Home मंथन येशू ख्रिस्ताच्या पुराणकथा असत्या तर ! लेखावरील विचारचर्चा (Debate on Yeshu’s Myth...

येशू ख्रिस्ताच्या पुराणकथा असत्या तर ! लेखावरील विचारचर्चा (Debate on Yeshu’s Myth for spread of Christianity in India)

1
             येशू ख्रिस्ताच्या पुराणकथा असत्या तर ! हा लेख ‘थिंक महाराष्ट्र’वर 25 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाला. तो अनेकांनी वाचला. त्या लेखाखाली; तसेच इमेलवर वाचकांनी प्रतिक्रियादेखील नोंदवल्या. तो लेख बहुचर्चित ठरेल अशी अपेक्षा होतीच. कदाचित वादळी देखील ठरेल अशी भीती वाटत होती. कारण लेखात एक अतिशय धाडसी विधान आहे, की त्यामुळे ‘ख्रिस्ती धर्म फार काळ टिकणार नाही’. हे एक फादर म्हणतात याबद्दल अचंबादेखील वाटला होता. परंतु, वास्तवात प्रतिक्रिया बऱ्याच आल्या, तरी त्यामागील भावना सौम्य आहेत. सध्याच्या ट्रेंडप्रमाणे हिट्स व लाईक्सच अधिक आहेत.

                लेखातील महत्त्वाचे विधान आहे ते इतिहास म्हणजे सत्य आणि पुराण म्हणजे कल्पित. त्यामुळेच फादर म्हणतात त्याप्रमाणे हिटलर, स्टॅलिन यांच्या सारख्यांचा काळाकुट्ट इतिहास कळलाच नसता किंवा बाबरी मस्जिद नावाच्या वास्तूमागील सत्यशोध ही भावनाच निर्माण झाली नसती तर किती शत्रुत्व नष्ट झाले असते, केवढ्या हत्या टळल्या असत्या ! परंतु सत्य इतिहास जाणण्याच्या ओढीने माणसांची मने अनेक दशके व शतकेही कलुषित राहिली. मला फादर यांचा हा मुद्दा महत्त्वाचा वाटतो.

                येशू ख्रिस्त हा वास्तवात घडला आणि त्याचा शोध घेऊया म्हणून गेली दोन हजार वर्षे ख्रिस्त चरित्राच्या कथा संशोधन करून मांडण्यात आल्या. तसे रामाच्या आणि कृष्णाच्या बाबतीत घडत नाही. ती महाकाव्येच असतात आणि त्या महाकाव्यातील व्यक्तिचित्रे व कथावस्तू इतक्या सघन व जबरदस्त असतात की त्या प्रत्येक माणसाच्या मनात रुतून बसतातच. तेवढेच नव्हे तर मानवी मनाच्या शक्तीनुसार प्रत्येक मानवाचे भावाविष्कारदेखील व्यक्त होतात. पुराणकथांमध्ये निर्मितीची ही जी शक्यता आहे ती अपूर्वच होय. म्हणूनच हिंदू धर्म म्हणा अथवा भारतीय संस्कृती म्हणा ती गेली चार-पाच हजार वर्षे टिकून राहू शकते. त्यामुळेच हिंदू धर्म आणि त्यातील देवदेवता व त्यांचे पुजारी यांची संघटित मांडणी करणे शक्य झाले नाही. किती पूजा आणि किती प्रकारच्या पूजा; आणि त्यातून निर्माण झालेले पंथ हे सगळे ठिकठिकाणच्या माणसांनी, त्यांच्या गटांनी निर्माण केले आहेत. त्यामुळे फादर म्हणतात त्याप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या पुराणकथा असत्या तर खरोखरच तो हिंदू धर्माचा एक भाग (अवतार ?) होऊन गेला असता. तो भारतीय संस्कृतीचा भाग आहेच.

                या ठिकाणी ‘येशू ख्रिस्ताच्या पुराणकथा असत्या तर !’ या मूळ लेखावर ज्ञानेश्वरीचे अभ्यासक डॉ. रवीन थत्ते, राजहंस प्रकाशनाच्या संपादक विनया खडपेकर, वसईच्या प्राध्यापक व लेखिका सिसिलिया कार्व्हालो यांच्या प्रतिक्रिया आणि थत्ते यांच्या प्रतिक्रियेला फादर हिलरी फर्नांडिस यांनी दिलेले उत्तर हे स्वतंत्र लेख स्वरूपात वाचकांसमोर मांडत आहोत.

संपादक, थिंक महाराष्ट्र

——————————————————————————————————————————————————————

डॉ. रवीन थत्ते –  ख्रिश्चन धर्माला किंवा धर्मामध्ये पुराणकथा नाहीत असे नाही, जुन्या करारात त्या भरपूर खचाखच भरलेल्या आहेत. येशूने जे सांगितले ते पूर्वीच्या धर्मावरच आधारित होते, परंतु थोडे नव्या वळणाने सांगितले एवढेच. ते सांगताना त्याने धार्मिक बंड केले नाही, परंतु धर्ममार्तंडांविरुद्ध केले. ती चळवळ राजकीय होती. त्याने जुन्या कथा नाकारल्याचा उल्लेख मला तरी माहीत नाही. धर्म ही गोष्ट येशू नंतरच्या लोकांनी प्रस्थापित केली आणि ते करताना त्यांनी एक घाव दोन तुकडे ह्या न्यायाने सगळे जुने पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांचा राग यहुदी धर्मगुरूंवर होता, त्याला चुकीचे वळण मिळाले. त्याचा परिपाक असा झाला, की जुनी परंपरा जणू नाहीशी झाली किंवा केली गेली. एका दृष्टीने ते फायदेशीर ठरले. कारण काहीतरी अगदी नवे उभे राहिल्याचा भास झाला. (त्यात  नवे  फारसे काहीच नव्हते आणि कोठल्याच धर्मात फार काही नवे नसते). परंतु त्या धर्माचा प्रसार झाला, कारण तो धर्म ज्यांनी अंगिकारला ते इतिहासाच्या ओघात जगाचे राज्यकर्ते झाले. धर्मांचा प्रसार केवळ तलवार आणि समृद्धी यांच्या जोरावरच होतो असे नाही; परंतु तसा होत असतो हेही नाकारता येत नाही. इस्लामच्या बाबतीत देखील तेच घडले आहे. तेथेही एक घाव दोन तुकडे हीच पद्धत वापरण्यात आली आहे. एक घाव दोन तुकडे ह्या मानिसकतेचे जू मनावरून उतरवणे सोपे नसते.

                लेखक म्हणतो त्या प्रमाणे इथे केवळ पुराणे किंवा परंपरा असणे-नसणे हा एकच मुद्दा नाही. तो मुद्दा आहेच, परंतु तोय्न्बी म्हणतो त्याप्रमाणे इंडिक संस्कृत्यांचा प्रवास (चीन धरून) का कोणास ठाऊक निराळ्या पद्धतीने घडला आहे. सर्वात महत्त्वाचे असे की त्या संस्कृत्यांमध्ये धर्म ही कल्पना देव ह्या संकल्पेनेशी निगडित असलीच पाहिजे हा विचार फार पूर्वीपासून कधीही गृहीत धरलेला नाही. धर्म ह्या शब्दाची व्युत्पत्ती जो धरून ठेवतो तो अशी असून त्यातील मूळ धातू धृ असा आहे. ह्या व्याख्येप्रमाणे इथे माणसे केंद्रीभूत आहेत आणि म्हणूनच त्यांच्या कल्पनाविलासांना वाव आहे. हा कल्पनाविलास देव-दानव, सूर-असुर-राक्षस, चेटूक, गंधर्वनगरी, स्वर्ग-नर्क या सगळ्या गोष्टींना सामावून घेऊ शकतो. त्यातून निर्माण होणाऱ्या गोष्टी म्हणजे पुराणे. अर्थात पुराणात इतिहास, भूगोल, वंशावळी, प्रवास, चालीरीती ह्यांचीही वर्णने आहेत. जुन्या करारात हे सगळे थोड्याफार प्रमाणात होते, ते पुढे दुय्यम मानले गेले. अहो, देवळाच्या पारावर बसून ब्रह्माबद्दल बोलत नाहीत तर कथा सांगतात. त्या जुन्या होत नाहीत. जे पुरा होत नाही ते पुराण असते. असे म्हटले जाते, की तुम्हाला उपनिषदे कळली नाहीत तरी चालेल, परंतु ज्याला पुराणे अवगत नाहीत तो खरा अज्ञानी होय. आपलीच ओळख नाही तर मग पलीकडे जे आहे (ते असले तर) ते कसे भेटणार? साम्यवाद बुडाला, कारण त्याने माणसाचा स्वभाव लक्षात घेतला नाही. क्रांत्या टिकत नाहीत, उत्क्रांत्या टिकतात.

                इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म पसरला तो नवे काहीतरी वाटले म्हणून आणि जे पसरवत होते त्यांच्या हातात सत्ता होती म्हणून. परंतु दोन्ही धर्मांत जुने पुसण्यात आले. चमत्कारसदृश सर्व घटनांना आणि जुन्या करारातील गोष्टी दुय्यम ठरल्या आणि केवळ येशू किंवा मोहोम्मद यांच्या गोष्टी सांगण्याचा प्रघात पाडण्यात आला. त्यातही चमत्कार होतेच पण नवे होते. एका माणसाच्या आयुष्यावर गोष्टी सांगण्याला मर्यादा असतात. ग्रीकांचे विज्ञानही गुंडाळून ठेवण्यात आले. विश्वोत्पत्तीबद्दलच्या प्रमेयांना थाराच नव्हता. एक विरोधाभास असा की ह्या ख्रिश्चन आणि यहुदी लोकांनीच पुढे विज्ञानाचा पाठपुरावा केला. त्याचा एक परिणाम असा, की त्यांची धर्मावरील श्रद्धा कमी झाली. यहुदी लोक एकजूट राहिले ते वंश आणि वर्ण यामुळे. कोठलाच धर्म वाईट नसतो, परंतु त्याच्या प्रसाराच्या चक्रांची गती कशावर अवलंबून असते हेही बघावे लागते. इस्लामच्या आक्रमतेविरुद्ध जगभरात प्रतिक्रिया उमटत आहेत. ख्रिश्चन धर्म प्रसार थांबला आहे कारण प्रचारक नाउमेद आहेत आणि त्यांच्या मागे राज्यसत्तेचे पाठबळ नाही. इतिहास चक्राकार असतो, त्याचे हे उदाहरण आहे. भारतीय हिंदू आणि तत्सम लोक आता उत्तर अमेरिकेत सर्वात सधन झाले आहेत तेव्हा त्यांच्या धर्माला उर्जितावस्था येण्याचा संभव नाकारता येणार नाही.

                लेखकाने इथल्या धार्मिक चळवळीबद्दल लिहिले आहे. त्याचा संबंध केवळ मिथकांशी आणि पुराणांशी नाही. त्या चळवळी राजकीय आहेत. प्रस्थापितांचे एतद्देशीयांच्या संस्कृतीबद्दलचे उदासीनत्व आणि कित्येक वेळा त्याबद्दल दाखवलेली तुच्छता आणि आम्ही किती पुढारलेले आहोत हे दाखवण्याची अहमहमिका आणि त्याचवेळी अनाहूतपणे आणि स्वार्थीपणे झालेले परदेशी धर्मांबद्दलचे तुष्टीकरण ह्या गोष्टी लोकांच्या नजरेला आणून देण्याचे कौशल्य ज्या राजकीय पक्षाने दाखवले त्या पक्षाची सरशी झाली आहे. हे दाखवण्यासाठी आपल्या देशाच्या इतिहासात इतके दाखले आहेत, की त्यांची सुद्धा आता पुराणे  झाली आहेत. त्याच्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न कितीही उदात्त असला तरी तो आता फसला आहे. आणि एक नवीन चक्र फिरू लागले आहे. त्याला जगभरातील हिंदू लोक गती देत आहेत.

—————————————————————————————————-

  फादर हिलरी फर्नांडीसया लेखावरील थत्ते यांचे मनोगत वाचले. मी त्यांच्या जुन्या विचारांचे स्वागतच करतो. बायबलमध्ये प्रामुख्याने जुन्या करारात काही पुराण कथा आहेत. परंतु, बायबलबाहेर रामायण, महाभारत, भागवत इत्यादी पुराणे अथवा महाकाव्य अशा प्रकारच्या कल्पित साहित्याला वाव दिला गेला नाही. त्यामुळे ख्रिस्ती धर्म म्हणजेच रिलिजन म्हणून चर्च प्रणीत अधिकृत बायबल आणि बाहेरील चर्च मान्य परंपरा व चर्च धर्मपीठाची प्रमादहीन म्हणजे infallible श्रध्दा व धर्म शिकवण यापर्यंतच सीमित राहिला व  म्हणून तो सर्वसामान्य ख्रिश्चनांच्या जीवन चरित्राचा भाग बनू शकला नाही. तो चर्च भिंतींतच अडकून राहिला. तसेच, तो चर्च धर्मपीठाची कडक व कठोर धर्म शिकवण आणि मार्गदर्शन (Doctrine) व अपरावर्तित धर्मश्रध्दा (Dogma) ह्यांच्या सीमेत स्थगित राहिला. हिंदू जीवनपद्धत आजपर्यंत टिकून आहे आणि यापुढेही टिकून राहील, याचे कारण त्यातील पुराणकथा व महाकाव्ये. जीवन हिंदू पद्धतीतून रामायण, महाभारत व अन्य असंख्य कपोलकल्पित कथा, पुराणे व महाकाव्ये वगळा तर मग धर्माचा फक्त सांगाडा काय तो शिल्लक राहील.

———————————————————————————————————————————————————————–

विनया खडपेकर – हिलरी फर्नांडिस यांचा लेख एक वेगळी चर्चा सुरू करतो. इतिहास आणि मिथक यांतील महत्त्वाचे काय? ही चर्चा कोणत्याही धर्माच्या बाबतीत होऊ शकते. बहुतेक सर्व धर्मांना इतिहास असतो आणि त्या इतिहासाभोवती मिथक किंवा दंतकथा किंवा आख्यायिका फुललेल्या असतात. माझा कोणत्याही धर्माचा खास असा अभ्यास नाही. ज्या हिंदू धर्मात मी जन्मले त्या धर्माविषयी मला थोडी अधिक माहिती आहे. कारण मी त्या वातावरणात वाढले एवढेच. हिलरी म्हणतात, हिंदू धर्मात मिथके आहेत. ख्रिस्ती धर्मात इतिहास आहे. मग गुड फ्रायडे काय? सिसिलिया कार्व्हालो यांनी ख्रिस्ती पुराणाचाही उल्लेख केला आहे. तेव्हा मिथके ख्रिस्ती धर्मातही आहेतच. शिवाय माझा असाही प्रश्न आहे, की इंग्रजी भाषेत मायथॉलॉजी हा शब्द प्रचारात आहे. तो कसा काय आला? तो लॅटिनमधून आलेला असू शकतो. पण इंग्रजीमध्ये तो रुजला. त्या अर्थी धर्माभोवतीचे काल्पनिक वाङ्मय त्या समाजातही आहे. हिंदूंमध्ये तेहतीस कोटी देव असल्याचे मानले जाते. त्यामुळे त्यांच्या मिथकांची संख्या ख्रिस्ती धर्मापेक्षा साहजिकच प्रचंड असणार. हिंदूंमध्ये देवांची संख्या इतकी प्रचंड का? हा चर्चेचा वेगळा विषय आहे.

                हिलरी यांना हिंदू पुराणकथांत गोडवा आढळतो. तो सरसकट सर्व पुराणकथांमध्ये नसतो. चमत्कार मात्र बहुतेक हिंदू पुराणकथांमध्ये असतात. तर्काच्या कसोटीवर ते टिकत नाहीत म्हणून ते अनेकांना पटत नाहीत. त्यामुळे हिंदूंमध्ये पुराणकथांना भाकडकथा मानणारा मोठा वर्ग आहे. या वर्गाला इतिहास प्रिय आहे. हा वर्ग करमणूक म्हणून पुराणकथांकडे पाहतो. अधूनमधून पुराणकथांची यथास्थित टवाळी करत असतो. हिंदू पुराणकथांची महती सांगताना हिलरी यांनी या वर्गाची दखल घेतलेली दिसत नाही. शिवाजीमहाराज हे इतिहास म्हणून मान्यता पावलेले असले तरी त्यांच्याभोवती अनेक दंतकथा उभ्या आहेत. कल्याणच्या सुभेदाराची सून ही दंतकथा, की सत्य याबद्दल इतिहास साशंक आहे. हिरकणी बुरूजाबाबतही तशीच आख्यायिका होती. डोंगराच्या त्या टोकावरून हिरकणीने उडी मारली, तरी ती जगली अशी कथा होती. अत्यंत अवघड वाटेवरून ती खाली उतरत गेली असावी म्हणून शिवाजी महाराजांनी तेथे बुरूज बांधला असे इतिहास मानतो. देवदेवतांभोवतीच्या दंतकथांना हिंदू पुराणकथा म्हणतात असे वाटते. जनता विभूतीपूजक असते. चमत्कृतीने भरलेल्या दंतकथा-पुराणकथा ही जनतेतील बहुसंख्यांची मानसिक गरज असते. समाज जितका बुद्धिनिष्ठ होत जातो तितकी ती मानसिक गरज कमी होत जाते. बुद्धिनिष्ठांची मांदियाळी असलेले प्रगत पाश्चात्य देश ख्रिस्ती धर्माचे आधारस्तंभ. म्हणूनही ख्रिस्ती धर्मात पुराणकथा कमी असू शकतील. ख्रिस्ताभोवती पुराणकथा असत्या तर भारतात ख्रिस्ती धर्म अधिक पसरला असता का, या विषयात मला रस नाही.

——————————————————————————————————————————————————————————–

सिसिलिया कार्व्हालोखूप छान लेख, विचारप्रवर्तक ! फादर थॉमस स्टिफन्स यांनी ख्रिस्तपुराणलिहिले हे किती बरे केले. त्यांनी ख्रिस्ताला महाकाव्याचा विषय केले आणि पौराणिक बनवले. त्यामुळेच तर ख्रिस्तपुराणजगप्रसिद्ध झाले; भाषा आणि साहित्याच्या अभ्यासकांना खाद्य मिळाले…

—————————————————————————————————-

About Post Author

1 COMMENT

  1. ह्या फादर ला काही काम धाम नसणार, म्हणून स्वतःच्या धर्माला सोडून दुसऱ्या धर्माच्या गोष्टींवर टिप्पण्या देतोय. स्वतःचं ठेवायचं झाकिन, दुसऱ्याच पाहायचं वाकून असला प्रकार ….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version