बहिरम यात्रेला विदर्भात मोठे ऐतिहासिक स्थान आहे. ते बैतुल-होशंगाबाद या जुन्या राजमार्गावर येते. तेथील यात्रेचा उल्लेख वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारे येतो. कॅप्टन मेडोज टेलरच्या ‘कन्फेशन ऑफ ए ठग’ या पुस्तकामध्ये त्याचे काही संदर्भ सापडतात. बहिरमचे दगडी मंदिर, त्याशी जोडलेली मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ यांची नावे हे सारे भारतीय संस्कृतीचा वेगळ्याच दृष्टीने विचार आणि तत्संबंधी संशोधन करण्यास भाग पाडते…
बहिरमची यात्रा मार्गशीर्षात महिनाभर चालते. बहिरम घाट सातपुड्यात आहे. तो पहाड ओलांडून मध्यप्रदेशात जाताना जो घाट लागतो त्याला बहिरम घाट असे जुने नाव आहे. अमरावतीजवळच्या नांदगाव पेठ येथेही प्राचीन मंदिरे दोनतीन आहेत. सुंदर नक्षीकाम असलेल्या एका मंदिराचे दगडी स्तंभ तुटफूट होऊन एका शेतात पडलेले आहेत. सुंदर पायऱ्यांची दगडी विहीरही नांदगावात आहे. नागपूर-अमरावती जुना हमरस्ता त्याच मंदिराजवळून जात असे. जुनाट मंदिराचे अवशेष वलगावजवळील अळणगावातही पडून आहेत. अळणगावाचे नाव जुन्या ब्रिटिश डिस्ट्रिक्ट गॅझेटियरमध्येही नमूद आहे. गुरू मच्छिंद्रनाथ आणि चेला गोरखनाथ हे दोघे नेपाळातून कधी काळी फिरत फिरत तेथे आले. त्या निमित्त बांधलेले ते प्राचीन मंदिर होते. तुटक्या मंदिराचे काही तुरळक अवशेष आणि काही जुनाट मूर्ती तेथे पाहण्यास मिळतात. बहिरम हेही त्याच यादीतील एक नाव म्हणता येईल.
अचलपूराहून निघणाऱ्या बैतूल-होशंगाबाद या जुन्या राजमार्गावर बहिरम हे महत्त्वाचे ठिकाण आहे. अचलपूर-परतवाड्याहून खरपीमार्गे बैतूल-होशंगाबादला जाणारा रस्ता ही ब्रिटिश अमदानीची देणगी आहे. पूर्वीचा तो राजमार्ग अचलपूराहून अमरावती मार्गाला छेद देऊन अष्टमासिद्धी मार्गे कांडली, करंजगाव, गोविंदपूर, कारंजा ते बहिरम घाट असा जात असे. ‘कन्फेशन ऑफ ए ठग’ या पुस्तकात एलिचपुरातील दुला रहमान शहाचा दर्गा, करजगाव ते बहिरम घाट यांचे सुंदर वर्णन आलेले आहे. ते पुस्तक 1839 साली लंडनहून प्रकाशित झाले. कॅप्टन मेडोज टेलरने ते पुस्तक लिहिलेले आहे, तो ब्रिटिश माणूस हैदराबादच्या निजामाच्या नोकरीत होता. ठगांचा सरदार अमिर अली याला मध्यप्रदेशातील सागर जेलमधून चौकशीसाठी निजामाच्या हैदराबाद जेलमध्ये आणले गेले. त्याच्या सांगण्यानुसार जेल सुपरिंटेंडंट मेडोज टेलर याने संकलन केलेले ते पुस्तक आहे. ठगांचा सरदार अमिर अली याची ती साहसी जीवन कहाणी आहे. पुढे, हा मेडोज टेलर अमरावती आणि एलिचपूर येथे कमिशनर म्हणून नोकरीस होता. चिखलदरा हिल स्टेशन ही त्याच मेडोज टेलरची करामत. त्याने काढलेली गाविलगड किल्ल्याची काही स्केचेस उपलब्ध आहेत.
बहिरमबुवाच्या मंदिराला फार जुन्या इतिहासाची झालर आहे. अनिल कडू हे मंदिराच्या विश्वस्त मंडळात पदाधिकारी आहेत. त्यांनी सागिंतले, की “जेव्हा आम्ही येथे नवीन बांधकाम केले तेव्हा कलाकुसर केलेले बरेच दगड आम्हाला मिळाले, काही सापडलेले दगडी म्हणजे मानवी मुखवटे तेथे जतन करून ठेवलेले आहेत. काही नक्षीदार दगड इकडेतिकडे विखरून पडलेले आहेत.” म्हणजेच, कधी काळी तेथे सुंदर दगडी मंदिर असावे. फार पूर्वी, तेथे मानवी वस्ती असावी असे तेथील वातावरण प्रथम दर्शनी दिसते.
‘कन्फेशन ऑफ ए ठग’ हे पुस्तक वाचल्यानंतर त्यातील ठिकाणे धुंडाळताना माझी दमछाक झाली. ब्रिटिशांनी विविध विषयांवर विविध प्रकारची पुस्तके लिहून ठेवलेली आहेत. त्यांपैकी एक म्हणजे ‘रुट्स इन द पेनिन्शुला ऑफ इंडिया’. मद्रास आर्मीचा मास्टर जनरल मेजर एफ.एच.स्कॉट ह्याने ते पुस्तक गव्हर्नमेंटच्या ऑर्डरनुसार 1853 साली लिहून प्रसिद्ध केले. त्या पुस्तकात संपूर्ण भारतातील तत्कालीन राजमार्गांचे नदीनाल्यांच्या बारीकसारीक माहितीसह वर्णन केलेले आहे. मी त्याच आधारावर संशोधन करत ठगांच्या कार्यकल्पांचा शोध घेत धाबा या गावी पोचलो होतो. त्यात अचलपूर ते होशंगाबाद हा मार्ग नदीनाल्यांच्या अंतरांसह दिलेला आहे. करजगाव पांढरी, कारंजा यांचा उल्लेख त्या पुस्तकात आलेला आहे. करजगावहून गोविंदपूर आणि त्यापुढे पायऱ्यांची एक विहीरही आहे. पुढे, तो रस्ता बहिरमास पोचतो. ब्रिटिश प्रशासन येण्याच्या बऱ्याच आधी बहिरमास मोठी वस्ती असली पाहिजे आणि बहिरम हे नामांकित ठिकाण असले पाहिजे असे माझे मत आहे.
त्या यात्रेचा उल्लेख 1870 च्या हैदराबाद असाइण्ड डिस्ट्रिक्ट गॅझेटियरमध्येही आलेला आहे. यात्रेचा उल्लेख ‘ईम्पीरियल गॅझेटियर’मध्ये पाचशे दुकाने आणि पन्नास हजार माणसे असा आहे. त्या यात्रेला उर्जितावस्था ब्रिटिश काळात आली, त्याला कारण म्हणजे ब्रिटिशांनी विदर्भातील कापसाचे व्यापारी महत्त्व ओळखून सर्वप्रथम कॉटन कमिशनराचे पद निर्माण केले. त्या अधिकाऱ्याने कापसाच्या पिकावर सखोल संशोधन करून भरघोस उत्पन्न येईल अशी व्यवस्था केली. प्रायोगिक तत्त्वावर काही फार्म उघडले. पैकी एक फार्म अमरावतीच्या खोलापुरी गेटहून पुढे येणाऱ्या सुकळी गावाला होता. तेथे कापसाचे नवीन बियाणे तयार होई. त्यातून भरपूर उत्पन्न आणि पैसा शेतकऱ्यांच्या हातात पडू लागला. तो अमरावतीचा सराफा बाजार. गाणाऱ्या नायकिणींचे कोठे, लग्न समारंभ यात सढळ खर्च होऊ लागला. त्यातूनच बहिरमच्या यात्रेलाही वेगळी झळाळी प्राप्त झाली. श्रीमंत जमिनदार लोक संपूर्ण लवाजम्यासह महिना-पंधरा दिवसांच्या मुक्कामाने बहिरमास ठिय्या मांडून राहू लागले. तेथे शेतीसाठी लागणारी अवजारे व जनावरे यांची खरेदीविक्री होऊ लागली. नाचणाऱ्या-गाणाऱ्यांसाठीही ती पर्वणी ठरली. बहिरमची एक खासीयत आहे, बहिरमच्या पलीकडे पहाडी प्रदेश आणि अलिकडे सपाट प्रदेश, त्या दोहोंचा मेळ म्हणजे बहिरम, मिश्र संस्कृतीचा मिलाप. अशा दोन भिन्न प्रदेशांच्या जोडणीचे ठिकाण व्यापारी दृष्टीने फार महत्त्वाचे ठरते. म्हणून बहिरम यात्रेला व्यापाऱ्यांची जत्रा म्हणूनही संबोधले जाते.
ब्रिटिश अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये निर्णय बहुतेकदा जेथल्या तेथेच घेतले जात. त्यासाठी ब्रिटिश अधिकारी महिन्यातील वीसपंचवीस दिवस संपूर्ण ऑफिस आणि लवाजमा यांसह दौऱ्यावर असत. अगदी टेबल-खुर्ची आणि ते वाहून नेणारे बिगारीही सोबत असत. तो पडाव गावाबाहेरच्या आमराईत पडत असे. तेथेच त्या गावातील पाटील, कुलकर्णी आणि संबंधित लोक बोलावून शक्य तेवढ्या समस्यांवर तोडगा काढला जात असे. तीच पद्धत यात्रांमध्ये वापरली गेली. रयतेच्या बारीकसारीक कामांचा ताबडतोब आणि जेथल्या तेथे निपटारा व्हावा म्हणून सरकारी कचेऱ्यांतील काही विभागांची नेमणूक यात्रेनिमित्ताने बहिरमात होऊ लागली. ब्रिटिश सरकारने घेतलेली ही दखल यात्रेचे महत्त्व वाढवण्यास कारणीभूत ठरल्याचे दिसते.
सरकारी कामकाजाची परंपरागत पद्धत थोड्याबहुत फरकाने कायम आहे. अनेक लोकोपयोगी प्रकल्प जिल्हा परिषदेसारखी संस्था राबवत असते. यात्रेचे स्वरूप नवीन तंत्रज्ञानामुळे बदलले आहे. तरीही मानवी भावभावना त्यांचे अस्तित्व टिकवून आहेत आणि जोवर हे आहे तोवर अशा यात्रांना क्षय नाही.
– ज्ञानेश्वर दमाहे
—————————————————————————————————