अचलपूरची ‘विदर्भ मिल्स’ ही जुन्या कापड गिरण्यांपैकी एक. अन्य दोन गिरण्या सोलापूर व अंमळनेर येथे होत्या. विदर्भ मिल त्या प्रदेशातील कापसाचे पिक ध्यानी घेऊन बाबासाहेब देशमुख यांनी सुरू केली आणि ती एका वैभवाला पोचलीदेखील. पण सरकारी हस्तक्षेपामुळे तिची पडझड झाली, तेथे ‘फिनले मिल्स’ सुरू करण्यात आली. तीही बंद पडली आहे… विदर्भ मिलची दु:खद कहाणी !
अचलपूरच्या ‘विदर्भ मिल्स’ची स्थापना हे बाबासाहेब देशमुख यांचे धाडस. त्यासाठी त्यांनी विदर्भ मिल्स प्रायव्हेट लिमिटेडचे पंजीकरण 18 मार्च 1923 रोजी मुंबई येथे केले. त्यांनीच स्थापन केलेल्या ‘पांडुरंग जिनिंग’ ह्या उद्योगाचा मिलची स्थापना हा पुढील टप्पा होता. बाबासाहेबांनी औद्योगिक स्वरूपाची ही पावले वऱ्हाडात विपुल होणारा कापूस, पाण्याची मुबलकता, दळणवळणाची साधने इत्यादींचा विचार करून उचलली होती. त्यामुळे अचलपूरात मोठ्या प्रमाणावर रोजगार उत्पन्न व्हावा. लोकांना रास्त भावात स्वदेशी कापड मिळावे अशी अपेक्षा होती. बाबासाहेबांनी व त्यांच्या साथीदारांनी या मिलसाठी भाग भांडवल घरोघरी जाऊन जमा केले. मिलचा कारभार प्रत्यक्ष सुरू होण्यास 1926 साल उजाडले.
गिरणीतील यंत्रसामुग्री प्रगत अशी मँचेस्टर व बोस्टन येथून आयात केली होती. महायुद्धाच्या काळात तंबूच्या कापडास मागणी बरीच होती. कापसाच्या वाहतुकीसाठी अचलपूर ते मूर्तिजापूर अशी नॅरो गेज आगगाडी ब्रिटिशांनी सुरू केली होती. तिचे रूळ मिलच्या कोळसा यार्डापर्यंत पोचले होते. मालगाडीचे डबे मिलपर्यंत आठवड्यातून एकदोनदा गरजेनुसार कोळसा खाली करण्यासाठी येत. दुसरे असे, की मेळघाटातील बांबू व सागवान यांचीही वाहतूक रेल्वेद्वारे होत असे. त्याच रेल्वेला कामगार नेते कै. सुदाम देशमुख यांनी ‘शकुंतला एक्सप्रेस’ असे नाव दिले होते. गिरणी दुसऱ्या महायुद्धानंतर मंदीमुळे काही काळ बंद होती.
ती पुन्हा सुरू झाली तेव्हा बाबासाहेबांचे चिरंजीव राजाभाऊ यांच्याकडे मालकीची सूत्रे आली होती. मिलची व्याप्ती राजाभाऊंच्या दूरदृष्टीमुळे घडली. मिलची प्रगती आरंभकाळात उत्तरोत्तर होत गेली. कोंबर, कार्डिंग विभागात इंडिव्हिज्युअल ड्राइव्ह, स्पिनिंगच्या एकोणीस हजार स्पिंडल्स, कापडाचे तीनशेछत्तीस साचे, डाइंग-प्रिंटिंग इत्यादी विभाग काळानुरूप अद्ययावत होते. कामगार-कर्मचाऱ्यांची वसाहत पूर्वीपासूनच होती. ‘विदर्भ गृह निर्माण’द्वारा त्या वसाहतीची निर्मिती हेदेखील राजाभाऊंच्या दूरदृष्टीचे उदाहरण आहे.
चीनचे 1962 व पाकिस्तानचे 1965, अशा भारताविरूद्धच्या दोन युद्धांचा परिणाम देशात सर्वदूर जाणवला. त्यापासून कापड उद्योगही सुटला नाही. गिरणी पुन्हा 1966 मध्ये बंद पडली. अधिकारी निघून गेले. काही कामगार इतरत्र गेले, एकंदरीत परिस्थिती खूपच बिकट झाली. कामगारांना भांडीकुंडी विकून जगावे लागले. सरकारकडे विनंती अर्ज सुरू झाले. त्यातून पर्याय असा समोर आला, की महाराष्ट्र सरकार विदर्भ मिल काही अटींवर चालवू शकेल, परंतु त्यासाठी कामगारांचे निवेदन स्वाक्षऱ्यांसह आवश्यक राहील. ही अट कळीची होती. कामगार संघटना त्या प्रस्तावास राजी नव्हती. परंतु अशा वेळी जीवावर उदार होऊन राजाभाऊ देशपांडे (खंडाळकर), केशवराव परांजपे, महादेव राऊत, अझीझ धिमान व त्यांचे सहकारी यांनी आवश्यक आकडा जमा करून त्या वेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना त्यांच्या चिखलदरा भेटीत सादर केला. सरकारी सूत्रे हलून ‘बेकारी निवारण योजने’(URS)अंतर्गत गिरणी भाडेतत्त्वावर दहा वर्षांसाठी महाराष्ट्र सरकार चालवेल असे ठरले. त्याबाबत राजाभाऊ व सरकार यांच्यात करार झाला. राजाभाऊंनी कोणाचीही सेवा नवीन न धरता नियुक्ती पूर्वीप्रमाणेच धरावी असे कलम टाकून कामगारहित पाहिले.
त्यानुसार, मिलमध्ये ऑगस्ट 1968 मध्ये साफसफाई सुरू होऊन उत्पादनास सुरुवात पुढील तीनचार महिन्यांत झाली. मिल प्रगतिपथावर धावू लागली. नफा दिसू लागला. मिल अद्ययावत होऊ लागली. पण तेवढ्यात केंद्र सरकारने मिलचे राष्ट्रीयीकरण केले. मिलचा ताबा ‘नॅशनल टेक्सटाइल्स कॉर्पोरेशन’कडे (एन.टी.सी.) 1973 मध्ये गेला. मिलचा तो सुवर्णकाळ होता. त्या मिलच्या एक गाठ कापडासाठी नागपूर, अकोला आणि हिंगणघाट येथील काही गाठी खरेदी कराव्या लागत असत. महाराष्ट्रातील एन.टी.सी.च्या कोणत्याही मिलला आर्थिक अडचण असल्यास विदर्भ मिल्स ती अडचण सहज दूर करत असे. साधारणपणे, 1995 पर्यंत सर्व व्यवस्थित सुरू होते. परंतु त्यानंतर सरकारी धोरण, स्थानिक व वरिष्ठ अधिकारी यांचे राजकारण, विशिष्ट लॉबी, भ्रष्टाचार आणि भरीस भर कामगार संघटनेचे अनाकलनीय धोरण या सर्वांचा परिणाम होऊन मिल नोव्हेंबर 2003 मध्ये कायमची बंद झाली.
कामगार संघटनेने प्रयत्न केले. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील आणि माजी आमदार वसुधा देशमुख यांची साथ मिळाली. त्यामुळे ‘फिनले मिल्स’ विदर्भ मिल्सच्याच जागेवर एन.टी.सी.मार्फत सुरू झाली (2008). ‘फिनले’ ही भारतातील सर्वात प्रगत कापड गिरणी होती. त्यांनी नवीन इमारत, आधुनिक यंत्रसामुग्री यासाठी सुमारे चारशे कोटी रुपये खर्च केले. विसंगती अशी, की ‘विदर्भ मिल्स’ला आधुनिकीकरणासाठी फक्त चार कोटी रुपये हवे होते. तर ते ती मिल सुरू करू शकले असते. पण ते नाकारल्यामुळे मिल बंद झाली. तेथेच चारशे कोटी रुपये खर्चून नवी मिल सुरू केली !
ती ‘फिनले मिल्स’ही बंद आहे. कारण सरकारी नियोजनशून्यता. कामगार पुन्हा रस्त्यावर आले आहेत. बाबासाहेब देशमुख यांनी मिल सुरू केली त्यावेळी कामगार-कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून ‘सिटी हायस्कूल’ (अचलपूरची शाखा) ही शाळा त्या भागात कार्यरत होती. परंतु व्यावहारिकता लक्षात घेऊन, कर्मचाऱ्यांच्या पुढाकाराने ‘सुबोध हायस्कूल’ची स्थापना 1956 साली करण्यात आली. तिचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. ती जिल्ह्यातील नामांकित शाळा म्हणून ओळखली जात आहे. तिच्या स्थापनेसाठी बाळासाहेब यावलकर, आबासाहेब भारतीय, बाळासाहेब घिके, गणपतराव पार्डीकर, बाळासाहेब फडणीस, राजाभाऊ खंडाळकर, बाबासाहेब गावली, शंकरराव शुक्ल, गंगाधरराव बोज्जे व त्यांचे सहकारी यांचा वाटा होता. बाळासाहेब यावलकर संस्थेचे अध्यक्ष अनेक वर्षे होते. संस्थेच्या प्रगतीमध्ये त्यांची दूरदृष्टी, आबासाहेब भारतीय यांचे नियोजन, अनंतराव पिंपळीकर यांची शिस्त व तळमळ अशा सर्वांचे योगदान महत्त्वाचे ठरते. अनंतराव पिंपळीकर अनेक वर्षे मुख्याध्यापक होते.
मनोरंजनासाठी कामगार कल्याण केंद्र, सुसज्ज थिएटर, टेनिस क्लब इत्यादी अस्तित्वात होते. कामगार-कर्मचारी यांची सहकारी सोसायटी होती. भागधारकांना वित्तीय कर्ज मिळे. किराणा, हॉटेल हेही विभाग होते. तेथील चिवडा व आलुबोंडा हे पदार्थ प्रसिद्ध होते. मिल बंद झाली तरी मिलचे कर्मचारी व कामगार यांच्यासाठी उभारलेल्या तीन चाळींमधील- ब्राह्मण चाळ, नवीन चाळ व जुनी चाळ – भरभराटलेले सांस्कृतिक जीवन व दृढावलेले कौटुंबिक स्नेहबंध बराच काळ तसेच टिकून होते. कामगार-कर्मचाऱ्यांचा तो मोठाच ठेवा होता.
– विनय देशपांडे (खंडाळकर) 9325066915 deshpandevinay02@gmail.com
अचलपूर
—————————————————————————————————————————————