डेबूची साधना

0
32

आम्ही अकोल्यात ज्या मोहल्ल्यात राहत होतो; गाडगेबाबा त्या वस्तीची साफसफाई केल्यानंतर विश्रांतीच्या काळात आमच्या घरासमोर गाय दिसली म्हणून औषध घेण्यासाठी आवश्यक असलेले दूध येथे मिळेल या अंदाजाने दारात येऊन गेले. देणाऱ्याने चरवीभर देऊ केले, पण घेणाऱ्याने आवश्यक तेवढेच अर्धा कप दूध घेतले. तेही श्रम न करता घेतले नाही. आधी संपूर्ण परिसर स्वच्छ केला आणि गरजेपुरतेच दूध घेतले. तत्त्वज्ञान ही, खरे तर सांगण्याची बाबच नसावी. ते प्रत्यक्ष आचरणातून प्रकट व्हावे लागते. माझ्यासमोर घडलेल्या त्या छोट्या प्रसंगातूनही गाडगेबाबा मोठे तत्त्वज्ञान सांगून गेले होते. तेव्हा मी लहान असेन, पण त्या प्रसंगाच्या डोहात शिरतो तेव्हा ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ अशीच अवस्था अनुभवण्यास येते! चरवीभर दुधातून घोटभर दूध बाबांनी घेतले. दूध घोटभर घेऊन पोटभर आशीर्वाद तर त्या महात्म्याने दिले असणारच. त्यातील चिमूटभर का होईना, आशीर्वाद माझ्याही वाट्याला आला असेल. त्या फकिराची चिमूटभर फकिरी वृत्ती आशीर्वादात मला मिळाली असेल का?

डेबू जानोरकर ते गाडगे महाराज हा या माणसाचा प्रवास न्याहाळला तरी थक्क व्हायला होते. संसारातून मन विरक्त झाले. ते घरदार सोडून जंगलात गेले. त्यांनी बारा वर्षे घनघोर तपश्चर्या केली. षडरिपूंवर विजय मिळवला. त्यांना ‘साधने’च्या काळात काही साक्षात्कार झाला, ज्ञानप्राप्ती झाली. देव प्रसन्न झाला इत्यादी इत्यादी. खूप गोष्टी ऐकलेल्या-वाचलेल्या आहेत. त्यात डेबू जानोरकरची कथा वेगळी, पण तेवढीच अद्भुत व थक्क करणारी वाटते.

डेबूही विरक्त होऊन 1905 साली घरदार सोडतो. पण तो जंगलात जात नाही. तर तब्बल बारा वर्षे म्हणजे 1917 पर्यंत ‘माणसांच्या जंगला’तच तपश्चर्या करतो! डेबू जानोरकर हा साधक वेगळा; त्याची तपश्चर्या वेगळी आणि त्याची साधना तर एकदम जगावेगळी. षडरिपूंवर विजय मिळवण्यासाठी रोज स्वतः इतरांकडून अपमान करून घ्यायचा, समोरच्याकडून शिव्या खायच्या, समोरचा देत नसेल तर त्याला त्या देण्यास भाग पाडायचे, मार खायचा- तो सहजासहजी मिळत नसेल तर समोरच्याला असे काही उत्तेजित करायचे, की त्याने डेबूला बदडून काढलेच पाहिजे. डेबूजीने त्यासाठी नाना युक्त्या, क्लृप्त्या करायच्या. रोज पायी भटकंती, रोज नवीन गावे, मिळेल तेथे निवारा, अंथरायला जमीन आणि पांघरायला आकाश ! दिवसभर कोणाची लाकडे फोड, कोणाचे वावर निंदून दे, कोणाचे भारे उचलू लाग, कोणाला कुंपणासाठी काटे तोडून दे, धांड्याच्या पेढ्यांचा ढीग रचून दे अशी कष्टाची कामे करायची. पण त्याचा मोबदला मात्र घ्यायचा नाही! तेवढेच नव्हे, तर त्याने केलेल्या कष्टाबद्दल तारीफ ऐकण्यासाठीही तेथे थांबायचे नाही. त्याने मोबदला घेण्याच्या वेळेस व कौतुकाचे दोन शब्द ऐकण्याच्या वेळेस तेथून शिताफीने पसार व्हायचे व कोणीतरी, कोठेतरी शेतात शिदोरी सोडून खात असला तर त्याच्या तोंडासमोर उभे राहायचे. त्याला दया येऊन कोणी भुकेला दिसतो म्हणून त्याने डेबूला त्याच्या शिदोरीतील पाव चतकोर किंवा अर्धकोर भाकर द्यावी. डेबूने म्हणावे, ‘बस एवढीच! यानं पोट भरंन काजी?’ देणाऱ्याने मिश्कीलपणे विचारावे, ‘मंग अजून किती देवू?’ डेबूने म्हणावं, ‘देऊन द्यान आहे तेवढी.’ त्यावरही राग आवरत देणाऱ्याने विचारावे ‘मंग मी काय खावू? उपाशी राहू?’ त्यावर डेबूने निर्विकारपणे म्हणावे, ‘रायना उपाशी. एका दिवसाच्या उपासानं माणसं मरते थोडीच.’ त्यावर देणाऱ्यासमोर एकतर शिव्याशाप देणे किंवा डेबूला बदडून काढणे याशिवाय दुसरा पर्यायच नसायचा. पण त्या दिवसापुरती का होईना, डेबूची ‘साधना’ मात्र होऊन जायची.

डेबूची भटकंती सुरू आहे. या गावावरून त्या गावाला. डेबू पायी चालला आहे. त्याच दिशेने एक रिकामी बैलबंडीही जात आहे. बैलबंडीवाल्याला तो ज्या दिशेने जात आहे, त्याच दिशेने बराच वेळ झाला एक फाटक्यातुटक्या कपड्यातला माणूस बैलबंडीच्या मागे मागे पायी पायी येत आहे असे म्हटल्यावर दया येते. तो डेबूला विचारतो, ‘अरे, कोणत्या गावाला चाललास?’ डेबू गावाचे नाव सांगतो. बैलबंडीवाला म्हणतो, ‘अरे वेड्या, बस ना मग बैलबंडीत. मीही त्याच गावी जात आहे. पायी कशाला चालतोस?’ डेबूने बैलबंडीत बसावे ना सरळ सरळ? मग डेबूची ‘साधना’ किंवा ‘तप’ कसे झाले असते? साधकाला साधनेचे साधन मिळाले असते ना? डेबू विचारतो, ‘खरंच बसू का जी गाडीत?’ ‘अरे, खरंच बस’, बैलबंडीवाला म्हणतो. ‘पण तुम्ही खाली उतरल्याशिवाय मी कसा बसू जी?’ बैलबंडीवाला त्या प्रश्नावर चक्रावतो आणि विचारतो, ‘कावून रे, माही काई अडचण होते काय तुले?’ ‘नाहीजी मले काय अडचण होईन तुमची? पण बैलाले होईना जी. त्याला आपल्या दोघांचा भार तोलणार नाही. म्हणून मी काय म्हणतो, तुमी खाली उतरा, मी गाडीत बसतो.’ यावर गाडीवाल्याने काय करावे? डेबूला अपेक्षित तेच त्याने करावे. गाडीवाल्याने संतप्त व्हावे. डेबूला भरपूर शिव्याशाप द्याव्यात. अंगावर धावून जावे. वेळप्रसंगी डेबूला बदडून काढावे. त्या शिवाय डेबूने त्याच्यासमोर दुसरा पर्यायच ठेवलेला नसतो. तपसाधनेची ही जगावेगळी पद्धत डेबू जानोरकरने कशी व कोठून शोधून काढली असेल?

अखंड बारा वर्षे रोज कोणाच्या तरी शिव्याशाप खायचे, स्वतःचा अपमान जाणीवपूर्वक करून घ्यायचा, प्रसंगी मार खाण्याचे प्रसंग स्वतःच निर्माण करायचे व स्वतः मार ओढवून घ्यायचा आणि समोरच्याचा पोटभर मार खायचा हे ‘व्रत’ डेबू जानोरकर या ‘साधका’ने कठोरपणे पाळले. ते व्रत पाळायचे तर त्यासाठी नव नवीन ‘फंडे’ शोधणे हा डेबूच्या ‘साधने’चा भाग होतो ना?

पाणी प्यायच्या निमित्ताने डेबू कोणाच्या तरी वावरात घुसायचा. हाक द्यायचा ‘कोणी हाय काजी वावरात?’ हाकेला प्रतिसाद यायचा, ‘कोण हाय रे? काय पायजे?’ डेबू उत्तर द्यायचा, ‘काय नाय जी. पाणी प्यायचं हायजी.’ समोरच्याने म्हणायचे, ‘अरे राजा, तू विहिरीजवळच तं उभा हाय. तेथेच दोर आहे, बादली आहे. काढ विहिरीतलं आणि पे पानी. काय आयतंच पायजे?’ ‘नाय जी.’ असे म्हणत डेबूने विहिरीतील पाणी काढायचे आणि प्यायचे. निघता निघता समोरच्याला म्हणायचे, ‘काजी आता ही तुमची विहीर बाटली असंन नाजी?’ काहीच न समजून समोरच्याने विचारावे, ‘विहीर काऊन बाटली असंन रे?’ डेबूनेही तेवढ्याच निर्विकाराने म्हणायचे, ‘त्याचं काय हाय ना, मी म्हार हाय ना जी.’ डेबूला पाण्यासोबत आता ‘फ्री’ शिव्या असायच्या आणि वेळप्रसंगी मार ‘बोनस’च्या रूपात. डेबूची ‘तहान’तर भागायचीच, वर त्याची ‘व्रतपूर्ती’ही साधून जायची- ‘टू-इन-वन.’

डेबू जानोरकर यांच्या बारा वर्षांच्या अखंड साधनेत वणवण पायी भटकंती सोबतच रेल्वेचा प्रवासही आहे. अपमान, शिव्या, मार खाणे हे ओढवून घ्यायचे म्हटल्यावर रेल्वेचा ‘फुकटाचा’ प्रवास तर सर्वोत्तमच! एका प्रवासात डेबूचा ‘प्रवास’ सुरू असतानाच टीसी येतो. डेबूकडे तिकिट मागतो. तिकिट असण्याचा तर प्रश्नच नसतो. टीसी त्याला शिव्या देतो, मारतो आणि अक्षरश: लाथ मारून गाडी खाली फेकतो. डेबू आडवातिडवा प्लॅटफॉर्मवर पडतो. एवढा सर्व तमाशा झाल्यानंतर कोण त्या गाडीत बसेल? आणि समजा, त्या गाडीतही बसायचे झाले तरी ज्या डब्ब्यात सर्व प्रवाशांसमोर अपमान झाला, शिव्या खाल्ल्या, मार खाल्ला तो डबा सोडून दुसऱ्या डब्ब्यात बसावे! हे सामान्य माणसाने केले असते. पण हा माणूस सामान्य दिसत असला तरी तो सामान्य थोडाच होता? हा विनातिकिट डेबू जानोरकर गाडगे महाराज बनण्याच्या खडतर प्रवासाला निघाला होता ना!

डेबू परत त्याच डब्यात जाऊन बसतो. सर्व प्रवासी त्याच्याकडे पाहतात. त्यांच्या ‘नजरा’ कशा असतील त्याची कल्पना वाचक करू शकतो. तरीही त्यांतील एका प्रवाशाला दया येते. तो त्याच्याजवळ जाऊन म्हणतो, ‘किती शिव्या खाशील? किती मार खाशील? किती अपमान करवून घेशील? आमच्याच्याने बघवत नव्हतं रे आणि आता परत तू विनातिकिटच डब्ब्यात चढलास?’ तो माणूस खिशात हात घालून पैसे काढतो आणि डेबूच्या हातात बळजबरीने कोंबत म्हणतो, ‘जा बाबा, जा. गाडी सुटायला अजून वेळ आहे. जा लवकर आणि तिकिट काढून ये.’ तो अजीजीला आलेला असतो. डेबू शांतपणे ते पैसे परत करतो आणि म्हणतो, ‘बाबा, टीसीच्या एका लाथेने माहा शंभर मईलाचा प्रवास होवून गेला ना जी.’

आम्ही डेबू जानोरकरचा हा प्रवास ना कधी समजून घेतला, ना कधी त्याची गांभीर्याने दखल घेतली. ‘गाडगे महाराजांचा’ जन्म कालांतराने झाला आणि डेबू जानोरकरचा मृत्यू. गाडगे महाराज कधी स्वतःहून डेबूबद्दल बोलण्याची शक्यता नव्हती आणि डेबूला काही विचारावे तर डेबू होताच कोठे काही सांगण्याला? गाडगे महाराजांच्या सहवासात आलेल्यांनी महाराजांची पाठ नेटाने धरली असती, त्यांनी बारा वर्षांच्या त्या कालखंडात कशी, कोठे-कोठे भ्रमंती केली याची माहिती करून घेतली असती, तर डेबूच्या प्रवासाचा ‘नकाशा’ बनवता आला असता आणि त्या नकाशाचा माग काढत ‘डेबूचा’ थांग लावता आला असता. पण दुर्दैवाने तसे झाले नाही. कोणालाही तसे वाटले नाही आणि डेबू काळाच्या अंधारकोठडीतच बहुतांश गडप झाला. गाडगे महाराज यांच्या तोंडून जो काही डेबू झिरपला असेल व सांगोवांगी लोकांनी सांगितला असेल, तेवढाच डेबू आमच्या वाट्याला आला. हे शल्य कायमस्वरूपी टोचत असते आणि ती वेदना ठसठसतही राहते. दुर्भाग्य आपले! दुसरे काय?

‘मी कोणाचा गुरू नाही आणि माह्या कोणी शिष्य नाही’ असे म्हणणाऱ्या गाडगे महाराजांची आठवण गुरुपौर्णिमेच्या दिवशी मित्राकडे पुरणपोळीचे जेवण जेवताना झाली. डेबूच्या अखंड तपसाधनेतीलच एक किस्सा त्या वेळेस आठवला. गावचा श्रीमंत जमीनदार जेवण करत आहे आणि त्याच वेळेस डेबू आवाज देत आहे. ‘वाढ वो माय भाकर तुकडा’. घरची मालकीण लगबगीने येऊन त्याला वाढू लागते. डेबू अन्नाकडे पाहत विचारतो, ‘काय व्हय वो? मी हे नाय खात. मले पुरण पोयी पाहिजे, तेही तूप लावून. मालक जसा खाऊन राह्यला तशीच.’ तंत्र तेच, मार खायचे. डेबूने ‘टायमिंग’ही अचूक साधले आहे. दारावर आलेल्या भिकाऱ्याची भाषा व मागणी ऐकून मालकीण आश्चर्यचकित होते, तर जेवणाच्या ताटावर बसलेला मालक ते ऐकून रागाने लालबुंद होत भरल्या ताटावरून उठतो. काठी हातात घेतो आणि त्याच काठीने डेबूला मारत सुटतो. ‘तुला तूप लावून पुरणपोळी पाहिजे? ही घे पुरणपोळी. अजून पाहिजे? घे पुरणपोळी. त्याच्यावर तूप पाहिजे? हे घे तूप. माजले साले भिकारी. म्हणे, तूप लावून पुरणपोळी पाहिजे.’ असे बडबडतच तो डेबूला बदडबदड बडवतो. अखेर तो थकतो पण डेबू थकत नाही, तो निमूटपणे मार खातो.

रात्रीच्या वेळेस डेबू कोठेतरी खडकावर बसला आहे. काटेरी काठीने मार खाल्लेला असल्यामुळे रक्ताळलेल्या शरीरातील एकेक काटा काढत आहे. त्याच वेळेस कोणीतरी तेथून जात असतो, ‘अरे, काय करून राहिला रे?’ डेबू उत्तर देतो, ‘काही ना जी, मालकाने दिलेली पुरणपोळी तुपासंग खातो नां जी.’ मित्राच्या घरी पुरणपोळी खात असताना हा किस्सा आठवला आणि डोळ्यांत पाणी आले. मित्राने घाबरून विचारले, ‘काय झालं?’ त्याला काय सांगणार? म्हणालो, ‘अरे पुरणपोळी गरम होती, जांभाळ्याला चिकटली. म्हणून डोळ्यांत पाणी आलं!’

डेबूची पुरणपोळी जेव्हा जेव्हा आठवते, जांभाळ्याला चिकटतेच आणि डोळ्यांतून पाणी काढते. डेबूसारखी माणसे कोण्या हाडामासाची बनली होती? महात्मा गांधी यांच्याबाबत आईन्स्टाईनने म्हटले होते, ‘गांधीसारखा हाडामासाचा माणूस होऊन गेला यावरच पुढील पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत.’ गाडगेबाबांबद्दलही आपण यापेक्षा वेगळे काय म्हणू शकतो? पण मी हा हाडामासाचा माणूस पाहिला होता, म्हणून कदाचित मी तसे म्हणणार नाही!

– चंद्रकांत वानडे 9822587842

(‘महाराष्ट्र टाईम्स’वरून उद्धृत, संस्कारित)

———————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here