वसईच्या एकूण लोकसमुदायामध्ये घाटी म्हणजे देशावरील माणसे बहुत आहेत. तशी पंचवीस हजारांपेक्षा जास्त कुटुंबे त्या भागात असावीत असा अंदाज आहे. ते लोक मुख्यत: सातारा जिल्ह्याच्या माणदेशातील आहेत. ते गेल्या दोन-तीन शतकांपासून तेथे वास्तव्यास येत गेलेले आहेत. ते लोक मेंढपाळ म्हणून भटकंती करत ठाणे जिल्ह्यामध्ये प्रथम आले व पुढे येऊन वसईत स्थिरावले. वसई ही त्यांच्या पारंपरिक लोकगीतांमध्ये वत्सापूर, बांदुपुरा, बहादुरपुरा, गुलछनाबाद आणि बाजीपूर अशा नावांनी आलेली दिसते.
“वत्सापूर गावा जाया | मला प्रसंग पडला | सयांनो किती सांगू | बया माझी लहिनीच्या कडला |”
वसई या शब्दाची व्युत्पत्ती ‘वस्’ या मूळ संस्कृत धातूपासून झालेली आहे. ‘वस्’ याचा अर्थ राहणे, वस्ती करणे किंवा आधार देणे. माणदेशातील अनेक लोक हे निमभटके. त्यांतील काही लोकांनी त्यांच्या भटकंतीत सुरुवातीला तात्पुरती आणि कालांतराने कायमची वस्ती वसई या ऐतिहासिक नगरीत केली व ‘वसई’ हे मूळ नाव एका परीने सार्थ केले ! ग्रामीण व खेडवळ असे ते अशिक्षित लोक शंभुमहादेव डोंगररांगेतील दुष्काळग्रस्त भागातून उदरनिर्वाहासाठी आणि शेळ्या-मेंढ्यांच्या चारापाण्याच्या शोधार्थ दोन पर्वत पालथे घालून कोकणभूमीत आले. त्या लोकांना ‘घाटी’ या नावाने संबोधले गेले !
शिंग्रोबा धनगर हे मुंबई-पुणे यांना जोडणाऱ्या खंडाळा घाटाचे जनक. त्या मेंढपाळ वंशाच्या काही पिढ्या शतक-दोन शतके पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यातील दुर्गम वनाच्छादित भागात शेळ्या-मेंढ्यांमागे भटकंती करून जीवन जगत होत्या. ते लोक पूर्व पट्ट्यातील जव्हार, मोखाडा, शहापूर, वाडा, तलासरी या भागांत मेंढ्या चारण्याबरोबर डोंगर फोडून मातीचे काम करत. तेच लोक पुढे पश्चिम पट्ट्यातील भिवंडी, वसई, बोईसर, डहाणू, पालघर या प्रदेशांकडे सरकले. तेथे त्यांना अधिक सुसंस्कृत अशी मानवी वस्ती आढळली. त्या भागात विकासाचे वारे आणि शहरीकरणाची हवा अधिक होती व ती झपाट्याने वाढलीही. त्यामुळे त्यांचा मेंढपाळ व्यवसाय कमी होत गेला.
त्यांना आरंभी वसई कुळवाड्यांच्या शेतांमध्ये शेतीची कामे करण्याचा पर्याय उपलब्ध झाला. वसई परिसरातील पानवेली, केळी, नारळ, सुपारी, पोफळी, भातशेती आणि ताडीमाडीची झाडे यांची मशागत हा त्यांचा चरितार्थ बनला. मेंढपाळ लोक शिक्षित नव्हते आणि आदिम जमातीच्या बुजरेपणाच्या खुणा त्या लोकसमुदायामध्ये दिसून येत होत्या. परंतु त्यांनी काळानुरूप बदलत नवनव्या व्यावसायिक क्षेत्रांशी जुळवून घेतले. त्यांना अकुशल स्वरूपात असणारी कामे सहज उपलब्ध झाल्याने त्यांनी वसईत राहणे पसंत केले असावे. ते सद्यकाळातही मुंबईच्या विविध भागांमध्ये व्यवसाय आणि नोकरी या निमित्तांनी जात असले तरी त्यांची राहण्यासाठी पसंती वसई ही अधिक असते. माणदेशातून मुंबई-कोकण प्रदेशात स्थलांतरित होऊन आलेल्या लोकसंख्येमध्ये सर्वाधिक लोकसंख्या ही वसई-विरार परिसरात आढळून येते.
मुकादम ही संकल्पना मानवी स्थलांतराच्या प्रक्रियेत कामाच्या रगाड्यातून रूजू झाली. मुकादम हे माणसे ‘खंडी’ने किंवा मजुरीने माणदेशच्या दोन-तीन तालुक्यांतील दुष्काळग्रस्त भागांतून आणत. ते त्यांच्या मार्फत वसईच्या परिसरात विविध प्रकारची कामे कधी कंत्राटाने तर कधी मजुरीसाठी माणसे पुरवून करत असत. अजूनही मुकादम हा वसई-विरार परिसरात मेंढपाळ जमातीचा आधारस्तंभ असतो. मुकादम दिवसभर भटकंती करून माणसांना उद्याच्या कामाची सोय लावून देत असतो. मुकादम एके काळी ख्रिश्चन किंवा वाडवळ यांच्या ओसरीला राहून, येणाऱ्या मजुरीची रक्कम जगन्नाथ वर्तक, पद्मन सेठ अशांकडे विश्वासाने ठेवून सहा महिन्यांनंतर, ‘घरी’ म्हणजे माणदेशी जाताना मागून घेत. वस्त्या वस्त्यांत असे प्रामाणिक शेतकरी होते. ते स्थलांतरितांच्या रक्कमा सांभाळून ठेवत. ते दयाळू सावकारच म्हणायचे ! माणदेशातून आलेल्या मुकादमांना वसईत त्यांची आडनावे किंवा गावे यांवरून न ओळखता त्यांच्या नावापुढे घाटी हे विशेषण वापरले जाते. माझे आजोबा सुदामा इरकर हे वसई परिसरात सुदामा घाटी तर वडील दिनकर हे दिन्या घाटी आणि मला दिन्या घाट्याचा मुलगा महाद्या घाटी या नावाने ओळखले जात असे. ती पद्धत काही प्रमाणात अजूनही देवाळा, गिरीज, रानगाव, भालोडी, कर्जोडी, खालघर लोणी, दळवाडी भागात चालू असलेली दिसते.
मेंढपाळ लोकांनी त्या भागात सर्वात महत्त्वाचे काम केले, ते म्हणजे वसईच्या जलस्रोतांचा प्रमुख आधार असणारी आणि नामशेष होऊ लागलेली अवाढव्य अशी बावखल व्यवस्था जपण्यास मदत हे होय. ते कष्ट करत असताना त्यांनी गायलेल्या ‘भलरी’ गाण्यांमुळे त्यांची ती कामगिरी विशेष नजरेत भरते. घाटी लोकांची ‘भलरी’ बावखल खोदताना आणि बावखलातील गाळ काढताना कुळवाड्यांचे लक्ष वेधून घेई. ‘भलरी गड्या भलरीऽऽ ऽ’ असा आवाज बावखल असलेल्या शेतीच्या परिसरात दुमदुमून जात असे. भलरी लोकगीते ही घाटी लोकसंस्कृतीने वसईच्या लोकसाहित्यामध्ये टाकलेली आगळीवेगळी भर आहे. घाटी लोकांनी बावड्या खोदणे, जुन्या घरांची कामे आणि शेतीवाडीची कामे करून वाडवळ, भंडारी, ख्रिश्चन, आदिवासी, कोळी, कुणबी, आगरी अशा स्थानिक लोकांशी ऋणानुबंध निर्माण केले. त्यांनी त्यांचे ‘विंचवाच्या पाठीवरील बिऱ्हाड’ स्थानिकांच्या ओसरीला व मोकळ्या खेचरांत मांडून तीन दगडांच्या चुलीवरील संसार केला. त्यांनी स्थानिक लोकसंस्कृती, लोकजीवन व निसर्ग यांच्याशी जुळवून घेतले. दर्याराजाला दंडवत घालून प्रामाणिक जीवन जगू देण्याची प्रार्थना केली. त्याचा गमतीदार परिणाम म्हणजे वसईतील कामधंदा संपवून, उतारवयात पुन्हा मूळ गावाकडे जाऊन स्थायिक झालेल्या लोकांच्या जीवनशैलीत आणि त्यांच्या बोलीभाषेवर वसईतील विविध जातीजमातींचा प्रभाव जाणवतो. उदाहरणार्थ तुळसाबाई ही वसईतील होळीची हेलकरीण. होळी या गावी पाने, नारळ आणि भाजीपाला यांचे मोठे मार्केट आहे. तुळसाबाई तेथे पानांच्या व भाजीपाल्याच्या पाट्या डोक्यावरून भल्या पहाटे वाहून न्यायची. घाटी लोकसंस्कृतीच्या तुळसाबाईसारख्या स्त्रियांना होळीवरील हेलकरणी असे म्हणतात. तर तशी तुळसाबाईसारखी आजी तिच्या बोलीभाषेमध्ये ख्रिश्चन आणि वाडवळी जमातीच्या बोलीभाषांतील शब्दांचा आणि लयीचा सहज वापर करते आणि म्हणते, ‘गंव कटे सालली? तुआ पानाआं हेल मिळेन का माना’. तसेच, वसईच्या लोकसंस्कृतीमध्येही अस्सल माणदेशी बोलीभाषेचा हेल आणि जीवन यांचा प्रभाव जाणवतो. वसईतील कुळवाडी विनोदाने का होईना, “काय रे गड्या ! कुणीकडे निघालास व्हय. गावाकडं निघालास, व्हय?” असा हेल आणि सूर काढून माणदेशी बोलीत बोलण्यास सुरुवात करतात.
माणदेशातील घाटी लोकांच्या जीवनात वसईतील इंग्रजी शिक्षणाच्या प्रभावामुळे झालेला बदल लोकगीतातून सांगताना स्त्री म्हणते,
“शिका शिका वसईतील इंग्रजी शिका
अस्सल माणदेशी मायीला लवकर मुका
इंग्रजी मडम आली आमच्या वसईच्या देशात
पोरगं चड्डी घालून सुट्टीत हिंडतंय गावाकडं वेड्याच्या वेशात”
देशावरून आलेल्या लोकसंस्कृतीला घाटी का म्हणतात? यासाठी तीन वेगवेगळी कारणे सुचवली जातात-
एक – घाटी हा शब्द ‘घंटा’ या भौतिक वस्तूला पर्याय म्हणून वापरला जातो. ती घंटा जर देवळात किंवा पशूच्या गळ्यात बांधली तर तिला ‘घाटी’ असे म्हणतात. घंटा ही एकाच वेळी परमेश्वराची आराधना करण्यासाठी आणि जनावरे आकर्षक दिसण्यासाठी वापरली जाते. तो शब्द ‘घाटी’ असा विविधार्थांनी प्रातिनिधीक बनून वसई परिसरात मेंढपाळ लोकसमुदायाला वापरला जातो. त्याच ‘घाटी’ समाजाने वसई परिसरात येऊन, कष्टप्रद कामे करून त्या परिसराचा भौतिक विकास साधला आहे व स्वत:स नावलौकिक मिळवला आहे.
दोन – माणदेश हा घाटमाथ्यावरील पठारी प्रदेश आहे. तो प्रदेश घाटरस्त्यांद्वारा ओलांडून ती जमात वसई परिसरात आली. म्हणून घाटावरील लोक म्हणजे घाटी लोक असे संबोधले गेले असावे.
“वसई देशा जाया | जीव माझा दुगद्यात |
भरताराला किती सांगू | गाडी खंडाळ्या बोगद्यात |
वसई गावा जाती | माझा मुलुख पठारी घाट |
धन्याला किती सांगू । दोन्ही डोंगराची वाट |”
त्यामागील कारणमीमांसेला आध्यात्मिक डूबदेखील दिली जाते. ती अशी, की त्या जमातीचे लोकदैवत हे शिवस्वरूप असून त्याने पृथ्वीवर मानवसृष्टीला त्रास देणाऱ्या दैत्यांचा संहार केलेला आहे. त्यामुळे ती जमात कोकण किनारपट्टीवरील दैत्यकुळातील राक्षसांचा संहार करण्यासाठी जणू त्या परिसरात आलेली असावी !
तीन – वसईतील घाटी लोकसंस्कृतीबद्दल तिसरा, अगदी वेगळा मतप्रवाह असा आहे, की ती जमात तिचे दैनंदिन जीवन येशू ख्रिस्ताच्या चर्चच्या घाटावर (घंटेच्या नादावर/आवाजावर) जगत होती. चर्चच्या घंटा पहाटे पाच, दुपारी बारा चाळीस आणि संध्याकाळी सात वाजता होत. चर्चवर टांगलेल्या त्या घंटेला वाडवळी ख्रिस्ती बोलीभाषेत देवळाचा घाट म्हणतात. येशूच्या पवित्र चर्चमधून वाजवल्या जाणाऱ्या घाटानुसार त्यांची दैनंदिनी नव्या ठिकाणी ठरवली जाई. त्यांचा दिनक्रम घंटेवर म्हणजे तिच्या आवाजावर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत होऊन गेला. म्हणून ती जमात ‘घाटी’ या नावाने ओळखली जात असावी ! या संदर्भात आणखी एक वेगळी नोंद म्हणजे – येशू हा मेंढ्या पालन करणाऱ्या यहुदी समाजात जन्मास आला होता. घाटी लोकसंस्कृतीमध्ये मेंढ्या पाळणाऱ्या यहुदी समाजातील येशू आणि मरिया माता यांच्याविषयी ते त्यांच्या पूर्वजांपैकी एक असावेत अशी समजूत आणि विश्वास झालेले आढळतात.
“भर दुपारी देवळा । येशु माझा वाजवितो घाट
धन्याला किती सांगू । थांबव टिकाव फावड्याची गाठ
वसईच्या गावी जाया मला प्रसंग पडला
देवळीच्या येशूने मला आधार दिला”
शेतशिवारात कित्येक पिढ्यांपासून मातीकाम करणारी ही ‘घाटी’ माणसे अत्याधुनिक बनलेल्या वसई-विरारच्या शहरीकरणाची साक्षीदार आहेत. त्यांनी त्यांचा उदरनिर्वाह वसई-विरार परिसरात विविध कष्टप्रद कामे करून चालवला आहे व गावाकडे राहणाऱ्या त्यांच्या माणसांना पैसा पुरवला आहे. वसईतील कामाचा पैसा काही सुखाचा नाही, त्यासाठी हाडाची काडे करावी लागतात हे ‘घाटी’ लोकांना माहीत आहे. स्त्री वसईच्या कामाविषयी लोकगीतातून सांगते,
“वसई शहरांमध्ये पैसा नाही फुकाचा
हिरी डोबरं खोदताना घाम गळतो लाखाचा
वसई शहरांमध्ये पैसा नाही झाडाला
मातीचे खड्डे खोदताना पीळ पडतो हाडाला
वसई शहरांमध्ये पैसा नाही सुखाचा
स्लॅप भरताना कांडका पडतो हाताचा
वसई शहरांमध्ये पैसा नाही सुखाचा
सयानो किती सांगू धनी गेला लाख मोलाचा”
वसईतील कष्टाची अवघड कामे करत असताना, इमारतीवरून माणसे पडून त्यांचा लाखमोलाचा जीव गेल्याची जाणीव या लोकगीतात दिसून येते. त्यांची जीवनशैली साधी, सरळ आणि निसर्गाशी जवळीक असणारी अशी आहे. ती शैली कृत्रिमपणा, साजसजा (आकर्षकपणा, दिखाऊपणा) यांपासून म्हणजे शहरी संस्कृतीपासून दूर आहे. त्यांनी त्यांच्या कला, गीते, कथा, विधी, प्रथा, श्रद्धा, समजुती असे जीवनाचे विविध पैलू वसईतदेखील जोपासलेले दिसून येतात. खेडूत माणदेशी बोलीभाषेचा ढंग त्यांच्या बोलण्यामध्ये, कित्येक पिढ्या वसईत राहून आणि शिक्षित असूनसुद्धा राखला गेलेला दिसून येतो.
घाटी जनतेच्या उदरनिर्वाहाच्या साधनांमध्ये बदल टप्प्याटप्प्याने जगव्यवहारानुसार होत गेलेले आहेत. ते लोक मातीकामगार, हातगाडीवर हमाल, चारचाकी छोट्या टेम्पोचे चालक येथपासून ते अत्याधुनिक वाहनचालकांपर्यंत विविध कामे करत आलेले आहेत. होळी या मार्केटच्या ठिकाणी भाजीपाल्याच्या गोणी व पाट्या हेल काढत वाहणारे घाटी लोक स्वत: भाजीपाल्याचा आणि फळांचा व्यापार करून संपन्न होऊ पाहत आहेत. घाटी लोक आरंभी कुळवाड्यांच्या जुन्या घराच्या ओसरीला आणि खाचरात राहत होते. ते मृग नक्षत्राच्या पहिल्या पावसाच्या थेंबाबरोबर मुकादमांकडून हिशोब संपवून गावाकडे शेती कसण्यासाठी जात असत. ते लोक पुढे पावसाळ्यातही वसई परिसरात राहू लागले. त्यांनी बांबू आणि शेण यांपासून बनवलेल्या कुडाच्या खोल्यांत आरंभी आसरा घेतला. नंतर त्यांनी वसई-विरार परिसरात जमिनी खरेदी करून, त्यांच्या मालकीची टुमदार घरे बांधली आहेत. नोकरीचाकरी करणारे घाटी लोक अलिशान इमारतींमध्ये घरे खरेदी करून राहत आहेत. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणाचे महत्त्व आणि गांभीर्य ओळखून गावाकडे शिकणारी त्यांची मुले वसईत आणि मुंबई शहरांत आणलेली आहेत. घाटी माणसे शिक्षणाच्या प्रवाहात आली आहेत. सर्व सुशिक्षित मातीकामगारांना त्यांच्या मुलांना शिकवावे असे वाटू लागले-
“मातीवाल्या परास साळवाल्याला लय सुख अनंता माझा राघु खोपटात वाची बुक”.
त्यांचा हा विकास स्थानिक कोळी, वाडवळी व ख्रिश्चन समाजाच्या आधाराने झाला आहे. माझ्यासारखा बालपणी वडिलांचे छत्र हरपलेला मुलगा मातीकामगार ते विद्यावाचस्पती आणि व्याख्याता म्हणून उभा राहिला आहे. होळीवर हेल आणि मोलमजुरी करणाऱ्या भिवरा या हेलकरणीने तिचा मुलगा शिवाजी, बापू या टेम्पोवाल्याने त्याचा भाऊ व दोन मुलगे, रामा टेम्पोवाल्याने त्याचा मुलगा यांना सुशिक्षित केले आहे. ती मुले साता समुद्रापलीकडे जगाच्या कानाकोपऱ्यात काम करत आहेत. ही उदाहऱणे झाली. एकूण घाटी समाज प्रगतीच्या ओघात पुढे पुढे जात आहे. माणदेशातून वसई परिसरात येऊन स्थिरावलेल्या लोकांच्या स्थलांतराचा व त्याबरोबर विकसित होणाऱ्या लोकांचा हा इतिहास आहे.
वैभवशाली वसई आणि घाटी लोकसंस्कृती यांना जोडण्यामध्ये वसई बसस्थानकातील लाल परीची भूमिका महत्त्वाची आहे. ती परी पंच्याहत्तर वर्षांची झाली आहे. वसई-म्हसवड ही एस.टी. बस अहोरात्र न थकता – न दमता चार-पाचशे किलोमीटर अंतर डोंगरांतून आणि घाटातून पार करत माणदेशातील घाटी लोकांना घेऊन येण्याचे आणि वसई नगरीत सुपूर्द करण्याचे काम निस्वार्थीपणे करत आलेली आहे. वसई-म्हसवड ही एसटी बस म्हणजे घाटी संस्कृती आणि वसई यांना जोडणारा आधुनिक काळातील अनमोल असा दुवा आहे.
(अधिक माहितीची भर– सिसिलिया कार्व्हालो 9422385050 drceciliacar@gmail.com)
– महादेव इरकर 7387194364 mahadeoirkar@gmail.com
———————————————————————————————-
आपण फार सुंदर प्रकारे घाटी लोकांचा इतिहास लिहिला आहे.आपले खुप खुप अभिनंदन 💐 खरोखर ह्या आगरामध्ये या घाटी लोकांनी इमानदारीत कामे केली.मला आठवते आमचे आजोबा स्व.श्री.पद्मणशेठ वर्तक हे ह्या समाजाचे आधारस्तंभ होते.मग बावखलातील चिखल काढणे,शेताचे बांध बांधणे,जमिन कुडवणे,पावसाळी स्टाँक करण्यासाठी मिलघाणी पेंड फोडणी इत्यादी.त्यावेळी प्रत्येक समाज ह्या आगरामध्ये घाटी लोकांनवर प्रेम करत असत.आज हा समाज बांधकाम व्यावसायिकांनकडे आपले टँक्टर आणून मोठा व्यवसाय करतात.इतके मात्र खरे की आमचा माद्या गाठी आता श्री.महादेवराव झाले आहेत.ह्यासाठी विशेष करुन त्यांच्या मातोश्रींचे विशेष अभिनंदन.महादेवराव हे तहसिलदार लेव्हलच्या बँचला मार्गदर्शन करत असतात.लिहिण्या सारखे भरपूर आहे…. धन्यवाद…..मी किशोर तात्याजी वर्तक,देवाळे, वसई.९८२३६४३१२२.
सुंदर…पण घाटी शब्दांची उत्पत्ती ख्रिश्चन संस्कृतीशी जोडणे सर्वथा चूकच. घाटावरचे व खालचे हा शब्द प्रयोग खूप जुना व प्रचलित आहे. तो माणसांच्या मूलनिवासी, प्रादेशिक अस्वमिता व स्थलांतराची निगडीत आहे.
अतिशय सुंदर विवेचन. मला नेहमी वाटायचे की घाटा वरून येणारी ही माणसे होती म्हणून त्यांना घाटी म्हणत असावे. परंतु लेखकाने त्या नावाच्या उगमा बाबत अनेक पर्याय दिले आहेत, आणि सर्व विचार करण्यासारखेच आहेत. वसई आणि येथील समाज ह्या विषयी त्यांचे प्रेम आणि आदरभाव पाहून आमच्या समाजाच्या सहिष्णुतेचे पावतीच मिळाल्यासारखे वाटले. लहानपणी, गावात कोणाचे घर बांधले जात असेल, कोणाची विहीर खोदली जात असेल, तर आम्ही मुले ते काम बघायला जायचो, विहिरीतील माती गमेल्यानी वर पोहोचवता “भल्लारी” च्या स्वरावरची गाणी ऐकून आम्ही खेळताना त्याचे अनुकरण करायचो. घाटी दुपारी जेवायला बसल्यावर, बाजरी अथवा ज्वारी ची भाकरी मिरची किंवा कांद्या बरोबर कुस्कुरून खायचे ते बघून आम्ही स्तिमित व्हायचो. खरोखर, घाटी हे वसईच्या त्या वेळच्या पिढीतील एक अविभाज्य भाग होते. अत्यंत संशोधनात्मक लेखाबद्दल अभिनंदन.
दीपक मच्याडो