रुक्ष, ओसाड बरड : पालखीचा तेवढा विसावा ! (Barren Barad)

0
529

माणूस ज्या भूमीत, ज्या गावात-खेड्यात जन्मला त्या भूमीचा एकेक कण त्याला काशी, गया, मथुरा ह्यासम पवित्र-पावन असतो. तेथील काटेरी बोरीबाभळींना त्याच्या हृदयी पाईन-देवदारपेक्षाही वीतभर जास्तच उंची लाभलेली असते ! गाववेशीवरील म्हसोबा, वेताळ अन बिरोबा ही तर त्याची खरीखुरी ज्योतिर्लिंगे असतात ! बरड हे माझे गाव माझ्यासाठी प्रेमाचे तशा प्रकारे आहे. अन्यथा बरड गाव नावाप्रमाणे वैराण, उजाड आहे. ते सातारा जिल्ह्याच्या पूर्वेकडे आहे. ते गाव पुणे-पंढरपूर ह्या राज्य महामार्गावर फलटणपासून पूर्वेस अठरा किलोमीटर अंतरावर आहे. त्याच रस्त्यावर अठरा किलोमीटर अंतरावर सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते हे महत्त्वाचे गाव लागते. गाव बारामती नगरीपासून वीस किलोमीटरवर येते.

बरड गावाबद्दल इतिहासात कोठलाही भक्कम, सबळ व ठसठशीत पुरावा वा उल्लेख आढळत नाही. ‘बरड’ ह्या शब्दाचा अर्थ असा, की मानवी वास्तव्याचे स्थान, जे रुक्ष, ओसाड, सहसा विरळ लोकवस्तीचे असून, जेथे पिकपाण्याची टंचाई भासते. गो.नी. दांडेकर जेव्हा किशोरवयात संत गाडगेबाबांच्या छत्रछायेत मराठवाड्यात भटकत होते तेव्हा त्यांनी त्यांची स्मरणे त्यांचे आत्मचरित्र, ‘स्मरणगाथा’ या पुस्तकात उतरवली आहेत. त्यांनी एकदा अशाच निर्जन, रुक्ष अन् ओसाड भूमीस भेट दिली, त्या भूमीचा उल्लेख त्यांनी ‘बरड भूमी’ असा केला आहे. काहीजण बरड हे नामाभिधान ह्या गावास बेरड जातीवरून पडले असावे असा तर्क लावतात. मात्र बेरड लोकांची संख्या नगण्य आहे. ते बहुतांशी तेथून परागंदा झालेले आहेत. मात्र ‘बेरड’ हा शब्द साहित्यिक मंडळी अनेकदा जातीवाचक शब्द म्हणून न घेता, तो ओसाड, निर्जन, निष्पर्ण, नापीक मृदाभूमीकरता वापरतात, हे खरेच. कवयित्री ललिता गादगे त्यांच्या ‘उजाड उघडे माळरानही’ या कवितेत म्हणतात-

स्वागत करण्या वसंत ऋतूचे, रंग उधळले दिशा दिशांना
बेरड कोरड इथली सृष्टी, घेऊन आली ती नजराणा

गाव ओसाड व उजाड खडकाळ माळरानावर वसले असल्याने त्याचे नाव बरड असे पडले असावे. बरड गावाचा उल्लेख त्याच नावाने फलटणचे इतिहासप्रसिद्ध असे शूरयोद्धे ‘बारा वजिरांचा काळ: वणगोजी बाबा अर्थात वणंगभूपाळ’ ह्यांच्या आमदानीतही होता असे इतिहाससंशोधक सदाशिव शिवदे ह्यांचे मत आहे.

बरड गाव उष्ण, ओसाड व दुष्काळी छायेच्या भीतीदायक सावटाखाली मोडते. गाव समुद्रसपाटीपासून पाचशेपन्नास मीटर उंचीवर आहे. कोरडे-उष्ण वारे वर्षभर चालू असतात. बरड गावाच्या दक्षिणेस खटाव व माण हा रुक्ष, ओसाड, निर्जन अन् दुर्लक्षित भूप्रांताचा पट्टा येतो. बरड गावास दुष्काळाच्या झळा अलिकडच्या बदलत्या काही दशकांत अधिकच बसत आहेत. मात्र नीरा उजनी कालवा हा ह्या बरड प्रांताची प्राणवाहिनी ठरला आहे ! तो नाईक निंबाळकर ह्यांनी ब्रिटिश आमदानीत 1929-1939 समयी खोदला आहे. त्याच्या जलछायेत तेथील प्रजेचे जीवन व कृषी व्यवसाय तग धरून आहेत. तेथील जमीन काळी व मुरमाड असून कृषीव्यवसायही यथातथा आहे. ज्वारी, बाजरी, गहू, मका, कांदा व ऊस ही मुख्य पिके आहेत. बरेचसे होतकरू तरुण बारामती, कोल्हापूर व पुणे येथील उद्योगधंद्यांत काम करतात. बरड परिसरात शेती ह्या प्रमुख व्यवसायास पूरक म्हणून कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय अन् शेळी-मेंढीपालन केले जाते. महादेवाच्या डोंगररांगांच्या उत्तरेकडील उतारावर वर्षा ऋतूत इवलेसे भूमीअंतर्गत जलप्रवाह वाहतात व झरे उघडे पडतात. लोकमदतीतून मागील काही पिढ्यांनी बरडच्या आग्नेयेस कुरवलीजवळ व नैऋत्येस मिरढे गावाच्या टप्प्यात पाझर तलावाची निर्मिती केली आहे.

आषाढी एकादशीकरता पंढरीच्या वाटेवर जाणारी पालखी फलटणनंतर बरड गावी थांबते. पालखी विसाव्याचे स्थान बरड गावाच्या आग्नेयेस मोकळ्या विस्तीर्ण मैदानावर, ओढ्यालगत आहे. अर्जुनराव तेली ह्या अग्रणी व सढळ दानशूर उद्योजकाने पालखीच्या विसाव्याची व भोजनाची आर्थिक जबाबदारी चार-पाच दशकांपूर्वी स्वीकारली होती. अर्जुनराव तेली हे दयाशील गृहस्थ 1970-80 च्या दशकात होऊन गेले. त्यांची गोष्ट अशी सांगितली जाते, की त्यांची परिस्थिती बेताची होती, मात्र त्यांनी एके ठिकाणी जमीन घेतली. तेथे भूमीत धन सापडले. त्यानंतर दोन ठिकाणी जमीन घेतली, तेथेही धन सापडले. त्यांनी किराणा दुकाने, कापड दुकाने, शेतीविषयक मालाची दुकाने व कापूस पिंजण्याची जिनिंग असे उद्योग सुरू केले. त्यांनी दानशूर, पुण्यवंत व मायाळू मनुष्य म्हणून ख्याती प्राप्त केली. त्यांनी ‘पंढरीची वारी’ या सिनेमास व वारीस मदत केली. ते मृत्यू पावल्यानंतर पालखीची सर्व व्यवस्था बरडच्या ग्रामपंचायतीमार्फत पाहिली जाते. त्याशिवाय, महादेवाचा दिवंगत भक्त तेल्या भूत्या याची पालखी शिखर शिंगणापूरला सासवडवरून जाते. ती मानाची पहिली कावड आहे. ती बरडवरूनच जावली, आंदरुड, कोथळे व मुंगी घाटामार्फत जाते.

बरड गाव हे सध्या ज्या स्थळी आहे त्याच्या नैऋत्येस बरड-मिरढे रस्त्यावरील पाझर तलावाजवळ होते, असे वृद्ध गावकरी सांगतात. खरोखरीच, जुन्या, वस्ती उठून गेलेल्या गावाच्या खुणा दोन किलोमीटर अंतरावर आढळतात. जुन्या घरांची व मंदिरांची उद्ध्वस्त जोती, वृक्षांभवतालचे विस्कळीत पार… शिवा साळुंखे ह्या गावकऱ्यांनी तेथील काही फुटकळ वीरगळ उजेडात आणले आहेत. सध्याच्या बरड गावी तशा काही वास्तुखुणा- उदाहरणार्थ मंदिरे, वृक्षांचे पार, गढी-वाडा, शिलालेख काहीच आढळत नाहीत. ते गाव मिरढे रस्त्यावर जुन्या अवशेष स्थानावरून उठून राज्य महामार्गाजवळ पुनश्च वसले असल्याच्या गावकरी मंडळींच्या तर्कास त्यामुळे आधार लाभतो. बरड गावाच्या पूर्व सीमेवर मारुती मंदिराशेजारी शुक्रवारचा आठवडी बाजार भरतो. त्यालगत एक ओढा वाहतो. त्या ओढ्याच्या किनारी रंगरंगोटी केलेले महादेवाचे जुने मंदिर आहे. कंबरभर उंचीचे एकदोन वीरगळ समोरच्या चिंचेच्या खोडास टेकवून ठेवले आहेत. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा तळ तेथून आग्नेयेस माळरानावर पडतो.

काही मुस्लिम बांधव बरड गावाच्या पूर्व वेशीवर राहतात. गावाची रचना तीनचार वस्त्या व एक वाडी अशी आहे. बागेवाडी म्हणजे दीडेक हजार लोकवस्ती असलेली. ती बरड गावाच्या ग्रामपंचायतीत मोडते. तेथे एकही मुस्लिम कुटुंब नांदत नाही, तरी तेथील हिंदू बांधव गेल्या सात-आठ पिढ्यांपासून मुस्लिम मोहरम साजरा करतात. ताबूत विविधरंगी मढवून त्यांचे विसर्जन करतात. बागेवाडी-बरड गावास हिंदू-मुस्लिम ऐक्य व सलोखा असलेले गाव म्हणून लोकप्रियता लाभलेली आहे.

बरड गावात रामोशी, धनगर, फासेपारधी, बेरड जमात राहते. त्या जमातींचे इष्टदेव बिरोबा, सतोबा, धुळदेव वा धुळोबा हे महादेव डोंगरात राहतात. त्या जमाती धनगरांच्या मदतीने मेंढीपालन करतात. दहिवडी व म्हसवड येथे लोकर विकून घोंगडी व्यवसायास तेजी आणतात. बागेवाडी (बरड) येथील इमानी व काटक रामोशी बांधवांकडील ‘कारवानी’ जातीची कुत्री प्रसिद्ध आहेत. ती सडपातळ व लांब तोंडाची आणि अतिशय वेगवान असतात. त्या कुत्र्यांना मुधोळ जातीची शिकारी कुत्री (Mudhol Haund) म्हणून ब्रिटिश आमदानीत ओळखले जात असे. कारवानी कुत्र्याचा जगातील सर्वात वेगवान अशा प्राण्यांमध्ये सहावा क्रमांक लागतो. मात्र त्यांना ती प्रतिष्ठा लाभलेली नाही. ती कुत्री रामोशी व धनगर लोकांकडे बेवारस व महत्त्वहीन जगत असतात. बरडच्या दक्षिणेस सपाटीचे कुसळी गवताचे कुरण (Grassland) आहे. तेथे रानटी ससे व घोरपडी मागील दोन दशकांपर्यंत मिळत. त्यांची शिकार रामोशी व धनगर लोक कारवानी कुत्र्यांमार्फत करत. मराठा जात येथे शिवाजी महाराज जयंती उत्सव व रामोशी-धनगर बांधव आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची जयंती उत्साहाने साजरी करतात.

बरड गावापासून उत्तरेस बारामती, पूर्वेस माळशिरस, दक्षिणेस माण व खटाव असे तालुके आहेत. बरड गावापासून गुणवरे, कुरवली, जावली, निंबळक ही गावे चार-पाच किलोमीटर अंतरांवर आहेत. बरड गावाचे क्षेत्रफळ दोन हजार एकेचाळीस हेक्टर असून लोकसंख्या चार हजार तीनशेसत्याऐंशी आहे. घरांची संख्या नऊशे आहे. साक्षरता दर सत्तर टक्के आहे. गावाला जवळची रेल्वे स्थानके फलटण, बारामती अन् लोणंद अशी तीन तीन आहेत. बरड गावात प्राथमिक आरोग्य केंद्र, दोन मोठ्या बँकांच्या शाखा, प्राथमिक व मॉडर्न हायस्कूल आहे. किशोरांचा ओढा उच्च शिक्षणासाठी फलटण व बारामती या गावांकडे असतो. गावाचे संगणकीकरण झाले आहे.

बरड गावास कोठलेही प्रमुख ग्रामदैवत नाही, म्हणून कोठलीही प्रसिद्ध अशी यात्रा वा जत्रा तेथे भरत नाही. पालखीसोहळा व उरूस हेच तेथील मुख्य आकर्षण होय.

स्वादिष्ट, रुचकर अन चविष्ट अशी ओली भेळ बरड बसस्थानकासमोरील दोन उपहारगृहांत मिळते. भजी, भेळ व चहा हेच मुख्य आकर्षण. पुणे-पंढरपूर मार्गावर ढाबा संस्कृती पाय पसरत आहे. बरड गावाचे विशेष म्हणजे देशावरील खाद्यपदार्थ व देशी सातारी मराठी बोलीभाषा तिला धनगरी, रामोशी धाटणीतील शब्दांची फोडणी देत वापरली जाते. गावचे धनंजयराव सावळकर हे एम पी एस सी परीक्षेमार्फत थेट उपजिल्हाधिकारी पदावर निवडले गेले आहेत. ते अप्पर जिल्हाधिकारी म्हणून मुंबईला असतात.

राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक अन ऐतिहासिक अशा सर्व बाबतीत पिछाडीस पडलेले हे गाव सर्व आघाड्यांवर गावनामाचा अर्थ अधोरेखित करते की काय अशी भीती ग्रामस्थांना वाटते. पण तसे नाही. बरड गाव त्याच्या सभोवतालावरून खूप मोठे वाटते. नवव्या शतकातील राजपुतान्यावरील आक्रमणाने परमारवंशीय काही योद्धे सह्याद्री पठारावर आले. त्यांपैकी निंबराज परमार हे सहकाऱ्यांसमवेत शिखर शिंगणापूरजवळ महादेवाच्या डोंगररांगेत 1270 च्या दरम्यान राहिले. निंबराज (पहिले) परमार ह्यांना निंब (लिंब) वृक्षांच्या गर्द झाडीत देवी निंबजाई हिची मूर्ती सापडली. ते ठिकाण म्हणजे निंबळक गाव. निंबजाई देवीवरून निंबराजाच्या घराण्यास निंबाळकर हे आडनाव पडले. त्यांचे आधीचे आडनाव पवार हे होते. ते परमार ह्या क्षत्रिय राजपूत कुळापासून उत्पन्न झाले असे मानले जाते. इतिहास अभ्यासक निंबराज पहिला हा त्या घराण्याचा मूळ पुरूष मानतात. त्याच्या नावावरून निंबळक व निंबाळकर ही नावे पडली असल्याचेही समजतात. महंमद तुघलक (1325 -1351) हा देवगिरी (दौलताबाद) येथे राजधानी करून राज्य करत होता. निंबराज प्रथम याचा पुत्र पोडखल 1327 ला महंमद तुघलकाच्या सेवेत आला. अनेक युद्धांत भाग घेत तो अखेर एका युद्धातच मारला गेला. त्यानंतर पोडखलचा पुत्र निंबराज द्वितीय (1327-1349) याला तुघलकाने सरदारकीची वस्त्रे दिली; नाईक हा परंपरागत मानाचा किताब दिला. मोरचेल व मानाचा तोडा दिला. तेथून पुढे त्या संस्थानिक घराण्यास ‘नाईक निंबाळकर’ असे आडनाव मिळाले.

निंबराज द्वितीय ह्यांनी फलटण ह्या नगराची स्थापना 1330 मध्ये केली. ते निंबळक येथे गढीत वास्तव्यास होते. गढीचे पडके अवशेष आहेत. निंबाळकर घराण्याने निंबजाई देवीचा जीर्णोद्धार केला असून ते गाव बरडच्या वायव्य दिशेस चार किलोमीटर अंतरावर आहे. मुस्लिम पातशाही, आदिलशाही व निजामशाही यांच्याविरुद्ध बंडाचा झेंडा शहाजीराजे अन् शिवाजी महाराज यांच्याआधीही उभा करणारे वणगोजी ऊर्फ वणंगपाळ नाईक निंबाळकर हे फलटणचे. शहाजीराजांच्या आई अन् मालोजीराजे भोसले यांच्या पत्नी उमाबाई (दीपाबाई) ह्या वणंगपाळ ऊर्फ वणगोजी यांच्या भगिनी होत. जिजाऊ यांच्या मातोश्री म्हाळसाबाई या फलटणच्या. शिवपत्नी सईबाई ह्या फलटणच्या. सईबाई यांची कन्या सखुबाई ऊर्फ सकवराबाई ह्या बजाजी निंबाळकर यांचा पुत्र महादजी निंबाळकर यांच्या पत्नी होत. भोसले अन् निंबाळकर ह्यांचे असे रोटीबेटीचे संबंध पूर्वापार चालत आलेले आहेत. राजे वणंगपाळ यांनी पातशाहीविरुद्ध केलेले अयशस्वी बंड इतिहासकार स्वराज्य निर्मितीचे आद्य बंड मानतात.

शिखर शिंगणापूर हे धार्मिक स्थान बरड गावाच्या दक्षिणेस अठरा किलोमीटर अंतरावर माण देशात येते. देवगिरीचे यादव नरेश सिंघणराजा (1210-1247) ह्यांनी महादेवाच्या डोंगररांगांत महादेवाचे हेमाडपंती धाटणीचे शिवमंदिर बांधून तेथे सिंहणपूर गाव वसवले. त्यास शिखर शिंगणापूर हे नाव पडले. शंभू महादेवाचे लग्न विष्णू-लक्ष्मीने तेथेच चैत्र अष्टमीस लावून दिल्याचा उल्लेख पुराणात आहे. मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका असलेली शिवपिंड ही महादेव-पार्वतीचे प्रतीक मानले जाते. बरड गावाच्या दक्षिणेस महादेवाचा डोंगर ही उपरांग पसरलेली आहे. ती सिंहगडापासून सुरू होते व पूर्वेस सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बाणूरगड अर्थात प्रसिद्ध भूपाळगड येथे संपते.

बरड गावालगत महादेवाच्या डोंगररांगेत पूर्वेस शिंगणापूरशेजारी गिरवीजवळ वारुगड आहे. त्याच धारेवर पश्चिमेस ताथवडे गावाजवळ संतोषगड आहे. ताथवडे घाटातून पुसेगाव-सातारा मार्गावर वर्धनगड आहे. वारुगडाच्या दक्षिणेस दहिवडीजवळ  महिमानगड व रामायणाच्या दंतकथेत डोकावणारा सीतामाईचा डोंगर ही स्थानेही तेथे आहेत. धुळदेव, बिरोबा अन् सतोबा ही शिवाची निम्न दर्ज्याची मानली जाणारी अवतारस्थळेही बरडच्या दक्षिणेस त्या डोंगररांगेत आढळतात.

सतीश हणमंतराव शिंदे  9674031891 shindesatish15420104h@gmail.com

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here