागीदार होऊ शकते या भीतीतून तशा विवाहास विरोध होत आहे. आपली मिळकत आपलीच राहावी, यासाठी अलिकडेच खाप पंचायतीने असा फतवा काढला आहे, की “मुलींना वडिलांची कायदेशीर मिळालेली मिळकत विकता येणार नाही.” त्यातून खाप पंचांची मानसिकता समजते. एका गोत्रात भाईचारा असतो. मिळकतीमुळे तो खराब होऊ नये अशी भावना काहींची असते; तसेच, पूर्वी कृषीप्रधान संस्कृतीमुळे एक गाव म्हणजे एक कुटुंब होते. सर्वजण एक-दुसऱ्यावर आधारलेले होते. त्यामुळे एकमेकांतील संबंध बिघडू नयेत या कारणांसाठी अंतर्गत विवाह अमान्य केले असावेत. खरे तर, विवाह हे स्त्रीला नियंत्रित करण्याचे माध्यम आहे. तिने तिच्या मर्जीने विवाह केल्याने ती भाषा, भाग, जाती-धर्म यांच्या मर्यादा तोडते. हे खाप पंचायतीला धोकादायक व संस्कृतीवरील आक्रमण वाटते. त्याच कारणासाठी ते तिच्या स्वेच्छेने होणारे विवाह अमान्य करतात.

प्रश्नः सगोत्र विवाहास कायदेशीर आधार आहे का?

मुंबई उच्च न्यायालयाने माधवराव विरूद्ध राघवेंद्रराव या केसमध्ये सगोत्र विवाहास मान्यता 1946 मध्ये दिली आहे. सगोत्र विवाहावर बंदी घालण्यासाठी हिंदू मॅरेज अॅक्टमध्ये सुधारणा करण्याची जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने 2010 मध्ये फेटाळून लावली आहे. न्या. एन. एस. धिंगरा आणि न्या. ए. के. पाठक यांच्या खंडपीठाने याचिकाकर्ते नरेश कदियान यांना न्यायालयाचा वेळ घालवल्याबद्दल दंड ठोठावण्याचा इशारा दिला. सगोत्र विवाहावर बंदी घालावी असे कोणत्या हिंदू ग्रंथात म्हटले आहे, अशी विचारणा न्यायालयाने केली असली, तरी ती चुकीची वाटते. कारण हिंदू शास्त्रात लिहिलेल्या नियमांना वर्तमान न्यायालयीन व्यवस्थेत स्थान नाही. अनेक देशांतील न्यायालयात धर्माचा हस्तक्षेप चालतो; परंतु भारतात तसे नाही. असे असतानाही सगोत्र विवाह करणाऱ्याचा जीव घेतला जातो, हे संतापजनक आहे. सगोत्र विवाह करणाऱ्यास शंभर चप्पल मारण्याचा आदेश बागपत खाप पंचायतीने एका प्रकरणात दिला आहे, हे निषेधार्ह आहे.

प्रश्नः स्वेच्छेने विवाह करणाऱ्या तरुणांकडे तुम्ही कसे बघता?

मी अगोदर म्हटल्याप्रमाणे पूर्वी गावात बलुतेदारी होती. प्रत्येकजण दुसऱ्यावर अवलंबून होता; परंतु आज आधुनिकीकरणामुळे एकमेकांवरील ते अवलंबून राहणे संपले आहे. त्यामुळे कोणी स्वेच्छेने विवाह करणार असेल, तर त्यास सर्वांनी पाठिंबा द्यायला हवा. आजचे तरुण-तरुणी प्रेम करत स्वतःचे निर्णय घेतात. त्यामुळे परिवाराचा सन्मान दुखावला जाण्याची भावना तयार होते. मग खाप पंचायत काहीतरी फर्मान काढते. म्हणजे आरमान, सन्मान व फर्मान यांचा हा मामला आहे. तरुण कुंडलीसुद्धा बघत नाहीत, जात बघत नाहीत; गोत्र तर दूरच राहिले ! जाटांच्या मुलींना दाबून ठेवले आहे. मात्र स्वच्छेने आंतरजातीय विवाह करणाऱ्यांमध्ये जाट मुलींचे प्रमाण अधिक असल्याचे मी खात्रीशीर सांगू शकतो.

आम्ही कुरुक्षेत्र विद्यापीठाचे समाजशास्त्राचे अभ्यासक प्रा. सुभाषचंद्र यांचीही भेट घेतली. त्यांनी सगोत्राची माहिती दिली. ते म्हणाले, की गोत्र हा शब्द ‘गौक्षेत्र’ या नावापासून बनला गेला. माणसाचे दोन व्यवसाय पारंपरिक राहिले आहेत – ते म्हणजे कृषी व पशुपालन. पशुपालनात गाय व बैल हे मुख्य पशू आहेत. प्रत्येक परिवारास गायी चारण्यासाठी गावातील ठरावीक क्षेत्रे राखीव असत. त्याला गोक्षेत्र म्हटले जाई. ओळखीसाठी त्याला ठरावीक नाव दिले जाई. त्यामुळे गोक्षेत्र ही त्या-त्या लोकांची ओळख बनली. लोकसंख्या वाढल्याने लोक दूर-दूरपर्यंत पसरले व त्यांच्या ओळखीसाठी गोक्षेत्राचा वापर करू लागले. पुढे त्यालाच गोत्र म्हटले जाऊ लागले. पारंपरिक पद्धतीने आलेल्या गोत्राचा अभ्यास केला, तर असे दिसते, की गोत्र हे केवळ पुरुष पिढीच्या नावाने ओळखले जाते. त्यात स्त्रीला काही स्थान दिले गेलेले नाही. एखादे लग्न झाल्यावर होणाऱ्या मुलांत आई व वडील यांचे रक्त मिसळले जाते. पुढील पिढीत तिसऱ्या गोत्रात लग्न होते. त्यामुळे त्या पिढीत आणखी एका गोत्राचे रक्त मिसळले जाते. अशा अवस्थेत प्रारंभिक पितृगोत्राचा अंश पंचवीस टक्के असतो. आणखी काही पिढ्यांनंतर ते प्रमाण पाच टक्क्यांहून कमी होत जाते. तरीही गोत्र पित्याच्याच नावाने पुढे चालले जाते ! सगोत्र विवाह केल्याने परिवाराचे, गावाचे, संपूर्ण गोत्राचे नाक कापले जाते असा गैरसमज असल्याने ‘ऑनर किलिंग’च्या घटना घडत आहेत. जी जोडपी प्रेमविवाह केल्यानंतर गावी जातात, त्यांचा जीव जाण्याचे प्रमाण अधिक आहे.

महाराष्ट्रात मामाच्या मुलाशी विवाह वाजतगाजत केला जातो. परंतु हरियाणात तसे काही झाले, तर ‘ऑनर किलिंग’ होते. भारताच्या अनेक भागांत जवळच्या काही नात्यांत विवाह केला जातो. लग्न काही समाजांत एका गोत्रात होते. लोकसंख्या वाढल्याने गोत्राचा विस्तार झाला आहे. जसे, की भारद्वाज या गोत्राचा विस्तार हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आदी राज्यांत झाला आहे.

आंतरजातीय विवाहांना सहाय्य करण्यासाठी ‘अंनिस’च्या वतीने लातूर, सांगली, कोल्हापूर, वर्धा,पुणे, सातारा येथे अंनिस कार्यकर्ते मदत केंद्रे चालवतात. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करू इच्छिणाऱ्या जोडप्यांचे समुपदेशन करून त्यांचे मोफत विवाह ‘अंनिस’च्या व्यासपीठावर लावले जातात. पाचशेपेक्षा जास्त असे विवाह ‘अंनिस’ने गेल्या तीस वर्षांत लावले आहेत.

आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांना संरक्षण देण्यासाठी ‘अंनिस’च्या वतीने कोरेगाव सातारा येथे ‘सेफ होम’ची निर्मिती केली आहे. तेथे अशी जोडपी लग्न केल्यानंतर काही दिवस राहू शकतात. विरोध मावळल्यानंतर त्यांना सोडले जाते. ‘अंनिस’च्या वतीने  तरुणाईसाठी ‘जोडीदाराची विवेकी निवड’, ‘दिल, दोस्ती, दुनियादारी’ असे अभिनव उपक्रम राबवले जातात.

अहमदनगर जिल्ह्यात ‘ऑनर किलिंग’च्या घटना खूप घडतात, म्हणून तेथे ‘अंनिस’च्या वतीने ऑगस्ट २०१४ मध्ये जातीय अत्याचार विरोधी परिषद घेतली होती.

– राहुल थोरात 9422411862 ansvarta@gmail.com

(‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती वार्तापत्र’ वार्षिक 2016 वरून उद्धृत, संपादित-संस्कारित)

—————————————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here