माझा संगीत सत्संग

0
35

भारतीय शास्त्रीय संगीताचा इतिहास सलग लिहिणे कठीण आहे. कारण संगीत ही काही सत्ता नाही. त्यामुळे राजकीय सत्तेचा तपशीलवार इतिहास लिहिला गेला तसा संगीताचा इतिहास उपलब्ध नाही. मुळात ‘तवारिख’सारखी काही परंपराच आपल्याकडे नव्हती. त्यामुळे इसवी सन 1000 च्या आधीच्या भारतीय इतिहासाची तारीखवार मांडणी सापडत नाही, तशीच ती संगीताचीही सापडत नाही. आधी एक तर्क निश्चित करून मगच त्या भूतकाळाकडे पाहवे लागते. त्यातच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात हिंदू आणि मुसलमान या दोन संस्कृती एकमेकांत केव्हा मिसळल्या आणि गुंतागुंत वाढली याची कालनिश्चिती करता येत नाही. मुसलमान संगीतकारांचा तपशीलवार इतिहासही त्यांच्या शिष्यांनी लिहिलेला सापडत नाही. अमीर खुस्रोपासून सुरुवात केली तर सदारंगापर्यंत त्या गाडीला स्टेशनच नाही. मधील कबीर परंपरेमध्ये शास्त्रीय संगीताचे उल्लेख सापडतात; पण तेही नंतर घुसवलेले असावेत. त्यातच कलाकार हिंदू असोत की मुसलमान, ‘अध्यात्मा’चाही विचित्र स्पर्श श्रेष्ठ कलाकारांच्या जीवनाला झालेला सापडेल. स्वामी हरिदास हे त्याचे एक उदाहरण ! गुरूकृपा हा तर सगळ्यांच्या परवलीचा शब्द. आत्मविसर्जन केल्याशिवाय गुरू प्रसन्न होत नाही आणि ते केल्यावर गुरू हा ईश्वररूपच होतो. त्यातून गुरूसेवेच्या दंतकथांचीही गर्दी निर्माण होते, जिचा संगीतचर्चेला काही उपयोग नसतो.

ही गुरूशिष्यपरंपरा गायक-श्रोता यांच्यातही अवतरते. श्रवणभक्ती वर्षानुवर्षे एकनिष्ठपणे करणारा श्रोता कलाकाराला आवडणे साहजिकच आहे. तशा श्रोत्यांच्या आठवणींना संगीतचर्चेमध्ये अकारण महत्त्व असते. ते महत्त्व श्रोत्याच्या वयाबरोबर वाढते, स्मरणशक्तीबरोबर नाही ! या निष्ठेमुळे, गायक आणि श्रोता या दोघांचाही काही विकास झाला नाही असाही एक अर्थ निघू शकतो. फार थोड्या दंतकथा (विलासखानी तोडीच्या निर्मितीची किंवा बाळकृष्णबुवा आणि शेजारच्या घरात पाणी भरणारा मुलगा, जो पुढे त्यांचा पट्टशिष्य झाला यांच्यामधील) संगीतचर्चेला मदत करतात.

जे व्यापक इतिहासाचे, तेच घराण्यांच्या इतिहासाचे. मात्र इंग्रजांच्या काही चांगल्या सवयी भारतीयांना परचक्रामुळे का होईना, 1850 नंतर लागल्या; त्यात इतिहासलेखनाची सवय महत्त्वाची होय. त्यामुळे सर्व प्रमुख घराण्यांचे मूळपुरूष, त्यांचे निकटचे शिष्य यांच्या कारकिर्दीचा काटेकोर नसला तरी ढोबळ आलेख उपलब्ध होऊ लागला. बहुतेक सर्व घराणी लहानमोठ्या संस्थानांच्या नावांची आहेत. हा योगायोग नव्हता. नियतीचा व्युत्क्रम असा, की राजकीय पारतंत्र्यात संपूर्ण देश अगतिक अवस्थेत सापडलेला होता, त्यावेळी घराण्यांच्या मूळपुरूषांची प्रतिभा आयाळ झडलेल्या सिंहांच्या अवस्थेला पोचलेल्या संस्थानिकांच्या आश्रयाने नुसतीच तगली नव्हती, तिला नवे धुमारे फुटत होते. संस्थानिकांनाही केवळ बायकांना ठेवण्यापेक्षा खेळ खेळून (क्रिकेट, टेनिस), शिकारीला जाऊन (इंग्रज रेसिडेंटची हौस पुरवण्यासाठी) वेळ जास्त चांगला घालवता येतो हे कळलेच होते. त्यांनी कलाकारांना आश्रय देऊन पुण्यसंचय केला होता !

भातखंडे-रातंजनकर यांच्यासारखे चिकित्सक, आधुनिक मेथडॉलॉजी समजलेले संशोधक येईपर्यंत वस्तुनिष्ठतेचा स्पर्श संगीतचर्चेला होणे शक्यच नव्हते. गायक/वादकाची जवळीक हाच माहिती मिळवण्याचा राजमार्ग होता. गुरूमुखी विद्येप्रमाणे कलाकारमुखी इतिहास प्रमाण मानणे भाग होते. पण मुळात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत इतके उदार, व्यापक (Liberal) होते, की घराण्यांच्याही शाखा-प्रशाखा तयार झाल्या, त्यांच्यामध्येही ‘आमच्या शाखेलाच घराण्याच्या मूळपुरूषापासून सर्वांत जास्त विद्या मिळाली’ असे दावे करण्याची सवय लागली. कोणता शिष्य/शिष्या गुरूच्या सहवासात किती वर्षे होता/होती याला महत्त्व आले. एकलव्याचे एरवी सर्वमान्य असलेले उदाहरण मागे पडले ! अनेक गुरूंची तालीम घेणारे चंचल ठरू लागले किंवा सगळीकडे अनौरस. भास्करराव बखले यांचा अपवाद करावा लागला, कारण त्यांची लोकप्रियता आणि संगीताच्या नव्या विद्यार्थ्यांना आकृष्ट करण्याची ताकद ! भास्करबुवांनी घालून दिलेला मैफलीचा ढाचाच गेल्या पंधरा-वीस वर्षांपर्यंत प्रचलित होता. परंपरेला जर लिखित इतिहासाचा आधार नसला तर दंतकथाच प्रसवतात ! वारकरी संप्रदायाचे जे झाले- इतिहास मागे पडला आणि भाकड कथांमध्येच ज्ञानेश्वरांपासून सगळे संत अडकले, तसेच शास्त्रीय संगीतकारांचे झाले. संगीत किस्से, खऱ्याखोट्या आठवणी, सांगोवांगीमधून येणारी अतिशयोक्ती (किती तास रियाझ केला किंवा कोणी एखादा राग किती तास ऐकवला इत्यादी) यांच्या भोवऱ्यात अडकले ! संतांच्या बाबतीत निदान त्यांच्या रचना छापील स्वरूपात उपलब्ध होत्या; रेकॉर्डिंगचा जमाना येईपर्यंत शास्त्रीय संगीत त्या बाबतीत वंचित होते. गायक/वादकाची मैत्री असली तर त्याच्या सहवासात राहता येते व जवळून पाहता येते हे खरे असले, तरी त्यातून त्याच्या संगीताचे मर्म कळेलच याची खात्री नसते. त्याची कारणे दोन- एक, जवळीक साधणाऱ्याची संगीत समजून घेण्याची कुवत किती आणि दुसरे, सहसा कलाकार स्वतःविषयी बोलण्यास तयार असतात ते वाहवा मिळवण्यासाठी, प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी नाही !

संगीतविषयक लेखन करण्याचे दोन मार्ग संभवतात असे दिसून आले. पहिला मार्ग लेखक व कलाकार यांची जवळीक कशी झाली, काही (कदाचित) अलौकिक प्रसंगांवेळी लेखक साक्षीदार कसा होता, काही वेळा मित्र कलाकार लेखकाशी अतिशय उत्कटपणे कसा वागला, कधी कधी त्याच्यासमोर लेखक नतमस्तक कसा झाला इत्यादी. अर्थात, या मार्गाने लिहिणाऱ्यांपाशी ते प्रसंग जिवंत वठतील असे लिहिण्याची ताकद महत्त्वाची असते. गोविंदराव टेंबे, कृ.द. दीक्षित, पु.ल. देशपांडे हे त्या मार्गाने गेले. त्यांच्या प्रभावाखाली अनेक ‘ब’ दर्ज्याच्या मंडळींनीदेखील संगीताविषयी मनापासून लिहिलेले आहे. सामान्य श्रोता समजतो तितके संगीत-संगीतकार अगम्य नसतात. ‘चला माझं बोट धरा, मी तुम्हाला त्यांच्यापर्यंत घेऊन जातो’ असा दिलासा देणारी ती मंडळी एक महत्त्वाचे सांस्कृतिक कार्य पार पाडत असतात !

दुसरा मार्ग अधिक शास्त्रीय, वस्तुनिष्ठ आणि संगीत समजण्यासाठी जास्त उपयोगी होता; त्याचा पाया प्रा.बा.र. देवधर यांनी घातला आणि अशोक रानडे यांनी तो पुढे नेण्यासाठी त्यांचे संपूर्ण करिअर वापरले. संगीत हे क्षेत्र व्यापक, विस्तीर्ण आहे, तरीही ते मानवनिर्मित आहे; त्यात साक्षात्कारी क्षण/अनुभव असले तरी ते माणसांनी अनुभवलेले असतात आणि त्यांनीच ते आत्मसात करून गळ्यातून/वाद्यांमधून प्रथमतः स्वतःच्या आनंदासाठी आणि परिणामस्वरूप म्हणून श्रोत्यांशी तो आनंद वाटून घेण्यासाठी (To Share) साकारलेले असतात. गुरूंबद्दल डोळस निष्ठा आवश्यक आहेच- मात्र उठसूट डोळसपणाचे पुरावे देण्याची गरज नसते. प्राथमिक अवस्थेत तरी विद्येचे स्वरूप गुरूमुखी असते. घराणी म्हणजे अभेद्य किल्ले नव्हेत आणि घराण्याशी इमान राखणे म्हणजे इतर घराण्यांशी वैर करणे नव्हे. परंपरा हे कलाकाराचे मोठे भांडवल असते, ती त्याची कमाई नव्हे आणि त्याच्यावरील ओझेही नव्हे. कलाकाराशी मैत्री ठेवावी ती त्याची कला समजून घेण्यासाठी, त्याच्या आहारी जाऊ नये आणि त्याला गिळंकृतही करू नये. अलौकिक वाटणाऱ्या कलाकारांचा चक्रमपणा, अशिष्ट सवयीही वेळप्रसंगी स्वीकारून त्यांच्या कलाकृतींपर्यंत पोचावे, उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत भारतातील इतर संगीताशी जोडावे, परस्पर तुलना करून पाहवी, सर्व गायक-वादकांचे स्वागतच करावे आणि संगीताचे शास्त्र, विद्या शिक्षण महत्त्वाचे आहेच; पण आनंद घेणे आणि देणे हे त्याचे खरे कार्य असते याचे भान ठेवावे !

विनय हर्डीकर 9890166327

(‘अंतर्नाद,’ दिवाळी अंक 2019 वरून उद्धृत)

——————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here