‘रापण’ हे कोकण किनारपट्टीवरील मच्छिमारीचे मुख्य साधन होते; त्याच बरोबर ती गावची घटना होऊन गेली होती. आमच्या तांबळडेग गावाला पहाटे कोंबडा आरवला की जाग येत असे. प्रत्येक घरचा कर्ता पुरुष तोंड धुऊन इतरांना जागवत समुद्रकिनारी पोचत असे. हळुहळू, लोकांचे थवे चहुबाजूंनी संपूर्ण किनारपट्टीवर गोळा होत. तोपर्यंत चिलीम, भुरगडी किंवा विडी... कशाचा तरी झुरका मारून, शारीरिक थकवा दूर करून ऊर्जानिर्मितीचे पुरुष लोकांचे काही काम चालायचे. मच्छिमारी धंद्याची प्रमुख केंद्रे मालवण, आचरा मुंबरी, कुणकेश्वर ही होती. तांबळडेगच्या किनाऱ्यावर दहा रापणी कार्यरत असल्यामुळे परिसर सकाळी गजबजून जात असे...