भारतीय विद्यालयाचे मोर्शीचे इतिहास विभागप्रमुख प्रा. संदीप राऊत यांना सामाजिक भान आणि सामाजिक बांधिलकी यांचा वारसा घरूनच मिळाला आहे. सरांचे गाव दर्यापूर तालुक्यातील उपराई. त्या गावामध्ये पशुबळी देण्याची प्रथा होती. असे सांगतात, की त्यामुळे एवढी हिंसा व्हायची, की नदीचे पात्र पूर्ण लाल व्हायचे! गाडगेबाबा त्या गावात 1 एप्रिल 1954 ला आले, त्यांनी गावातील लोकांचे प्रबोधन केले आणि तो हिंसाचार थांबवला. राऊत यांनी पीएच डी साठी विषय ‘संत गाडगेबाबा यांचे सामाजिक कार्यातील योगदान – एक ऐतिहासिक मागोवा’ असा घेतला होता. त्या अभ्यासातून एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली. ते सांगतात, ‘गाडगेबाबा पुस्तकात सामावू शकत नाही. तो या मातीत रुजतो आणि मातीतून उगवतो, माणसाच्या मनात वसतो. सर्वसामान्य माणसाच्या बुद्धीचा आवाका लक्षात घेऊन साधीसोपी उदाहरणे देऊन विचार करण्यास लावणारे गाडगेबाबा विलक्षण आहेत.’ गाडगेबाबा देव दगडात नाही हे सांगतात तेव्हाच ते दशसूत्रीसारखा कृती कार्यक्रमही देतात. एकाच वेळी अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरा, शिक्षण, रोग्यांची शुश्रूषा, सार्वजनिक लोकहिताची बांधकामे अशी अनेक कामे करतात. हे सर्व कार्य करणारे गाडगेबाबा ढोंगी संतांपेक्षा कितीतरी वेगळे आहेत आणि हे समाजापर्यंत पोचले पाहिजे असे राऊत यांना वाटू लागले.
बबनराव मेटकर यांचा 6 एप्रिल 2013 ला अचानक मृत्यू अल्पशा आजाराने झाला. त्यांचे प्रबोधनाचे कार्य थांबते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा संदीप राऊत यांनी पुढाकार घेऊन बबनराव मेटकर स्मृतिप्रीत्यर्थ विचार प्रबोधन मालिका सुरू केली. ती सलग पाच वर्षे चालू ठेवली. त्यांनी मोर्शी, वरुड, चांदूर बाजार, तिवसा, अचलपूर, दर्यापूर व अंजनगाव या तालुक्यांतील दोनशेपंचावन्न शाळांमध्ये गाडगेबाबा आणि त्यांचे विचार पोचवले. राऊतसरांच्या ओघवत्या वक्तृत्वशैलीने मुलांपुढे गाडगेबाबा उभे राहतात, त्यांच्या आयुष्यातील प्रसंग जिवंत होतात. कार्यक्रम संपताच, ती मंडळी पुढील शाळेकडे निघून जातात. कोठलाही बडेजाव नाही; आपण काहीतरी मोठे काम करतोय याचा अहंकार नाही आणि प्रसिद्धीही नाही.
राऊतसर म्हणतात, गाडगेबाबा यांचे कार्य मार्ग दाखवणाऱ्या दीपस्तंभासारखे आहे. आपण एकविसाव्या शतकात जगत असताना व भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत असताना समाजात अंधश्रद्धा, निरक्षरता व व्यसनाधीनता प्रचंड प्रमाणात वाढत आहे. तसेच, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आदी अनेक समस्या देशापुढे आहेत. या गर्तेतून समाजाला बाहेर काढण्यासाठी गाडगेबाबांच्या लोककल्याणकारी विचारांची गरज आहे आणि त्या विचाराला कृतीची जोड देणेसुद्धा आवश्यक आहे. सर राष्ट्रीय सेवा योजनेचे(NSS) प्रमुख आहेत. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मदतीने त्यांनी पाणी अडवण्याच्या दृष्टीने बंधारे बांधले. त्यांनी स्वतः विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मोर्शी येथील बस स्थानक, उपजिल्हा रुग्णालय, विविध कार्यालयांचे परिसर कितीतरी वेळा स्वच्छ केले.
मानवी मूल्ये लोप पावतात की काय? अशी भीती आजच्या काळामध्ये निर्माण झाली आहे. समाजसेवा हा गल्लाभरू व्यवसाय झाला आहे आणि झाडू मारणे म्हणजे फोटो काढण्याचा ‘इव्हेंट’. अशा वेळी संदीप राऊत आणि त्यांचे सहकारी जे काम करत आहेत, ते आश्वासक चित्र निर्माण करते. त्यांच्या टीममध्ये पुढील प्राध्यापक आहेत- घनश्याम दाणे, मनोज वाहने, भैय्या चिखले, दया पांडे, सुभाष मोरे, स्वप्नील देशमुख, रुपेश वाळके, गौरव मेश्राम, प्रविण नवले, मनोज सपकाळ, राहुल हगवणे, प्रशांत कोकणे, योगेश मानकर, सुशील ढोले, गजानन कावळे.
– डॉ. आशिष लोहे 7775860581
(‘मीडिया वॉच’ विशेषांक, फेब्रुवारी 2018 वरून उद्धृत, संस्कारित)
———————————————————————————————————————————–