हेलस गाव – चारशे वर्षांचा गणेशोत्सव! (Helas village – Ganesh festival of four hundred years!)

1
96
helas_gav

हेलस नावाचे गाव जालना जिल्ह्याच्या मंठा तालुक्यात आहे. ते गाव हेलावंतीनगरी म्हणून पुराणकाळात प्रसिद्ध होते. त्याची ओळख ‘पालथी नगरी’ म्हणूनही आहे. कारण तेथे उत्खननात प्राचीन मूर्ती, वस्तू मिळाल्या, त्या जमिनीखाली उलट्या-सुलट्या कशाही असत! म्हणून ती ‘पालथी नगरी’! मात्र तो इतिहासप्रेमींसाठी खजिना आहे. गावाचा सांस्कृतिक, पौराणिक, ऐतिहासिक वारसा थक्क करणारा आहे.

गावात सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा चारशे ते पाचशे वर्षांपासून अविरत व अखंडितपणे चालू आहे. ते गावचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य. लोकमान्य टिळक यांनी 1893 साली सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव परंपरेपेक्षा तेथील उत्सव पुरातन असून प्रसिद्धीअभावी त्याचे महत्त्व लोकांपर्यंत पोचले नाही अशी गावकऱ्यांची भावना आहे. हेलस गावाच्या पंचक्रोशीचे गणेश हेच आराध्य दैवत आहे. गणेशाची मूर्ती साधारणपणे तीन फूट उंचीची मनमोहक व आकर्षक आहे. गणपती मंदिरातील उत्सवाची सुरुवात भाद्रपद शुद्ध नवमीला भागवत सप्ताहाने होते व उत्सवाची सांगता भाद्रपद पौर्णिमेला गावातून श्रींची पालखी मिरवणूक काढून केली जाते. स्थापना व विसर्जन यांशिवाय साजरा होणारा हेलसचा असा हा आगळावेगळा सार्वजनिक गणेशोत्सव आहे. हेलस येथील कोणाही नागरिकाच्या घरी गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जात नाही.

भाद्रपद पौर्णिमा ही गावात महत्त्वाची आहे. गणेशोत्सवाच्या आकर्षणाचा तो दिवस. त्या दिवशी, लग्न होऊन गेलेल्या व हयात असणाऱ्या गावाच्या सर्व माहेरवाशिणी न विसरता माहेरी येतात. ती प्रथा मागील एकशेसव्वीस वर्षांपासून आहे. वयस्कर माहेरवाशिणींबरोबर त्यांच्या सुना आणि नातसुनाही उत्सवात सहभागी होतात. काही म्हाताऱ्या स्त्रिया तर कुटुंबांतील पुढील दोन पिढ्यांसह गणेशोत्सवासाठी येतात. त्यामुळे गावाचे ‘गोकुळ’ होऊन जाते. गावात त्या दिवसाला दसरा-दिवाळीपेक्षाही जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. पौर्णिमेला सकाळी मंदिरात पूजाविधी केला जातो. दुपारी ग्रंथांची मिरवणूक व शिरा, भात आणि कढी असा महाप्रसाद होतो. मिरवणुकीत पालखीमध्ये भागवत ग्रंथाची प्रत असते. त्या वेळी मुली घरोघरी रांगोळ्या काढतात. डोक्यावर कलश घेऊन ग्रंथपूजा करतात. महाप्रसाद खाण्यासाठी नजिकच्या जालना, परभणी जिल्ह्यांतील स्त्रियाही येतात. संध्याकाळी हरिपाठ व नंतर रात्री नऊ वाजता श्रींची मिरवणूक मंदिरातून पालखीतून काढली जाते. परिसरातील तीस ते चाळीस गावांतील दिंडीपथके मिरवणुकीत सामील होतात. पालखी जमिनीवर खाली न ठेवता रात्रभर मिरवणूक फिरत असते. सकाळी पालखीचे विसर्जन मंदिरात केले जाते. विशेष म्हणजे गावातील जेवढी माणसे कामानिमित्त बाहेरगावी गेलेले असतील, ती सर्व या कार्यक्रमासाठी आवर्जून येतात.

_vikhurlelya_murtiहेलस येथील गणेशोत्सवाला समकालीन असलेला नाट्योत्सवदेखील लक्षणीय आहे. तीन नाटके गावात दरवर्षी सादर केली जातात. त्यात सामाजिक, तमाशाप्रधान आणि विनोदी वगनाट्य यांचा समावेश असतो. नाट्योत्सव निजामकाळात साजरा करताना अडचणी आल्या, देवराव काळे (पायरी येथील) व बाबुराव महाराज (अहमदनगर येथील) यांनी त्यावर मात करून उत्सवास प्रोत्साहन दिले. त्या निर्धारामुळे उत्कृष्ट व दर्जेदार सांगितिक नाटकांच्या माध्यमाद्वारे मनोरंजन, ज्ञानप्रसार व लोकप्रबोधन यांस चालना मिळाली. गावात ‘संगीत मानापमान’, ‘वाहाडचा पाटील’, ‘राजा हरिश्चंद्र’, ‘संत सखू’, ‘पंताची सून’, ‘सिंहाचा छावा’ यांसह अनेक नाटके सादर झाली आहेत. त्या नाटकांची सर्व पातळ्यांवरील तयारी स्थानिक लोकांनी स्वतः केली आहे.

गावकरी नाटकांच्या तालमी दोन महिने आधीपासून करत. नाटकांतील स्त्रीकपात्रे पुरुषांनी साकारलेली असत. स्वातंत्र्यपूर्व काळात एकसंधतेसोबतच राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारे नाट्यप्रयोग व स्वातंत्र्यानंतर प्रत्येकाला हक्काची जाणीव करून देणारे नाट्यप्रयोग झाले. ते खरोखरच दखल घेण्याजोगे होते. हेलस येथील नाट्यपरंपरा महाराष्ट्राच्या इतिहासात उपेक्षित व दुर्लक्षित राहिलेली आहे. स्त्रीपात्र करणारे एक प्रसिद्ध नट म्हणजे साहेबराव खराबे. ते पेशाने शिक्षक आहेत. साहेबराव यांनी 1953 ते 1987 पर्यंत विविध नाटकांत स्त्रीपात्रांच्या भूमिका समरसून साकारल्या. ते म्हणाले, ‘‘नाटकात पुरुषांनी स्त्रीपात्र साकारणे हे खरोखरच महाकठीण काम आहे. मी स्त्रीच्या अंगी असलेले माया, प्रेम, स्नेह, आवाजातील गोडवा, मृदुस्वभाव हे गुण नाट्यप्रयोगात प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एक महिना अगोदरपासून तयारी करायचो. मी एकदा का रंगमंचावर उतरलो, की मी पुरुष आहे हे विसरूनच जायचो. त्यामुळे कित्येकांना मी स्त्रीच वाटायचो. माझी अजरामर झाली ती ‘राजा हरिश्चंद्र’ नाटकातील ‘तारामती’ची भूमिका. 1962 ची गोष्ट. मी तारामती हे पात्र करत होतो. माझे पती राजा हरिश्चंद्र स्मशानात प्रेताना आग लावण्याचे काम करत असतात. माझ्या हातात मृतावस्थेतील मुलगा रोहिदास. मी मुलाचा खून केल्याचा आरोप करून प्रजा मला मारू लागते आणि मी स्मशानात जाते. हरिश्चंद्र मला ओळख दाखवत नाहीत. माझे हाल असह्य होतात. ते दृश्य पाहताना गावातीलच नव्हे तर नाटक बघण्यासाठी बाहेरगावाहून आलेली प्रेक्षक मंडळी ढसाढसा रडू लागत.’’

_puratan_baravश्री गणेश संस्थावनचे अध्यक्ष दीपक खराबे म्हणाले, की आम्ही कार्यक्रमपत्रिकेवर गावातील वयस्कर कै. शंकरराव खराबे यांनी दिलेल्या माहिती आधारे 2019चे ‘एकशेएकतीसवे वर्ष’ साजरे केले आहे. आमचा गणेशोत्सव पूर्णतया निसर्गस्नेही, ध्वनिप्रदूषण व जलप्रदूषण टाळणारा असा पर्यावरणपूरक आहे. मीरा खराबे म्हणतात,‘‘माझ्या गावातील प्रत्येक घराघरात नाटकात काम करणारी एकतरी व्यक्ती आढळते. मात्र, त्याची ना शासन दरबारी नोंद, ना कोठे दखल!”

गावात कालिकादेवीचा यात्रोत्सव चैत्र महिन्यात असतो. त्या दरम्यान वेगवेगळया ठिकाणांहून आलेल्या वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींचे प्रवचन होते. देवीचा छबिना (पालखी) सोहळा होतो. श्रावण महिन्यात पुरातन शिवमंदिरामध्ये महिनाभर उत्सव असतो. ते मंदिर हेमाडपंतांनी बांधलेले, शिल्पकलेचा उत्तम नमुना म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिरात वाढती गर्दी पाहून मंदिर समितीने सभागृह, पथदिवे, रस्ते यांची विकासात्मक कामे केली आहेत.

हेलस येथील महादेव मंदिराच्या समोर पुरातन बारव आहे. बारव तीस-तीस फूट चौरसाकृती पन्नास-पंचावन्न फूट खोल आहे. विहीर गावातील बऱ्याच कुटुंबांची पाण्याची तहान भागवते. पूर्वी त्या ठिकाणी पाणी काढण्यासाठी विशिष्ट प्रकारची सोय केली जायची, ती पाहण्यास मिळते. त्या बारवेचे बांधकाम दगडी आहे. तीत पावसाळ्यात पाणीच पाणी असते. बारवेचे बांधकाम नव्याने करण्यात आले आहे. मंदिराचाही जीर्णोद्धार गावकऱ्यांच्यावतीने झाला आहे. राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून त्या क्षेत्राची अनेक विकासकामे होत आहेत.

नवीन काळात गावात विविध जातिधर्मांचे लोक आपुलकीने व प्रेमाने वागतात. गावाची माती पांढरी आहे. त्यामुळे तेथे सर्व प्रकारची म्हणजे डोंगराळ, बागायती आणि पारंपरिक शेती होते. ज्वारी, बाजरी, तांदूळ, गहू अशी सर्वसामान्य पिके आहेत. हवामान कोरडे आहे. पावसाळ्यात पावसाचे प्रमाण जास्त असते.

हेमाद्रिपंत म्हणजे हेमाडपंती स्थापत्यकलेचा व मोडी लिपीचा उद्गाता हेमाद्री याच्या बांधकाम शैलीतील भग्नावस्थेतील शेकडो मूर्ती गावाच्या शिवारात सापडतात. मोडी लिपीत मजकूर लिहिलेले स्तंभ पूर्वी नदीवरील पांडवघाटावर सापडत, मात्र तसे मोजके स्तंभ त्या ठिकाणी शिल्लक राहिले आहेत. बरेच वारंवार येणाऱ्या पुराच्या पाण्यात वाहून गेले असण्याची शक्यता आहे. त्यासोबत तेथील कालिकादेवी मंदिर, महादेव मंदिर, बारा हनुमानांचे मंदिर, बारवा, ऐतिहासिक विटा असे पुरावे नजरेस पडतात. मात्र त्या संशोधनाबाबत दुर्लक्ष झालेले आहे. कारण हेलस गावाच्या दक्षिणेस बसलेल्या अवस्थेतील तीन फूट उंचीच्या दोन मोठ्या मूर्ती आहेत. गावातील काहीजण त्यास हेमाडपंत यांची मूर्ती म्हणतात तर काहीजण मामा-भाचे यांची मूर्ती असल्याचे सांगतात. परंतु त्याबाबत कोणालाच काही माहिती नाही.

_dhachaतेराव्या शतकात देवगिरीच्या यादव साम्राज्याचा पंतप्रतिनिधी म्हणून सक्षमतेने काम पाहिलेल्या, मोडी लिपीला राजाश्रय मिळवून दिलेल्या हेमाद्री पंडिताचा प्रभाव गावावर आहे. परंतु तो वारसा जतन करण्याकरता गावकरी आणि पुरातत्त्व खाते हे सक्षमपणे काही करताना दिसत नाहीत. हेलस गावाला शासनाकडून पर्यटनाचा ‘क’ दर्जा प्राप्त झाला आहे. पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष आणि गावात होणारी वास्तूंची नासधूस कशी सावरावी हे विचारी, संवेदनाशील नागरिकांना कळत नाही. गावात अनेक मूर्ती मंदिरासमोर पडून आहेत. काही लहान मूर्ती शेतात इतरत्र विखुरलेल्या दिसतात. पुरातन बारव (विहीर) ही आधुनिक खोदकाम केल्याने ढासळून गेली आहे. तिचे काहीच अवशेष शिल्लक आहेत. तीही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पुरातन खांबाचा वापर नाले झाकण्यासाठी केला जातो. उन, वारा, पाऊस यामुळे तो पुरातन साठा काही वर्षात नष्ट होऊ शकतो. त्या सर्व मूर्ती एकत्र करून शासनाने वास्तुसंग्रालय उभारावे अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

दीपक खराबे 9423274184

– संतोष मुसळे 9763521094 Santoshmusle1983@gmail.com
—————————————————————————————————

About Post Author

1 COMMENT

  1. धन्यवाद सर !
    तुमचा हा लेख मी…

    धन्यवाद सर !
    तुमचा हा लेख मी pdf द्वारे तुमच्या नावासाहित कॉपी करून घेत आहे , तुमच्यामुळे गावातील लोकांना गावच महत्व पटेल अशी आशा आहे !
    परत एकदा तुमचा धन्यवाद ,पुढील कार्यास शुभेच्छा???

Comments are closed.